नेहमीप्रमाणेच या दिवाळीला सुद्धा मोबाईलवर मित्रांचे मेसेजेस आले. काही हिंदु मित्रांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. काही ज्येष्ठ विचारवंतांच्या शुभेच्छा आल्या. काहींनी दिवाळीच्या ऎवजी ‘इडा पिडा ठळो, बळीचे राज्य येवो’ अशा शुभेच्छा दिल्या होत्या. काही बौद्ध मित्रांनी दिवाळी हा मोदगल्यायन या बौद्ध भिक्खुचा याच दिवशी खून झाला होता म्हणून हा दिवस आनंदाचा नसून शोक दिन आहे असेही मेसेज पाठवले.त्या सर्व मेसेज मधून माझे मन ‘इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो!’ या मेसेज वरुन हटता हटेना! डोक्यात बराच कोलाहल माजला आणि विचारांची एक श्रृंखला निर्माण होत गेली. बळीचे काय करायचे असा प्रश्न समोर उभा ठाकला! शिलवान, निष्ठावान भगिनिंनी बाबासाहेबांना ओवाळताना ‘ईडा पिडा टळो! भिमाचे राज्य येवो!’ असे म्हटले. त्या भगिनिंना त्या काळामध्ये म्हणजे 1937 मध्ये बळीचे राज्य येवो असे न म्हणता ‘भिमाचे राज्य येवो’ असा काळानुरुप बदल केला.
तरुण पार्टी झिंदाबाद। थोडे दिन मे भिमराज।
1937 सालचा प्रसंग! डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विलायतेहून नुकतेच आगमन झाले होते. त्यांनी आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या दौर्याचा कार्यक्रम निश्चित केला. आपल्या पहिल्या फेरीत नाशिक जिल्ह्यातून दौरा करण्याचे निश्चित झाले. बाबासाहेबांचे आगमन जिथे जिथे असे तेथे तेथे पुढील घोषणा दिल्या जात होत्या, “डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार”, “आंबेडकर कौन है! दलितोंका राजा है।“ “तरुण पार्टी झिंदाबाद। थोडे दिन मे भिमराज।“ सर्वच ठिकाणी स्वतंत्र मजूर पक्ष व डॉ.बाबासाहेब यांचा जयजयकार होत होता.
दिंडोरी येथे आल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयजयकाराने दिंडोरी गाव गजबजून गेले. महारवाड्यात सुंदरशा मंडपात तयार केलेल्या मंचावर आरुढ होताच तेथील शेकडो स्त्रीयांनी आरती ओवाळून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भक्तीभावाने व भगिनीप्रमाणे ओवाळून ‘इडा-पिडा टळो! भिमाचे राज्य येवो!’ असे म्हणाल्या.संपूर्ण प्रसंग आजच डोळ्यासमोर घडत आहे असेच वाटते. त्यातल्या दोन गोष्टींनी मला नेहमीच विचार करायला भाग पाडले आहे.
पहीली गोष्ट “भिमराज येवो” या घोषणेतून व्यक्त झाली आहे. डॉ.आंबेडकरांना सार्वजनिक आयुष्यात येऊन केवळ 10 वर्षे झाली होती. त्यातही राजकारणात फारच थोडी. तरीही 1927ला महाडच्या चवदार तळ्यावर सुरु केलेला सामाजिक समतेचा संघर्ष दलितांना विशेषत: महारांना जबरदस्त चैतन्य देऊन गेला. बाबासाहेबांनी मानवी हक्कांची सुरु केलेली लढाई महारांनी शिरसावंद्या मानली व चळवळीसाठी तन मन धन सर्व काही देऊ केले. त्यामुळेच बाबासाहेब या देशामध्ये समग्र क्रांती करु शकतात असा विश्वास महारांमध्ये निर्माण झाला. त्या समग्र क्रांतीलाच त्या भोळ्या भाबड्या परंतु कट्टर निष्ठावंतानी ‘भीमराज’ हे नाव दिले.
ईडा पिडा टळो
दुसरी गोष्ट त्या शिलवान, निष्ठावान भगिनिंनी बाबासाहेबांना ओवाळताना ‘ईडा पिडा टळो! भिमाचे राज्य येवो!’ असे म्हटले. त्या भगिनिंना त्या काळामध्ये म्हणजे 1937 मध्ये बळीचे राज्य येवो असे न म्हणता ‘भिमाचे राज्य येवो’ असा काळानुरुप बदल केला. केवढी मोठी निष्ठा! केवढे मोठे शहाणपण! केवढा मोठा विश्वास! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्ववत्तेवर, शीलावर, करुणेवर ज्यांची जीवापाड निष्ठा होती त्यांनी बळीला 1937 सालीच सोडले व बाबासाहेबांना तन-मन-धनाने स्वीकारले. ज्यांनी बाबासाहेबांच्या विचारविश्वाचा, आधुनिक भारताचा ध्यास घेतला, ज्यांनी नव्या राष्ट्राच्या निर्मितीचा ध्यास घेतला त्या बाबासाहेबांच्या निष्ठावान अनुयायांनी 1937 सालीच बळीच्या राज्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरप्रणीत नवराष्ट्र निर्माण हाच पर्याय आहे हे छातीठोकपणे सांगितले.
कारण बळीच्या राज्यात बहुजनांना सुखशांती असेलही. परंतु आता नव्या जमान्यात एकाधिकारशाही, राजेशाही, सामंतशाही म्हणजेच शोषण! हे संपवायचे असेल तर लोकसत्ताक रचनाच हवी. आम्हीच आमचे प्रवर्तक आम्हीच आमचे मालक! शिवाय बळीने वामनापुढे शरणागती पत्करली. वामनाला म्हणे तीन पाय होते. त्यातला एक पाय आकाशात, दुसरा पाय पृथ्वीवर ठेवल्यानंतर तिसरा कुठे ठेवायचा हा प्रश्न पडला आणि बळीने आपली मान तुकवून आपले डोके वामनाच्या तिसर्या पायासाठी पुढे केले.
यातील ब्राह्मणी कल्पनाविलास सोडला तर एक सत्य उरते! ते म्हणजे ब्राह्मणाच्या वेषात आलेल्या वामनाला बळी सर्वश्रेष्ठ मानतो. ब्राह्मणी व्यवस्थेला व ब्राह्मणी धर्माला शिरसंवाद्य माननारा बळी म्हणूनच वामनापुढे मान तुकवतो. हि शरणगमनता अचानक आलेली नाही. ब्राह्मणी संस्कृतीच्या प्रभावाखाली असल्यामुळेच बळी वामनाला डोक्यावर घेतो आणि अखंड भारतवर्षाला व समस्त बहुजनांना ब्राह्मण्याच्या हवाली करुन एका अंधारयुगाला प्रारंभ करतो. बहुजनांच्या कित्येक पिढ्यांनी रक्ताने, घामाने उभारलेले एक सुजलाम, सुफलाम राज्य आपल्या एका कृतीने एका क्षणांत बळीने ब्राह्मणाच्या हाती नव्हे तर पायी देऊ केले. हा भाबडेपणा म्हणावा की आणखी काही?
हिंदुत्वाचे भिकार सनातन तुणतुणे
हे आजच्या विचारवंताना दिसत नाही असे नाही. तरीही ते ‘बळी बळी’ म्हणून टाहो फोडत आहेत. हे त्यांच्या अज्ञानातून घडत नसून हिंदुत्वाचे भिकार सनातन तुणतुणे ज्यांना सोडवत नाही व आधुनिक राष्ट्र निर्मितीचा बाबासाहेबांचा आराखडा ज्यांना पचत नाही अशांनी बळीचे भूत बळेबळेच गळी मारुन बहुजनांना आंबेडकरी विचारधारेपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र खुद्द डॉ.बाबासाहेबांच्या नावाचा जप करत सुरु ठेवले आहे. आंबेडकरी विचारमंथनातून स्वत: ही मुक्ती पावत नाहीत व बहुजनांनाही मुक्तीपासून दुरु ठेऊन त्यांच्या मनात गोंधळ उडवून देण्याचा यामध्ये इरादा असतो. हा सुनियोजित कट आहे असे आम्हांस वाटते.
आधुनिक भारताच्या रचनेचा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आराखडा संविधान समितीने व संसदेनेही स्वीकारला नाही. बाबासाहेबांनी प्रस्तुत केलेले मनुला संपविणारे व भारतीय स्त्रिचाही सन्मान वाढविणारे ‘हिंदु कोडबिल’ नेहरु व इतर सनतन्यांनी मान्य तर केले नाहीच उलट गायब केले आणि त्यापूर्वी संविधानामध्ये समग्र क्रांतीचे रसायन ओतायला याच सनातन्यांनी बाबासाहेबांना संविधानसभेमध्ये विरोध केला होता.
ईडा पिडा टळो
शेवटी हेच क्रांतीचे रसायन ‘States & Minorities’ या नावाने स्वतंत्र ग्रंथाच्या रुपात बाबासाहेबांनी प्रकाशित केले.
अशा क्रांतीकारी विचारधारेकडे पाठ फिरवून जे जे ‘बळी बळी’ असा जप करित आहेत
त्या बळींच्या ध्यासाध्यायींना आम्ही शुभेच्छा तरी कशा द्यायच्या हा आमच्यासमोर प्रश्न उभा राहतो.
अज्ञानात खितपत पडलेल्या व म्हणूनच त्यांचे जीवन नरकयातनांनी परिपूर्ण आहे
अशा बहुजनांना समग्र क्रांतीचा मार्ग दाखविण्याऎवजी पुराणातल्या ब्राह्मणी व्यवस्थेला शरण जाणार्या
बळीचे स्वप्न दाखवून किती दिवस हे ब्राह्मण्यग्रस्त छुपे हिंदुत्ववादी विचारवंत फसविणार आहेत?
याप्रसंगी ‘शुद्र पूर्वी कोण होते’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत बाबासाहेबांनी उल्लेख केलेल्या हिंदुच्या पाच प्रकारच्या वर्गांची आठवण होते.
पुष्कळ वर्षे आम्ही ज्यांना पुरोगामी समजलो ते तथाकथित विचारवंत असे फुसकेच राहतील असे वाटले नव्हते.
शेवटी “ईडा पिडा टळो” या बहुजनांच्या सार्वजनिक कुशलसंदेशाकडे वळुया!
“ईडा” या शब्दाचा अर्थ
“ईडा” या शब्दाचा अर्थ मराठी भाषेमध्ये सापडत नाही. ‘ईडा’ हा द्राविडी शब्दप्रयोग आहे. आजही तो तामिळ भाषेत प्रचलित आहे. ईडा चे तामिळ भाषेत दोन अर्थ आहे. एक म्हणजे ‘घास’! अन्नग्रहण करताना अन्नाचा एक अंश जो आपण तोंडात घालतो तो घास म्हणजे ईडा. म्हणजे ईडा हा अन्नासंबधी अन्नदर्शक शब्द आहे.”ईडा” या शब्दाचा दुसरा अर्थ आहे हिरवागार भुप्रदेश. म्हणजे सुपिकता, सुजलाम, सुफलाम अशा अर्थाचा भावदर्शक शब्द आहे. तो कृषिप्रधानताही दर्शवतो. ‘पीडा’ म्हणजे दु:ख, यातना! ‘पिडा’ला पाली भाषेमध्ये पीळा म्हणतात. जसे पीडा व पीळा एकच होतात तद्वतच ईडेचा ईळा होत असावे.
ईडा पीडा हे शब्दप्रयोग द्रविडांचे व द्रविडीभाषेचे दक्षिणायन झालेल्यानांही
किंवा उत्तर भारतातून अनेक परकीय राजसत्तांच्या आक्रमणामुळे द्राविडींचे उच्चाटन झाल्यानंतरही
महाराष्ट्रामध्ये द्राविडीचा थोडाफार अवषेश अजुनही बाकी आहे.
‘ईडा पीडा टळो’ याचा अर्थ ‘अन्न देणार्या हिरव्यागार भुप्रदेशावर येत असलेली पीडा नष्ट होवो.
मुबलक अन्न मिळो अन्न धान्य पिको. सुख समृद्धी येवो व सर्व सुखी होवोत’ असा होतो.
आधुनिक भारतामध्ये ही समृद्धी येऊन देश खर्या अर्थाने जागतिक महासत्ता बनायचा असेल तर
संविधानाने पुरस्कृत केलेल्या जीवन मुल्यांचा स्वीकार प्रत्येक भारतीयाला करावाच लागेल.
या संविधान पुरस्कृत न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हिच अस्मिता व्हायला हवी.
मी प्रथमही भारतीय आहे आणि नंतरही भारतीयच आहे
मराठी, बिहारी, तमिळ, भैया, काश्मिरी, बोडो अशा फुटकळ अस्मिता कामाच्या नाहीत. त्याकाही जणांना काहीकाळ सत्तासुख देतीलही पण हाती सत्ता असतानासुद्धा आंबेडकरी आराखड्याप्रमाणे देशाच्या किंवा राज्याचा विकास घडवून आणला नाही तर बहुजन कल्याणकारी राज्याची सुतराम शक्यता नाही. उलट अशा छद्मी अस्मितेमुळे माणसामाणसातून दरी रुंदावली जाते. शेवटी कधी प्रांताच्या नावाने तर कधी भाषेच्या पोकळ अभिमानाने दंगली घडविल्या जातात. दंगली, विध्वंस यांच्या अराजकातून काही व्यक्तींचे भवितव्य जरुर घडेल परंतु देशाचे भवितव्य मात्र जेव्हा अशा खुजा लोकांच्या हाती सत्ता जाते तेव्हा त्याची किंमत शांततापुर्ण सहजीवनातून विकासाची वाट पाहत असलेल्या लोकांना मोजावी लागते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ठणकावून सांगतात, ‘मी प्रथमही भारतीय आहे आणि नंतरही भारतीयच आहे’. अशा प्रकारची उत्तुंग मानसिकता प्रत्येक भारतीयाच्या मनमष्तिष्कावर कोरली जाईल त्यादिवशी देश खर्या अर्थाने नवनिर्माणाच्या मार्गाने कुच करील. वर्णजातीविरहीत व वर्गविरहीत समाजाची रचना करणे हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संकल्प आहे. संसदिय लोकशाही बाबासाहेबांना सर्वात योग्य वाटते. व्यक्ती, समाज व राष्ट्र यांचा एकसंघ विकास या दृष्टीने त्यांनी संविधान दिले व विचारधारा मांडली. खरे तर बाबासाहेबांचा या विचारधारेला आणि सम्यक संकल्पाला नाकारायची कुणालाच कसल्याही प्रकारची गरज वाटू नये. परंतु जेव्हा बहुजन विचारवंत आंबेडकर नावाच्या क्रांतीला नकार देतात तेव्हा नाकारणार्यांच्या बाबत शंका उपस्थित होणे साहजिकच होय.
‘बळी’ व ‘वामन’ हि मोठी समस्या नाही परंतु त्यांच्यात अडकलेली मानसिकता हिच मोठी धोंड होय! या देशातील बळीराजाला म्हणजेच शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी या सर्वांच्या कल्याणासाठी भीमराज्य प्रस्थापित करावेच लागेल!!!
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)