आंबेडकरी चळवळीतील एक वैचारिक बुरुज
जेष्ठ साहित्यिक विचारवंत दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांच्या काही आठवणींबद्दल त्यांच्या नात Adv. भाग्येशा कुरणे सांगत आहेत.
आयुष्यात भडक प्रसिद्धी करणं, तत्व सोडून पैशासाठी प्रस्थापितांच्या दावणीला बांधले जाणं, एखादया आमदार – खासदारकीसाठी स्वतःला विकून टाकणं आपल्याला कधीच जमलं नाही. तुम्हाला मोठमोठे पद, पैसा यांच्या ऑफर्स आल्या नसतील का?
पण बुध्दी, विचार शाबूत ठेवून आपण त्या कायम नाकारल्या. विचारायचं सुद्धा कोणाचं धाडस होणार नाही एवढं तुम्ही चारित्र्य सांभाळल.स्टेजवर बडीबडी भाषण अन प्रत्यक्षात वर्तणूक वेगळीच असा आपला खाक्या नव्हता. त्यामुळे विरोधकांना देखील आपल्याबद्दल बद्दल आदर होता, ज्यांच्यावर तुम्ही नेहमी वैचारिक टीका केली ते अनेक जुने कॉम्रेडस तुमच्या अंत्यविधीला उपस्थित होते.
मान सन्मान पुरस्कारांसाठी जीहुजरी आपण कधीच केली नाही.आपण शेवट पर्यंत स्वाभिमानी तत्वनिष्ठ राहिलात. कोणाला पटो अथवा न पटो परंतु आपण आपल्या वैचारिक भूमिका ठामपणे मांडत राहिलात. वैचारिक विरोध ही अभ्यासपूर्ण मांडले कधीही आचरट भाषा वापरत टीका केली नाही.
आयुष्यातील भौतिक सुख ,चैन,ऐशो आराम बाजूला ठेवले, शासकीय नोकरी सोडली व आयुष्याचा पूर्ण वेळ आंबेडकरी राजकारण धम्म चळवळीसाठी वाहून दिला. लेख-भाषणे मोर्चानी प्रस्थापितांच्या उरात धडकी भरवली. तुरूंगवास भोगला.लाठ्या काठ्या झेलल्या, आयुष्यभर वैचारिक प्रबोधन करत वणवण फिरला. तुम्ही आयुष्यभर विद्यार्थी होता. तुम्हाला भेटायला गेलं की हातात तुमच्या कायम पुस्तक असायचं. आयुष्यभर जमा केलेल्या पुस्तकांची मुंबईत एक लायब्ररी व्हावी हे तुमचं शेवटचं स्वप्न होतं.त्यासाठीची तुमची उतारवयातील धडपडत आजही आठवते.
सामाजिक परिवर्तनाच काम करताना सोसलेल्या यातना वृद्धापकाळात शारीरिक मानसिक त्रास/आजाराच्या रूपाने उफाळून येत होत्या. तरीही तुमचं वाचन , लेखन अभ्यास भेटीगाठी सुरूच असायचं. आजची तरुण पोरं पोरी सेल्फी घ्यायला आले की तुम्ही सेल्फी नको काम करा रे अस निक्षून सांगायचा. अभ्यास न करता, न वाचता उथळ चर्चेसाठी आलेल्या पोरापोरींना तुम्ही अनेकवेळा ओरडायचा. परत पाठवायचा. मलाही तुमची भीती वाटायची, तुम्हाला काही विचारताना ततपप व्हायच, पण मग तुम्ही प्रेमाने विचारायचा हे पुस्तक तू वाचलं आहेस का ?
आधी वाच मग आपण बोलू.ही सतत प्रश्न विचारणारी, लेख लिहणारी माझी नात आहे असं तुम्ही सगळ्यांना हसत अभिमानाने सांगायचा कारण विचार करणाऱ्या तरुण पिढीबाबत तुम्हाला अप्रूप होत. अनेकांना तुमचा स्वभाव तुसडा वाटत असेल पण त्यामागची भावना वाईट नव्हती.अभ्यास वाचन करायचं , तळागाळात उतरून काम करायचं, अनुभव घ्यायचे अन मगच विचार मांडायचे, स्टेज आणि संधी मिळाली म्हणून काहीही बरळायच नाही हे तुम्ही आमच्यावर कायम ठसवल. साधेपणा – विनम्रता वागण्यातून शिकवली. तुमची नातवंड म्हणून जन्माला येणं यापेक्षा दुसरी अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी असू शकत नाही. आयुष्यात तुमचा लाभलेला सहवास नेहमीच प्रेरणादायी ठरतोय.
तुम्ही सार्वजनिक जीवनात प्रस्थापितांसोबत असणाऱ्या आंबेडकरी नेतेमंडळीवर सडकून टीका केली, तुझ्या आजोबांच या या नेत्याबद्दल मत काय होत ?
मला अनेकजण असा नेहमीच खोचक प्रश्न विचारतात.पण बाहेर वैचारिक टीका करणारे तुम्ही,
खाजगी जीवनात त्यांच्याबद्दल आदरभाव बाळगून होतात हे अनेकांना माहितीही नाही.
तुम्ही आजारपणात त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला जायचा.फोनकरून तब्येत विचारायचा.
बायकोपोराकडे लक्ष दे अस हक्काने निक्षून सांगायचा.
एकदा केंद्रीय मंत्रीपदावरील नेत्याबद्दल पेपरमधील सडकून टीका ऐकून तुम्हाला विचारलं होतं,
तुम्ही काहीतरी खवचट बोलाल अस अपेक्षित होतं.पण तुम्ही सांगितलं की एकेकाळी तो खूप चांगला संघटक होता.
जेव्हा आम्ही पोलिसांच्या कचाट्याला चुकवून बाहेर असायचो तेव्हा तो एकटा अख्खी मुंबई गोळा करून हादरवून सोडायचा.
वैचारिक वादाच रूपांतर तुम्ही वैयक्तिक द्वेषामध्ये होऊ दिल नाही, कोणीतरी सार्वजनिक जीवनातून उध्वस्त व्हावं म्हणून तुम्ही कधी प्रयत्न केले नाहीत.
तुम्ही टीका केली पण व्यवस्थेने थोपलेल्या मर्यादा लक्षात घेत आदरही जपला हे आमच्या आजच्या ट्रोलधारी मंडळींना कस समजावून सांगायचं ?
तुम्ही आंबेडकरी राजकारणात समाजकारणात अनेक प्रयोग केले.जातवर्णधिष्टीत समाज व्यवस्थेमध्ये या प्रयत्नांना यश येण्यासारखी परिस्थिती नव्हती.
तुमच्या पिढीचे प्रयोग अयशस्वी का ठरले याची चाचपणी होईल आणि हेच प्रयोग येणाऱ्या भावी पिढ्यांना दिशा देतील.
दर दहा मिनिटाला फेसबुक चेक करून किती लाईक्स आले, कोणी काय कंमेंट केली,
माझा विडिओ किती व्हायरल झाला यात गुंतलेल्या आमच्या पिढीला हे प्रयत्न तोकडे वाटतील
पण तरीसुद्धा येणारी प्रत्येक पिढी लढवय्ये पँथर म्हणून तुमची दखल घेईल.
तुम्हाला जाऊन दोन वर्ष झाली – शरीराने नाही पण विचारांनी तुम्ही आमच्या कायमच सोबत आहात. बुद्धाने सांगितल्या प्रमाणे असणं किंवा नसणं यापेक्षा ‘ घडण ‘ महत्वाचं असत. हे ‘ घडविण्या ‘ साठी आम्ही नक्कीच संघटीतरीत्या प्रयत्न करू.नव्या काळाचे प्रश्न समजून घेऊन नवनविन सिद्धांकन मांडू. कामाच्या नव्या पद्धती विकसित करू. नवे प्रयोग करू. तुमच्या सैद्धांतिक मांडणीची नव्याने चिकित्सा करू आणि मतभेदांसकट तुम्हाला सोबत घेऊन जाऊ. तुम्हालाही हेच अपेक्षित होत.
आजोबा, तुम्ही आपल्या कुटुंबासाठी दीपस्तंभ होता.कौटुंबिक स्तरावर येणाऱ्या प्रत्येक आवाहनांना तुम्ही धीरोदात्तपणे सामोरे गेलात.
ताणतणाव पचवले, बाहेर या तणावाच दुःखाच भांडवल करत कुठे हात पसरला नाही.
तुम्ही अनेक गोष्टी सहन केल्या पण चेहऱ्यावर आणल्या नाहीत, नांद्रेगावच्या ग्रामपंचायतीने ठराव करून जेव्हा तुमचा गावात जाहीर सत्कार करायचं ठरवलं,अन भावकीतले लोक जेव्हा हा प्रस्ताव घेऊन मुंबईला तुम्हाला भेटायला आले, तेव्हा सत्तरीकडे झुकलेल्या तुम्ही निरागसपणे प्रश्न केला,
अरे मी काय एवढं मोठं केलंय ?
कशाला माझा सत्कार करता, कशाला पैसे घालवता ?
त्यापैशात काहितरी विधायक काम करा.तुमच्याकडे बघून आपली पहिली पिढी शिक्षित झाली.
आता तुमची नातवंडही उच्चशिक्षित होत आहेत, तुमचा अपमान होईल असं कृत्य आम्ही करणार नाही.
तुम्हाला गमावण्याच दुःख आहेच परंतु तुमचं राजासारखं आयुष्य आम्हाला कायमच प्रेरणादायी असेल.
तुम्हाला विनम्र अभिवादन! क्रांतिकारी जयभीम!
लेखन – Adv. भाग्येशा कुरणे
डॉ.बाबासाहेबांच्या चळवळीतील सिंह सुरबानाना टिपणीस
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on JULY 17, 2021, 10:52 AM
Web Title: Some memories of Raja Dhale 2021-07-17