जयभीमवाले टिळक
बाळ गंगाधर टिळक यांचे धाकटे सुपुत्र श्रीधर टिळक आणि थोरले सुपुत्र रामचंद्र टिळक हे बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत अनुयायी होते, यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही.कारण फुले, शाहू, आंबेडकरांच्या कार्याविषयी टिळकांना वाटणारा तिरस्कार सर्वविदित आहे.अशा कर्मठ व विषमतावादी ब्राह्मणी संस्कृतीच्या पुरस्कर्त्या, बाळ गंगाधर टिळकांच्या पोटी, समतेचे पुरस्कर्ते कसे जन्माला येणार? हा प्रश्न पडणेही स्वाभाविक आहे. तथापि हे सत्य आहे की टिळकांचे दोन्ही सुपुत्र बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे व क्रियाशील अनुयायी होते.
टिळकपुत्रांच्या कार्यावर दृष्टीक्षेप टाकला तर लक्षात येईल की त्यांचं कार्य केवढं क्रांतिकारक व जोखिमपूर्ण होतं आणि त्यासाठी त्यांना केवढी किंमत मोजावी लागली.
श्रीधरपंत यांचे टोपणनाव बापू होते. मुलं हे खरे न्यायाधीश असतात. पालकांच्या वर्तनव्यवहारातील विसंगती ते सतत टिपत असतात. त्याचा त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या जडणघडणीवर परिणाम होत असतो. श्रीधरपंतांना टिळकांच्या सार्वजनिक व वैयक्तीक जीवनातील विसंगती पदोपदी जाणवू लागल्यामुळे, ते आपल्या वडीलांऐवजी सुधारणावादी आगरकरांच्या विचारकार्याकडे आकृष्ट झाले. त्यातूनच मग प्रबोधनकार ठाकरे, जेधे, जवळकर या परिवर्तनवादी मंडळीत त्यांची बैठक जमली आणि स्वारी तिथे रमली.
पुढे पुण्यातील बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यक्रमांनाही ते आवर्जून उपस्थित राहू लागले. आणि त्यांच्या विद्वत्तेने प्रभावित होऊन त्यांचे कट्टर अनुयायी बनले. बाबासाहेबांनी गायकवाड वाड्यावर आपल्या घरी यावं, असा ते नेहमी आग्रह करीत. परंतु आपल्यामुळे श्रीधरपंत व त्यांचे थोरले बंधु रामचंद्र यांना त्रास होईल, यामुळे बाबासाहेब त्यांच्या निमंत्रणास नम्र नकारच देत.
परिवर्तनवादी चळवळीतून आलेल्या वैचारिक प्रगल्भतेमुळे स्वाभाविकपणे त्यांचे आपल्या पिताश्रींशी वैचारिक खटके उडत. आपल्या लग्नप्रसंगी त्यांचा वडीलांशी असाच खटका उडाला. कारण पुण्याच्या ब्रह्मवृंदांनी मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने बा. ग. टिळकांना खिंडीत पकडले व ‘पंचगव्य’ प्राशन करुन प्रायश्चित घेण्यास सांगितले. कारण १९१८ साली बा. ग. टिळक होमरुल लीगचे अध्यक्ष या नात्याने, बोटीने इंग्लडला गेले होते. त्यामुळे, धर्मशास्रानुसार समुद्र उल्लंधनाचे पातक त्यांचेकडून घडले होते. म्हणून टिळकांनी पंचगव्य प्राशन करावे यासाठी ब्रह्मवृंद अडून बसले.
तेव्हा श्रीधरपंतांनी ‘माझ्या लग्नासाठी जर माझ्या वडीलांना प्रायश्चित घ्यावे लागणार असेल, तर हे लग्न न झालेले बरे!’ असे ब्राह्मणांना खडसावले. पण स्वतःच कर्मठ असलेल्या टिळकांनी श्रीधरपंतांच्या बाणेदारपणाकडे कानाडोळा करुन प्रायश्चित घेतलेच.
तथापि पंचगव्य प्राशन हे प्रायश्चिताचे केवळ टोकण ठरले. कारण एवढा मोठा नेता पड खातोहे हे बघून ब्रह्मवृंदांनी कोपरखणनी सुरु केली. व पंचगव्य प्राशनाने फक्त लग्नकार्यातला तांत्रिक अडसर तेवढा दूर झाला. पण समुद्र उल्लंघनाचे पातक मात्र फिटले नाही. ते फिटण्यासाठी सुवर्णयोनीतून टिळकांचा पुनर्जन्म घडवावा लागेल, असे त्यांनी सांगितले.
टिळक त्यासही राजी झाले. व यथावकाश भलीमोठी सोन्याची योनी तयार करवून, तिच्यातनं टिळकांना बाहेर काढून, त्यांनी त्यांचा पुनर्जन्म घडविला आणि कर्मकांडाच्या दक्षिणेपोटी सोन्याच्या योनीवर त्यांनी डल्ला मारला.
‘भटाला दिली ओसरी, भट हळूहळू पाय पसरी’ या म्हणीप्रमाणे गायकवाड वाड्याच्या ओसरीवर भटांनी शनवार वाड्यासारखे यथेच्छ पाय पसरुन, प्रायश्चिताप्रित्यर्थ आपल्या परिवाराला मोठा आर्थिक गंडा घातला. ही फसवणूक श्रीधरपंतांच्या जिव्हारी लागली. त्याची परिणती ते कट्टर सुधारणावादी बनण्यात झाली. तर,
‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ व ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ अशी केसरीतून इंग्रज सरकारची कानउघाडणी करणा-या आपल्या जहाल मतवादी पिताश्रींनी, ब्रह्मवृंदांपुढे पत्करलेला मवाळ मतवाद पाहून, वडील व त्यांच्यातली दरी विस्तारत गेली. आणि ते प्रचंड अस्वस्थ झाले. या अस्वस्थ कालखंडात त्यांना सावरले प्रबोधनकार ठाकरे यांनी.
श्रीधरपंत चांगले लेखक होते. कॉलेज जीवनापासूनच त्यांनी लेखनारंभ केला होता. स्वतः टिळकही आपल्या पुत्राची ही प्रतिभा जाणून होते. काही कवितांचे अनुवादही ते त्यांचेकडून करवून घेत. तथापि त्यांच्या परिवर्तनवादी विचारांमुळे केसरीतून मात्र त्यांना लेखनाची संधी मिळाली नाही. ती संधी त्यांना दिली ज्ञानप्रकाश व विविधवृत्त या नियतकालिकांनी. या नियतकालिकातील निवडक लेखांचं ‘माझा व्यासंग’ या नावाने त्यांनी पुस्तकही प्रकाशित केले. या कामी थोरले बंधु रामचंद्र यांचे प्रोत्साहन त्यांना लाभले.
१९२७ साली पुण्यामुंबईत जोतिबांच्या जन्मशताब्दी निमित्त मोठे कार्यक्रम होऊ लागले. श्रीधरपंत या कार्यक्रमांना उपस्थित राहून व्याख्यानेही देऊ लागले. अशाच एका व्याख्यानात ते म्हणाले,
“ब्राह्मणेतर समाजाला आपल्या हक्कांची जाणीव प्रथम जोतिरावांनीच करून दिली. या दृष्टीने विचार केल्यास मागासलेल्या वर्गावर व अस्पृश्य समाजावर त्यांचे अलोट उपकार आहेत.
महात्मा फुले हे आपल्या हिंदुधर्मीयांचे मार्टिन ल्युथर होत. ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्ध म्हणजे ब्राह्मण्याविरुद्ध त्यांची तक्रार हा आपल्याकडील प्रोटेस्टॅन्टिझम होय. आणि गेल्या दहा वर्षातील सत्यशोधक समाजाची चळवळ ही आमच्याइकडील रिफॉर्मेशनची चळवळ होय! सत्य, न्याय व समानतेच्या तत्त्वांवर हिंदू समाजाची पायाभूत उभारणी करण्याचा सत्यशोधक समाजाचा प्रयत्न होता. हे तरुण पिढीने लक्षात ठेवावे.
सरते शेवटी मला माझ्या ब्राह्मणेतर बंधूंना एवढेच सुचवायचे आहे की , सामाजिक व धार्मिक वादग्रस्त प्रश्न व त्यावरील मतभेद राजकीय चळवळीच्या आड येऊ देऊ नका.”
ज्या जोतिबांनी टिळक-आगरकरांना जामिन मिळवून देवून डोंगरीच्या तुरुंगातून त्यांची सुटका करवली. त्या जोतिबांच्या निधनाची टिळकांनी केसरीत दखलही घेतली नाही. पण फुल्यांच्या त्या पुण्याईतून उतराई होण्याचे ‘पुण्यकर्म’ श्रीधरपंतांच्या या व्याख्यानाने केले, असे म्हटले तर अनुचित होणार नाही.
१९२० साली टिळकांच्या निधनानंतर टिळकबंधुंनी गायकवाडवाड्यावर जणू बंडाचे निशाणच फडकवले.
८ एप्रिल १९२८ ला त्यांनी गायकवाडवाड्यात समता संघाची स्थापना केली. त्याचे उद्घाटक होते बाबासाहेब आंबेडकर. अशारितीने बाबासाहेबांनी आपल्या गायकवाडवाड्याला भेट द्यावी, हे टिळकबंधुंचं स्वप्न, समता संघाच्या उद्घाटनामुळे साकार झाले.
समता संघाच्या उद्घाटनानंतर सहभोजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. गायकवाडवाड्यातील ग्रंथालयाच्या सभागृहात सहभोजनाच्या पंगती झाल्या.
या सर्व प्रकाराला तीव्र विरोध असलेल्या टिळकवादी मंडळीचा तिळपापड झाला.
त्यांनी भोजनसमयी वीजपुरवठा खंडित करुन व्यत्यय आणण्याचा खटाटोपही केला.
पण गोड्या तेलाचे दिवे लावून भोजनाचा कार्यक्रम आनंदात पार पडला.
समाजप्रबोधनासाठी त्याकाळी प्रबोधनपर मेळ्यांचे कार्यक्रम होत.
गायकवाडवाड्यात पांडोबा राजभोज यांच्या अस्पृश्यांचा श्रीकृष्ण या मेळ्याचे टिळकबंधुनी आयोजन केल्याने प्रचंड खळबळ माजली.
पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. इतकेच नव्हे तर कोर्टाकडून मनाई हुकूमही आणण्यात आला.
गायकवाड वाड्यातल्या गणपतीवर तरी अस्पृश्यांची सावली पडू नये,
म्हणून गणपतीला पिंज-यात बंद करुन, त्याला मोठे टाळे ठोकण्यात आले.
पण या सर्व विरोधाला न जुमानता श्रीधरपंत मेळ्याच्या कलाकारांना घेऊन वाड्यावर येऊन धडकले.
पोलिसांनी अडवण्याचा केलेला प्रयत्न हाणून पाडत समुदाय आत शिरलाच.
रामचंद्र टिळकांनी मोठ्या हातोड्याने गणपतीच्या पिंज-याचे टाळे तोडून पिंजरा भिरकावून दिला. गणपतीसमोर गीतगायनाचा कार्यक्रम झाला.
दरम्यान कोर्टाचा समन्स स्वीकारण्यासाठी बेलिफने केलेली धडपड टिळकबंधुना धुडकावून लावली.
अर्ध्या तासाने मेळा गातगात परत गेला.
तेव्हा बेलिफने पुन्हा समन्स पुढे केला.तेव्हा रामचंद्र टिळकांनी तो टराटरा फाडून फेकून दिला.
या कार्यक्रमास प्रबोधनकारांचा सक्रिय पाठींबा होता.
कार्यक्रमाचा वृत्तांत छापण्यासाठी दुस-या दिवशी प्रसिद्ध होणा-या ‘लोकहितवादी साप्ताहिकाचे शेवटचे पान त्यांनी राखून ठेवले होते.
कार्यक्रमानंतर श्रीधरपंतांनी तयार केलेला वृत्तांत त्यावर छापण्यात आला. ‘गायकवाड वाड्यावर अस्पृश्यांच्या मेळ्याची स्वारी’ असे त्या बातमीचे शीर्षक होते.
श्रीधरपंतांच्या या विद्रोही कारवायांमुळे त्यांना गायकवाड वाड्यात प्रवेशबंदी करण्यात आली.केसरीवरील मालकी हक्कावरुन विश्वस्त व त्यांच्यात कोर्टकचे-या सुरु झाल्या.
‘मला केसरीचा ताबा मिळू देत, मी महाराष्ट्राला आगरकरांचा अवतार दाखवून देईल’ असं श्रीधरपंत म्हणत.
कोर्टकचेरीमुळे त्यांची प्रचंड ओढाताण झाली.तशात ज्ञातीबांधवांच्या जाचाला कंटाळून त्यांचे फिलॉसफर आणि गाईड प्रबोधनकार ठाकरेही पुणे सोडून मुंबईला स्थायिक झाले.
परिणामी श्रीधरपंत निराधार झाले.
१९२३ पासूनच त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते.
ज्ञानप्रकाशमधील आपल्या एका कवितेत ते म्हणतात,
‘गेला सर्व हुरूप, ओसरुनि
ये बुद्धीवरी झापडे।
आता मी जगलो कशास न कळे,
हृद्रोग चित्ता जडे।
अखेर २५ मे १९२८ रोजी त्यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसखाली आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी त्यांनी तीन पत्रे लिहून ठेवली होती. एक पुण्याच्या कलेक्टरला.
दुसरे वृत्तपत्रांसाठी आणि तिसरे अर्थातच आपल्या लाडक्या बाबासाहेब आंबेडकरांसाठी.
त्यात ते म्हणतात,
‘… मला असे नेहमी वाटे की माझा जन्म माझ्या देशाची,माझ्या समाजाची व माझ्या भाषेची सेवा करण्याकरिता आहे.माझ्या माता पितरांचीही याहून भिन्न कल्पना नव्हती.माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांचे असहाय खेळणे बनण्याकरिता नव्हता.एखाद्या गरीब अपरिचित शेतकऱ्याच्या झोपडीत माझे जीवितकार्य पुरे करण्याकरिता माझा पुनर्जन्म होवो,अशी मी आशा बाळगतो.’
महामानवांना कार्यारंभी मोजकेच अनुयायी भेटतात. पण त्यांचं योगदान मात्र फार मोलाचं असतं.
पुढे महामानवांच्या कार्याला जसजशी लोकप्रियता मिळत जाते,त्या लोकप्रियतेच्या प्रखर प्रकाशात, त्यांच्या प्रारंभीच्या अनुयायांचं योगदान झाकोळलं जातं.
वास्तविक महामानवांसारखेच त्यांचेही जन्मदिन व स्मृतीदिन उत्साहात साजरे झाले पाहिजेत.
पण दुर्दैवाने तसे घडत नाही.हे विस्मरण चळवळीच्यादृष्टीने भूषणीय नाही.
परिवर्तनवादी चळवळींच्या अपयशाचे तेही एक कारण आहे.
लेखन – सुभाषचंद्र सोनार, राजगुरुनगर
( लेखक निवृत्त शिक्षक असून इतिहास अभ्यासक,विश्लेषक आहेत.)
डॉ.आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा स्थापन करणारा मराठा
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 03 , 2020 14 : 50 PM
WebTitle – Shridhar-tilak-2020-12-03