साधना मध्ये राजा ढाले यांचा ‘काळा स्वातंत्र्यदिन’ (1972) लेख छापून आला होता.आजची लोकशाही संविधान वाचवण्यासाठी सज्ज असलेली काँग्रेस,त्यावेळी साधनेवर मोर्चा काढणार होती. साधना प्रेस जाळायला.
“काळा स्वातंत्र्यदिन” हा लेख त्यावेळी सत्ताधारी काँग्रेसला अतोनात झोंबला होता, त्यात राष्ट्रध्वजाचे कापड आणि एका दलित स्त्रीच्या लुगड्याची किंमत अशी तुलना होती.
पुणे शहर काँग्रेसच्या वतीने साधना प्रेस जाळण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते,लोकशाहीचा कडेलोट म्हणजे पेशवाई,या प्रतिगामी पुण्यात पुरोगामी मंडळी होती,मात्र त्यांचा आवाज क्षीण होता.संख्येने ते अत्यल्प होते.साधना हे त्याचे प्रातिनिधिक स्वरूप होते.तीच साधना अडचणीत सापडली होती.साधना प्रेसची होळी करण्याचे जाहीर झाले तेव्हा दलित पँथर गप्प कशी बसेल?
पुण्यात प्रतीमोर्चाचे आयोजन
प्रतिगम्यांच्या या हल्ल्यात “साधना” एकाकी पडू नये म्हणून दलित पँथरने त्याच दिवशी पुण्यात प्रतीमोर्चा काढला.
मुंबईतून शेकडो तरुण पुण्याकडे निघाले, रविवार असल्याने तरुणांची संख्या मोठ्याप्रमाणात होती.
प्रेस जाळण्याचा निर्णय काँग्रेसमधील प्रतिगामी मेंदू असले तरी या मोर्चात शिवसेना आणि इतर हिंदुत्ववादी देखील सामील होतेच,
म्हणजे एकीकडे काँग्रेस,शिवसेना,हिंदुत्ववादी आणि दुसऱ्या बाजूला साधना प्रेस अन दलित पँथर.
आता अलिकडे पक्ष फाटाफुटीत हे अभूतपूर्व युतीचे चित्र पुन्हा एकदा आपण पाहिलेच आहे.
दलित पँथर एकाचवेळी सर्वांना अंगावर घेण्याची ताकद राखून होती.
त्यांच्या मोर्चाची घोषणा होती,“जला दो,जला दो साधना प्रेस जला दो”
तर दलित पँथर च्या प्रतीमोर्चाची घोषणा होती “नहीं जलेगी, नहीं जलेगी, हमारी साधना नहीं जलेगी”
घोषणा युद्धाला उधाण आले होते..प्रसंग बाका होता.दलित पँथरच्या तरुणांमध्ये वीरश्री संरचारली होती,कडक पोलिस बंदोबस्त होता.
प्रतिगामी जीव मुठीत घेऊन पळत सुटले
मात्र,इतक्यात पलीकडून दंगलखोरांनी दगड मारून गल्लीत पळ काढला, दगडफेक सुरू झाली.दलित पँथरचे तरुण दंगल खोरांचा पाठलाग करत मागे धावले,तरुणांच्या हातातील प्लेकार्डच्या लाठ्या सज्ज झाल्या होत्या,पण दंगलखोर पळ काढून बायकांच्या पदरखाली लपले असावेत.पेशवाई जोपासणारे गर्भगळीत झाले झोले होते.तुंबळ युद्ध होईल असे वाटले होते,किमान लुटालूट करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे अपेक्षित होते,मात्र असे काही न करता मोर्चाची त्रेधा उडाली..दलित पँथरच्या ताकदी समोर प्रतिगामी जीव मुठीत घेऊन पळत सुटले.
आणि साधना प्रेस जाळून टाकण्याच्या आंदोलन मोर्चाचा अशाप्रकारे फज्जा उडाला,साधनाच्या प्रवेशद्वाराजवळ बाबा आढाव,एसेम जोशी,यदुनाथ थत्ते हजर होते,त्यांनी दलित पँथरच्या मोर्चाचे स्वागत केले.डॉ.अनिल अवचटांनी जोशी-थत्ते यांच्याशी दलित पँथरच्या नेत्यांशी ओळख करून दिली. पुढे सर्वांच्यासोबत “आंतरभारती” हॉलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले.
राजा ढाले यांचा लेख असल्याने अर्थातच ते या बैठकीत “हिरो” होते.या बैठकीला एक वेगळी धार होती.बाहेर एसेम जोशी यांची प्रतिमा जाळणे,यदुनाथ थत्ते यांची प्रेतयात्रा काढणे. (पुण्यात जीवंतपणी प्रेत यात्रा काढण्याचे अघोरी प्रकार प्रतिगामी करत असत,यात प्रबोधनकार ठाकरे यांचीही एकदा प्रेतयात्रा काढण्यात आल्याचे आठवते) बैठकीत मुंबईतील तरुण भाषणे करत होते,सर्वांनी साधनाला पाठिंबा जाहीर केला होताच.
राजा ढाले यांनी सरकारला आव्हानच दिले,“केसला सामोरे जायला मी समर्थ आहे,मी लेखाबद्दल क्षमा मागणार नाही”
यावेळी टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाले,पुण्या मुंबईतील सर्व तरुणांनी साधनाला पाठिंबा जाहीर केला.
या बैठकीत प्रक्षोभक भाषण झालं ते नामदेव ढसाळ यांचं.त्यांनी ना.ग. गोरे यांच्यावरच आगपाखड टीका केली.
नवसमाज निर्मिती कशी भोंगळ आहे. बिनबुडाची आहे,याबद्दल ढसाळ बोलत राहिले. त्यांचा संदर्भ वेगळा होता.
मात्र या आकस्मिक हल्याने एसेम जोशी, थत्ते,अवचट,बाबा आढाव सगळेच आश्रयचकीत झाले.
खरंतर बाबा आढाव यांना ते भाषण आवडले नाही,ते नाराज झाले होते.
मात्र एकूणच.पुण्यातील प्रतिगामी शक्तींना आव्हान देण्यासाठी मर्दुमकी गाजवण्यासाठी काढलेला प्रतीमोर्चा पाहून प्रतिगाम्यांनी नांगी टाकली होती,एखाद्या मोर्चाला प्रतीमोर्चा ने प्रत्युत्तर देणे हा पुणेकरांसाठी नवखा प्रकार होता.सेनापती पडताच सैन्य खोट लावून कसे पळाले असेल या इतिहासाचे दर्शन पुणेकरांना झाले. लाक्षणिक अर्थाने हा प्रतीमोर्चा यशस्वी झाला होता.”साधना” चा गोतावळा आनंदी झाला होता,हिरमुसले होते फक्त डॉ.बाबा आढाव.
यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या ठिकाणी आणखी एक छोटेखानी सभा झाली.
यात नामदेव ढसाळ यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यावर कठोर टीका केली.
त्यावेळी पुणे पोलिसांनी नामदेव ढसाळांना कागदोपत्री अटक केली होती.तेव्हा नामदेव ढसाळांना जामीन राहिले होते ते डॉ.बाबा आढावच.
चळवळीतील तरूणांवर त्यांचा विशेष जीव होता.आपुलकी होती.टीका मतभेद मानपान इत्यादी गौण मानणारी ती पिढी होती,यापिढीचे अर्ध्वयू होते.डॉ.बाबा आढाव. (घटना प्रसंग — ज. वि. पवार आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ आणि नामदेव ढसाळ कृत दलित पँथर पुस्तकातून साभार)
डॉ. बाबा आढाव यांचा जन्म १९३० मध्ये पुण्यात झाला. ते नाना पेठेतील एक प्रख्यात आयुर्वेदिक डॉक्टर होते. नाना पेठ बाजारपेठेचे केंद्र असल्याने विविध व्यवसायांतील कामगार मोठ्या प्रमाणात तिथे येत. त्यांच्या रोजच्या संघर्षांची जाणीव डॉ. आढाव यांना झाली. हमालांचे अमानवी शोषण आणि त्यांना कोणतेही कायदेशीर संरक्षण नसल्याचे दृश्य त्यांच्या मनाला चटका लावत होते.
या वास्तवाने खोलवर प्रभावित होऊन १९६६ मध्ये त्यांनी आपली चांगली चाललेली डॉक्टरकी सोडली आणि कामगारांच्या हक्कांच्या लढ्यासाठी आयुष्य समर्पित केले.
डाळींचा व्यापार करणाऱ्या ओबीसी वर्गातील हा शिलेदार खऱ्या अर्थाने महात्मा जोतीराव फुलेंच्या सत्यशोधकचळवळीचा वारसदार होता.
वैद्यकीय व्यवसाय करत असताना कष्टकरी, हमाल, रिक्षाचालक आणि शोषित घटकांच्या वेदना, अडचणी आणि अन्याय त्यांना प्रकर्षाने जाणवू लागले.
सुरुवातीला त्यांनी समाजवादी पक्षासोबत काम केले, मात्र नंतर राजकीय चौकटीपलीकडे जाऊन १९५५ मध्ये हमाल पंचायतची स्थापना केली. पुढे हीच पंचायत १९७२ मध्ये प्रभावी कामगार संघटना बनली. वाहतूक क्षेत्रातील कामगारांना योग्य वेतन मिळावे, या मागणीसाठी १९५६ मध्ये पहिले आंदोलन झाले. या सातत्यपूर्ण संघर्षामुळेच १९६९ मध्ये ‘महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार कायदा’ अस्तित्वात आला — असंघटित कामगारांच्या संरक्षणासाठी भारतातील पहिला कायदा.
डॉ. आढाव हे महात्मा फुले यांच्या जातीविरोधी आणि मानवतावादी विचारांचे निष्ठावान अनुयायी.
त्यातूनच त्यांनी वर्ग, जात आणि लिंग विषमतेविरोधात अनेक चळवळी पुढे नेल्या.
- १९५२ – दुष्काळाच्या काळात महागाई आणि साठेबाजीविरोधात सत्याग्रह
- १९६२ – महाराष्ट्र सरकारच्या पुनर्वसन धोरणाविरुद्ध आंदोलन
- १९७२ – दलितांना सर्वत्र पाणी मिळावे यासाठी राज्यव्यापी ‘एक गाव – एक पाणवठा’ मोर्चे
- १९७४ – कष्टकरी कामगारांना स्वस्त, पौष्टिक अन्न देणाऱ्या कष्टाची भाकरी योजना ची सुरुवात; भवानी पेठेपासून सुरू होऊन पुढे पुण्यात १२ शाखा
१९७०–७१ च्या काळात त्यांनी दोन महत्त्वपूर्ण विषयांवर निर्भीड आंदोलन उभारले होते.
पहिले आंदोलन होते पंढरपूरच्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेच्या विरोधात. शासनाच्या वतीने केली जाणारी पूजा ही समानतेच्या तत्त्वांना बाधक असल्याचे त्यांचे मत होते.
दुसरे आंदोलन होते संस्कृत भाषा आणि वेदज्ञानात निपुण असलेल्या विद्वानांना शासन पुरस्कृत करत असलेल्या सन्मानांच्या विरोधात.
सामाजिक समतेच्या विचारातून त्यांनी या शासनपरंपरेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
या दोन्ही भूमिकांमध्ये असलेल्या तात्त्विक स्थैर्यामुळे, तसेच त्यांनी प्रत्यक्ष आंदोलने उभारल्यामुळे, बुद्धिवंत आणि प्रगतिशील पुरोगामी वर्तुळांकडून डॉ. बाबांना मोठा पाठिंबा लाभला. त्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर १९७१ मध्ये मंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय पूजा थांबवण्यात आली. मात्र, या चळवळीचा प्रभाव दीर्घकाळ टिकला नाही.
यानंतर लगेचच, १९७२ मध्ये राज्यावर तीव्र दुष्काळ ओढवला. त्या वेळी शिष्टमंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची भेट घेतली.शासकीय पूजा बंद केल्यामुळे विठ्ठल नाराज झाला आणि दुष्काळ पडला, अशी समजूत पुढे करत, पुन्हा शासकीय पूजा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
या घडामोडीनंतर १९७३ मध्ये महाराष्ट्र शासनाने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आपल्या ताब्यात घेतले आणि मंदिराच्या दैनंदिन कारभारासाठी विशेष कायदा लागू करण्यात आला. त्या वर्षापासून या मंदिराचे प्रशासन कायद्याच्या अधीन राहून चालू लागले.
बाबा आढाव यांनी असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि पेन्शन मिळावी, यासाठी २०१२ मध्ये राष्ट्रीय पेन्शन अदालत उभारण्यात पुढाकार घेतला.
त्यांनी उभारलेल्या प्रमुख संघटना:
- मोलकरीण पंचायत
- रिक्षा पंचायत
- कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायत
- विषमता निर्मूलन समिती
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन, आणिबाणी विरुद्ध लढा, मराठवाडा नामांतर लॉगमार्च,कामगार, दलित, स्त्री आणि शोषित समाजाच्या हक्कांसाठी लढणारा हा सच्चा सत्यशोधक — डॉ. बाबा आढाव
—त्यांचे संपुर्ण आयुष्य अन्यायाविरुद्ध आणि मानवतेच्या बाजूने उभे राहिले होते.
असे थोर कष्टकऱ्यांचे नेते आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे सोमवार 8 डिसेंबर 2025 रोजी वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले. मागील 13 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या वैचारिक स्मृतींना टीम जागल्याभारतकडून विनम्र अभिवादन !!

मिलिंद धुमाळे
संपादक जागल्याभारत
हे ही वाचा .. कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांचे निधन; वयाच्या 96 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 08,2025 | 09:00 PM
WebTitle – ‘Sadhana’s Holi, Dalit Panther and Baba Adhav























































