कतार मध्ये दुसऱ्या दिवसाची सुरवात म्युझियम ऑफ इस्लामिक आर्ट (MIA) पाहण्यापासून करण्याचे ठरले. फिरण्यासाठी सकाळीच गाडी बुक केली होती. नाश्ता करून गाडीने म्युझियमला पोहचलो. रस्त्यावर फारशी ट्राफिक नव्हती . शिवाय रोड ही प्रशस्त, स्वच्छ आणि खाच- खळगे विरहित होते. खाच-खळगे हा शब्द प्रयोग कल्याण मुबईला राहत असल्यामुळे ओघाने येतोच. तो आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे म्हणून. म्युझियम समुद्र किनारी आहे. खरे पाहता म्युझियमच्या सर्व बाजूला समुद्र आहे. समुद्राचे पाणी अत्यंत स्वच्छ आणि नितळ होते. सभोवार असलेले आकर्षक कारंजे मुझीयमची शोभा अधिकच वाढवतात. मुझीयमची रचना ही अत्यंत आकर्षक होती. मुझयमसाठी निवडलेली जागा व त्याची ठेवलेली निगा अचंबित करणारी होती.
कतार म्युझियम
मुस्लिम समाज हा कलेच्या बाबतीत सजग असलेला समाज आहे. भारतातील त्यांच्या मध्ययुग काळातील भव्य वास्तू व त्यावरील कलाकूसर भारतीयांसाठी परिचित आहेच. ताजमहल सारखी वास्तू तर जागतिक आकर्षण असलेली वास्तू आहे, हे सर्वश्रुत आहे. या म्युझियम मध्ये १४ व्या १५ व्या शतकापासूनचे विविध देशातील कलाकुसरीच्या वस्तू, भांडे, कपडे, दागिने आणि विविध देशातील इस्लामिक धर्मग्रंथ ‘ कुराण ‘ याच्या हस्तलिखित प्रती जपून ठेवल्या आहेत.म्युझियम मधील दालने ही कलात्मक आहेत.
एकंदरीतच म्युझियम पाहतांना वेळ कसा निघून जातो ते कळत नाही.
म्युझियम मधील काही वस्तूंचे फोटो खाली देत आहे.
कलात्मक वस्तू, वास्तू विविध कतार च्या म्युझियम मध्ये पाहिल्या आहेत पण सैनिक आणि त्याचा घोडा पूर्णपणे चिलखत परिधान केलेला प्रथमच पाहत होतो.
देश पाहण्यासाठी आलेले पर्यटक आणि सेवा देणारे सर्व कर्मचारी अत्यंत विनयशीलपणे वागत होते. कुठेही धावपळ, गडबड दृष्टीस पडत नव्हती.
म्युझियम पाहून झाल्यावर लांब ड्राईव्हवर जाण्याचे ठरले होते ते म्हणजे शहराचा फेर फटका मारण्यासाठी. कार मधून शहर दर्शन करण्यासाठी.
कतार एक विलोभनीय शहर
म्युझियम मधून बाहेर पडलो तेव्हा काळोख झाला होता. सर्वशहर लाईट ने झगमगुन उठले होते. मुळात इथल्या इमारतीचे बांधकाम, त्याचे स्ट्रक्चर अत्यंत विलोभनीय आहे. प्रत्येक इमारतीचा आकार , रचना इतकी मनमोहक आहे की ती इमारत डोळ्यात साठवून ठेवावी अशी आहे. आणि काळोख झाल्यावर रंगीबेरंगी लाइट्स मुळे इमारतींची वाढलेली शोभा केवळ अविश्वसनीय अशी होती. बरं अशी एक इमारत नसून असंख्य इमारती एकापेक्षा एक अशा सुंदर आहेत, की ते दृश्य केवळ डोळ्यात साठवून ठेवावे असेच होते.मन हरकून जावे असा तो तासा दीड तासाचा प्रवास ( लांब ड्राइव्ह ) होता. ह्या देशाला लाइटिंगचा देश म्हटला तरी अतिशोयोक्ती होणार नाही.
इमारतींसोबत सर्वत्र रस्ते ही लाइटने सुशोभीत केलेले होते. विविध प्राणी, फुले, फळे, झाडे यांच्या आकाराच्या लाइट्स रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसतात. आम्ही पर्ल नामाभिमान असलेल्या विभागात फेरफटका मारला. नावाला सार्थ ठरेल असे सर्वत्र मोत्यांच्या राशी दिसत होत्या. सर्व दहापंधरा किलोमीटरचा परिसर मोत्यांच्या माळांनी सुशोभीत केलेला दिसत होता. ज्याचे वर्णन करणे ते शब्दात पकडणे कठीण जात आहे. ते दृश्य वर्णन करण्यासारखे नव्हतेच मुळी. जे आहे ते फक्त पाहणे, आणि डोळ्यात साठवणे एवढेच केले जाऊ शकते.
आम्ही जो चाळीस पन्नास किलोमीटरचा प्रवास केला होता त्या प्रवासातील सर्व रस्ते प्रशस्त चकचकीत होते. रस्त्याला अगदी लहान खड्डा देखील नव्हता. ट्राफिक किंचितही नव्हती. कार थांबत होती फक्त सिग्नलला . ह्या चाळीस पन्नास किलोमीटरच्या प्रवासात रस्त्यावरून चालणारे केवळ चार पाच लोक दिसले. दोन तीन स्पोर्ट्स सायकलवर फिरणारे , दोन तीन बाईक वाले बस एवढेच काय ते लोक. बाकी सर्वांचा प्रवास कारने. एका रेसिडेन्स एरियातील हॉटेल मध्ये पार्सल घेण्यासाठी गेलो तिथे काही लोक खरेदीसाठी रस्त्यावर दिसले. पार्सल बॉय पार्सल घेऊन बाईक वर जातांना मात्र दिसत होते. एकंदरीतच दिवसभरचा फेरफटका सुखावह होता. हवेत कुठेही प्रदुर्षण जाणवले नाही त्यामुळे दिवसभर फिरूनही थकवा जाणवला नाही. फ्रेश मानानेच घरी परतलो.
क्रमशः
अशोक हंडोरे
नाट्यकर्मी,सामाजिक चळवळ विश्लेषक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 19,2023 | 20:54 PM
WebTitle – Qatar: Journey to a prosperous country, Museum of Islamic Art