विद्यार्थी दिवस : एक पत्र विद्यार्थी दिवसाच्या व्यापक चळवळीसाठी..!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी छ. प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे प्रवेश घेतला. हा शाळा प्रवेश दिन ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून महाराष्ट्रात साजरा व्हावा यासाठी १७ वर्षे महाराष्ट्र सरकारकडे आग्रह धरला होता. सदर विनंती आग्रहाअन्वये शासनाने ६ वर्षापूर्वी हा दिवस ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून घोषित केला. त्यानंतर हा विद्यार्थी दिवस देशभरातील शाळा महाविद्यालयात साजरा होण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले. मागील चार वर्षापासून राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्यापर्यंत हा विषय पोहचवत आहे. यापूर्वी १ लाख २५ हजार पत्रे केंद्र सरकारकडे पाठविण्याची मोहीम राबवली. याची दखल घेत तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तथापि अधिकृत अधिसूचना निघण्यापूर्वीच त्यांचा कार्यकाल संपुष्टात आला. अन्यथा एव्हाना विद्यार्थी दिवसाची अधिकृत अधिसूचना केंद्र सरकारकडून निघाली असती.
आपल्याकडे ज्या पद्धतीने डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाने शिक्षक दिन आणि डॉ. ए. पी. जे अब्दूल कलाम यांच्या नावाने वाचक दिन देशभर साजरा केला जातो, तसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संपूर्ण भारतात विद्यार्थी दिवस साजरा व्हायला हवा, ही भूमिका घेऊन विद्यार्थी दिवासाची चळवळ आपण अधिक तीव्र करतो आहे. संभाजीनगर – औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि तो जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहाणार नाही’ असे विधान केले होते. या विधानाला ७५ वर्षे होत आहेत. याचे औचित्य साधून आता महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून तब्बल ७५ लाख पत्रांच्या माध्यमातून राष्ट्रपती मा. द्रौपदी मूर्म आणि प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांना साद घालणार आहे.
जागतिक स्तरावर ज्यांना सिम्बॉल आॕफ नॉलेज म्हणून संबोधले जाते आणि जगातला सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून ज्यांची ओळख आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज जगाचे प्रेरणास्थान आहे. या आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून नव्या पिढीला जबरदस्त प्रेरणा आणि चालना देण्याच्या दृष्टीने तसेच शालेय शिक्षण चळवळ अधिक गतिमान करण्याच्या हेतूने ७ नोव्हेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन तथा ‘विद्यार्थी दिवस’ हा अत्यंत महत्वाचा ऊर्जादायी दिवस आहे. नवा, समृध्द, शक्तिशाली भारत उभा करायचा असेल, तमाम गोरगरिबांच्या, दलित- वंचितांच्या आणि एकूणच सर्व समाजाच्या नव्या पिढीला शिक्षणाच्या मुख्य धारेत आणायचे असेल, तसेच एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे पहायचे असेल तर विद्यार्थी दिवस भारतभर होणे महत्त्वाचे आहे. यासाठी आपण सर्वजण या पत्रमोहीमेचा एक भाग होऊया. छोटसं पोस्टकार्ड राष्ट्रपती व प्रधानमंत्र्यांना स्वतः पाठवूया आणि इतरांनीही पाठवावे यासाठी आवाहन करून आपले कर्तव्य बजावूया..!
अरुण विश्वभंर जावळे
प्रवर्तक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिवस.
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 05,2024 | 10:48 AM
WebTitle – Students’ Day A Letter to the Wider Movement of Students’ Day