13 आॅक्टोबर 1935 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकजवळच्या येवल्यात “मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ” अशी घोषणा केली होती. 1935 ते 1956 इतक्या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला. 21 वर्षे बाबासाहेबांनी अनेक धर्मांचे धर्मग्रंथ वाचले, तुलनात्मक अध्ययन केले.
शेवटी त्यांनी भारतातील मातीतलाच मानवतावादी धम्म स्वीकारण्याची घोषणा केली.
14 आॅक्टोबर 1956 ला अशोक विजयादशमीच्या दिवशी धम्मदिक्षा घेतली.हा धम्मदिक्षेचा सोहळा अपूर्व होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत 5 लाख अनुयायांनी धम्मदिक्षा घेतली.
धर्मांतराने काय मिळाले?
हा प्रश्न जेव्हा मनात येतो तेव्हा या प्रश्नासोबत अनेक प्रश्न आणि विचारही येतात.
बाबासाहेब आंबेडकरांनी तथागतांचा धम्मच का निवडला?
बाबासाहेब आंबेडकरांनी इतर धर्मात जायचा विचार केला नसेल का?
भारतात बौध्द धम्म मरणप्राय अवस्थेत असताना भविष्यात धम्म वाढेल की नाही?
5 लाख लोकांनी धम्म स्विकारला पण त्यातील बहुतांश लोक हे अशिक्षित होते,
त्या लोकांनी धम्मपालन निट केले नाही तर धम्म चळवळ क्षीण होईल अशी भीती नसेल का?
धम्म स्वीकारल्यानंतर इतर धर्मातील लोकांची काय प्रतिक्रिया असेल? ज्या हिंदू धर्माला नाकारून बौध्द धम्म स्विकारला त्या हिंदूंची काय प्रतिक्रिया असेल?
अशिक्षीत, मागास, गरीब लोकांना धम्म देणे हे धाडसाचे नव्हते का?
हे आणि इतरही बरेच प्रश्न निर्माण होतात.
धर्मांतराने आम्हाला काय मिळालं हा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा धर्मांतराच्या आधीचा हिंदू आठवतो. यात सर्व मागास, गरीब आणि अशिक्षित जातींचे लोक होते. त्यांचे धर्मांतराच्या आधीचे जीवन काय होते हे कल्पनाही करवत नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्यासोबत प्रामुख्याने हिंदू महार, हिंदू मातंग, हिंदू चर्मकार, हिंदू वडार अशा मागासवर्गीय लोकांनी धम्मदिक्षा घेतली. जातव्यवस्थेच्या हिन पातळीवर असलेले हे लोक होते. ज्यांच्या सावलीचाही विटाळ होतो अशा लोकांना बाबासाहेबांनी धम्म दिला. अस्पृश्य म्हणजे ज्यांचा स्पर्शही चालत नाही असे हे लोक होते. कमालीचे दारिद्र्य, अशिक्षीतपणा, हीन दर्जाचे जीवन जगणारे हे लोक होते.
या लोकांना बाबासाहेबांनी एक धाडसी स्वप्न दाखवले. तुम्हीही माणुस आहात आणि तुम्ही माणुस म्हणून जगू शकता हे धैर्य निर्माण केले. बाबासाहेबांनी समानतेवर, बंधुत्वावर आणि करुणेवर आधारित धम्म स्वीकारण्याचे बळ या पिडीत लोकांच्या मनात निर्माण केले. धर्मांतराने पिढ्यानपिढ्या खितपत पडलेल्या मागास, लाचार जनतेच्या मनात स्वाभिमानाचे स्फुलिंग चेतवले. आपणही स्वाभिमानी होऊ शकतो,आपणही माणुस म्हणून जगु शकतो हा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मात हिन दर्जाच्या समजल्या जाणाऱ्या लोकांना दिला.
धर्मांतराने काय मिळवले?
बरेच टीकाकार असे बोलतात की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्माला धर्मांतरित बौध्दांनी गालबोट लावले. बुद्धालाच महार बनवले. बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात महाराष्ट्रातील बौध्दांनी धम्म सीमित केला. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते की संपूर्ण भारत बौध्दमय करीन या स्वप्नाशी आजचे बौध्द प्रामाणिक राहिले नाहीत आणि तसा प्रयत्न पण करताना दिसत नाहीत. पण हे सगळे आरोप खरे आहेत का?
हे आरोप करणे कोणत्या मानसिकतेचा परिपाक आहे?
तथागतांचा धम्म ही फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची मालकी नाही. स्वतः तथागत गौतम बुद्ध म्हणतात की ज्याला धम्म स्वीकारायचा आहे त्याने तो धम्म अभ्यासावा, विचार करावा आणि जर सारासार विवेकबुद्धीला पटला तरच स्वीकारावा. बुध्दिष्टांनी धम्म स्वीकारण्यावर इतरांना कधी मनाई केली आहे का?
कोणत्याही जाती-धर्माचे लोक धम्म स्वीकारू शकतात.
धम्म स्वीकारल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांचे लगेचच निर्वाण झाले. पण बाबासाहेबांच्या अनुयायांनी धम्म प्रसार थांबवला नाही. घरातील देव फेकून दिले. गावोगावी जाऊन जनजागृती केली. विहारे निर्माण केली. आपल्या मुलांना कठीण परिस्थितीत शिकवले.बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालण्याची कसरत करत राहीले आणि बहुतांश लोक यात यशस्वी झाले.
महाराष्ट्रातील स्थिती लक्षात घेता ब्राम्हण समुदायानंतर सर्वात जास्त अधिकारी हे बुध्दिष्ट आहेत. सत्तेत कमी असले तरी नोकऱ्यांमध्ये बुध्दिष्टांनी मजल मारली आहे.सधन म्हणता येणार नाही पण चांगले जीवन जगतात. दीक्षाभूमीवर आणि चैत्यभूमीवर जी ग्रंथविक्री होते त्याचे दरवर्षी नवनवीन रेकॉर्ड होतात. गावोगावी धम्म परिषद आयोजित करण्यात येतात.
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक बाबतीत बौध्द नेहमी सजग असतात.
कोणत्याही जाती-धर्मावर अथवा व्यक्तीवर अन्याय झाला तर पहिली प्रतिक्रिया बौध्दांची असते.
सामाजिक भान असलेला समाज म्हणून बौध्द अग्रेसर आहेत. जात धर्माच्या भिंती कधीच पाडून दिल्या आहेत.
भले आर्थिक बाबतीत आजचे बौध्द फार सक्षम नसतील परंतु सामाजिक,राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक बाबतीत नक्कीच सक्षम आणि सजग आहेत हे मान्यच करावे लागेल.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक लढ्याचे हे फलित आहे.
दलित धर्मांतर:दलितांना सन्मान द्यायला कमी पडतो म्हणून ते धर्मांतर करतात
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 14, 2020 10:32 AM
WebTitle – Buddhist-conversion-Ambedkar-1956
आपण वेळोवेळी अशा मार्गदर्शनाची गरज आहे आजच्या तरुणाना !
Thanks Sir.
धुमाळे साहेब या लेखामध्ये व अशा बऱ्याच लेखांमधून खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. तसेच तुमचे लेख व जे तुम्ही इथे अनेक लेखकांचे लेख प्रकाशित करता त्यातून मला व अनेक तरुण व अभ्यासू लोकांना नक्कीच प्रेरणा मिळते. आशेच लेख share करत राहा, व आम्हाला ज्ञानाने समृद्ध करत राहा.
धन्यवाद, सप्रेम जयभीम.