स्वप्नील शेटे नं बनवलेला हा ‘तळ’ (tal bottomland ) 31 मिनिटांत बराच ढवळलेला असतो. या शॉर्टफिल्ममध्ये माणसांच्या मनाच्या तळाशी असलेल्या जातीयतेचा चिकट गाळ ढवळल्यानंतर भयानक दुर्गंधीसोबत क्रौर्याचे विषारी गॅस बाहेर फेकले जातात. हिटलरचा गॅस चेंबर्सही त्यापुढं किमान शंभर वेळा हार मानतो. इथं मरणारी माणसं नसतात, जातीयतेच्या गाळात रुतलेल्या असहाय्य किड्यांना पॉश घरातल्या फिश टॅन्कमधल्या शोभेच्या माशांना खाऊ घालण्याइतकं हे सहजसोपं ‘छंदबद्ध’ असू शकतं.

माशांनी किड्यांना गिळणं ही सहजता समाजात सर्वमान्य असते, यात घराची शोभा वाढणं भवतालचं समाजघर डेकोरेट राहाणं महत्वचं असतं, मग ते घर जातीयतेच्या वाळवीनं पोखरलेलं असलं तरी हरकत नाही. मात्र हे घर कायम शोभिवंत दिसावं, तसं असावंच याची गरज नसते. समाज संस्कृती, प्रशासन, सरकारी सुरक्षा यंत्रणा त्यासाठी मोलाचं काम करत असतात. त्याला कर्तव्य तत्परता, योगदान किंवा अनेकदा विकासही म्हटलं जातं. यांना मोठ्या माशांच्या पोटात विसावणार्या या किड्यामुंग्यांबाबत उदासीन असण्याचे विशेषाधिकार असतात, ते बजावण्यासाठी कमालीची तत्परता त्यांच्या कर्तव्याचा भाग असते.
‘तळ’ मध्ये जातीयतेच्या चिखलात हजारो वर्षे सापडलेल्यांच्या गाळातलं रुतलेपण असतं,खूप प्रयत्नांनी माणूस बनलेल्यांचा जीवंत राहाण्याचा हक्कही त्यांना दिलेल्या आरक्षणातून मिळाल्यानं देशाच्या प्रजासत्ताकापासून धोक्यात आलेल्या ‘सामाजिक समानतेची’ या भवतालला चिंता असते.
या शॉर्ट फिल्ममध्ये पडद्यावर येणार्या माणसांच्या मनाचा तळ हजारो वर्षांपासून गढूळलेलाच समोर येतो.
मनात साचलेला हा गाळ कल्पनेच्या कितीतरी खोल गडद हट्टी असतो.
जात, धर्म, संस्कृतीच्या नावाखाली निर्जिव घट्ट थर साचलेले असतात, या थरांचे टणक दगड बनत जातात,
त्यावर मानवी संवेदनेचा कुठलाही, कसलाच परिणाम होणार नसतो, या बधिरपणाची जाणीव होण्यासाठी आता एका सुरूंगाच्या स्फोटाची गरज असते.
या दाबून भरलेल्या आत्मविस्फोटाचा ताण मिलिंद शिंदेंच्या अभिनयात स्पष्ट होतो.
तर अभिनेते किशोर कदम ‘तळ’ मध्ये दगड झालेल्या व्यवस्थेचं प्रतिनिधीत्व करतात.
तळच्या पहिल्याच प्रसंगात ज्या मायलेकींची हत्या होते, त्या चांगुणा तांबे (माय) आणि लेक (आदिती काटकर)
या हजारो वर्षांपासूनच्या जातीय ‘तळागाळा’त रुतलेल्या आहेत. त्यांचं समाज म्हणून माणुसपण कधीचंच संपुष्टात आलेलं आहे.
हे माणूसपण मिळवण्याच्या बदल्यात त्यांना क्रूर पद्धतीने जीवाची किंमत मोजावी लागते. यातील आईला मुलगा आहे आणि लेकीला भाऊ आहे. अक्राळ रक्तपिपासू व्यवस्थेसमोर जीवघेणी हतबलता साकारण्याचं हे काम प्रमोद तांबेंनी चोख केलंय. या रक्ताचे शिंतोडे उडून समाज नावाच्या घराचं डेकोरेशन खराब झालंय म्हणून आशितोष कुलकर्णी, शर्वरी पेठकर यांनी साकारलेल्या व्यक्तीरेखेतील एलिट क्लासमधील ‘पांढरपेशे ऑफिस कर्मचारी’ कायदा सुव्यवस्था आणि महान संस्कृतीला बट्ट्या लागेल म्हणून चिंतेत आहेत.
ओमकार गोवर्धन हा ऑफीस कर्मचारी या शॉर्ट फिल्म अजून ‘त्या’ अर्थाने पुरेसा ‘एलिट’ झालेला नाही. त्यामुळे तो कास्ट सिस्टीममध्ये अपर क्लासना मिळणार्या प्रिव्हेलेजविषयी बोलतोय. तर हॉस्पीटमधल्या सोनाली मगर, सायली शिंदे या कास्ट प्रिव्हिलेजमध्ये मोडत नाहीत तर अधिकारपदावरील डॉक्टर अश्विनी कासार यांच्यासाठी जातीवादाचा विषय आरक्षणातून मिळणार्या फायद्यापलिकडचा नसल्याचं स्पष्ट होतं. या सर्वच व्यक्तिरेखामध्ये परस्परांना जोडणारं असं काहीच नाही, एकप्रकारचं कातडीबचावू तुटलेपण संबंधात आहे.
दिपक राजाध्यक्ष, अक्षय विंचुरकर हे बाप लेक प्रिव्हिलेज मिळालेल्या सोसायटीचं अर्थात डेकोरेट झालेल्या समुदयाचं नेतृत्व करतात, तर तेजश्री येरवालकर यांनी साकारलेली ‘तळ’ मधली घरकामगार महिला समाजाचं स्वतःपुरतं झालेलं बनावट सुशोभिकरण आणि वास्तव यातील फरकाचं नाव आहे. माणसाच्या मनाचा तळ ढवळून काढणार्या या शॉर्टफिल्मचे मोजकेच मात्र परिणामकारक संवाद मिलिंद धुमाळेंचे असतात जे थोडकेच असल्याने फापटपसारा न मांडता अचूकपणे मुद्द्यांवर बोट ठेवतात. अर्ध्या तासाच्या या शॉर्टफिल्ममुळे मनाचा ढवळलेला तळ फिल्म संपल्यावरही नितळ शांत होत नाही, तरीही या गढूळलेल्या माणुसपणात स्वतःचा चेहरा मात्र लख्ख दिसतो, हे या फिल्मचं यश..
तळ … आज रिलीज झालाय… नक्की बघा, लिंक

संजय सोनवणे
लेखक,पत्रकार आपलं महानगर
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 29,2025 | 10:50 AM
WebTitle – tal bottomland























































