आपल्याला चित्रपट संगीतातील नेमकं काय आवडतं?
गीताचे बोल, गायक-गायीकेचा आवाज, गाण्याची चाल की या सर्वांचा एकूण मेळ? अर्थात नेमकं उत्तर सांगणं तसं अवघडच….कारण सिने संगीतात सर्व घटक मिसळलेले असतात. पण हिंदी चित्रपट संगीतात काही गाणी अशी आहेत की ती वरील घटका शिवाय कायम स्मरणात राहिली आहेत. गाण्याची चाल अर्थातच संगीत दिग्दर्शक तयार करतात मात्र गाणे पूर्णत्वास जाते ते वाद्य संयोजक (अरेंजर) नावाच्या त्यांच्या सहाय्यकांमुळे. गीतातील सुरूवात, स्थायी आणि अतंरा यांच्या मधील जागा वेगवेगळे वाद्य वादक भरून काढत असतात. अनेकदा तर सुरूवातीच्या सुरावटी इतक्या अप्रतिम असतात की आता कोणते गाणे लागणार हे आम्ही लगेच ओळखतो. ‘बोल राधा बोल संगम होगा की नही’….., ‘ए दिल और उनकी’…., ‘मै जिंदगी का साथ निभाता’…., वगैरेच्या सुरूवातीच्या धून. तुम्हाला अशी अनेक गाणी आठवू शकतात.
आज मी एका अशाच सुरावटी बद्दल सांगणार आहे. १९५४ मध्ये प्रदीपकुमार व वैजयंतीमालाचा चित्रपट ‘नागीन’ प्रादर्शीत झाला. यात हेमंतदा यांनी एकूण १३ गाणी संगीतबद्ध केली होती. मात्र यात एक गाणे असे होते ज्याला बोलच नव्हते आणि तरीही तेच या चित्रपटाचा हायलाईट ठरले. त्यावेळी हेंमतदाकडे दोन तरूण सहाय्यक वाद्यमेळ संयोजन करीत. पैकी एक होते कल्याणजी वीरजी शहा व दुसरे रवी शंकर शर्मा. चित्रपटाचे नावच ‘नागीन’ असल्यामुळे बीन हे वाद्य ओघाने आलेच. गारूडी त्यांच्या बीन या पारंपांरीक वाद्याने साप बीळा बाहेर काढतात असे म्हटले जाते.(आता या समजुती दूर होत आहेत) बीन हे वाद्य इतके मंजूळ वाजत नसल्यामुळे चित्रपटातील संगीतासाठी त्याचा वापर करणे अवघड होते. या आवाजाशी मेळ असणाऱ्या दुसऱ्या एका वाद्याचा वापर मग या बीनचा साउंड ट्रॅक तयार करताना करण्यात आला.
कल्याणजीभाईने नुकतेच भारतात आणले गेलेले ‘क्लेव्हायोलिन’ वाद्याचा वापर करायचे ठरविले. ‘क्लेव्हायोलिन’ हे की बोर्ड असलेले एक इलेक्ट्रॉनीक वाद्य होते जे फ्रेंच इंजिनीअर Constant Martin याने १९४७ मध्ये तयार केले. याच वाद्यातून मग पूढे सिंथेसायझर सारखी की बोर्ड असलेली वाद्य तयार होत गेली. या ‘क्लेव्हायोलिन’ की बोर्डला एक अॅम्लीफायर व स्पिकर जोडण्यात आले ज्यायोगे हव्या तशा आवाजाच्या चढउतारावर कन्ट्रोल करणे शक्य झाले. कल्याणजीभाई हे वाद्य अप्रतिमपणे वाजवत असत. त्यांच्या जोडीला मग रवी यांनी हार्मोनियमवर साथ केली आणि या दोघांच्या काम्बीनेशन मधून तयार झाली नागीनची सुप्रसिद्ध धून ’ तन डोले मेरा मन डोले ’….
तन डोले मेरा मन डोले या बीनची नशा आज ६७ वर्षानंतरही उतरत नाही यातच कल्याणजीभाई यांच्या कल्पकतेचा अंदाज येतो.आजही लग्नसंमारंभात वाजविल्या जाणाऱ्या या धूनला यजमाना इतकेच अग्रस्थान आहे. विशेषत: वरातीत ही धून वाजू लागली की अनेक वऱ्हाडी सापा सारखेच डोलू लागतात. आगोदर केलेल्या विशेष रसपानामुळे मग अधिकच नशा येऊ लागतो. हा नशा इतका वाढतो की एखादा वऱ्हाडी रूमालाची पूंगी करून तुफान फेर धरू लागतो व दुसरा सापा सारखा जमिनीवर वळवळू लागतो.खरे तर हे चित्र बघायला तो फ्रेंच इंजिनीअर कधी भारतात आला असता तर!
ही बीन वाजवणाऱ्या कल्याणजीने पूढे आपला धाकटा भाऊ आनंदजीला सोबत घेऊन मग स्वतंत्र संगीत कारकिर्द सुरू केली आणि एक प्रतिष्ठीत संगीतकार बनले. (त्यानां साथ देणारा रवी शंकर शर्मा देखील पूढे रवी या नावाने प्रख्यात संगीतकार झाला) ३० जून १९२८ ला गुजरात मधील कच्छ प्रांतात कल्याणजीचा जन्म झाला. आनंदजी त्यांच्याहून ५ वर्षे लहान. वडील कामधंद्यासाठी मुंबईत आले व ग्रोसरीचा व्यवसाय करू लागले. कल्याणजीचे आजोबा त्याकाळाचे लोकसंगीतकार होते. त्यामुळे वारसा घरातुनच मिळाला.
क्लाव्हायोलीन या परदेशी वाद्यावर त्यांची हुकूमत होती त्यामुळेच नागीन धून तयार होऊ शकली. करीअरच्या सुरूवातीला त्यांचा स्वत:चा ‘कल्याणजी वीरजी अण्ड पार्टी’ नावाचा आर्केस्ट्रा होता. मुंबई व देशात ते शो करत असत. कल्याणजीने या क्षेत्रात यायचे ठरविले त्यावेळी हेमंतकुमार, नौशाद, एस. डी. बर्मन, शंकर जयकिशन, मदन मोहन, ओ.पी. नय्यर असे एकापेक्षा एक दिग्गज संगीतकारांनी चित्रपटसृष्टी दणाणून सोडली होती. त्यामूळे कल्याणजीभाई समोर जबरदस्त स्पर्धा होती. या नामावलीत आपले नाव आणण्यासाठी त्यानां भरपूर मेहनत घ्यावी लागली.
१९५९ मधील ‘सम्राट चंद्रगुप्त’ या चित्रपटातुन त्यानां पहिली संधी मिळाली. त्यातील ‘चाहे दूर हो चाहे पास हो’ हे लता रफीचे द्वंद गीत खूप गाजले. नंतर त्याच वर्षी आला ‘सट्टा बाजार’ आणि ‘मदारी’. पैकी मदारी मध्ये पुन्हा एकदा त्यांची बीन ‘दिल लुटने वाले जादूगर अब….’ या गाण्यात वाजली.लता-मुकेशचे हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. यावेळी मग लहान भाऊ कल्याणजी त्यांच्या सोबत सामील झाले. सुरूवातीला कल्याणजी वीरजी शहा नावाने ते संगीत देत पण पूढे भाऊ देखील सक्रिय झाला व मग ते सुप्रिसद्ध ‘कल्याणजी-आनंदी’ झाले. त्यांचा खरा डंका वाजला तो १९६५ मधील ‘हिमालय की गोदमे’ आणि ‘जब जब फूल खिले’ या चित्रपटातील गाण्यामुळे.
नंतर मात्र त्यानां कधीच मागे वळून बघावे लागले नाही. १९६८ मधील ‘सरस्वती चंद्र’ यातील ‘चंदनसा बदन’ या गाण्याने पहिले तर १९७४ मध्ये ‘कोरा कागज’ यातील ‘मेरा जीवन कोरा कागज’… या गाण्याने दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. लता व आशासांठी त्यांनी जवळपास ६०० गाणी संगीतबद्ध केली. मला स्वत:ला त्यांची—-डम डम डिगा डिगा (छलिया)……ये समा, समा है (जब जब फूल खिले)…..
आंखो आंखो मे हम तुम हो गये(महल)…….आओ तुम्हे मै प्यार सिखादू (उपासना)…..अकेले है चले आओ (राज)…..चांदी की दिवार ना तोडी (विश्वास)….बेखुदी मे सनम (हसीना मान जाएगी…..) चाँद आहे भरेगा(फूल बने अंगारे……)चंदन सा बदन (सरस्वतीचंद्र)…..चाँद सी मेहबूबा होगी मेरी (हिमालय की गोद मे)…..हम बोलेगा तो बोलता है (मर्यादा)…..जींदगी का सफर है कैसा (सफर)……पल पल दिलके पास (ब्लॅकमेल)
पल भर के लिए कोई (जॉनी मेरा नाम)…..रहने दो गिले शिकवे (रखवाला….) समा है सुहाना सुहाना (घर घर की कहानी)…..यारी है इमान मेरा (जंजीर)… वक्त करता जो वफा (दिल ने पुकारा)….कसमे वादे प्यार वफा सब (उपकार)…..ओ साथी रे (मुकदर का सिंकदर) ही गाणी आवडतात.
खरं तर ही यादी जागा अपूर पडेल इतकी खूप मोठी आहे.
आपल्या ४६ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास २०० चित्रपटापेक्षा अधिक चित्रपटानां संगीत दिले.
गुजरातने एक स्वरमयी शहा संगीतसृष्टीला दिला तसा दुसराही एक शहा गुजरातने दिला मात्र तो भारतीय राजकारण बेसूर करत आहे. कल्याणजीभाईनी चित्रपटसृष्टीतल्या सर्वच नावंत गायक गायीके सोबत काम केले शिवाय अनेक नवनवीन तरूण गायक गायीकांना संधी दिली.अलका याज्ञीक, अनुराधा पौडवाल, कुमार शानू, मनहर उधास, साधना सरगम, सपना मुखर्जी, उदीत नारायण, सुनीधी चौहान अशा अनेक गायक गायीकेना त्यांनी प्रथम संधी दिला जे आज या क्षेत्राात अग्रेसर झाले.
लहान मुलांतील टॅलेंटला संधी मिळावी म्हणून किती तरी कार्यशाळा घेत असत.
२४ ऑगष्ट २००० मध्ये कल्याणजीभाईच्या संगीत सुराला पूर्ण विराम मिळाला.
बंधू आनंदजी आज कल्याणजी विना अधुरे वाटतात.
कल्याणजी भाईची तन डोले मेरा मन डोले ही नागीन धून ऐकून कदाचित आजही साप बीळा बाहेर येत असावेत
कारण आजही मदारी सापा समोर हीच तन डोले मेरा मन डोले धून वाजवतात.आज कल्याणजी भाईचा जन्म दिवस.
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUN 30 , 2021 19 : 50 PM
WebTitle – Tan dole mera man dole kalyanji bhai virji bhai 2021-06-30