चैत्यभुमी हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच स्मृतीस्थळ आहे आणि त्या स्थळाबाबत आपल्या मनात विशेष भावना असणे नैसर्गिक आहे. तिथे गेल्यावर मिळणारी ऊर्जा अद्भुत आहे हे मी मागच्या पोस्टमधे लिहीलेल आहे.पण ही अद्भुत उर्जा येते कुठून? तर हि अद्भुत ऊर्जा येते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपल्या मनात असलेल्या भावनेमुळे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मानव मुक्तीसाठी अखंड केलेला संघर्ष आणि त्या संघर्षाचा आपल्या जीवनावर पडलेला प्रभाव या प्रती आपल्या मनात असलेल्या भावानांमधून ही ऊर्जा निर्माण होतं असते. पण या उर्जेच रुपांतर आपण कश्यात करतो हा प्रश्न महत्वाचा आहे.
चैत्यभुमीला अभिवादनासाठी जाणारे तीन प्रकारचे लोक असतात. एक जे तासनतास रांगेत ऊभे राहून स्तुपात जाऊन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला फुलं,मेणबत्त्या, अगरबत्त्या वाहत असतात आणि दुसरे जे चैत्यभुमीवर सेवाकार्यात गुंतलेले असतात आणि तिसरे ते जे पुस्तकांच्या स्टॉलना भेटी देणे; राज्याच्या, देशाच्या कान्या कोप-यातुन आलेल्या मित्रांना, कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आलेले असतात.
बाबासाहेब थोडेफार समजु लागले
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविषयी तिनही प्रकारच्या लोकांच्या मनात सारखीच कृतज्ञता असते पण ती कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत मात्र वेगळी असते. लहानपणी मला सुद्धा अभिवादनाच्या रांगेत ऊभं राहणं खुप विशेष वाटायचं आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा तोच सर्वोत्तम मार्ग वाटायचा.बाबासाहेबांनी आपल्यासाठी येवढा संघर्ष केलाय तर आपण ४ तास रांगेत उभं राहील्यास काय बिघडलं असा विचार त्यामगे असायचा. पण, नंतर समजलं कि बाबासाहेब तर त्यांच्या विचारात आहेत आणि त्यांचे विचार ग्रंथांमधे आहेत. मग अभिवादनाची रांग सोडून मी शिवाजी पार्कवरील पुस्तकांचे स्टॉल पालथे घालु लागलो, जमेल तशी पुस्तकं विकत घेऊ लागलो.
आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथांचे ते गठ्ठे घेऊन शिवाजी पार्कवर मित्रांमधे मिरवण्यात खुपच गर्व वाटायचा. आपण अमुक-तमुक ग्रंथ विकत घेतले आहेत, वाचले आहेत अस चारचौघात सांगणं आणि संदर्भ देणं फार जबरदस्त वाटायचं. एकदम विद्वान असल्यासारखं भासायचं. हे असं करुन मी स्वत:ला हुशार आंबेडकरवादी समजु लागलो होतो. पण खरं सांगतो काही काळाने असं संदर्भ देऊन स्वत:ला हुशार सिद्ध करुन मला पोपट झाल्यासारखं वाटू लागलं. पोपट विटू विटू करु लागला, लोकांना नावाने हाका मारु लागला कि पब्लिक खुष होत, पोपटाला हुश्शार समजतं पण पोपट शेवटी पोपटचं असतो.ग्रंथ वाचण, ते पाठ असणं आणि त्या ग्रंथांच आकलन करणं यात फरकं असतो हे लक्षात येउ लागलं. आकलनाची कमतरता भरुन काढण्यासाठी मी मग ईतर आंबेडकरवादी अभ्यासकांना वाचु लागलो. त्यांच्याशी चर्चा करु लागलो, प्रश्न विचारु लागलो. यातुन माझ आकलन वाढतं गेल.बाबासाहेब थोडेफार समजु लागले. तेव्हापासुन बाबासाहेब समजुन घेण सुरुच आहे आणि ते शेवटपर्यंत सुरुच राहील.
आपल्या आंबेडकरवादी उत्क्रांती मधला एक टप्पा असवा.हा टप्पा आता पार करायला हवा
पण आपण बाबासाहेब समजुन घेउन काय करतो असा प्रश्न मागील काही वर्षांपासुन मला पडू लागलाय. बाबासाहेब वाचले, समजुन घेतले, जे समजलं ते जमेल ईतरांना सांगीतल पण पुढे काय असा प्रश्न मनाला पडू लागला आणि एक दिवस समजलं कि बाबासाहेब वाचण्याच्या, समजुन घेण्याच्या नादात आपण ग्रााऊंडवर काम करणचं विसरुन गेलो. वेवेगळ्या संस्था-संगठनां जॉईन केल्या. त्यातल्या एका संस्थेशी असलेली बांधिलकी आजही कायम आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सगळा संघर्ष हा समस्या, दु:ख निवारणासाठी होता. शोषणकारी व्यवस्था नाकारुन त्यांना समतवादी समाज व्यवस्था निर्माण करायची होती. त्यांनी केवळ अस्पृश्य नाही तर शेतकरी, कामगार आणि स्त्रियांच्या समस्या दुर करुन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची पराकाष्ठा केली. याबाबीत बाबासाहेबांच अनुकरणं करायचं राहूनच गेलं हे लक्षात आलं. आपल्या आसपास येवढ्या सगळंया समस्या असताना आपण अनेक वर्ष केवळ संदर्भ-संदर्भ खेळतं बसलो याच आश्चर्य वाटतयं. कदाचित आपल्या आंबेडकरवादी उत्क्रांती मधला एक टप्पा असवा. हा टप्पा आता पार करायला हवा.
आंबेडकरवादाची ती दोन साधनं म्हणजे धम्म आणि संविधान
आपल्या आसपास असणारे आणि समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी काम करणारे कार्यकर्ते हेच खरे प्रबुद्ध आंबेडकरवादी असल्याचे आता पटू लागलं आहे. भलेही त्यातले काही जण फार शिकलेले नसतील, भलेही त्यांनी बाबासाहेबांचे खंडच्या खंड वाचलेले नसतील पण तरीही त्यांना बाबासाहेब नेमके समजलेत हे लक्षात येऊ लागलं आहे. समाजा समोर समस्यांचा डोंगर ऊभा असताना बाबासाहेब वाचलेल्या समजलेल्या लोकांनी केवळ वैचारिक चर्चां आणि डिबेट्स मधेच रमणं हा शहाणपण नाही.
बाबासाहेबांचे ग्रंथ वाचुन, त्यावर चर्चा करणे आवश्यक असले तरी केवळ त्यामुळेच बाबासाहेब समजणार नाहीत.
बाबासाहेब समजून घेण्यासाठी त्यांच्या लिखाणासोबतच त्यांनी जे काम केल ते सुद्धा समजुन घ्याव लागेल.
त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांनी जी महत्वाची दोन साधनं जनतेला दिली
त्यांचा वापर करुन लोकांच्या समस्या सोडवणं हाच आंबेडकरवाद आहे असं आता वाटू लागलं आहे.
ती दोन साधनं म्हणजे धम्म आणि संविधान.
आंबेडकरवादी लिडरशीप
धम्म म्हणजे कर्मकांड नाही तर धम्म म्हणजे कर्मकांडातुन मुक्त होणं. स्वत:च स्वत:चा आधार होणंं, स्वत:तलं आणि ईतरांमधलं माणुसपणंं जपणं आणि वाढवणं. धम्माच मुख्य प्रयोजन हे स्वत: सह ईतरांचे समस्येतुन, दुखा:तुन, शोषणातुन मुक्त करणे आहे. संविधानाने जी शासकिय, प्रशासकीय, राजकीय व्यवस्था निर्माण केलेली आहे ती मुख्यत: जनतेच्या समस्या सोडवण्यासाठीच, जनतेच दुख: दुर करण्यासाठीच निर्माण केली आहे. ही व्यवस्था आज संविधानकारांना अपेक्षित रित्या काम करत नसल्यामुळे जनतेच्या समस्यांमधे, दुखा:मधे वाढ झाली आहे. या दोनही साधनांचा उपयोग सामान्य जनतेचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी केल्याशिवाय आपण स्वत:ला आंबेडकरवादी म्हणऊन घेऊ शकत नाही.
जातीव्यवस्थेचे निर्मुलन हा जरी आंबेडकरवादी चळवळीचा केंद्रबिदु असला तरी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकरी, कामगार आणि स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी काम का केले याचे तात्विक उत्तर काहीही असले तरी त्याचे व्यावहारीक उत्तर हेचं आहे की जो पर्यंत आपण ईतर शोषित, वंचित वर्गाला त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करत नाही तोपर्यंत आपली चळवळ सशक्त होणार नाही. याचाचा अर्थ एकाच जातीच्या किंवा वर्गाच्या समस्यांवर चळवळ करुन आपली चळवळ मोठी होणार नाही. त्यामुळेच आंबेडकरवाद्यांनी सुद्धा केवळ जातकेंद्री चळवळ न करता शेतक-यांचे, कामगारांचे, ईतर समदु:खी समुहाचे, लिंगभेदाचे प्रश्न हाती घेतले पाहीजेत. या प्रश्नांवर काम करणारी आंबेडकरवादी लिडरशीप निर्माण झाल्याशिवाय आंबेडकरवादी चळवळीचा व्यापक परिघ ख-या अर्थाने देशाला समजणार नाही.
सरकारच्या आर्थिक धोरणांचा आपल्या रोजच्या जीवनावर होणारा परिणाम
जोपर्यंत लोकांच्या रोजच्या जगण्याच्या समस्या, नागरी समस्या, सांडपाण्याच्या समस्या सोडवणे हा सुद्धा आंबेडकरवाद आहे हे आपल्याला समजणार नाही तो पर्यंत लोकांना आबेडकरवाद आपलासा वाटणार नाही. समस्या कोणतीही असो या समस्यांचा सर्वाधिक त्रास हा शोषित, वंचित समुहांनाच जास्त होतो हे जाणुन काम करणारे कार्यकर्ते जो पर्यंत निर्माण होत नाहीत तो पर्यंत आंबेडकरी चळवळ ही केवळ जातकेंद्री आणि पर्यायाने जातीपुरतीच मर्यादीत राहणार नाही. बिगर आंबेडकरवादी लोक आणि आंबेडकरवादी कार्यकर्ते यांच्यात जे एक प्रकारच अंतर निर्माण झालं आहे त्याच महत्वाच कारण हेच आहे कि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर वैचारिक चर्चा करणारे लोक हे जनतेच्या रोजच्या जगण्याच्या प्रश्नांवर काम करताना अभावानेच आढळून येतात.
आरक्षण, जातिय अत्याचार, महापुरुषांचे विचार या पलिकडे आपल्या चर्चा सरकत नाहीत. मी असं म्हणत नाही कि अर्थशास्त्रात पीएचडी असणा-या व स्वत:ला आंबेडकरवादी प्राध्यपकाने सांडपाण्याच्या प्रश्नावर नगरपालिकेला फे-या माराव्यात पण त्यांनी निदान लोकांना समजेल अश्या भाषेत सरकारच्या आर्थिक धोरणांचा आपल्या रोजच्या जीवनावर काय चांगला-वाईट परिणाम होतो हे तरी सांगायला हवं.
मुक्तीपथ
अर्थशास्त्राच्या परिषदेत क्लिष्ट शब्द आणि आकडेवारीच्या माध्यमातुन विद्वत्ता सिद्ध करणे जेवढे महत्वाचे आहे.
तेवढेच सामान्य लोकांशी त्यांना समजेल अश्या भाषेत संवाद साधणे सुद्धा आवश्यक आहे.
कारण शेवटी अर्थशास्त्र हा विषय थेट लोकांच्या जगण्याशी जोडलेला आहे.
या पीएचडी धारक प्राध्यापकांनी सांडपाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी नगरपालिकेला फे-या मारल्या
तर उत्तमच कारण प्रशासन त्यांना अधिक चांगला प्रतिसाद देण्याची शक्यता आहे.
सांगण्याचा हेतु हाच की शोषित, वंचित कोणिही असो त्यांच्या समस्या सोडऊन त्यांना सोबत घेणे हाच मार्ग आंबेडकरवादी चळवळीला पुढे नेणारा आहे. चळवळीचा परिघ मोठा करणारा आहे. तोच मुक्तीपथ आहे. हे micro level ला ते होत आहे पण micro level ला सुद्धा ते मोठ्या प्रमाणात झालं पाहीजे. यातुन केवळ आंबेडकरवादी समाजकारण नाही तर आंबेडकरवादी राजकारण सुद्धा पुढे जाणार आहे. त्यासाठी शासकीय-प्रशासकीय व्यवस्था कसं काम करते हे माझ्या सारख्या थोडफार वाचन असलेल्या लोकांना शिकून घ्यावं लागणार आहे.
संविधानाचा सन्मान
वैचारीक चर्चांच्या हस्तिदंती मनो-यातुन उतरुन आता जमिनीवर थोडं काम करावं लागणार आहे.
संवैधानिक मार्गाने बिनबोभाट असं काम करणारे अनेक कार्यकर्ते आसपास आहेत.
या कार्यकर्त्यांमुळेच चळवळ टिकुन राहणार आहे, यांच्यामुळेच संविधानाचा सन्मान होणार आहे.
जे अभ्यासु आणि हुशार कार्यकर्ते अस काम करतं आहेत त्यांच्याकडून काही गोष्टी शिकुन घ्याव्या लागणार आहेत.
बाबासाहेबांचे विचार आणि कार्य लोकांपर्यंत पोहचणं जेवढं महत्वाच आहे
तेवढचं कृतीशिल आंबेडकरवादातुन सर्वांना आपल्यासोबत जोडुन घेतं पुढे जाण सुद्धा तेवढचं महत्वाच आहे.
मागच्या १५ दिवसांपासून महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक वैचारीक लेख लिहीण्याची तयारी करत असताना
एका प्रबुद्ध माणसाचा फोन आला आणि आपल्या फोलपणाची जाणिव झाली.त्यातुन मनात जी काही ढवळाढवळं झाली ती ईथे मांडली आहे.
माझं स्वत:च मत काय आहे यावर मी विचार करु लागलोय
दरवर्षी चैत्यभुमी ग्रंथ खरेदी करुन अभिवादनाचं कर्मकांड पार पाडणारा मी कदाचित थोडा भानावर आल्याची शंका मला स्वत:विषयी येऊ लागली आहे.
बाबासाहेबांची ग्रंथसंपदा केवळ कपाटांची शोभा वाढवण्यासाठी नाहीत तर वाचण्यासाठी आहे.
केवळ वाचनं महत्वाच नसुन त्यात बाबासाहेबांनी मांडलेला विचार समजणं जास्त महत्वाच आहे.
जो पर्यंत बाबासाहेबांच्या समजलेल्या विचारांचे रुपांतर कृतीत होत नाही
तो पर्यंत तो विचार आपल्याला समजलां असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कृतीच्या पातळीवर माझी पाटी बरिचशी कोरी आहे.
येणा-या काळात ही कोरी पाटी जमेल तशी भरुन काढणे हेच माझ्यासाठी आंबेडकरवाद समजणं असणार आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथसंपदेवर क्लिष्ट वैचारिक चर्चा करुन मिळणारा आनंद ईगोला सुखावणारा असला तरी
आता ईगोच्या सुखासिनतेच्या आसक्तीवर मात करुन आता पुढे सरकावं लागणार आहे.
एखाद्या प्रश्नावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मत काय होते हे मुखोद्गत असण्यापेक्षा
आता माझं स्वत:च मत काय आहे यावर मी विचार करु लागलोय.
दिपस्तंभाचा खरा सन्मान
एक आंबेडकरवादी म्हणून मी जर माझ्या स्वतंत्र बुद्धीने विचार करु शकत नसेल तर तो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर केलेल्या संघर्षाचा अपमान ठरेल कारण बाबासाहेबांचा सगळा संघर्ष हा आपल्या सर्वंकष मुक्तीसाठी होता, आपल्या खांद्यावर आपल डोकं आहे आणि त्या डोक्यात मेंदू आहे. या मेंदुचा वापर आपण स्वतंत्र बुद्धीने करुन माणुस म्हणुन आपल्या अंगभुत गुणांचा विकास करावा याच साठी तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष होता ही बाब लक्षात न घेता आपण निव्वळ पोपट बनुन राहणे बाबासाहेबांना सुद्धा अपेक्षित नव्हते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दिपस्तंभाप्रमाणे आहेत. समुद्रात जहाज भरकटू नये, त्यांना योग्य दिशा मिळावी यासाठी दिपस्तंभ ऊभारले जातात. समुद्र कितीही ऊधाणलेला असला, तुफान पाऊस, वादळवारा असला तरी त्या सगळ्यांशी भिडत दिपस्तंंभ ठाम उभे असतात. जहाजांना दिशा देण्याच अखंड काम करतं असतात. ही जहाज जर नवी क्षितिज काबिज न करता दिपस्तंभोवतीच नांगर टाकुन बसली तर लक्ष्यापर्यंत पोहचतील का? बाबासाहेबा नावाचा दिपस्तंभ पाठीशी असताना या जहाजांनी समुद्रात खोलवर प्रवास करुन नवी नवी क्षितिज काबिज केली पाहीजेत. तसं केल्यानेच त्या दिपस्तंभाचा खरा सन्मान होणार आहे.
स्वतंत्र प्रज्ञेचा माणूस घडवण्यासाठी
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सगळा संघर्ष आपली पिढ्यानपिढ्यांची मानसिक गुलामी नष्ट करुन
स्वतंत्र प्रज्ञेचा माणूस घडवण्यासाठी असताना आपण केवळ पोपट बनुन राहणे
हा खरचं आंबेडकरवाद आहे का यावर विचार झाला पाहीजे.
जसा धम्म नित्य नुतन सनातन आहे तसाच आंबेडकरवाद सुद्धा नित्य नुतन सनातन आहे
पण त्यासाठी केवळ पोपटपंची न करता स्वतंत्र प्रज्ञेने विचार करणारे, ज्ञाननिर्मिती करणारे,
नवनिर्मिती करणारे, कृती करणारे लोक निर्माण होणे.
संवैधानिक मार्गाचा अवलंब करुन लोकांच्या समस्या, दु:ख, दुर करणारे कार्यकर्ते निर्माण होणे
हेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना खरं अभिवादन ठरणार आहे.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस, विचारांस आणि कार्यास विनम्र अभिवादन.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कृत राष्ट्रभाषा करण्याचा दावा खरा आहे?
भगवान बुद्धांचे दोन महत्वाचे संदेश
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
( @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 04, 2021 23: 20 PM
WebTitle – While paying homage to Dr. Babasaheb Ambedkar
Very nice touching article.
अप्रतिम लिहीले