देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातही वातावरण तापले असून गेले दिवस राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत होता. इथे भावाविरुद्ध बहीण अन नणंद विरुद्ध भावजाय असा संघर्ष होणार असून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट असा हा संघर्ष होणार आहे. तर दुसरीकडे वर्धा जिल्ह्यात सासऱ्याविरुद्ध सुनेचा संघर्ष पाहायला मिळत आहे.मात्र याला कारणही वेगळं आहे.इथं केवळ राजकीय कारण नाही तर कौटुंबिक वाद छळ , फसवणूक आणि अत्याचार अशा गंभीर आरोपांची पार्श्वभूमी आहे.वर्धा मतदारसंघात भाजपकडून रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर त्यांच्याविरोधात त्यांची सून पुजा तडस या अपक्ष म्हणून आव्हान देणार आहेत. पूजा तडस यांनी पत्रकार परिषद घेत सासरे रामदास तडस यांच्यावर (आज 11 एप्रिल 2024 ) अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे.
रामदास तडस यांच्या स्नुषा पूजा तडस यांनी नागपुर येथील प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप करत मोठा खुलासा केला आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी तडस कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मला वेगवेगळ्या फ्लॅटवर ठेवून उपभोगाची वस्तू समजली, असं म्हणत त्यांनी सासरे रामदास तडस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यादेखील या पत्रकार परिषदेत उपस्थित होत्या.
मला उपभोगाची वस्तु समजून अत्याचार
“रामदास तडस यांनी त्यांच्या मुलाला बलात्काराच्या आरोपापासून वाचवण्यासाठी माझ्यासोबत त्याचं लग्न लावून. त्यानंतर त्यांनी मला एका फ्लॅटवर नेऊन ठेवलं. तिथे मला अतिशय वाईट वागणूक देण्यात आली. ज्या फ्लॅटमध्ये मी राहत होते तिथे मला फक्त उपभोगाची वस्तु समजण्यात आलं. त्यातून हे बाळ जन्माला आलं. माझ्या बाळाच्या जन्मानंतर हे बाळ कुणाचं?, या बाळाची डीएनए टेस्ट करा, असे अपमानजनक आरोप करण्यात आले. 17 महिन्यांचे माझं बाळ आहे, माझ्यावर प्रत्येकवेळी अत्यंत घाणेरडे आरोप करण्यात आले.या अगोदर माझा एकदा गर्भपात देखील करण्यात आला ”, असा धक्कादायक खुलासा पूजा तडस (Pooja Tadas) यांनी यावेळी केला.
पूजा तडस यांनी असंही म्हटल की. “मी न्याय मागण्यासाठी गेल्यावर मला त्यांनी लोखंडी रॉडनं मारहाण केली होती, मी याचे पुरावेदेखील सर्वांना देणार आहे.
एका स्त्रीवर इतके अत्याचार?, मला बेघर करण्यात आलं. महिलांना आरक्षण द्या, असं तडस म्हणतात.
मग, माझ्यासोबत हा अन्याय का?, मला दोन वेळचं अन्नही मिळत नव्हतं, माझ्या मुलाला दूध देखील मिळत नव्हतं,
माझ्यावर खूप अत्याचार करण्यात आले, असा गंभीर आरोप पूजा तडस यांनी केला आहे.
मोदींनी मला न्याय द्यावा
यावेळी पूजा तडस यांनी थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे न्याय देण्याची मागणी केली आहे.
“ज्या भाजपा उमेदवाराची सभा घेण्यासाठी मोदी 20 तारखेला वर्ध्यात येत आहेत. त्यांना माझी विनंती आहे. मोदींनी माझ्या मुलाला न्याय द्यावा.
मोदींनी सभेसाठी आल्यानंतर मला थोडा वेळ द्यावा आणि त्यांनी मला न्याय द्यावा.’
अशी मागणी पूजा तडस (Pooja Tadas allegetion on ramadas tadas ) यांनी केली आहे.
त्यांच्या या आरोपांची आता राज्यभर चर्चा रंगली असून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
या गोष्टीचा पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार व्हावा
यावेळी पीडित पूजा तडस सोबत उपस्थित असलेल्या सुषमा अंधारे यांनी म्हटले की, “या गोष्टीचा पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक महिला म्हणून त्या न्यायाची आणि सन्मानाची लढाई लढत असतील तर मोदींचा परिवार म्हणवून घेणाऱ्या सर्वांनी देखील त्यांचा विचार केला पाहिजे. एक परिवार उद्ध्वस्त होत आहे,तो परिवार मोदीजींच्या परिवारातील परिवार आहे. आणि मोदीजींच्या परिवारासाठी मोदीजी जर 20 तारखेला ज्याने यांचा परिवार उद्ध्वस्त केला त्याच्या प्रचारासाठी जर येत असतील तर मोदीजींनी अगोदर यांचा परिवार दुरुस्त आहे का हे पाहिले पाहिजे,ज्या रामदास तडस यांच्या प्रचारासाठी ते येथे येत आहेत. त्या रामदास तडस यांनी आपल्या परिवाराला न्याय दिला आहे का? हे त्यांनी समजून घ्यावे आणि मग मोदी का परिवार असं वाक्य ठळक करत त्यांनी आपली भाषणबाजी करावी इतकी साधी अपेक्षा आहे.”
आता या घटनेनंतर नरेंद्र मोदी पीडित महिला पूजा तडस यांना भेटणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 11,2024 | 18:32 PM
WebTitle – Pooja Tadas allegetion on ramadas tadas