खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला आहे, शुक्रवारी खडसे राष्ट्रवादी त जाणार आहे तशी घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे ,पण यात आता महत्वाचा प्रश्न हा आहे की, खडसे यांचा बळी नेमका कोणी घेतला?? भाजपने की फडणवीस?? याच उत्तर भाजपचेच लोक सांगतील की याला जबाबदार पूर्णपणे विरोधीपक्षनेते आदरणीय देवेंद्र फडणवीस हेच आहेत.
विरोधकांना घरीच कस बसवता येईल याची व्युहरचना फडणवीस आखत गेले
खडसे यांचा व्यवस्थित गेम करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली,
जेव्हा पासून फडणवीस मुख्यमंत्री बनले तेव्हापासून राज्याच्या विकासापेक्षा
आपल्या पक्षांतर्गत विरोधकांचा अविकास कसा होईल याकडे त्यांनी आपलं पूर्ण लक्ष केंद्रीत केले.
मग ते तावडे असो, पंकजा मुंडे असो की बावनकुळे असो की एकनाथ राव खडसे असो.
या सगळ्या आपल्या विरोधकांना घरीच कस बसवता येईल याची व्युहरचना फडणवीस आखत गेले,
दिल्ली कडून सतत त्यांना असलेला पाठिंबा यामुळे त्यांना आणखी बळ मिळत गेले.
जेव्हा एकनाथ खडसे यांच्या सारखा बहुजन समाजातील नेता,
ज्याने भाजप महाराष्ट्रात रुजवण्यात मोलाची भूमिका पार पाडली त्यांना जर भाजप या वयात
आणि चाळीस वर्षानंतर सोडावी लागत असेल तर
आता भाजपच्या पक्ष श्रेष्ठींनी नक्कीच देवेंद्र फडणवीस यांना जे अभय दिलं आहे त्याचा विचार करावा.
याला कारणीभूत कोणी असेल तर देवेंद्र फडणवीस स्वतः आणि त्यांचा अहंकार.
कोणाच्याही ध्यानी मनी नसतांना फडणवीस यांना मुख्यमंत्री पद मिळालं
आणि त्यांनतर सत्ता आणि अहंकार यांचं वार जे त्यांच्या डोक्यात गेलं
त्याची परिणीती मागच्या वर्षातील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मी पुन्हा येईल या अहंकारपूर्ण घोषणेत झाली.
सतत विरोधी पक्षातील लोक फोडायचे नि आपल्या पक्षात घेऊन त्यांना वर करायचं
आणि आपल्याच पक्षातील जेष्ठ आणि प्रामाणिक नेत्यांना वगळायच असा कित्ता फडणवीस यांनी सतत गिरवला.
स्वतःला पहेलवान समजून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांनी जे आव्हान दिलं त्यात फडणवीस अलगद फसले आणि शेवटी सर्वात जास्ती जागा मिळून पण त्यांना महाराष्ट्राची सत्ता सोडावी लागली. महाराष्ट्राच्या राजकारणातील पितामह असलेल्या शरद पवार यांना कमी लेखून आणि त्यांच्या पक्षातील अनेक शिलेदारांना गळाला लावून फडणवीस यांनी मोठी घोडचूक केली, त्यातच ज्या अजित पवार यांच्या विरोधात त्यांनी रान उठवलं त्यांच्या सोबत प्रातःकाळी केलेला गंधर्व विवाह पण फसला त्यामुळे फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील ८० वर्षाच्या म्हाताऱ्या सोमोर पराजित झाले आणि याला कारणीभूत कोणी असेल तर देवेंद्र फडणवीस स्वतः आणि त्यांचा अहंकार.
भाजपच्या अंतर्गत वर्तुळात फडणवीस यांच्या विरोधात असंतोष
राष्ट्रवादीमधील अनेक लोक फडणवीस यांनी फोडले पण शरद पवार यांनी महाराष्ट्रातील भाजपचा कणा खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन मोडला आणि पुन्हा एकदा आपण राजकारणातील महारथी आहोत हे सिद्ध केले. खडसे यांच्या राष्ट्रवादी तील प्रवेशा विषयी जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न केला गेला तेव्हा त्यांनी यथोचित उत्तर पत्रकारांना दिलं, तुम्ही यशाचे कितीही इमले बांधा पण तुमच्या पायाखालील जे खडक आहेत त्यांना विसरला तर तुमचा इमला खचल्याशिवाय राहणार नाही.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला आता याचा विचार करण्याची गरज आहे की केवळ एका व्यक्तीच्या समाधानासाठी तुम्ही पक्षातील जुन्या जाणत्या लोकांना अशी अपमानास्पद वागणूक देत असाल तर तुमच्या विश्वसनियतेला तडा गेल्या शिवाय राहणार नाही.आज खडसे गेले उद्या कोणी दुसरं जाईल, खडसेंच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजपच्या अंतर्गत वर्तुळात फडणवीस यांच्या विरोधात असंतोष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की.
सो सुनार की एक लोहार की
खडसे यांच्या निमित्ताने फडणवीस यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणारा एक तुर्क चा एक्का राष्ट्रवादी च्या हाती लागला आहे. खानदेश मध्ये त्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसला आपलं बस्तान बसवण्याची मोठी संधी मिळाली आहे. आधी मंत्रिमंडळातुन बाहेर काढणे आणि नंतर मंत्रिमंडळ विस्तार करतांना देखील खडसे यांना वगळणे त्यांनंतर वेळोवेळी सर्व बाबतीत खडसे यांना डावलणे, विधानसभेत त्यांची तिकीट कापून मुलीला देणे, आणि त्यांच्या मुलीचा पराभव घडवून आणण्यात योगदान देणे या सर्व गोष्टी फडणवीस यांना आता भोवलेल्या दिसत आहेत.
खडसे यांना योग्य स्थान राष्ट्रवादी त दिल्या जाईल च पण या मध्ये फडणवीस यांचं पण राजकीय नुकसान आहे तरीही सतत खडसे याना गृहीत धरल्या गेले, सतत अपमान, सतत डावलणे यातून त्यांनी शेवटी ज्या पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं त्या पक्षाची सोडचिठ्ठी देण्याची वेळ खडसेंवर आली.
याला भाजप पेक्षा जास्ती देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहे हे सदरचा सगळा घटनाक्रम लक्षात घेतल्यास दिसून येते. या सर्व बाबतीत शरद पवार यांचा विचार केल्यास “सो सुनार की एक लोहार की” ही म्हण शंभर टक्के पवार यांना लागू होते ,म्हणून च खडसे यांच्या निमित्ताने फडणवीस यांना देखील स्वतःच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि खडसे पक्षामुळे नाहीतर आपल्या मुळे गेले हे कबूल करण्याची पण आत्तापर्यंत चा फडणवीस यांचा प्रवास बघिलतल्यास या दोन्ही गोष्टींची शक्यता शून्य आहे हे लक्षात येते.
BY – नम्रता आचार्य ठेमस्कर
लेखिका राजकीय अभ्यासक विश्लेषक आहेत.
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)