भारतात ब्रिटीश राजवटीआधी समाजातील विविध घटकांमध्ये शैक्षणिकदृष्ट्या प्रचंड विषमता होती. ही विषमता दूर करून सर्वसामान्य जनतेत शिक्षण प्रसारासाठी झटणाऱ्या समाजसुधारकांना राजाश्रय देण्याचे काम ब्रिटीश भारतातील ५६५ संस्थानांपैकी मोजक्याच राज्यकर्त्यांनी केले. या राज्यकर्त्यांमध्ये बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे नाव आपल्याला अग्रक्रमाने घ्यावे लागेल.समाजसुधारकांना राजाश्रय देतानाच सयाजीराव महाराजांनी स्वतः आपल्या बडोदा संस्थानात केलेल्या शैक्षणिक कार्याचा दैदिप्यमान इतिहास आजवर दुर्लक्षित राहिला.
आजवर अज्ञात राहिलेल्या या विद्वान राजाच्या कर्तृत्वाची ओळख करून देण्याचा उपक्रम “महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती”च्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने हाती घेतला आहे. या समितीने २०१८ मध्ये पहिले १२ खंड प्रकाशित केले. पुढचे १३ खंड मिळून आतापर्यंत २५ खंडामध्ये एकूण ६२ ग्रंथ उपलब्ध झाले आहेत.यापैकी शिक्षण(महाराजा सयाजीराव यांच्या सुधारणा खंड २५ भाग १) हा डॉ. विशाल तायडे लिखित २०२ पृष्ठांचा ग्रंथ बडोदा संस्थानात सयाजीरावांनी केलेल्या शैक्षणिक क्रांतीचा परिपूर्ण इतिहास वाचकांसमोर मांडतो.
ग्रंथाच्या सुरुवातीला सयाजीरावांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणविषयक धोरण लेखकाने मांडले आहे.
सयाजीरावांनी १८९३ मध्ये अमरेली तालुक्यातील १० गावांमध्ये सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाची योजना प्रायोगिक तत्त्वावर लागू केली.
पुढे १९०६ मध्ये महाराजांनी संपूर्ण बडोदा संस्थानात सर्व जाती-धर्माच्या मुलामुलींसाठी मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा लागू केला.
हा कायदा लागू करणारे बडोदा हे भारतातील पहिले संस्थान होते. या कायद्याची लेखकाने मांडलेली प्रमुख १६ वैशिष्ट्ये सयाजीरावांच्या दूरदृष्टीचे ठोस पुरावेच आहेत.
सयाजीरावांनी जनतेच्या माध्यमिक शिक्षणासाठी बडोदा हायस्कुल(१८७१),‘द पाटण अँग्लो व्हर्नाक्युलर स्कुल’
(१८७९),‘फतेहसिंग इंग्लिश इन्स्टिट्यूट’ (१८९५), ‘गंगाधर मिक्स्ड स्कुल’(१९२३-२४)
यांसह संस्थानातील विविध ठिकाणी गुणवत्तापूर्ण शाळांची स्थापना केली.
प्राथमिक-माध्यमिक शिक्षणाने साक्षर झालेल्या जनतेला उच्चविद्याविभूषित करण्यासाठी सयाजीरावांनी राज्याधिकार प्राप्त झालेल्या वर्षीच (१८८१) बडोदा कॉलेजची स्थापना केली.
कृषिप्रधान सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच शेतीचे अत्याधुनिक ज्ञान मिळावे या उद्देशाने
सयाजीरावांनी १८८९ मध्ये बडोदा कॉलेजमध्ये स्वतंत्र शेतकी विभागाची स्थापना केली.
या विभागाशी संलग्न शेतजमिनीत विविध पिकांचे प्रयोगशील उत्पादन घेतले जात होते.
याचबरोबर विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्र शिक्षण देण्यासाठी सयाजीरावांनी १८९० मध्ये कलाभवनची स्थापना केली.कलाभवनमध्ये ६ विद्याशाखांचे सैद्धांतिक आणि प्रत्यक्ष व्यावहारिक शिक्षण दिले जात होते. संस्थानातील प्रत्येक विद्यार्थ्याला बडोद्यात येऊन कला भवनमध्ये तंत्र शिक्षण घेणे शक्य नव्हते. त्यामुळे संस्थानाच्या औद्योगिक प्रगतीसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याच्या उद्दशाने सयाजीरावांनी जिल्हा औद्योगिक शाळांची स्थापना केली. तंत्र शिक्षणाचे विकेंद्रीकरण करण्यामागील सयाजीरावांची भूमिका आज आपण समजून घेणे गरजेचे आहे.
स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली करून सयाजीरावांनी स्त्री उद्धाराच्या कार्यास सुरुवात केली. बडोदा संस्थानात १८७५ ला २ तर १९२६-२७ ला ३७५ मुलींच्या शाळा होत्या. महिलांना औद्योगिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने संपूर्ण संस्थानात तीन औद्योगिक शाळा उभारल्या. त्याचबरोबर पडदा पद्धत पाळणाऱ्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी झनाना वर्गाची स्थापना करण्यात आली.
समाजातील अस्पृश्य आणि आदिवासी लोकांसाठी सयाजीरावांनी राबवलेल्या शैक्षणिक योजनांचा लेखकाने संक्षिप्त आढावा घेतला आहे. १८८२ साली महाराजांनी सोनगढ येथे आदिवासी व अस्पृश्यांसाठी पहिली प्रत्येकी एक मोफत निवासी शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करतानाच महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली.१८८२ च्या कायद्यानुसार महाराजांनी आदिवासींसाठी प्राथमिक शाळा सुरू करून शैक्षणिक साहित्य आणि निवासाची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली.
आदिवासी विद्यार्थ्यांना शेतीचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी या शाळा संस्थानातील प्रायोगिक शेतीशी संलग्न केल्या. १८९६ ला सोनगड येथे आदिवासी मुलींसाठीची पहिली स्वतंत्र निवासी शाळा स्थापन केली.या समाजातील मुला-मुलींना बडोद्यातील १८८२ मध्ये सुरु झालेल्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षकी पेशाचे प्रशिक्षण दिले जाई. अस्पृश्य आणि आदिवासींसारख्या समाजातील वंचित घटकांच्या साक्षरतेसाठी सयाजीरावांनी राबवलेले शैक्षणिक धोरण आजही आदर्शवत ठरते.
महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीने २०१७ मध्ये महाराजा सयाजीरावांसंदर्भातील पहिल्या टप्प्यात १२ खंड प्रकाशित केले.
आता पुढील दुसऱ्या टप्प्यातील १३ खंडात ५० ग्रंथ डिसेंबर २०२० तयार झाले. दुसऱ्या टप्प्यातील ५० ग्रंथांचे प्रकाशन झाले आहे.
या समितीने समितीनिर्मितीपासून अवघ्या ४ वर्षात मराठी,
हिंदी आणि इंग्रजीत एकूण ६२ ग्रंथ तयार केले आहेत.या ६२ ग्रंथांची पृष्ठ संख्या २६,६४२ इतकी आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींसाठी शारीरिक शिक्षण हा विषय सक्तीचा करण्यात आला. १८९३ मध्ये ‘नेटिव्ह गेम्स इल्युस्ट्रेटेड’या स्थानिक खेळांचे विस्तृत वर्णन असणाऱ्या इंग्रजी पुस्तकाचे महाराजांनी गुजराती भाषांतर प्रसिद्ध केले. अशा प्रकारचे गुजरातीतील हे पहिले पुस्तक होते. महाराजांनी १९२० साली सर्व हायस्कूल आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये शारीरिक शिक्षकांची नियुक्ती केली. १९३१ पासून बडोदा कॉलेजमध्ये शारीरिक शिक्षण हे प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य करण्यात आले.
राज्यातील शारीरिक शिक्षण विभागाला स्काऊट चळवळ जोडून महाराजांनी व्यक्तिमत्व विकास प्रक्रियेला चालना दिली. उत्तम दर्जाच्या शैक्षणिक संस्था उभारताना या संस्थांची प्रशिक्षित शिक्षकांची गरज भागवण्यासाठी सयाजीरावांनी १८८२ मध्ये फिमेल ट्रेनिंग कॉलेज आणि १८८५ मध्ये पुरुष प्रशिक्षण महाविद्यालय सुरू केले. १९३० मध्ये महाराजांनी फिमेल ट्रेनिंग कॉलेजला ३०,००० रु. व मेल ट्रेनिंग कॉलेजला २६,००० रु. निधी मंजूर केला. लेखकाने उल्लेख केलेली ही रक्कम राज्याचे भवितव्य घडविणाऱ्या शिक्षकांना घडविण्याच्या महाराजांच्या प्रयत्नांना अधोरेखित करते.
पारंपरिक पुरोहितांची मक्तेदारी नष्ट करण्याच्या हेतूने मराठा जातीतील पुरोहित तयार करण्यासाठी सयाजीरावांनी १८९६ मध्ये पुरोहित पाठशाळा सुरू केली.
अंत्यज मुलांना धार्मिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने १९१३ साली बडोद्यात गरोडा पाठशाला सुरू करण्यात आली.
ब्राह्मणेतरांनाही धार्मिक शिक्षण देऊन पुरोहितांचा व्यवसाय करण्यास पात्र बनविले आणि पुरोहितांसाठी परवाना पद्धत सुरू केली.
धार्मिक शिक्षण देण्याची सयाजीराव गायकवाड यांची ही कल्पना आजही नवीन वाटते.
महाराजांनी शिक्षणशास्त्र, संशोधन, सॅनिटरी इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, धातुशास्त्र आणि खाणी, शिल्पकला, तालीम, औषधी, व्यापार, बागकाम, अर्थशास्त्र, आर्थिक आणि राजकीय तंत्र, नाणे आणि समाजशास्त्र, छापकाम आणि स्टेशनरी, पुस्तकालय, शेती, किंडरगार्टन, हॉटेल व्यवसाय, पोलीस कवायत, कायदा इ. विषयांचे उच्च शिक्षण घेण्यासाठी तरुणांना परदेशामध्ये पाठविले होते. परदेशातील ज्ञान, अनुभव आणि त्याआधारे बडोद्याचा विकास हे त्रिसूत्र सयाजीरावांच्या विचारांची सखोलता आणि व्यापकता स्पष्ट करणारे आहे.
लेखकाने दिलेल्या दाखल्यांवरून महाराजांना पुस्तकांबद्दल आणि पुस्तके लिहिणाऱ्यांबद्दल वाटणारी आत्मीयता व प्रेम यांची जाणीव होते.
सयाजीरावांनी बडोद्यात एक लाख पुस्तके असणारे आशिया खंडातील सर्वात मोठे ग्रंथालय उभारले.
याबरोबरच गाव तेथे ग्रंथालय,महिलांसाठी पत्र्याच्या पेटीतून घरपोच ग्रंथ योजना,
आयर्लंडच्या धर्तीवर फिरती ग्रंथालये,शिशु ग्रंथालये यांच्या माध्यमातून ग्रंथालय चळवळीचे मॉडेल उभारले.
शेतकी वर्ग, चित्रकला वर्ग, मुलांसाठी पाककला विद्यालय, संस्कृत विद्यालय, अनाथालय, बुक डेपो, जेल स्कुल, बटॅलियन स्कुल, किंडरगार्डन शिक्षणपद्धती, ग्रामशाळा, हस्तकला वर्ग, कारागिरांसाठी संध्याकाळची शाळा, आयुर्वेदिक महाविद्यालय, बडोदा सुधारगृह, मूकबधिर विद्यालय, बडोदा सेवा मंडळ, लेखक-विद्वानांची परिषद, पुरातत्त्व विभाग, राज्यस्तरीय शिक्षण परिषद, शिक्षण आयोग, नैतिक शिक्षण, रात्रशाळा, ज्ञानवर्धक सभा, फिमेल टीचर्स असोसिएशन, संग्रहालय, संगीत विद्यालय, प्राच्यविद्यामंदिर असे अनेक आगळे वेगळे शिक्षणासंदर्भातील उपक्रम सयाजीरावांनी यशस्वीरीत्या राबवले.
लेखकाने परिशिष्टात मांडलेला सयाजीरावांच्या कारकिर्दीत उभ्या राहिलेल्या बडोद्यातील एकूण २,५३४ विविध शिक्षणसंस्थांचा लेखाजोखा हा सयाजीरावांच्या शैक्षणिक क्रांतीचा आरसा आहे.
मुखपृष्ठावरील मांडणीपासून ते मलपृष्ठावरील मजकुरापर्यंत सयाजीरावांच्या शैक्षणिक कार्याची आणि लेखकाच्या प्रामाणिक प्रयत्नांची परिपूर्ण कल्पना आल्याशिवाय राहत नाही.
विकसनशील राष्ट्राकडून विकसित राष्ट्राच्या स्वप्नाचा पाठलाग करत असताना
सयाजीरावांच्या शैक्षणिक कार्याची आणि धोरणांची ओळख करून घेण्यासाठी या पुस्तकाचे वाचन गरजेचे ठरते.
लेखन – शिवानी घोंगडे, वारणानगर
(८०१०४४७७४०)
हे ही वाचा.. शोध सयाजीराव गायकवाडांचा – प्रेरणादायी कृतीकार्यक्रम
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 19 , 2021 7:00 AM
WebTitle – Article on the publication of Maharaja Sayajirao’s biography