विजय तेंडुलकर (जन्म : कोल्हापूर, ६ जानेवारी १९२८; मृत्यू : पुणे, १९ मे २००८) हे नामवंत मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक तसेच परखड राजकीय विश्लेषक होते. त्यांच्या लेखनाला सामाजिक वास्तवाची धार लाभली होती. त्यांचे वडील धोंडोपंत तेंडुलकर हे स्वतः लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते, आणि याच साहित्यिक व सांस्कृतिक वातावरणाचा प्रभाव विजय तेंडुलकरांच्या व्यक्तिमत्त्वावर व लेखनावर स्पष्टपणे दिसून येतो.

या कौटुंबिक पार्श्वभूमीतून तेंडुलकरांवर वाङ्मयीन संस्कार होत गेले. दि.बा. मोकाशी, वि.वि. बोकील, अनंत काणेकर, शिवरामपंत वाशीकर यांनी लिहिलेल्या साहित्याच्या वाचनातूनही घडवणूक होत गेली. तेंडुलकरांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्या काळात जोमाने चालू असलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले. साहजिकच या कालखंडात विविध विचारसरणींशी त्यांचा जवळून परिचय झाला. त्यांचे वास्तव्य पुण्यात आणि मुंबईत असे.
लेखनदृष्ट्या ‘गृहस्थ’ हे विजय तेंडुलकर यांचे पहिले नाटक. (याचेच “कावळ्यांची शाळा’ या नावाने त्यांनी १९६४ साली पुनर्लेखन केले)
मात्र ‘श्रीमंत’ हे त्यांचे रंगभूमीवरील आलेले पहिले नाटक होते.
सुरुवातीच्या नाटकांपासूनच मानवी जीवनाचा, माणसाच्या विकारांचा, अंतर्गत संघर्षांचा आणि एकाकीपणाचा शोध घेण्याची त्यांची प्रवृत्ती स्पष्टपणे जाणवते. ठरावीक तत्त्वज्ञानाचा किंवा विशिष्ट विचारसरणीचा ठसा नाकारत, तेंडुलकर मनस्वी आणि स्वतंत्रपणे लिहीत गेले—आणि याच स्वातंत्र्यपूर्ण लेखनदृष्टीमुळे त्यांचे नाट्यलेखन वेगळे आणि ठळक ठरले.
‘शांतता कोर्ट चालू आहे’ यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणार्या विषयांनाही त्यांच्या लेखणीने हात घातला.
‘सखाराम बाइंडर’मधील स्फोटक आशय आणि ‘घाशीराम कोतवाल’मधील पारंपरिक नाट्यतंत्राला धक्का देणारी रचना,
हे दोन्ही प्रयोग विजय तेंडुलकरांच्या प्रयोगशील जाणिवांचे अविभाज्य अंग होते. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना त्यांच्या नाटकांचे आव्हान स्वीकारण्याची ओढ सातत्याने वाटत राहिली.
‘माणूस नावाचे बेट’, ‘मधल्या भिंती’, ‘सरी गं सरी’, ‘एक हट्टी मुलगी’, ‘अशी पाखरे येती’, ‘गिधाडे’, ‘छिन्न’ यांसारखी नाटके रूढ सामाजिक संकेतांनाच नव्हे, तर प्रस्थापित नाट्यसंकेतांनाही हादरा देणारी ठरली. मानवी स्वभावातील कुरूपता, हिंस्रता आणि सत्तेची विकृती यांचे भेदक, वास्तववादी आणि उग्र चित्रण असल्यामुळे ही नाट्यकृती प्रचंड गाजल्या—आणि वादग्रस्तही ठरल्या.त्यावर वाद झडले आणि न्यायालयीन संघर्ष झाला. आशय आणि तंत्रदृष्ट्या असणारी विलक्षण विविधता, हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले आहे. त्याच प्रमाणे तेंडुलकरांनी चित्रपट माध्यमही नाटकांच्याच ताकदीने हाताळले. सामना, सिंहासन, आक्रीत, उंबरठा, अर्धसत्य, आक्रोश, आघात, इत्यादी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले.
मानवी मनाचे, त्यातही त्याच्या कुरूपतेचे चित्रण करून अशा व्यक्तिरेखांना समजून घेण्यात, त्यांचे जीवन मांडताना घडते-बिघडते संबंध, त्यातील ताण, त्या अनुषंगाने व्यवस्थांचे बंदिस्तपण टिपण्यात त्यांची लेखणी रमते, काव्य-कारुण्य, व्यक्ती-समाज, वास्तव-फॅन्टसी यांची कलात्मक सरमिसळ त्यांच्या नाटकांत आढळते. नवनाट्य, वास्तववाद यांच्याशी त्यांच्या लेखनाचे आंतरिक नाते दिसते. तरीही त्यांच्यावर कोणताही शिक्का मारता येत नाही इतकी प्रयोगशीलता दिसते.तेंडुलकरांचा लेखन क्षेत्रातला उदय हा साठ-सत्तरच्या दशकातला आहे. त्या काळात असंतोषाचं वातावरण होतं. याच वातावरणाची निरीक्षणं त्यांनी आपल्या लिखाणातून मांडली.
“६०–७०च्या दशकाची सामाजिक-राजकीय पार्श्वभूमी नसती, तर कदाचित ‘विजय तेंडुलकर’ ही दंतकथा जन्मालाच आली नसती. ते दशक होते अनादराचे, अस्वस्थतेचे आणि प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारण्याचे. त्या काळात पत्रकारिता आणि साहित्य—दोन्हींचे स्वरूप बदलत होते; हाच बदल तेंडुलकरांच्या लेखनातून ठळकपणे जाणवतो. ते पत्रकारही होते आणि लेखकही—परंतु त्यांच्या दृष्टीने ही दोन्ही क्षेत्रे केवळ व्यवसाय नव्हती; ती त्यांच्या जीवनाचे ध्येय होती.”त्यांची नाटकं त्या काळातील परिस्थितीवर भाष्य करणारी आहेत. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे नाटक ६०च्या दशकाच्या मध्यात येते आणि ‘गिधाडे’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाइंडर’ ही नाटके ७०च्या दशकात रंगभूमीवर येतात—हा काही योगायोग नाही. या सर्व नाटकांतून नातेसंबंधांचा आणि व्यवस्थेचा होत चाललेला ऱ्हास स्पष्टपणे दिसून येतो.
तेंडुलकरांपूर्वी मराठी रंगभूमीवर प्रामुख्याने ‘संस्कार घडवणारी’ नाटके येत. नाटक या माध्यमातून नीतीमूल्यांची शिकवण देण्यावर अनेक नाटककारांचा भर असे. तेंडुलकरांनी मात्र या परंपरेला धक्का दिला. समाजातील कुरूप वास्तव, अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी आणि लपवून ठेवलेली हिंसा त्यांनी निर्भीडपणे रंगभूमीवर आणली.
स्वातंत्र्योत्तर पिढी आशावादी, स्वप्नाळू आणि नैतिक मूल्यांवर ठाम आहे, अशी एक समजूत होती. तेंडुलकरांनी मात्र या समजुतीचा मुखवटा खरवडून काढला. त्यांच्या वेगळ्या विषयांमुळे आणि धारदार मांडणीमुळे त्यांच्यावर नेहमी वादग्रस्ततेचे आरोप झाले. मात्र त्यांनी मुद्दाम वाद निर्माण करण्यासाठी लेखन केले नाही. जे लिहिणे आवश्यक वाटले, ते वादग्रस्त ठरेल म्हणून त्यांनी टाळलेही नाही.जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी व्यापक होती. ज्यांची दृष्टी त्या पातळीची नव्हती, त्यांनाच त्यांची नाटके वादग्रस्त वाटली. संघर्षाशिवाय नाट्य जन्माला येत नाही—आणि तेंडुलकर नेहमीच मोठा संघर्षबिंदू हेरून त्यावर नाटक लिहित. प्रेक्षकांना धक्का द्यायचा किंवा त्यांना आनंद वाटावा, या हेतूने नव्हे; तर जीवनातील अस्वस्थ करणारे वास्तव निर्भीडपणे दाखवण्यासाठीच त्यांनी नाटक लिहिले.
“”आपल्या नाटकातून त्यांनी जगण्याचे पेच काय आहेत याचं दर्शन घडवलं, पात्रांच्या आयुष्यात असलेलं नैतिक अनैतिकतेचा संघर्ष त्यांनी दाखवून दिला,खऱ्या आयुष्यात एखादी व्यक्ती एखाद्या परिस्थितीमध्ये कशी वागू शकते याचा विचार करूनच त्यांनी आपली पात्रं रंगवली. त्या पात्रांच्या मूळ प्रेरणा या रोजच्या जगण्यातील असत,” पल्लेदार नाही तर थेट मनाला भिडणारे संवाद”त्यांची पात्रं सहज होती. त्यांची भाषा कृत्रिम नव्हती. नाटकातले संवाद पल्लेदार नसत. त्यामुळे ती पात्रं आणि भाषा प्रेक्षकांना जवळची वाटत असे, असं असलं तरी पात्रांच्या भाषेत वजन असायचं,”
जसं भाषेचं व्याकरण असतं तसंच नाटकाचं देखील व्याकरण असतं, नाटकाची देखील भाषा असते. तेंडुलकरांची त्यावर हुकूमत होती. हे माध्यम दृश्य आणि श्राव्य आहे त्याचा विचार करून ते लिहीत असत. नाटकांच्या निमित्ताने त्यांचा सहवास मला मिळाला, त्यावेळी हे बारकावे लक्षात आले,”आधी परिणामाचा विचार मग मांडणीतेंडुलकरांशी बोलल्यानंतर आणि पुन्हा नव्याने त्यांच्या नाटकांकडे पाहिल्यावर लक्षात येतं की ते परिणाम काय साधायचा हे आधी ठरवत आणि मग मांडणी करत..
“तेंडुलकरांच्या नाटकामुळे हिंसा पहिल्यांदा प्रेक्षकांच्या समोर आली. मराठी प्रेक्षकांसाठी नाटक ही महत्त्वाची गोष्ट होती. कथा, कादंबरी आणि पुस्तक हा वैयक्तिक अनुभव असतो. पण नाटक हा सामाजिक सोहळा असतो. मध्यमवर्गीय कुटुंबातील माणसं नटून-सजून हा सोहळा अनुभवण्यासाठी जात. या परंपरेला तेंडुलकरांनी शह दिला. जेव्हा प्रेक्षक नाटकाला येत तेव्हा विजय तेंडुलकर त्यांना आरसा दाखवत असत,”
“असं काही आमच्यात घडत नाही किंवा आमचं आलबेल आहे असं असं मानणाऱ्या दुटप्पी, दांभिक वर्गासमोर तेंडुलकर आरसा आणून ठेवतात. त्यांच्यातलीच हिंसा दाखवून प्रेक्षकाला उघडानागडा करतात. याचा परिणाम म्हणून प्रेक्षक चिडतो,”
“देशातील वाढता हिंसाचार” या विषयाच्या सखोल अभ्यासासाठी विजय तेंडुलकर यांना १९७३–७४ या काळात नेहरू शिष्यवृत्ती मिळाली होती.
तसेच १९७९ ते १९८१ या कालावधीत त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) येथे अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्य केले.
नवनाट्य चळवळीशी संबंधित संस्था आणि त्यातील कार्यकर्त्यांविषयी त्यांना विशेष जिव्हाळा होता.
एकांकिका – अजगर आणि गंधर्व, थीफ : पोलिस, रात्र आणि इतर एकांकिका; समग्र एकांकिका (भाग १ ते ३)
कथा – काचपात्रे, गाणे, तेंडुलकरांच्या निवडक कथा, द्वंद्व, फुलपाखरू, मेषपात्रे.
कादंबरी – कादंबरी एक, कादंबरी दोन, मसाज.
चित्रपट पटकथा – अर्धसत्य, आक्रीत, आक्रोश, उंबरठा, कमला, गहराई, घाशीराम कोतवाल, चिमणराव,
निशांत, प्रार्थना, २२ जून १८९७, मंथन, अक्कड़ बक्कड़ बम्बे बो
शांतता कोर्ट चालू आहे, सामना, सिंहासन.टॉक शो – प्रिया तेंडुलकर टॉक शो.
दूरचित्रवाणी मालिका – स्वयंसिद्धा.नाटके – अजगर आणि गंधर्व,अशी पाखरे येती, एक हट्टी मुलगी, कन्यादान,
कमला, कावळ्यांची शाळा, कुत्रे, गृहस्थ, गिधाडे, घरटे अमुचे छान, घाशीराम कोतवाल,
चिमणीचं घर होतं मेणाचं, चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी, छिन्न, झाला अनंत हनुमंत,
त्याची पाचवी, दंबद्वीपचा मुकाबला,देवाची माणसे, नियतीच्या बैलाला, पाहिजे जातीचे,
फुटपायरीचा सम्राट, भल्याकाका, भाऊ मुरारराव, भेकड, बेबी, मधल्या भिंती,
माणूस नावाचे बेट, मादी (हिंदी), मित्राची गोष्ट, मी जिंकलो मी हरलो, विठ्ठला, शांतता!
कोर्ट चालू आहे, श्रीमंत, सखाराम बाईंडर, सफर, सरी गं सरी.
नाट्यविषयक लेखन – नाटक आणि मी.
बालनाट्ये – इथे बाळे मिळतात, चांभारचौकशीचे नाटक,
चिमणा बांधतो बंगला, पाटलाच्या पोरीचे लगीन, बाबा हरवले आहेत,
बॉबीची गोष्ट, मुलांसाठी तीन नाटिका, राजाराणीला घाम हवा..
भाषांतरे : आधेअधुरे (मोहन राकेश), चित्त्याच्या मागावर, तुघलक (गिरीश कर्नाड),
लिंकन यांचे अखेरचे दिवस (व्हॅन डोरेन मार्क), लोभ असावा ही विनंती (जॉन मार्क पॅट्रिकच्या “हेस्टी हार्ट’चे भाषांतर),
वासनाचक्र (टेनेसी विल्यम्सच्या “स्ट्रीटकार नेम्ड डिझायर’चे भाषांतर), पाच पाहुण्या – पाच विदेशी कथांचा अनुवाद.
ललित – कोवळी उन्हे, रातराणी, फुगे साबणाचे, रामप्रहर, हे सर्व कोठून येते? ही त्यांची ग्रंथ संपदा.
त्यांना अनेक पुरस्कार मिळाले या मध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर पहिले मानकरी होते.
१९७० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, त्याच वर्षी कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार,
इ.स. १९७७ मध्ये मंथनसाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार,
१९८१ मध्ये आक्रोश चित्रपटासाठी फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट कथा व पटकथा पुरस्कार,
तर १९८३ मध्ये अर्धसत्यसाठी पुन्हा सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी फिल्म फेअर पुरस्कार त्यांना मिळाला.
पद्मभूषण, महाराष्ट्र गौरव, सरस्वती सन्मान, मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान,
विष्णुदास भावे गौरवपदक, कथा चूडामणी पुरस्कार, पु.ल. देशपांडे बहुरूपी सन्मान,
तन्वीर सन्मान आदी इतर पुरस्कारही त्यांना मिळाले.
इ.स. १९९८ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीची अभ्यासवृत्ती मिळाली होती.
हेही वाचा…साहित्यिक नाटककार महेश एलकुंचवार
आपल्या लेखनाच्या संदर्भात ते म्हणतात,
“मला मिळणाऱ्या सन्मानांचा विचार करताना, मी असे नेमके काय केले किंवा माझ्या हातून काय घडले याचा शोध घेत असतो. एवढे मात्र खरे की, मी जे जगलो आणि माझ्याभोवती इतरांना जगताना पाहिले, त्याच्याशी लिहिताना मी प्रामाणिक राहिलो. नाटकासारखे प्रेक्षक-सापेक्ष, रंजनप्रधान आणि काहीसे बाळबोध माध्यम हाताशी असूनही, माझ्या काळातील जगण्यातले पेच, गोंधळ आणि गुंतागुंत मी प्रेक्षकांसाठी सोपी, सरळ किंवा खोटी करून मांडली नाही.
मी जे लिहिले ते अनेक वेळा माझ्या समाजाला धक्कादायक आणि प्रक्षोभक वाटले. त्याची किंमत मला वेळोवेळी चुकवावी लागली—ती मी स्वीकारली; पण लिहिलेल्या कृतीबद्दल मला कधीही पश्चात्ताप वाटला नाही. मात्र मागे वळून पाहताना असे जाणवते की, यात शौर्य किंवा धैर्य नव्हते, तर कधी कधी मलाच नीट उमजत नसलेला एक हट्टीपणा होता. कुणी ‘नको’ म्हटले की तेच करण्याची माझी जुनी सवय आहे.”
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 26 , 2020 18 : 38 PM
WebTitle – Vijay Tendulkar Indian Playwriter





















































