“जयभीम” सिनेमा मध्ये हिरो शोधायचाच असल्यास खरा हिरो नुसता चंद्रु नाही, जयभीमचा हिरो संविधान आहे.आपल्याला संविधान वाचवायचं आहे ते ह्यासाठी – पोलिस कस्टडी मधलं टॉर्चर आणि मृत्यू भारतात काही नवीन नाहीत. ह्यात सर्वाधिक बळी पडणारे लोक दलित आदिवासी आहेत. जे ह्यातूनही जगतात त्यांची आयुष्ये कोर्टाच्या आणि पोलीस ठाण्याच्या चकरा मारत भरडली जातात. भरडवली जातात. मागे कधीतरी द हिंदू मध्ये वाचल्याचं आठवतं -भारतात सरासरी दररोज पाच माणसं पोलीस कस्टडी मध्ये मरतात. मारली जातात. ही मरणारी लोकं बहुतांश कोणत्या जातीची कोणत्या धर्माची आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. ज्यांच्या हातून ही मारली जातात ते पाशवी पोलीस अधिकारी आणि त्यांना जातीची रसद पुरवणारी पोलादी व्यवस्था अंतर्बाह्य ब्राह्मणी मनुवादी आहे. स्वातंत्र्यानंतर लोकशाही प्रजासत्ताक व्यवस्था आपण स्वीकारली.राजा असो वा रंक.
“जयभीम” चित्रपट ह्या वास्तवावर टाकलेला लख्ख प्रकाशझोत
घटनेने सर्वांना समान पातळीवर आणून ठेवले. व्यक्ती, व्यक्तीचे मूलभूत अधिकार, वंचित शोषित घटकांचे हक्क, संरक्षण आणि उत्थान, त्यासाठी अहोरात्र कार्यरत असावी लागणारी खंबीर न्यायव्यवस्था – ही सर्व भारतीय राज्यघटनेची माणसाला माणूस म्हणून आत्मसन्मानाने जगता यावे ह्यासाठीची कालातीत सुत्रं आहेत. मात्र व्यवस्था चालवणारे हात कत्तलखोर निघाले आणि दलित आदिवासी समाजावरील अत्याचाराचा वरवंटा स्वातंत्र्यानंतरही अविरत बेमुर्वतखोरपणे फिरतच राहिला आहे. “जयभीम” चित्रपट ह्या वास्तवावर टाकलेला लख्ख प्रकाशझोत आहे.
संविधान सभेतील भाषणात बाबासाहेब म्हणतात – “If we wish to maintain democracy not merely in form, but also in fact, what must we do? The first thing in my judgment we must do is to hold fast to constitutional methods of achieving our social and economic objectives”.
जयभीम सिनेमा चा हिरो संविधान आहे.
“जयभीम” मधील वकील चंद्रू नेमकं हेच तर घडवून आणतो.
व्यवस्था बड्या ठरवलेल्या जातींच्या सनातनी धेंडांचे चोचले पुरवताना कधीही थकत नाही,
मात्र शोषित घटकांनी टाचा घासून मरावे अशी यंत्रणा मात्र राजरोस राबवते.
ह्या क्रूर यंत्रणेला तिच्याशी लढा देत अक्षरशः सर्वस्व गमावलेल्या सेंगिनीच्या पायांशी शरण आणून
“मॅडम सरकारी जीप मध्ये बसा” अशी विनवणी करायला लावण्याचे बळ संविधानात आहे हा विश्वास “जयभीम” आपल्याला देतो. “जयभीम” मध्ये हिरो शोधायचाच असल्यास खरा हिरो नुसता चंद्रु नाही, जयभीमचा हिरो संविधान आहे. आपल्याला संविधान वाचवायचं आहे ते ह्यासाठी , शेवटच्या माणसांच्या हक्कांसाठी, शेवटची ठरवलेली माणसं कायमचीच शेवटची राहू नयेत ह्यासाठी. एवढं जरी साध्यातल्या साध्या प्रेक्षकाला कळलं असेल तरी “जयभीम” सफल झाला आहे असं म्हणावं लागेल. “जयभीम”चे नाव “जयभीम” का आहे ह्या प्रश्नाचं उत्तर ह्यातच आहे.
सिनेमा पाहून कित्येक लोकं अस्वस्थ
“जयभीम” सिनेमा आंबेडकरवादी assertion आहे की नाही, तांत्रिक दृष्ट्या ती आंबेडकरवादी कलाकृती आहे की नाही, तिच्यात आंबेडकरवादी फ्रेम्स आहेत की नाहीत ह्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही.”जयभीम” व्यवस्थेने अतोनात दुर्लक्षित केलेल्या, गुन्हेगारीकरण केलेल्या अनेकानेक जातींच्या संघर्षाबद्दल आजवर सपशेल ignorant राहिलेल्या माणसांच्या संवेदना खडबडवून जागी करू शकणारी ताकदीची कलाकृती आहे एवढं आजघडीला पुरेसं आहे. कोडगेपणाचा भडक मेकप लावून झुंडीच्या झुंडी जिथं देश, संविधान खड्ड्यात घालायला बसले आहेत तिथं अस्वस्थ होणं ही कोणत्याही कृतीकार्यक्रमाची पहिली पायरी असते.”जयभीम” पाहून कित्येक लोकं अस्वस्थ झालीत ही चांगली गोष्ट आहे.
जयभीम ही जाणीव विचारातून कृतीतून रुजली जाण्याची गरज आहे
कोणत्याही बदलाची सुरुवात अशीच घडते. स्टेप बाय स्टेप. One thing at a time. सोशल मिडियाने “जयभीम” हा शब्द सोशल मिडिया पुरता का होईना पण ठळकपने फोकस मध्ये आणला, जिवंत ठेवला, त्याची ताकद वाढवली. मेनस्ट्रीम मीडियानं आजवर प्रचंड हेटाळणी केलेला हा शब्द असा अस्खलितपणे एका चित्रपटाचं नेमकं शिर्षक बनतो ही गोष्ट प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आंबेडकरवादी चळवळीची कमाई आहे असं मला वाटतं.
जग आपली दखल घेत आहे, घ्यायलाच लागणार आहे ह्यावर झालेले हे शिक्कामोर्तब आहे. ते सेलिब्रेट करायला हवं. मला असंही वाटतं की आंबेडकरवाद्यांपेक्षा हा चित्रपट बनला आहे तो सर्वसामान्य लोकांसाठी, कोअर चळवळीच्या बाहेरच्या लोकांसाठी, “जयभीम” ही जाणीव विचारातून कृतीतून रुजली जाण्याची गरज आहे ती सर्वसामान्य लोकांची. ह्या बदलाचे अवकाश व्यापक होत जाऊन “जयभीम” आज न उद्या तळागाळात हमखास रुजत जाईल.
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
हे वाचा जय भीम चित्रपटातील ती केस कायद्याच्यादृष्टीने का महत्वाची जाणून घ्या
जय भीम चित्रपट:पोलिसांनी बॅग भरून लाच देण्याचा प्रयत्न केला न्या.चंद्रू
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
Jai bhim film Review – इरुलर जमातीचे भेदक चित्रण करणारा सिनेमा ‘ जयभीम ‘
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 12, 2021 10:05 AM
WebTitle – The real hero in Jayabhim cinema is not just the chandru it is the constitution