इथून पुढील काळात ‘कौशल्याधारीत’ कलाकृती मागे पडत ‘संकल्पनाधिष्टीत’ (Conceptual) कलाकृतींना अधिकाधिक चालना मिळत जाईल.
कोणत्याही कलानिर्मितीच्या मुळाशी प्रेरणा, उर्मी आणि प्रयोजन या बाबी कार्यरत असतात तर कल्पकता, माध्यमांची निवड व हाताळणी कौशल्य या बाबी कलाकाराचे व्यक्तीगत सामर्थ्य (आणि मर्यादा) दर्शक असतात.
कला ही “कालातीत” असते, असे जेंव्हा आपण म्हणतो तेंव्हा हे त्यातील विषयवस्तू, मानवीय विचारांच्या बाबतीतच फक्त खरे असते. बाकी कलाकृतीचे दृष्यांग साहजिकच स्थल-काल, एकूणच मानवी समाजाची उत्क्रांत अवस्था, तात्कालीक उपलब्ध साधने, तंत्रज्ञान या बाह्य बाबींवरच अवलंबून असते. उदाहरण घ्यायचे झाल्यास प्राचीन गुहाचित्रांची तुलना १६ ते २०व्या शतकात भरात आलेल्या ऍकॅडेमीक आर्टशी केली तर तांत्रिक दृष्ट्या मोजपट्टीची दोन विरुद्ध टोके दिसावीत.
पुढे यथार्थदर्शन मुल्यांच्या कौशल्याने गाठलेला कळस कॅमेऱ्याच्या शोधाने अक्षरशः एका क्षणात अर्थहीन आणि निरुपयोगी करून ठेवला. यंत्रयुग, तंत्रज्ञानातील प्रगती यांनी कलाविश्वास विषय, आशय आणि अभिव्यक्ती या सर्वच अंगांनी आमूलाग्र बदलले. आज मानवी शरीर रचना (Human Anatomy), यथार्थ दर्शन (Perspective) या ज्ञानाच्या कोणत्याही स्वरुपातील वापरा शिवाय सक्षम आणि समाजमान्य अशी दर्जेदार कलानिर्मिती करणे सहज शक्य आहे.
एका अर्थी कला ही निसर्ग आणि मानवी शरीर यांच्या यथार्थ दर्शन करवण्याच्या बंधना पासून मुक्त होऊन
अमूर्त अशा मानवी दार्शनिकतेची, विचार आणि कल्पकता पूर्ण अभिव्यक्ती करण्यास सिद्ध झाली.
आज संगणक युग तारुण्यात पदार्पण करत असतांना होऊ घातलेली क्रांती; नुकताच सुरू झालेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा सार्वत्रिक
आणि सार्वजनिक वापर. भविष्यात कलेच्या शारीरिक अंगास अंतीम मुक्ती (श्लेष अभिप्रेत) प्रदान करेल असेच दिसते.
प्रतीसृष्टीच्या निर्माणाची दोन साधने: आभासी वास्तवता (Virtual Reality) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून निर्मिती (AI Generated Content) हे आजचे वास्तव होते आहे. आज रंग, अवकाश अशा कोणत्याही प्रत्यक्ष साधनांच्या वापरा शिवाय निर्मिती शक्य आहे. उदा. गुगलच्या टिल्ट ब्रश सारखी साधने. तसेच प्रचंड मोठ्या प्रमाणावरचा वैश्विक डेटा वापरुन आज अनेक अंगांनी अनेक अंगांचा एकत्रित विचार करुन सामान्य मानवी मर्यादांच्या पलिकडे जाणारी निर्मिती कोणत्याही प्रत्यक्ष साधनांचा वापर न करता क्षणार्धात किंवा प्रत्यक्षकाळी (Realtime) साकारणे शक्य होते आहे.
कोणत्याही शैलीतील, कोणत्याही विषय किंवा विचाराधारीत चित्रनिर्मिती करणे (संगणक आणि इंटरनेटच्या सहाय्याने करवून घेणे) कोणाही सामान्य माणसास सहज शक्य व्हावे. परिणामी कलानिर्मितीसाठी लागणारी कौशल्ये बऱ्याच अंशी अनावश्यक ठरत जातील; कलेच्या प्रेरणा, उर्मी आणि प्रयोजन यात आमूलाग्र असे बदल होत जातील. आंगीक आणि बौद्धिक कौशल्यांचे महत्व हळूहळू कमी होत संकल्पना अधिकाधिक महत्वाची ठरत जाईल.
काही संभाव्य शक्यता:
१) तमाशात बतावणी असते, प्रत्येक खेळातील बतावणी काहीशी वेगळी असते. वेळोवेळी समाजात, आजूबाजूला घडणारे ताजे संदर्भ बतावणीत गुंफले जात असतात. AI च्या वापराने दरवेळी ताजे संदर्भ वापरीत एकाच संकल्पनेचे, कलाकृतीचे प्रत्येक प्रकटन ताजे, वेगळे असे होऊ शकते.
२) राशोमान मधे एकाच घटनेचे वेगवेगळ्या पात्रांच्या दृष्टीकोनातून वेगवेगळे अर्थ समोर येत जातात. AI च्या वापराने एकच संकल्पना, कलाकृती प्रेक्षकाच्या डिजिटल प्रोफाइल नुसार वेगवेगळ्या मानसीक अनुषंगाने किंवा ऐच्छिक पातळीवरुन अनुभवता येईल.
३) कथेचा शेवट हा काही वेळा लेखकास बरेच दिवस सतावतो किंवा काहीवेळा शेवट बदलायला हवा होता असे वाचकांस वाटू शकते
कारण एकाच कथेचे अनेक संभाव्य शेवट असू शकतात.
AI घ्या वापराने एकाच संकल्पनेचे, कलाकृतीचे अक्षरशः अनंत प्रकारे प्रकटीकरण आणि पर्यवसान दर्शविणे शक्य व्हावे.
यासारख्या संकल्पनेला महत्व देणाऱ्या कलाकृतींची संख्या पुढे वाढत जाईल.
त्याच बरोबर, एकाच संकल्पनेतील अंगभूत अनेकविध शक्यता; स्थल-काल-व्यक्ती-सापेक्षता;
ग्राहकवर्गच्या आर्थिक क्षमतेनुसार अनुभूतीचा दर्जा किंवा कालावधी; या सारख्या व्यावसायिक किंवा लौकिक,
व्यावहारिक बाबीही एकाच वेळी विचारात घेतल्या जातील.
अमेरिकेतील सिएटल सिटी येथे जातिभेदावर बंदी करणारा कायदा
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 30,2023 21:06 PM
WebTitle – Possible Changes Due to AI Generated Content