नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या दोन प्रमुख हवालदार, सीमा देवी आणि सुमन हूडा यांनी मागील नऊ महिन्यांत १०४ हरवलेल्या मुलांना शोधून त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा एकत्र आणण्याचा उल्लेखनीय पराक्रम केला आहे. हरियाणा, बिहार आणि उत्तर प्रदेशातील दुर्गम भागांमध्ये प्रवास करत त्यांनी हरवलेल्या मुलांचा शोध घेतला.या कामात अनेक अडचणी आल्या – कुटुंबांकडे हरवलेल्या मुलांचे ताजे फोटो नव्हते, भाषेचे अडथळे, अपरिचित ठिकाणे आणि इतर राज्यांतील स्थानिकांचा मनमिळाऊपणा मिळवण्यात आलेली अडचण. अशा अडथळ्यांना तोंड देतही या दोघींनी यशस्वीरित्या मुलांना शोधून कुटुंबीयांना भेटवले.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सीमा देवी आणि सुमन हूडा सध्या बाह्य उत्तर जिल्ह्यातील मानव तस्करीविरोधी युनिटसोबत (AHTU) काम करत आहेत. सीमा देवी यांनी मिडियाशी बोलताना सांगितले की, मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत ‘ऑपरेशन मिलाप’ अंतर्गत हे बचावकार्य केले गेले. “बचावकार्यदरम्यान दुर्गम ठिकाणे, इतर भौगोलिक अडचणी तसेच अपरिचित माणसं ही मोठी समस्या होती. अशा ठिकाणी आम्हाला स्थानिक पोलिसांकडून मदत घ्यावी लागली,” असे त्यांनी सांगितले.
जुने फोटो असल्याने अनेकदा ओळख पटवणे कठीण
यावर अधिक बोलताना त्या म्हणाल्या की,”काही प्रकरणांमध्ये हरवलेल्या मुलांनी वापरलेले फोन नंबर बंद झाले होते. अशा वेळी आम्ही सायबर टीमची मदत घेतली आणि फोनचा शेवटचा लोकेशन शोधला,” असे देवी यांनी स्पष्ट केले.
सीमा देवी यांनी एक उल्लेखनीय प्रकरण सांगितले: “बवाना भागातील एका १३ वर्षांच्या मुलीचा पत्ता नव्हता. तिच्या धाकट्या भावाने आम्हाला सांगितले की, तिने वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करून आपण बरी असल्याचे सांगितले, पण त्याला काहीतरी गडबड असल्याचा संशय होता. आम्ही तपास करून तिचा शोध नोएडाच्या जार्चा येथे लावला. तिथे ती घरकाम करत होती. आम्ही तिला तातडीने सोडवले.”
ज्या नवीन ठिकाणी शोधकार्य झाले, तिथे स्थानिकांचा विश्वास मिळवण्यासाठी वेळ लागला. यानंतरच दारोदार जाऊन शोध घेणे शक्य झाले.
देवी यांनी सांगितले की, जुने फोटो असल्याने अनेकदा ओळख पटवणे कठीण झाले.
अशा वेळी, मुलांच्या कुटुंबीयांनी त्यांना शारीरिकदृष्ट्या ओळखून सुद्धा मदत केली.
बहुतेक वय ४ ते १७ वर्षे असलेल्या मुलांना ओळखण्यासाठी पालकांना बोलवावे लागले.
सोशल मीडियावर अनोळखी लोकांशी मैत्री झाल्यामुळे १३ ते १७ वयोगटातील मुले विशेषतः धोक्यात
मार्चमध्ये AHTU मध्ये सामील झालेल्या सुमन हूडा यांनी सांगितले की,
मुलांना त्यांचे कुटुंब परत मिळवून देण्यात त्यांना प्रचंड अभिमान आणि समाधान वाटते. “आमच्या ड्युटीला ठरलेली वेळ नाही. हरवलेल्या मुलांची माहिती मिळताच आम्ही लगेच घर सोडतो. काही दिवस असेही असतात जेव्हा मी माझ्या मुलांना पाहू शकत नाही,” असे त्यांनी सांगितले.
अडचणींबद्दल सांगताना, हूडा यांनी नमूद केले की, अशा खेड्यांमध्ये हरवलेल्या मुलांचा शोध घेणे कठीण होते, जे नकाश्यावरही दिसत नाहीत. “वाहतुकीच्या साधनांचा काही ठिकाणी अभाव होता त्यामुळे आम्हाला कधी कधी बरेच किलोमीटर चालावे लागते. अनेक लोक मदतीस तयार असतात, पण काहींना वाटते की, पोलिसांना मदत केल्याने कायदेशीर अडचणी येतील,” असे हूडा म्हणाल्या.
सुमन हूडा यांनी खुलासा केला की, रेल्वे स्थानकांवरील भिकारी आणि फेरीवाल्यांकडून अनेकदा महत्त्वाचे धागेदोरे मिळाले.
त्यांना हरवलेल्या मुलांचे फोटो दाखवल्यावर मुलांना पाहिल्याचे सांगितले गेले.
सोशल मीडियावर अनोळखी लोकांशी मैत्री झाल्यामुळे १३ ते १७ वयोगटातील मुले विशेषतः धोक्यात असतात, असे त्यांनी सांगितले.
मुलांच्या हरवण्यामागील कारणे
मुलांच्या हरवण्यामागील कारणांमध्ये पळून जाणे, व्यसनाधीनता, पालकांची काळजी नसणे आणि शिक्षणाचा अभाव या बाबी होत्या.
सीमा देवी यांना स्वतःचे दोन मुलगे आहेत, वय १६ आणि १० वर्षे. “कामासाठी ज्यावेळी मी दोन-तीन दिवस घराबाहेर असते, तेव्हा माझा लहान मुलगा मला खूप मिस करत असतो,” असे त्यांनी सांगितलं. पालकांनी आपल्या मुलांशी बोलावे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवावे, असेही त्यांनी सुचवले.
बाह्य उत्तर जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त निधिन वलसन म्हणाले,
“ऑपरेशन मिलाप अंतर्गत सीमा आणि सुमन यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आम्हाला खूप अभिमान आहे. मुलांचा व्यापार थांबवण्यासाठी आणि आपले समाज सुरक्षित ठेवण्यासाठी आमची कटिबद्धता यामुळे अधिक दृढ झाली आहे.”
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 22,2024 | 15:42 PM
WebTitle – delhi-police-seema-devi-suman-hooda-missing-children-operation-milap