काही माणसं कर्तृत्ववाने आणि मनानेही श्रेष्ठ असतात. अशी माणसं आपला मोठेपणा दिसण्यातून नव्हे तर वागण्यातून, कृतीतून आणि कार्यातून दाखवून देत असतात. त्यांना एखाद्या गोष्टीच भांडवल किंवा दिखाऊपणा करुन लोकांची सहानुभूती मिळवता येत नाही असे सामाजिक बांधिलकी आणि समाज भावना जपणारे बंडखोर व्यक्तिमत्व म्हणजे जेष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते राजू किसन झनके. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने त्यांच्या निःस्वार्थी कार्याची दखल घेऊन नुकताच त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने त्यांचा यथोचित असा सन्मान केला आहे. मात्र समाजभूषण पुरस्कार त्यांनी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्यांना समर्पित करुन, ज्यांच्या अनमोल संदेशामुळे अभियानाने जन्म घेतला त्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमी येथे सहकुटुंब जाऊन पुरस्कार अर्पण केला. तसेच त्यांच्या समाजोपयोगी, उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला असून, अनेक संघटनांची त्यांना पुरस्कारही देऊन सन्मानित केले आहे.

निःस्वार्थी, सर्वसमावेशक, व्यापक दृष्टिकोन
एका सर्वसामान्य कुटुंबात राजू झनके यांचा २१ मार्च १९६९ रोजी जन्म झाला. त्यांचे वडील आंबेडकरी चळवळीत सक्रिय होते. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या भूमीहीन आंदोलनात ते ९ दिवस नागपूर कारागृहात होते. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी त्यांच्या वडिलांसह हयात ११ सत्याग्रहींना यशवंतराव चव्हाण सभागृहात पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यामुळे समाजभूषण राजू झनके यांना चळवळीचे बाळकडू त्यांच्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षीच ते आंबेडकरी चळवळीत ओढले गेले. पायाखाली जमीन कोणतीही असो, डोक्यावर आकाश कोणतेही असो प्रतिकुल, संघर्षमय परिस्थितीवर मात करुन मोठ्या आत्मविश्वासाने यश संपादन करणे हाच त्यांचा निःस्वार्थी, सर्वसमावेशक, व्यापक दृष्टिकोन त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतो. उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन नसल्याने त्यांनी उपजीविकेसाठी अनेक चांगल्या नोकऱ्या केल्या. पण, चळवळीत सक्रिय सहभाग असल्यामुळे आंदोलने, मोर्चे, बैठका, शासकीय भेटीगाठीमुळे त्यांना एकही नोकरी टिकविता आली नाही.
पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहून त्यांनी अन्याय, अत्याचार, विषमतेच्या विरोधात अनेक यशस्वी लढे देऊन अनेकांना दिलासा, न्याय मिळवून दिला. यांच्या स्वभावातील गोडी, सौजन्यशीलपणा, संकटसमयी धावून जाण्याच्या आंतरिक वृत्तीमुळे चळवळीत त्यांची नेहमीचं संवाद, समन्वय आणि समंजसपणाची भूमिका राहिलेली आहे. पत्रकारिताच नव्हे तर, सामाजिक व राजकीय क्षेत्रातही त्यांची महत्वाची भूमिका आणि योगदामुळे त्यांनी विविध क्षेत्रातील तसेच समाजातील अनेक मंडळींना त्यांना जोडता आले. ॲड. बाळासाहेब आंबेडकर, डॉ. भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, खासदार रामदास आठवले, खासदार चंद्रकांत हंडोरे, डॉ. नितीन राऊत, राजकुमार बडोले, प्रा. जोगेंद्र कवाडे, अर्जुन डांगळे, ज.वि. पवार, चंद्रशेखर आझाद, रा. सु. गवई, टी.एम. कांबळे, मनोज संसारे अशा अनेक राजकीय, सामाजिक, साहित्य, शासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी त्यांचे निकटचे, मैत्रीचे, जिव्हाळ्याचे दृढ संबंध होते तेवढेच सर्वसामान्य माणसाशीही त्यांचे सलोख्याचे संबंध होते. आपल्या ओळखीचा फायदा त्यांनी सर्वसामान्यांसाठी केला.
अन्याय, अत्याचार प्रश्नांवर संघर्ष
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या जागेचा विषय, पनवेलमधील अल्पवयीन स्वप्निल सोनावणे याचे प्रेम प्रकरणावरुन झालेले हत्याकांड,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगाव दाभाडे येथील बंगल्याच्या डागडुजीसाठी २ कोटींचा निधी,
नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांची झालेली आत्महत्या अशा अनेक प्रकरणासह अनुसुचित जाती जमातींच्या अनेक समस्यांवर
तसेच अन्याय, अत्याचार प्रश्नांवर त्यांनी केलेले काम दुर्लक्षित करता येणार नाही.
राज्यातील होतकरु, उपेक्षित आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हातभार देण्यासाठी
गेल्या ८ वर्षांपासून ते संस्थापक, अध्यक्ष असलेल्या महामानव प्रतिष्ठानच्या माध्यमातून
‘एक वही, एक पेन’ हे उपयुक्त अभियान राबवून हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचं फार मोठ काम त्यांनी केल आहे.
महापुरुषांची जयंती, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा अनेक उत्सव तसेच मान्यवरांच्या वाढदिवसानिमित्त
जनतेने शैक्षणिक साहित्य देण्यासाठी आवाहन व प्रयत्न करण्यात आल्यामुळे ‘एक वही, एक पेन’ अभियानाची
राज्य, देशपातळीवर मोठ्या प्रमाणात दखल घेतली गेली. तसेच गेल्या २३ वर्षापासून मुंबईसह
राज्यातील आघाडीच्या अनेक दैनिकांमध्ये त्यांनी पत्रकारिता केली असून,
२० वर्षापासून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील आघाडीच्या विविध दैनिकांसाठी मंत्रालय आणि विधीमंडळाचे वार्तांकन केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंचवली स्मशानभूमी प्रकरणी गावकऱ्यांनी सामाजिक बहिष्कार टाकून, प्रांत अधिकाऱ्यांच्या समक्ष जो जीवघेणा हल्ला झाला त्यावेळी जी काही मान्यवर मंडळी आमच्या पाठीशी उभी राहिली होती त्यात राजू झनके व जेष्ठ पत्रकार संजय बोपेगावकर हे आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहून संविधानिक सहकार्य केले त्यामुळेच आम्हांला दिलासा मिळाला, सावरता आले होते हे कधीच विसरता येणार नाही. मात्र, आम्ही ज्यांना पुढाकार घेऊन एकत्र आणले त्यांनी चिंचवली स्मशानभूमी प्रकरणी सहकार्य न करता, पाठीशी उभे न राहता आमची नाहक बदनामी करुन आम्हांलाच चळवळीतून उध्वस्त केले. त्या प्रकरणाची सर्व (सदिच्छा भेट ते जीवघेणा हल्ला व त्यानंतरचा घटनाक्रम) तपशील आमच्याकडे पुराव्यासह उपलब्ध आहे.
आंबेडकरी चळवळीत नेहमीच सक्रिय आणि अन्याय, अत्याचार प्रकरणी आवाज उठवणाऱ्या समाजभूषण राजू झनके २१ मार्च रोजी आपला ५४ वा वाढदिवस कुर्ला पश्चिम येथील संत गाडगे महाराज वसतीगृहातील उपेक्षित, गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य व मिठाई वाटप करुन त्यांच्या समवेत साजरा करणार आहेत. अशा सामाजिक बांधिलकी आणि समाज भावना जोपासणाऱ्या प्रेरणादायी, ध्येयवादी आदर्श व्यक्तिमत्वाचे, उपेक्षितांच्या आधारस्तंभाचे भावी जीवन सुख समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदीमय, यशस्वी, उज्वल, कार्यान्वित, दिशादर्शित, सुरक्षित, इच्छित मनोकामनापुर्तीचे आणि निरोगी आरोग्यमय जावो तसेच ते कार्यरत असलेली सर्व क्षेत्र त्यांच्या कर्तृत्वाने पावन होवोत अशा ५४ व्या वाढदिवसानिमित्त मंगलमय सदिच्छा !

मिलिंद कांबळे, चिंचवलकर
लेखक,आंबेडकरी चळवळ अभ्यासक तसेच वृत्तपत्रीय लेखनाचा तसेच सोशल मिडिया ब्लॉग लेखनाचा दहा वर्षापासूनचा अनुभव.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 21,2024 | 15:24 PM
WebTitle – Samajbhushan Raju Zhanke, a personality who cherishes social commitment and community spirit