डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य जातीत जन्माला आले त्यामुळे धर्माच्या अनुषंगाने समाजाने अस्पृश्य समाजावर जी अमानविय बंधने नियम लादली जातीय विषमतेमुळे अपमानाचे जे दु:ख त्यांनी सोसले तसेच दु:ख भारतीय स्त्रीच्या देखील वाट्याला आलेले होते.त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय स्त्रियांचे स्थान देखील दलित वर्गाच्या समकक्ष आहे असे म्हणतात.म्हणजेच दलित वर्गास जे शोषण अन्याय अत्याचार सहन करावे लागले त्यात सर्वजातीय स्त्रियांना देखील तसेच शोषण अन्याय अत्याचार सहन करावे लागले होते.
मातोश्री रमाबाई आंबेडकर यांना पाठवलेल्या एका पत्रात “स्त्रियांच्या उन्नतीसाठी व मुक्तीसाठी लढणारा मी एकमेव योद्धा आहे.”असे त्यांनी म्हटले होते.
या स्त्रियांच्या मुक्तीचा मार्ग केवळ कायद्यातच आहे असे त्यांनी जाणले.
कारण ज्या मार्गाने ही विषमता अन्याय व परावलंबित्व आले त्याच मार्गाने त्या विषमतेचे परिमार्जन केले पाहिजे असे त्यांना वाटे.म्हणून ज्यात स्त्रियांना सर्वोच्च स्थान आहे असा हिंदू कोड बिल हा कायदा त्यांनी स्त्रियांसाठी आणला.
आज स्त्रियांना जे काही स्वातंत्र्य आहे.
हक्क अधिकार आहेत ते याच कायद्याच्या कवच कुंडलामुळे आहे.हे महिलांनी कदापि विसरू नये.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्त्रियांविषयीचा उदात्त दृष्टिकोन पुढील दाखल्यावरून लक्षात येईल.
“स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजित असतो.
म्हणूनच हा समुदाय पाहिल्यावर मला खात्री वाटते व आनंद होतो की आम्ही प्रगती केली आहे.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी २० जुलै १९४२ रोजी नागपूर येथे आयोजित
‘ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वीमेन्स कॉन्फरन्स’मध्ये महिलांना उद्देशून केलेल्या
भाषणातील वरील ओळी म्हणजे या महामानवाच्या महिलांच्या सर्वांगीण प्रगतीविषयक दृष्टिकोनाचा परिचय देतात.
याच भाषणात ते पुढे म्हणतात की लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीची मैत्रीण म्हणून त्याच्या प्रत्येक कार्यात सहकार्य करावं,मात्र गुलामसारखे वागवल्यास तिने खंबीरपणे नकार द्यावा व समतेसाठी आग्रह धरावा” (डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखन व भाषणे – खंड 18 भाग – 2 पृष्ठ 426 )
यावरून असे दिसते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्त्री-पुरुष असा कोणताही भेद करत नव्हते,याशिवाय पती पत्नीचे नाते हे मित्रत्वाचे असले पाहिजे असा आग्रह ते करताना दिसतात यातून स्त्रियांच्या सहभागाविषयी ते किती गंभीर आणि संवेदनशील आणि त्यांना कोणत्याही बंधनात न ठेवता मुक्त वातावरण देण्यासाठी आग्रही होते हे इथे अधोरेखित होते.
एक घटना आणखी महत्वाची अशी की महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेस स्त्रियांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
आज स्त्रियांना बंधनात ठेवायला राजकीय,धार्मिक,सत्ताधारी अशा अनेक क्षेत्रातील पुरुष धपडपत आहेत.
स्त्रियांनी दासी बनावं पतीची सेवा करावी हाच तिचा धर्म,तिनं काय नेसावं कोणते कपडे घालावे याविषयी ‘पुरुष’ त्यांना बंधनात ठेवण्यासाठी आदेश देण्याची धडपड करताना दिसतात.
त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (साल 1927.26 मार्च) जेव्हा स्त्रियांना उद्देशून भाषण करत होते त्यावेळी त्यांनी स्त्रियांनी अस्पृश्यतेची ओळख पटवून देणाऱ्या सर्व जुन्या रीतीरिवाजांचा त्याग करण्याचे आवाहन केले,इतर पुरुषांच्या प्रमाणे बंधनात न ठेवता स्त्रीने मुक्त व्हावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना आधुनिक पद्धतीने साडी नेसावी तसे कपडे करावेत अशा सुचना देतात.
वरिष्ठ वर्गातील स्त्रिया जशी साडी नेसतात तशी साडी नेसावयास सांगतात.तुमच्यावर लादलेलेल्या जुन्या खूणा तुम्ही पुसल्या पाहिजेत.आपली ओळख पटविणारा शिक्का पुसला पाहिजे महार स्त्रियांचा त्यावेळचा पेहराव साडी नेसण्याची विशिष्ट पद्धत होती.तत्कालिक स्त्रिया गुडघ्या पर्यंतच तोकडे लुगडे नेसत असत.त्यामुळे त्या साडीवरूनही जातीची ओळख होत असे.
त्याचप्रमाणे गळ्यांत भाराभार गळसऱ्या व हातात कोपरभर कथलाचे किंवा चांदीचे गोठ पाटल्या ही देखील जात ओळखण्याची खूण होती.ती त्यागून त्या ऐवजी एकच गळसरी घालावी.अनेक गळसऱ्या घातल्याने नवऱ्याचे आयुष्य वाढते किंवा आपल्या शरीराला शोभा येते आशांतला भाग नाही.अशा दागिन्यापेक्षा कपड्यालाच जास्त शोभा आहे.तेव्हा कथलाच्या किंवा चांदीच्या दागिन्यांत पैसे खर्च करण्याऐवजी चांगल्या कपड्यात पैसे खर्च करा.आणि दागिना घालायचाच असेल तर तो सोन्याचा घाला नाहीतर घालू नये.अशा सुचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देतात.
यावरून असे दिसते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांना केवळ सामाजिक धार्मिक बंधनातूनच नाही
तर सांस्कृतिक आणि मानसिक बंधनातूनसुद्धा मुक्त करण्यासाठी आग्रही होते.
आणि ते त्यांनी केवळ बोलून न दाखवता तसे कायदे करून प्रत्यक्ष कृतीतून भारतीय स्त्रीला हे सबंध आकाश प्रगतीसाठी मोकळे करून दिले.
आज भारतात स्त्री मुक्ती ची चळवळ मुळ धरू लागली आहे आहे.
स्त्रिया स्वत:च्या मुक्तीचा मार्ग चोखाळत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कायद्याची शिदोरी घेऊनच पुढची वाटचाल त्यांना करावी लागते.
स्त्री मुक्ती तून स्त्री स्वातंत्र्यापर्यन्त हे कायदे महत्वाची भूमिका निभवतात.
आणि म्हणून स्त्री मुक्ती अन स्त्रियांच्या उत्थानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तुत्व लोकोत्तर आहे.
मिलिंद धुमाळे
संपादक – जागल्याभारत आघाडीच्या विविध वृत्तपत्रामधून स्तंभलेखन,ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा 10 वर्षांचा अनुभव,मी मराठी दैनिकात यशस्वी स्तंभलेखन,युवा कार्यकर्ता पाक्षिकाचे माजी कार्यकारी संपादक,जनरल बातम्यासोबतच राजकीय आणि सामाजिक विषयांमध्ये अभ्यास.
लेखन –
( लेखक जागल्या भारत चे संपादक आहेत )
milindgalaxy80@gmail.com
हे ही वाचा.. संविधानामुळे भारतीय स्त्रिया गुलामीतुन मुक्त
हे ही वाचा.. जागतिक महिला दिन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आपण
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 24, 2021 14:45 PM
WebTitle – Dr. Babasaheb Ambedkar and Indian Women 2021-03-24