“तुम्ही माझे घर पेटवाल पण लक्षात ठेवा टिपणीसाचा नेम कधीच चुकत नाही आणि माझ्या कडे गोळ्याही भरपूर आहेत.”
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या लढ्यात सी.के.पी.समाजातील दलितेतर सहका-यांचे योगदान फार मोठे आहे.त्यापैकीच एक लढवय्या वीर म्हणजे सुरेंद्र गोविंदराव टिपणीस उर्फ सुरबानाना टिपणीस.मुंबई इलाखा विधिमंडळात सार्वजनिक पाणवठे विहिरी दलितांसाठी खुले करण्याचा ठराव रावबहादूर सी.के.बोले यानी ४ आॅगस्ट १९२३ ला मंजूर केला होता.सुरबानाना यांची बाबासाहेबांसोबत ओळख त्यांचे मेहुणे अनंत विनायक चित्रे यांच्या माध्यमातून झाली.
बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाने,त्यांच्या अगाध ज्ञानाने व सामाजिक कार्याच्या अंतरिम तळमळीने ते प्रभावित झाले.तेथून पुढे त्यांच्या बाबासाहेबांसोबत भेटीगाठी व जवळीक वाढतच गेली.
सन १९२५ मध्ये सुरेंद्रनाथ टिपणीस हे महाड नगरपालिकेचे अध्यक्ष झाले.रावबहादूर सी.के.बोले यानी मुंबई विधिमंडळात सार्वजनिक ठिकाणे दलितांसह सर्वाना खुली करण्याचा केलेला ठराव अंमलात आणण्याचा त्यानी निर्धार केला.त्यानी महाडचे चवदार तळे दलितांसह सर्वाना खुले करण्याचा ठराव नगरपालिकेत मांडला व मंजूर करून घेतला.
१९ व २० मार्च १९२७ रोजी महाड येथे ‘ कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद ‘ आयोजित करण्यात आली होती.यासाठी बाबासाहेबाना अनंत विनायक चित्रे,कमलाकांत चित्रे,सुरबानाना टिपणीस,देवराव नाईक,बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांचे व तसेच महाडच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले.
दि.२० मार्च रोजी चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले होते .बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो सत्याग्रही चवदार तळ्यावर गेले.त्यात अनंतराव चित्रे,बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, सुरबानाना इ.नेते ही आघाडीवर होते.सर्वात आधी बाबासाहेब चवदार तळ्याच्या पाय-या उतरले व त्यानी या तळ्यातील ओंजळभर पाणी पिले.नंतर सर्व सत्याग्रही या तळ्यात उतरले व त्यानी ही पाणी प्यायले.
या घटनेने महाड येथील सनातनी धर्मांध संतप्त झाले.थोड्यावेळाने शेकडो धर्मांध हिंदूनी सुरबानानाच्या घराला वेढा घातला,ते सुरबानानाचे घर पेटवून देण्याची भाषा करू लागले.
सुरबानाना खोत असल्यामुळे त्यांच्या घराच्या दर्शनी भागातच भिंतीला डबलबारची बंदुक टांगलेली होती.
जमावाला न घाबरता सुरबानाना बंदूक घेऊन वरच्या मजल्यावरील गच्चीत गेले आणि बंदूक रोखून धरत ते जमावाला दरडावून म्हणाले,
” तुम्ही माझे घर पेटवाल पण लक्षात ठेवा टिपणीसाचा नेम कधीच चुकत नाही आणि माझ्या कडे गोळ्याही भरपूर आहेत.”
त्यांच्या या आक्रमक पावित्र्याने जमावाचे अवसान गळून पडले.ते दंगलखोर आल्यामार्गाने परत फिरले.
मात्र त्यांनी सत्याग्रहासाठी आलेल्या गोरगरीब दलितानां अमानुषपणे मारहाण केली.
त्यांच्या अन्नात माती कालविली.ही घटना कळताच बाबासाहेब अत्यंत दुःखी झाले.त्यानी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली.
पुढे हे प्रकरण कोर्टात गेले तेंव्हा सुरबानाना यानी बाबासाहेबाना दिलेली महत्वाची कागदपत्रे व त्यांची साक्ष कोर्टात निर्णायक ठरली.कोर्टात ही केस बाबासाहेबानी जिंकली.
महाड सत्याग्रहात निर्भयपणे सहभागी होऊन सनातनी गुंडाना त्यांच्याच भाषेत उत्तर देणारे बाबासाहेबांच्या चळवळीतील सिंह म्हणजे सुरबानाना.
बाबासाहेब सुरबानाना बद्दल एकदा म्हणाले होते, “सुरबा,तुझ्यासारखे समतेचे खंदे पुरस्कर्ते माझ्याबरोबर असल्यानंतर मी माझे इच्छित ध्येय निश्चित साध्य करेन.”
आज दि.22 जून सुरबानानांचा स्मृतिदिन.
सुरबानाना यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
(डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे दलितेतर सहकारी – योगीराज बागुल)
संकलन: बी.एन.साळवे
महाडचा रणसंग्राम प्रेरणादायी इतिहास
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on JUN 22 , 2021 08 : 30 AM
WebTitle – dr babasaheb movement surbanana tipnis 2021-06-22