Jai bhim film Review – ब्रिटिश काळात काही जमातींवर गुन्हेगार जमात म्हणून शिक्का मारण्यात आला होता. कुठेही गुन्हा घडला तर त्या ठिकाणा पासून जवळ असलेल्या गुन्हेगार ठरविलेल्या जमातीतील आदिवासी स्त्री पुरुषांना कुठली ही चौकशी नाकारतात जेलमध्ये टाकण्यात येत होते व त्यांच्यावर चोरीचा आरोप ठेवण्यात येत होता. महाराष्ट्रात फासेपारधी, रामोशी, कैकाडी आदी जमातींवर हा शिक्का मारण्यात आला होता तर तामिळनाडूत इरुलर, कुरवा सारख्या जमातींवर गुन्हेगार जमात म्हणून शिक्का मारण्यात आला होता.
घटनेने सर्वांना समानतेचा अधिकार दिला, ह्या जमातीवरील गुन्हेगारी जमात हा शिक्का पुसला, यांच्या उत्थानासाठी अनेक तरतुदी केल्या पण ना त्या तरतुदी त्यांच्या पर्यंत पोहचल्या ना पोलिसांच्या व्यवहारात काही फरक पडला. पोलिसांच्या दृष्टीने त्या आजही गुन्हेगारी जमाती आहेत. तामिळनाडू पोलिसही त्यास अपवाद नाहीत. १८८८ मध्ये ब्रिटिश पोलिसांचा ह्या जमातींबद्दल जो दृष्टिकोन होता तोच दृष्टिकोन आजही तामिळनाडू पोलिसांचा आहे.
Jai bhim film Review
जयभीम हा सिनेमा १९९० च्या दशकात घडलेल्या सत्य घटनेवरील असून ह्यात राजकन्नू आणि पार्वती या कुरवा जमातीतील पती पत्नीची हृदय द्रावक गोष्ट असून त्याच्या न्यायहक्कांसाठी लढणाऱ्या वकिलाची म्हणजेच चंद्रुची ही गोष्ट आहे. लेखक दिग्दर्शक यांनी येथे लेखनाचे , क्रिएटिव्हिटीचे स्वातंत्र्य घेतले असून अतिशय कष्टमय जीवन जगणाऱ्या इरुलर जमातीचे चित्रण करण्यासाठी राजकन्नू व पार्वती( सिनेमातील नाव सेंगनी) याना इरुलर जमातीचे दाखविले आहे. बांबूपासून टोपल्या, चटाया व विविध वस्तूं बनवून विकणे हे त्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन होते. उंदीर हे त्यांचे एक महत्वाचे अन्न होते. उंदीर हे शेतातील अन्नाची नासाडी करतात म्हणून त्यांना पकडणे किंवा मारणे महत्वाचे असते.
इरुलर जमातीतील लोक शेतात जाऊन उंदरांच्या बिळात धूर करून खाण्यासाठी उंदीर पकडतात हे सिनेमातील दृश्य माणसाला अस्वस्थ करते. उंदरांना खाण्यासाठी साप येत असतात प्रसंगी सर्प दंश होत असतो पण ह्या जमातीतील निष्णांत वैद्य सर्प दंशावर औषध देतात व माणसांना मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढतात. येथे नायिका सेंगनी ही सर्प दंशावर औषध देत असते. गावातील व्यक्तीला सर्प दंश होतो तेव्हा सेंगनी औषध देऊन त्यास वाचविते ह्या दृश्यापासून सिनेमा मनाची पकड घेतो.
वकील चंद्रू हा संविधानावर,न्यायावर विश्वास असणारा लढाऊ बाण्याचा निष्णांत वकील
अगदी बारीक सारीक तपशीला सह इरुलर जमातीच्या जगण्याचे हृदयदावक चित्रण पडद्यावर एकामागोमाग एक सरकत राहते. पुढे गावातील सरपंचाच्या घरी चोरी होते आणि आरोपी म्हणून चोरी नकेलेल्या इरुलर जमातीतील लोकांना म्हणजे राजकन्नू आणि इतरांना गुन्हेगार म्हणून अटक केली जाते. यांनी कुणीही चोरी केली नाही म्हणून सेंगनी व इतर स्त्रिया आक्रोश करतात, पटवून देण्याचा प्रयत्न करतात पण पोलीस त्यांचे काही न ऐकता त्यांनाही पोलीस कस्टडीत टाकतात आणि इथून सुरू होते त्यांच्या अमानवीय छळाची सुरवात.
मद्रास हाय कोर्टात , मानवीहक्कांसाठी लढणारा, स्रीयांच्या व गरींबाच्या केसेस विनामूल्य लढणारा ,
सर्वाच्या मदतीला धावणारा चंद्रू वकील राजकन्नू व त्याचे सहकारी यांची केस घेतो
व सरकार आणि पोलीस विरूध्द चंद्रू असा प्रदीर्घ न्यायालयीन संघर्ष उभा राहतो.
वकील चंद्रू हा संविधानावर , न्यायावर विश्वास असणारा लढाऊ बाण्याचा निष्णांत वकील असतो.
ढोबळ बटबटीत फिल्मी डायलॉग नाही,निरर्थक ज्ञानाचे डोस पाजणे नाही
पोलिस कस्टडीमध्ये नकेलेला गुन्हा राजकन्नू, सेंगनी व इतरांनी कबूल करावा म्हणून पोलिस थ्रीडीग्रीचा वापर करून त्यांचा अन्वनीत छळ करतात. जनावरांपेक्षाही अमानुषपणे त्यांना मारहाण करतात, ते रक्तबंबाळ होऊन बेशुध्द पडेपर्यंत ही मारहाण चालू राहते. त्या प्रसंगी त्यांचे व्हीवळणे, क्षमायाचना करणे अंगावर शहारे आणणारे, प्रचंड चिड निर्माण करणारे आणि मन सुन्न करणारे आहे.सेंगनी तर गरोदर असतांनाही तिला व इतर स्रीयांनाही जनावरां प्रमाणे मारहाण केली जाते. त्या प्रसंगातील सर्वच अभिनेत्यांचा ताकदीचा अभिनय, दिग्दर्शकाने कौशल्याने दिग्दर्शित केलेले प्रसंग आणि अकॅशन डायरेक्टर व सिनेमॅटोग्राफर यांनी क्रूरतेचे दर्शन घडविणारे चित्रित केलेले सर्व प्रसंग अंगावर येतात, अंगावर काटे उभे राहतात.
इतका अमानुष छळ सोसूनही चोरीचा कलंक कुठल्याही परिस्थितीत भाळी लावून घ्यायचा नाही यावर राजकन्नू व त्यांचे सहकारी यांचे ठाम असणे हे अविश्वसनीयच आहे. कारण हे काल्पनिक प्रसंग नसून सत्य घटना आहे. त्यामुळे कुठून येवढे बळ आले होते त्यांच्या अंगी हा प्रश्नच पडतो. हे असे प्रसंग एकामागोमाग एक घडत असतांना नायक सूर्याचा संयत अभिनय, कुठेही अभिनिवेश नाही, ढोबळ बटबटीत फील्मी डायलॉग नाही , निरर्थक ज्ञानाचे डोस पाजणे नाही पण न्याय मिळविण्याच्या दृढ निश्चयापासून तसूभरही दूर जाणे नाही यामुळे सिनेमा एका उंचीवर पोहचतो.
सिनेमात के.चंद्रू यांचा हा जीवनप्रवास न येता फक्त राजकन्नू आणि सेंगनी यांच्या कोर्ट केस संदर्भातील प्रसंग
ही गोष्ट जसी राजकन्नू, सेंगनी व त्यांच्या सहकारी यांची आहे तशीच वकील के. चंद्रू यांची ही आहे. के. चंद्रू यांचे आयुष्य, खराखुरा जीवन प्रवास, त्यांचा संघर्ष हा एका स्वतंत्र सिनेमाचा विषय ठरेल असा आहे. के. चंद्रू हे डाव्या चळवळीत काम करणारे तडफदार तरूण होते. वकील संघटनेचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली वकिलांचे अनेक आंदोलने झाली होती. ह्युमन राईट्स साठी त्यांनी एक प्रकारे जीवन समर्पित केले होते.
स्त्रियांच्या आणि मानव अधिकाराच्या, दीन दुबळ्यांच्या केसेस ते विनामुल्य लढत असत. ते अत्यंत तल्लख बुध्दिचे असल्यामुळे ते अल्पावधीतच मुख्य सरकारी वकील बनले व पुढे मद्रास हायकोर्टाचे न्यायधीश बनले. त्यांच्या साडेसहा वर्षाच्या न्यायधीश कार्यकिर्दीत त्यांनी शहानव हजार (९६,०००) केसेसचा निकाल दिला त्यात काही अत्यंत महत्वपूर्ण निर्णय त्यांनी दिले. हा त्यांचा जीवन प्रवास थक्क करणारा आहे पण सदर सिनेमात के.चंद्रू यांचा हा जीवनप्रवास न येता फक्त आणि फक्त राजकन्नू आणि सेंगनी यांच्या कोर्ट केस संदर्भातील प्रसंग यात घेण्यात आले आहेत.
कायद्याचा,न्यायचा आणि संविधानाचा विजय ह्या सिनेमात अधोरेखीत केला आहे
भ्रष्ट , क्रुर, अन्यायी पोलीस विरूध्द चंद्रू यांच्या न्यायालयीन लढाईत चंद्रू यांच्या बिनतोड युक्तिवादामुळे
कोर्ट एक सदस्यीय चौकशी आयोग नेमन्याचे फर्मान काढते आणि उच्च पोलीस अधिकारी ( प्रकाश राज) यांची नियुक्ती केली जाते.
नेमलेला पोलीस अधिकारी कर्तव्यदक्ष अधिकारी असतो की तो ही भ्रष्ट अधिकारी असतो ?
राजकन्नू, सेंगनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे नेमके काय होते ? हे सिनेमात पाहणेच योग्य.
सिनेमाची सुरवात अनाडी, अशिक्षित , अक्षर ओळख नसलेल्या दारीद्र्य वाट्यास आलेल्या सेंगनी राजकन्नू यांच्या पासून होते.
शिक्षण घेणे, स्वयंप्रकाशित होणे हे महत्वाचे आहे हा संदेश शेवटी दिला आहे.
कायद्याचा, न्यायचा आणि संविधानाचा विजय ह्या सिनेमात अधोरेखीत केला आहे.
हा विजय आहे संविधानाचा ,बाबासाहेबांचा, बा भीमाचा म्हणजेच ‘जयभीम’ चा.
जयभीम हा सिनेमा आज जगात पहिल्या नंबर वर
सुरवातीपासून तर शेवट पर्यंत हा सिनेमा माणसाला खिळवून ठेवतो.
सर्व मुख्य कलावंतांनी भूमिका समजून केल्या असून अप्रतिम अभिनयाचे दर्शन घडविले आहे.
सिनेमॅटोग्राफी अंत्यत चित्तवेधक झाली असून संकलन काटेकोरपणे केल्यामुळे कोणताही प्रसंग निरर्थक लांबत नाही.
सिनेमाची लांबी अडीच तास असली तरी सिनेमा कुठेही रेंगाळत नाही.
हा सिनेमा जसा भारतात गाजतो आहे तसाच परदेशात ही गाजतो आहे.जागतिक सिने जगतात IMDb.com ही अत्यंत महत्वाची व विश्वसनीय वेबसाईट मानली जाते. जगातील सर्व सिनेमानं येथे मानांकन मिळते. त्यांना रेटिंग दिले जाते. जगातील एक हजार मुव्ही तपासल्या तर 9.6 रेटिंग घेऊन जयभीम हा सिनेमा आज जगात पहिल्या नंबर वर आहे तर 1984 वर्षाचा हॉलिवूड मुव्ही The Shawshank Redemption हा 9.3 रेटिंग घेऊन दुसऱ्या नंबर वर आहे. IMDb top 1000 असे जरी google मध्ये टाईप केले तरी आपल्याला ते पाहता येईल. सांगण्याचे तात्पर्य हा महत्वपूर्ण मोव्ही सिनेप्रेमींनी आवश्य पहावा असा आहे.Jai bhim film Review
जय भीम मुवी मधील प्रकाश राजच्या ‘झापड मारण्याच्या’ सीनने नवा वाद
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 09, 2021 10:57 AM
WebTitle – Jai bhim film Review Cinema Jayabhim, a penetrating portrayal of the Irula tribe