सेट इंडीया चॅनलवरील इंडीयन आयडॉल (Indian Idol 12 ) या कार्यक्रमातील गायिका सायली कांबळे (Sayli Kamble) संदर्भात मध्यंतरी सोशल मिडीयावर एक भावनिक पोस्ट व्हायरल झाली होती.’सायली कांबळे इंडीयन आयडॉलचा स्टेज गाजवत आहे.ती सर्व स्पर्धकांत सर्वोत्तम गाते, तरीही तिला धर्मांध प्रेक्षक मते देत नाहीत, जी मिळतात ती आपलीचं मते असतात, आणि आपल्यातील अनेकजण फालतू मालिका पहात असतो.ती बौध्द समाजाची असल्यांने दर आठवड्याला तिला कमी मते मिळतात,आपण तिला भरभरुन मते द्यावीत, इतरांना देखील हा मेसेज पाठवावा, तिची गाणी युट्यूबवरही उपलब्ध आहेत.
मित्रांनों तिला आपल्या मतांची खूप गरज आहे,Sayli Kamble सायली कांबळे ने या वेळची Indian Idol इंडियन आयडॉल स्पर्धा जिंकली पाहिजे.
‘सायली कांबळे सुंदर गाते, ती चांगली ताकदीची गायिका आहे या संदर्भात काही प्रश्नचं नाही.
पवनदीप अन् अरुणिता यांच्या बरोबर सायली इंडीयन आयडॉलची तगडी स्पर्धक आहे यात वादचं नाही.
त्यामुळे सायली कांबळेच्या गुणवत्तेवर, मराठी, महाराष्ट्रीयन मुलगी असल्याच्या मुद्द्यावर मते मागण्यापेक्षा, ती बौध्द समाजाची असल्याचे सांगून जातीचं भांडवल करुन मते मागणे हे योग्य नाही.
कारण, कलेला कोणताचं धर्म नसतो हे खरा रसिकचं समजू शकतो.
जातीयतेचं निर्मुलन करतांना,अशी मानसिकता असेल तर कसं होणार ?
इंडीयन आयडॉलमध्ये महाराष्ट्रातील दोन स्पर्धक होते. परंतु, आशिष कुलकर्णी स्पर्धेतून बाहेर गेल्यांने सायली कांबळे ही इंडीयन आयडॉल स्पर्धेत एकमेव मराठी तगडी स्पर्धक आहे. पण, सध्या ती थिल्लर जातीवाद अन् साईबाबाच्या फेऱ्यात सापडली आहे. काही मंडळी म्हणतात सायली बौध्द आहे, काही मंडळी म्हणतात सायली चर्मकार आहे तर काही मंडळी म्हणतात सायली आगरी कोळी आहे. पण, सायली महाराष्ट्रीयन अन् मराठी असल्याचे सोशल मिडीयावरील कोणीही म्हणतांना दिसून येत नाही. अरे, प्रत्येक गोष्ट आपण जातीच्या तराजूत अजून किती तोलणार आहोत ?
त्यातच, सायलीच्या आईने सायली साईबाबाच्या नवसामुळे झाली असं वक्तव्य सदर कार्यक्रमात केलं अन् त्याला सायलीने साईवरुन सायली अशी टिप्पणी केल्यांने,सोशल मिडीयावर टिकेला अजूनचं कारण मिळाले.
‘सायलीला बौध्द मतांची गरज नाही,तिला तिचा साईबाबा इंडीयन आयडॉल स्पर्धा जिंकून देईल, तरी बौध्दांनी भावनिक होऊन vote देऊ नये..’ अशा विरोधात पोस्ट व्हायरल होत आहेत.
एकीकडे आपण संत तुकाराम यांच्या अभंगातील ‘नवसे कन्या पुत्र होती | मग का करणे लागे पती |’ ह्या ओळी सुनवायच्या अन् दुसरीकडे ज्या अंधश्रध्देवर आपला विश्वासच नाही त्या गोष्टी कुरवाळीत बसायच्या हे बुध्दीजीवी माणसाचं लक्षणचं असू शकत नाही.
नवसांने सर्व साध्य झाले असते तर, प्रयत्न न करताचं सर्वांनी इच्छित गोष्टी साध्य करुन घेतल्या नसत्या का ? कोरोनांने सर्व सर्व मर्यादा स्पष्ट केल्या आहेत.
सायली ही शिर्डीच्या साईबाबांना केलेल्या नवसामुळे झाल्याचे वक्तव्य एक महिन्यापुर्वीचं सदर कार्यक्रमात करण्यांत आले होते.पण, त्यावेळी कोणी आक्षेप घेतला नाही. एकविसाव्या शतकातही अशिक्षित नव्हे तर, सुशिक्षित समाजही परंपरागत, रुढीवादी संस्कार अन् तसेच एका अनामिक भितीपोटी अंधश्रध्देच्या पाशातून मुक्त होतांना दिसत नाही.एखादा राजकीय नेता आजारी पडल्यास, एखादी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास, क्रिकेट सामना असल्यास किंवा इतर कोणत्याही कारणासाठी देवाला अभिषेक, होम हवन, रुद्राभिषेक करणारे, नवस बोलणारेही कमी नाहीत. अशा परिस्थितीत एका गुणी कलावंताला संकुचित मानसिक दृष्टिकोणातून जातीयतेच्या कोंदणात बंधिस्त करणे, अन्याय करणे योग्य आहे का ?
तसेच, आपण ज्या भ्रामक गोष्टींवर विश्वासचं ठेवत नाही त्या वक्तव्यांवर तरी निरर्थक आकांडतांडव करुन काय साध्य करणार आहोत ?
एकीकडे आपण जातीवादाच्या विरोधात बोलतो अन् दुसरीकडे सायली कांबळेलाचं आपण जातीयतेच्या पिंजऱ्यात उभे तर करत नाही ना ?
महापुरुषांच्या कार्याचा वारसा सांगतांना आपण, त्यांचा वैचारीक वारसा खरचं जपतो का याचा विचारही झाला पाहिजे.
काही दिवसातचं इंडीयन आयडॉल स्पर्धा संपलेली असेल.
सायली कांबळे कोणत्या जातीची आहे हे महत्वाचे नसून,ती प्रथम एक कलावंत आहे हे लक्षात घेतल पाहिजे.
महाराष्ट्रीयन प्रेक्षक म्हणून आज आपण योग्य निर्णय घेतला नाही तर,सायली कांबळेसाठी आलेली अनुकुल परिस्थिती अन् संधी थांबून राहणार नाही.
इंडीयन आयडॉल हा राष्ट्रीय पातळीवरचा मोठा मंच आहे.
गाण्यातील गुणवत्तेच्या आधारावर मंचच्या फायनलपर्यंत एक मराठी मुलगी पोहोचली
याचा आपण महाराष्ट्रीयन अन् मराठी म्हणून आपणाला अभिमान असायला काहीचं हरकत नाही.
म्हणूनच, तिच्या जातीपेक्षा ती मराठी गायिका अन् महाष्ट्रीयन मुलगी असल्याचा सार्थ अभिमान बाळगून तिला भरभरुन वोटिंग केल्यास,
ती निश्चितचं १२ व्या सिझनची इंडीयन आयडॉल स्पर्धा नक्कीचं जिंकलेली असेल. (Indian Idol season 12)
लेखन – मिलिंद कांबळे, चिंचवलकर
९८९२४८५३४९
आंबेडकरी चळवळीतील एक वैचारिक बुरुज,राजा ढाले यांच्या काही आठवणी
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on JULY 19, 2021, 15:15 PM
Web Title – Sayli Kamble, Indian Idol; should be promoted as a Marathi rather than caste 2021-07-19