सर्व भारतियांना ईदच्या शुभेच्छा !
ईद मुबारक !!
मुस्लीम धर्म भारतीय उपखंडात पसरला : जगात ठिकठिकाणी संस्कृती आधी उदयाला आली. नंतर धर्म आले. ख्रिश्चन धर्माने युरोपात बस्तान बसवले. तर नंतरच्या मुहम्मदाच्या धर्माने पर्शिया आणि आजूबाजूच्या परीसरात. मुस्लीम धर्म जिथे गेला तिथे एकजिनसी संस्कृती नाही. इराण, इराक, सीरीया या पर्शियन साम्राज्याची संस्कृती वेगळी, इजिप्तची वेगळी, तुर्कस्तानची वेगळी तर पश्तुन भागाची वेगळी. पश्तुन म्हणजे पठाण. तर मंगोलियाकडच्या भागात अजून वेगळी. मंगोलियाच्या संस्कृतीत चीन आणि नेपाळमार्गे बौद्ध धर्म आधी आला. तरी संस्कृती तीच राहते. मंगोलियाची संस्कृती टोळ्यांची. आक्रमकांची. मंगोलियाचा सम्राट चंगेझखान हा बौद्ध होता. त्याने पश्तुनपासून ते पर्शियापर्यंत आपले साम्राज्य नेले. पण धम्म नाही नेला. त्याला साम्राज्य वाढवण्यात रस होता.
मुस्लीम धर्म भारतीय उपखंडात पसरला
तुर्की टोळ्या देखील पर्शियापासून आजच्या अफगाणिस्तानपर्यंत सर्वत्र होत्या. त्यांची संख्या अल्प असे. पण आक्रमक स्वभावामुळे जिथे जातील तिथे स्थानिकांना त्यांच्या सैन्यात भरती केले जाई. मुघल हे मूळचे मंगोल आहेत की या तुर्की टोळ्यातून पुढे मुघल आले हे ठाऊक नाही. माझा अभ्यास तितका नाही. पण मुघलांचे अस्तित्व हे तुर्की आणि मंगोल टोळ्या आपसात लढून त्या दुर्बल झाल्यानंतरच दिसते. त्यानंतरच मुस्लीम धर्म भारतीय उपखंडात पसरला.
९०० मुस्लिमांनी भारतात मुस्लीम धर्म एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर पसरवला हे पचायला जड जातं. फक्त ९०० मुसलमान धाकदपटशा करून धर्मपरिवर्तन करायला भाग पाडू शकतील का ? बौद्ध धम्म धाकाने नव्हता पसरला.तरीही तो नामशेष झाला. मग ९०० मुस्लीम कसे काय न भिता आपल्या धर्माचेच अनुयायी वाढवत गेले ?
बाबासाहेबांचे अनुयायी
याबाबातच्या ज्या अनेक थिअ-या आहेत त्यातल्या बाबासाहेबांच्या थिअरीवर मी विश्वास ठेवतो. माझा बाबासाहेबांवर विश्वास आहे. बाबासाहेब सुद्धा चुकू शकतात असे बुद्धीभेद करणारे वाक्य अनेकदा ऐकल्याने २००३ पासून मी बाबासाहेबांच्या अनेक ऐतिहासिक ग्रंथांचे संदर्भ तपासले. ते अचूक असल्याचे आढळले. मात्र यात माझा वेळ गेला. चळवळीत विश्वास ठेवून काम पुढे नेणे देखील महत्वाचे असते. प्रत्येकाने असे संदर्भ तपासत बसले तर ते होणे नाही. इतरत्र कुठेही असे होत नाही.
दुर्गा भागवतांवर डोळे झाकून विश्वास ठेवणारे त्यांच्या वक्तव्यांची चिकित्सा करत नाहीत. दुर्गाबाई पण चुकू शकतात असे मी कधी ऐकले नाही. दुर्गाबाईंनी बाबासाहेबांनी एकट्य़ाने राज्यघटना लिहीली नाही यावर विश्वास ठेवणारे संसदेच्या सेंट्रल होलममधल्या लायब्ररीत राज्यघटनेच्या मसुदा समितीची प्रोसिडिंग्ज वाचायला तयार नसतात. त्यांचा दुर्गाबाईंवर विश्वास असतो. आणि दुर्गाबाई चुकूच शकत नाही या विश्वासावर ते बाबासाहेब चुकू शकतात असे आंबेडकरी अनुयायांना सांगत असतात. जर त्यास सहमती मिळाली नाही तर बाबासाहेबांचे अनुयायी अंधभक्त मात्र दुर्गाबाईंचे भक्त हे अनुयायीच ठरत असतात. हे थोडंसं विषयांतर झालं. कारण अप्रामाणिकपणा काय असतो हे प्रत्येकाने स्वत:च्या आतमधे डोकावून तपासले पाहीजे.
सोमनाथाचे मंदीर लुटले
बाबासाहेब म्हणतात भारतातला बौद्ध धम्म नष्ट करण्यासाठी वैदीकांनी तुर्की आणि मुघल आक्रमकांना मदत केली. त्यांना आमंत्रणे दिली. पानिपताच्या लढाईत हिंदू राजांनी अब्दालीला कशी मदत केली हे इतिहासात आहेच. नालंदा सारखी विश्वविद्यालये या टोळ्यांनी उद्ध्वस्त केली तेव्हां ही केंद्रे त्यांना दाखवली गेली होती. तिथल्या बौद्ध विद्वानांची कत्तल झाली. ग्रंथालयाला आगी लागल्या. याच आक्रमकांनी मग जाताना इथे धन मिळाले नाही या रागातून सोमनाथाचे मंदीर लुटले. या लुटीची वर्णने आहेत. पण नालंदा सारख्य़ा सांस्कृतिक केंद्रांची नाहीत. याच काळात बौद्ध केंद्रे नामशेष झाली . या बौद्ध जनतेला मग धर्मांतरासाठी भाग पाडले गेले. एकीकडे वैदीक आणि एकीकडे हे आक्रमक. या दुष्टचक्रातून सुटून जिवंत राहण्यासाठी बौद्धांचे धर्मांतर झाले. अशा रीतीने केवळ ९०० आक्रमकांपासून १२% जनतेत मुस्लीम धर्म पोहोचला.
या आक्रमकांच्या आणि एतद्देशीय धर्मांतरीत मुस्लिमांच्या संस्कृतीत फरक आहे.
बौद्ध धम्म भारतात वेगळा आहे. लडाख आणि तिबेट मधे वेगळा आहे. चीन मधे वेगळा आहे आणि जपान मधे वेगळा आहे. या राष्ट्रांचे आपसातील संबंध हे संघर्षपूर्ण आहेत. ब्रह्मदेशातला बौद्ध धम्म हा मूळच्या भारतातल्या धम्माशी नाते सांगणारा आहे. थायलंड मधला धम्म हा तिथल्या संस्कृतीवरचे आवरण आहे. मलेशियातला बौद्ध धम्म हा मुस्लीम धर्माच्या आक्रमणानंतर आक्रसत गेलेला आहे.
थोडक्यात हे काही धर्मवेडे असण्याचे लक्षण नाही. काश्मीर मधे मुस्लीम असण्यापेक्षा काश्मीरीयतला महत्व आहे. अफगाणिस्तान मधे पश्तुनी असण्याला. बलुचिस्तानमधल्या लोकांना बलुची संस्कृती महत्वाची वाटते.
मात्र गेल्या काही वर्षात मुस्लीम धर्माचा अतिरेक वाढला आहे तो अमेरिकेच्या पैशांवर हे ८० आणि ९० च्या दशकातले उघड सीक्रेट आहे. मुस्लीम दशहतवाद हा अफगाणिस्तानमधले रशियन आक्रमण घालवण्यासाठी पोसलेला आहे. अल कायदा ही संघटनाच मुळात सीआयए ने बनवली, पोसली आणि वाढवली. अल कायदाचे म्होरके हे गरीब घरातून आलेले नाहीत. सद्दाम हुसेनला इराकच्या गादीवर अमेरिकेनेच बसवले. इराणमधली सेक्युलर राजवट ही अमेरिकेमुळेच उलथली. खोमेनी हा अमेरिकन सहाय्याने इराणचा सर्वेसर्वा झाला आणि त्याने धार्मिक कायदे बनवले. हे सर्व आखातातल्या तेलावर वर्चस्व मिळवण्यासाठी आणि तिथल्या रशियन हस्तक्षेपाला शह देण्यासाठी घडलेले आहे.
दलाई लामा
रशियाने कम्युनिझम आक्रमकपणे पूर्व युरोपात आपल्या नेतृत्वाखाली अनेक राष्ट्रांना स्विकारायला लावला. त्या काळच्या सोविएत युनियन मधे धर्मावर बंधने आली. त्यात उझबेकिस्तान, कझाकिस्तान सारखी राष्ट्रेही मुस्लीम ओळख विसरून कम्युनिस्ट झाली. चीनमधेही धर्मावर अनेक बंधने आली. तिबेट मधे तिबेटी संस्कृती आहे. त्यात लामांना विशेष महत्व आहे. लामांमधे चढत्या क्रमाने अधिकारी व्यक्ती आहेत. स्थानिक लामा हे धर्मगुरू असतात. त्यांचा प्रदेश मर्यादीत असतो.अशा अनेक लामांच्या वर एक पंचम लामा असतात. पंचम लामा ही खूप वरीष्ठ व्यक्ती आहे. स्थानिक लामा आणि पंचम लामा याच्या मधे काही पाय-या आहेत.पंचम लामा हे लद्दाखसाठी फक्त एकच असतात.ते जेव्हां लद्दाखमधे येतात तेव्हां लद्दाखी लोक आपली कामे सोडून त्यांच्या स्वागताला जातात.या पंचम लामांच्या वर एकच एक लामा असतात. त्यांना दलाई लामा असे म्हणतात. हे जगात एकच असतात.
याचा बौद्ध धम्माशी काही एक संबंध नाही. हे लोक बौद्ध धम्म मानतात. पण आपली संस्कृतीही जपतात. बुद्धाने सांगितले होते की धम्म देताना तिथल्या संस्कृतीवर अतीक्रमण करू नका. त्याने उदाहरणे देऊन धम्म हा त्या संस्कृतीवर रोपण असले पाहीजे असे सांगितले.
मुस्लीम दहशतवाद ही टर्म त्यांनी प्रचारीत केली
या सर्व गोष्टी एकमेकांशी ताडून पाहील्या पाहीजेत.म्हणूनच रोहिंग्या मुसलमानांना ब्रह्मदेशात तिथले स्थानिक बौद्ध मारतात म्हणून इथल्या बौद्धांना जाब विचारणारे इथले अर्धवट स्वयंघोषित मुस्लीम मौलवी असोत किंवा फ्रान्समधे अतिरेकी मुस्लिमांनी हिंसक घटना केल्या म्हणून भारतातल्या मुस्लिमांना जवाबदेही ठरवणारे इथले सनातनी आणि पुरोगामी असोत.हे सर्व लोक धार्मिक ध्रुवीकरणाला हात लावतच आहेत.
रशियन फौजा या तालिबान्यांमुळे गेल्या. तालिबान्यांना अफगाणिस्तान मिळाले. अल कायदाला काहीही मिळाले नाही. त्यामुळेच रशियन फौजा गेल्यानंतर अमेरिकेने आपला इंटरेस्ट काढून घेतल्यानंतर अल कायदा हा भस्मासुरासारखा अमेरिकेवर उलटले. अल कायदाकडे अमेरिकेच्या कृष्णकृत्यांचे पुरावे असल्याने अमेरिकेने सावध पावले टाकली. आधी मुस्लीम दहशतवाद ही टर्म त्यांनी प्रचारीत केली. त्याच वेळी भारतात कडवे उजवे सत्तेत येत होते. त्यांनी अमेरिकेच्या या मोहीमेत सहभाग नोंदवला. अमेरिकेने भारताचे तटस्थ धोरण आणि रशियाकडे असलेला झुकाव सोडून देण्याच्या बदल्यात भारताला मदत करण्याचे कबूल केले. या काळात अटलजींचे दूत जसवंतसिंह यांच्या आणि अमेरिकन परराराष्ट्रमंत्र्यांच्या शेकडो बैठका झाल्या. ती बैठकांची एक मालिकाच होती. या शिवाय परराष्ट्र सचिवांच्या पातळीवर अनेक बैठका झाल्या.
कॉंग्रेसने ध्रुवीकरणासाठी भाजप वाढावी यासाठी मुस्लिमांना भयभीत होण्याला मूक संमती दिली.
त्य़ानंतर इस्त्रायल देशावरची भारताने लादलेली बंदी उठवली गेली. इस्त्रायल आणि गाझा पट्टी या वादात भारताने आता इस्त्रायलच्या विरोधात मत नोंदवणे बंद केले. इराक, इराण च्या विरोधात मत द्यायला सुरूवात झाली. तटस्थता किंवा अलिप्तता आंदोलन गुंडाळले गेले. वाजपेयींनी मुस्लीम दह्शतवाद ही टर्म इंपोर्ट केली. बाजपेयी मवाळ होते कारण त्यांना बहुमत नव्हते.अमेरिकेच्या सहकार्यानेच काश्मीरात दशहतवादाविरोधातल्या लढाईला मुस्लीम दशहतवाद हे नाव मिळाले.
याच काळात हिंदू मुस्लीम दंगली बंद झाल्या.आता निवडणुकीत ध्रुवीकरणासाठी दंगलींची आवश्यकता पडत नव्हती. आता मुस्लीम दह्शतवाद या टर्मखाली भारतातल्या मुस्लीम समुदायाला संशयाच्या घे-यात उभे करता येत होते. कॉंग्रेस सरकारने या विरोधात कोणतीही पावले उचलली नाहीत. उलट सर्वाधिक बोगस प्रकरणे कॉंग्रेसच्या काळत झाली. कॉंग्रेसने ध्रुवीकरणासाठी भाजप वाढावी यासाठी मुस्लिमांना भयभीत होण्याला मूक संमती दिली. मुस्लीम भयभीत झाले तर ते तारणहार म्हणून आपल्या मागे उभे राहतील हा त्यांचा होरा होता. मात्र त्यांना पूरक असणारे राजकारण खेळणा-या आणि राजकारणात विरोधात असणा-या उजव्यांनी गैरमुस्लिमांना हिंदू बनवायला त्याचा उपयोग करून घेतला. मुस्लीम दह्शतवादाने हिंदू भयभीत व्हावेत असा प्रचार झाला. सीडीज बनल्या. सिनेमे बनले. त्याचे खासगी प्रक्षेपण वस्त्यावस्त्यात झाले.
भारतातल्या मुस्लिमांनी त्यावर प्रतिक्रिया द्यावी म्हणून करवादू लागलेले आहेत.
यामुळे भारतात मुस्लीमविरोधी वातावरण बनत गेले. ओबीसी हिंदू बनले. इथे कॉंग्रेस कमी पडत गेली.
कॉंग्रेसने विकास न केलेले दलित त्यांना सोडून गेले.अविकसित प्रदेशात यादव सोडून गेले.
हरियाणात जाट सोडून गेले. मात्र यातल्या सवर्ण आणि प्रबळ जातींना हिंदू बनवण्यात भाजप यशस्वी झाली.याचा फायदा त्यांना झाला.
आज त्यातला फोलपणा लोकांना कळून येतोय. मुस्लिम केव्हांच हिंसक प्रतिक्रियांपासून अलिप्त झाले आहेत.
मात्र जिथे वातावरण नाही तिथे दंगली घडवून मुस्लिमांवर खापर फोडण्यातला फोलपणा देखील
लक्षात येत असतानाच फ्रान्ससारख्या प्रगत देशातले मुस्लीम कसे काय हिंसक झालेत ?
यामागची कारणे शोधण्याचा जराही प्रयत्न न करता आणि भारतातले जातवास्तव,
खैरलांजी सारख्या घटनातले तपास आणि न्यायप्रक्रियेतले वास्तव याकडे काणाडोळा करून
आता सनातन्यांच्या सूरात सूर मिसळून पुरोगामीही हळूच
भारतातल्या मुस्लिमांनी त्यावर प्रतिक्रिया द्यावी म्हणून करवादू लागलेले आहेत.
सद्दामने सौदीवर आक्रमण केले
यात त्यांचा पवित्रा फारच रंजक आहे. उजव्या लोकांच्या प्रश्नांमुळे आमची अडचण होतेय,
कारण आम्ही तुमचे हितैषी आहोत असे त्यांना वाटते त्यामुळे आता तुम्हीच उत्तर द्यावे हा त्यांचा पवित्रा आहे.
भारतातल्या मुस्लिमांचा या घटनांशी काय संबंध आहे?
फ्रान्ससारख्या प्रगत देशातल्या गुप्तचर संघटनांना आता भारताकडून मार्गदर्शन घ्यायची गरज आहे का ?
हाच फ्रान्स हा देश अमेरिकेच्या मुस्लीम दहशतवाद विरोधी मोहिमेचा एक प्रमुख साथीदार देश आहे हे आपण कसे विसरतोय ?
सद्दाम हुसेन यांच्यावर झालेल्या कारवाइची १९९१ मधली कारणे ही खोटी होती
हे ब्रिटनमधे उघडकीस येऊनही ब्रिटन अमेरिकेसोबत राहिला.
लगेचच ब्रिटनमधे मुस्लीम दहशतवादाची प्रकरणे घडली.
त्यानंतर ९९ मधे पुन्हा इराकवर आक्रमण झाले त्यात अमेरिकेसोबत ब्रिटन, फ्रान्स होते.
सीरीया वर आक्रमणाच्या वेळीही होते आणि अफगाणिस्तानमधल्या आक्रमणाच्या वेळीही.
आज सौदी अरेबिया, इराक , इराण या देशातल्या तेलाच्या खाणीवर या तीन देशांनी क्लेम केलेला आहे.
सौदीतल्या विहीरींवर पूर्वीपासून जॉर्ज बुश यांच्या कुटंबाच्या मालकीच्या पेट्रोलियम कंपन्यांची मक्तेदारी आहे.
म्हणूनच सद्दामने सौदीवर आक्रमण केले होते.
भय हा फॅक्टर
आपल्या देशात काय घडते याकडे दुर्लक्ष करून मानवतावादाच्या नावाखाली फ्रान्समधल्या घटनांमुळे अस्वस्थ होणारे आपण देशातला जातीयवाद गाडू शकलेलो नाही. जातीयवादाच्या फसव्या व्याख्या पुढे करून आपण जातीय अत्याचार आणि जातपाळणे यात जाणिवपूर्वक गल्लत करत गेलो. आपण जातीवर आधारीत मतपेढ्या बनवल्या. त्यासाठी भय हा फॅक्टर वापरला. धर्मावर आधारीत मतपेढ्य़ा बनवल्या. त्यासाठीही भयाचा वापर केला. त्यातून दंगली आपणच घडवल्या. त्यात कधीच सूत्रधारांना शिक्षा झालेल्या नाहीत.
मात्र दंगलींचे जे खोल परिणाम होतात, त्याचाही वापर करून घेऊन अजून सामाजिक वातावरण बिघडवत नेले.
कारण आपले आणि आपल्या उच्चवर्णिय सहका-यांचे दोन्ही हातांनी
देशातल्या नैसर्गिक साधनसंपत्तीला ओरबाडून खाण्याकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावे.
भाजप येवो अथवा कॉंग्रेस यात कोण आघाडीवर आहेत ?
जे आघाडीवर आहेत त्यांना दंगलीच्या आणि दशहतवादाच्या कमीत कमी झळा बसलेले हे लोक आहेत. हा इंडीया आहे.
आणि होरपळणारे भारतीय आहेत. दंगलीत हिंदूस्थानी आहेत.
त्यांना इथले मुस्लीमस्तान उघड्या डोळ्यांना दिसतेय..दूरवरच्य़ा घटनांतून.
जवळच्या हाथरस, खैरलांजी, लक्ष्मणपूर, भागलपूरकडे डोळेझाक करून.कोणत्या तोंडाने आपण हिंसेचा निषेध करतो ?
BY – किरण चव्हाण
लेखक सामाजिक आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक विश्लेषक आहेत
शहीद भगत सिंह : मी नास्तिक का आहे?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 29, 2021 19:05 PM
WebTitle – Obstacles to soybean self-sufficiency in pulses