खरंच काय चुकलं यशवंत मनोहर यांचं ?
त्यांनी त्यांच्या मनातला विचार उघड बोलून दाखवला.सतत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पुस्तकी चर्चा करणा-या साहित्यप्रेमी मंडळींना पुरस्कार विजेत्या कवीच्या विचारांचं प्रकटीकरण इतकं आक्षेपार्ह का वाटावं? माझा विचार मान्य केला नाही तर मी सभागृह जाळून टाकीन असं तर कवी बोलला नाही ना.
विचाराला विचारानं उत्तर द्यावं असा सतत आग्रह धरणा-यांना कवीच्या वैचारिक भूमिकेला वैचारिक पातळीवरून प्रतिवाद करावा असं का वाटलं नाही ? जीवनव्रती सारखा प्रतिष्ठित पुरस्कार देण्याची पात्रता असलेली व्यक्ती एका रात्रीत दोन ओळींच्या संवादासाठी अपात्र होऊन जावी ?
देशात खोटं बोलण्या-वागण्याला प्रतिष्ठा आहे
यशवंत मनोहर यांना जीवनव्रती हा प्रतिष्ठित पुरस्कार देणा-या विदर्भ साहित्य संघाला मनोहरांची त्यांच्या लिखाणातून, काव्यातून समोर येणारी त्यांची सामाजिक जाणीवआणि विचारसरणी, त्यांचा धर्मविषयक द्दष्टिकोन संघातील अभ्यासू सदस्यांना, वाचकांना माहीत नसेल हे शक्य आहे का ? मनोहरांनी आपले विचार कधी लपवून ठेवले नाहीत. त्यांच्या आजवरच्या कवितेतही त्यांच्या विचारांचं प्रतिबिंब पडलेलं आहे. आपले विचार वेगळे आणि साहित्य वेगळे असं मानणा -या साहित्यिकांपैकी ते नाहीत हे सर्वज्ञात आहे.
किती विचित्र आहे, हे की देशात खोटं बोलण्या-वागण्याला प्रतिष्ठा आहे. मनाविरुद्ध केलेले जुलुमाचे नमस्कार चालतात; नमस्कार करावा असं मनातून वाटत नसता केवळ वाईट दिसेल, लोक रागावतील म्हणून नमस्कार करणा-या भिडस्त वर्तनाचं समाजात स्वागत असतं.प्रचलित विचारआचार प्रवाहाच्या विरोधात मनमोकळेपणानं कोणी मनोगत व्यक्त केलं तर मात्र समाजात अस्वस्थतेची लाट पसरते.मनातलं सत्य बोलून दाखवणारा निंदेचा धनी होतो.
हिंदू धर्माची प्रतीकं इतर धर्मीयांनी मानली पाहिजेत असा आग्रह का ?
बुद्धीची देवता म्हणून सर्व सभा समारंभात सरस्वतीची प्रतिमा पूजली जाते हे आपल्याला माहीतआहे. यशवंत मनोहरांनाही हे माहीत आहे.सरस्वतीपूजनाला सर्व सभारंभात बंदी असावी अशी सामाजिक मोहीम काही त्यांनी हाती घेतलेली नाही. आपल्या पुरस्कार समारंभात सरस्वतीऐवजी सावित्रीबाई असावी; तिचं पूजन व्हावं एवढीच त्यांची इच्छा होती. त्यांच्या सत्कार समारंभापुरतं त्यांना वेगळं नेपथ्य हवं होतं. सत्कारमूर्त्तीनी व्यासपीठावरचं नेपथ्य ठरवावं का हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण सूचना फार अतिरेकी नव्हती.
हिंदूंची प्रतीकं मंजूर नसलेल्या व्यक्तीनं अशा प्रतिकांपुढे झुकावं का ? हिंदू धर्माची प्रतीकं इतर धर्मीयांनी मानली पाहिजेत असा आग्रह का ? सत्कारमूर्त्तीचं वैचारिक अधिष्ठान काही असो, सहिष्णुतेबद्दल ख्याती असलेल्या धर्मातल्या सुबुद्धांनी, आम्ही आमच्या धर्मातील देवीचं पूजन करणारच असा आग्रह का धरावा ?
श्रद्धा नावाचा एक प्रकार सर्व धर्मात बोकाळलेला आहे.
खरं तर या आग्रहातून अप्रत्यक्षरीत्या आपण आपल्या असहिष्णुतेचं प्रदर्शन करत आहोत याचं भान आयोजकांना असायला हवं होतं. आम्हीच धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व का पाळावं असा नेहमीचा प्रतिवाद यावर केला जाईल. पण मग आमचं राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे म्हणून मिरवू नका. हे धार्मिक राष्ट्र आहे हे जाहीर तरी करून टाका असं त्यावर म्हणता येईल.
श्रद्धा नावाचा एक प्रकार सर्व धर्मात बोकाळलेला आहे. इथं “बोकाळलेला” हा शब्दही अनेकांना कदाचित रुचणार नाही. पण श्रद्धेचं समाजविघातक आणि अतिरेकी रूप आज समाजात दिसू लागलं आहे आणि पूर्वीपेक्षा अधिक आक्रमकपणे धर्मश्रद्धांचा प्रसार होतो आहे. आस्तिकातल्या सुजाण नागरिकांना देखील ही चिंतेची बाब वाटू लागली आहे.
सर्व श्रद्धा या अंधश्रद्धा असतात
सर्व श्रद्धा या अंधश्रद्धा असतात हे सत्य समाजाला अजून पचलेले नाही. श्रद्धा या प्रकारावर केलेल्या शाब्दिक टीकेनंही श्रद्धाळू लोक भडकतात; मारायला उठतात. श्रद्धेच्या विरोधात बोलणे हा त्यांना त्यांच्या धर्मावरला घाव वाटतो. आमच्या श्रद्धेवर टीका करणारे तुम्ही कोण? असा त्यांचा सवाल असतो.
मी एक साधा नागरिक आहे आणि घटनेनं मला प्रश्न विचारायचा अधिकार दिला आहे हे उत्तर त्यांना चालत नाही. कसले संविधान दिवस उत्सव, कसलं घटनाप्रेम नि कसलं काय. बुद्धिप्रामाण्यवादाचा लहानसा स्पर्शही आपल्या सामाजिक वर्तनाला झालेला दिसत नाही.अलीकडील विदर्भ साहित्य संघातल्या घटनेमुळे हे अधिक स्पष्ट झालं. विचार विनिमयानं या पेचावर तोडगा काढता असता.
प्रश्न विचारणं हाच मुळात या देशात अपराध मानला जाऊ लागला आहे
वास्तवाकडे धर्माचा चष्मा उतरवून नीट पाहिलं पाहिजे. आणि स्वत:ला काही प्रश्न विचारले पाहिजेत. उदाहरणार्थ : सरस्वती देवी ही बुद्धीची देवता आहे हे इथं शालेय वयापासून मुलांच्या मनावर बिंबवलं जातं. आपल्या धर्मनिरपेक्ष संविधानात हे कुठं बसतं ? अमुक एक देवी ही बुद्धीची देवता हे कुणी ठरवलं ? कोणत्या निकषावर तिला बुध्दीची देवता हे विशेषण देण्यात आलं ? याविषयी काही सांगितलं जात नाही. कोणत्या अशा आख्यायिका आहेत; त्या देवतेच्या जीवनक्रमात कोणते असे बौद्धिक कर्तृत्व आहे की ती देवी बौद्धिक संस्कृतीची प्रतिमा ठरावी ?
आजतागायत नागरिकांना अशा प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. प्रश्न विचारणं हाच मुळात या देशात अपराध मानला जाऊ लागला आहे. समाजाच्या म्हणून भावना असतात. प्रश्न विचारण्यानं त्या दुखावल्या जातात हा विचार द्दढ होत चालला आहे आणि तो अनेक सामाजिक आणि राजकीय संघर्षांना जन्म देऊ लागला आहे.
सरस्वती हे एका विशिष्ट धार्मिक समूहाचं प्रतीक
निदान हे तरी सर्वांना मान्य व्हावं की सरस्वती ही कल्पित स्त्री आहे; ऐतिहासिक व्यक्तिरेखा नव्हे. या वास्तवामुळे एखाद्याला वाटलं, की सन्मान हाडामासाच्या कर्तृत्ववान स्त्रीचा करावा; विशिष्ट धर्मातील कल्पित व्यक्तिमत्वाचा करू नये तर त्यात गैर काय ? ही सूचना कुणाला आवडो न आवडो, तर यात कुणाचा अवमान कसा काय होतो? अलीकडील जीवनव्रती पुरस्कार प्रकरणात ही सूचना पुढं आली आणि एका वादळाला कारणीभूत ठरली.
साहित्याच्या दरबारी असा आग्रह धरणारा कुणी सोमागोम्या नव्हता. विदर्भ साहित्य संघानं पुरस्कार देऊन गौरवलेला तो एक ज्येष्ठ कवी होता. समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेत विचारवंत म्हणून आयोजकांनी त्याचा उल्लेख केला आहे. सरस्वती हे एका विशिष्ट धार्मिक समूहाचं प्रतीक असलं तरी ते सर्वधर्मीयांनी मान्य केलेलं प्रतीक आहे असं संघाच्या आयोजकांना वाटत असेल तर ज्या साहित्यिकाला आपण विचारवंत म्हटलं आहे त्या सत्कारमूर्तीना आपल्या परीनं हे समजावून सांगता आलं असतं. तसा प्रयत्न दिसला नाही.
वैचारिक मूल्यं महत्त्वाची
आयोजकांप्रमाणे वाचक समाजातील एक वर्तुळही यशवंत मनोहर या कवीकडे विचारवंत म्हणून पाहातो.
ज्या विदर्भ साहित्य संघानं आपल्याला जीवनव्रती हा मानाचा पुरस्कार जाहीर केला
त्या संघाचे पदाधिकारी, संयोजक कोणत्या सामाजिक मानसिकतेचे आहेत हे यशवंत मनोहर यांना ठाऊक नसेल असं कसं होईल ?
तिथं मनोहरांच्या जिव्हाळ्याचे मित्रही आहेत आणि ते रूढी प्रिय विचारसरणीचे आहेत हेही मनोहर यांना अट घालण्यापूर्वी माहीत असणार. पण सहका-यांच्या आणि मित्रपरिवाराच्या धार्मिक भावनांपेक्षा आपण जन्मभर जपलेली तत्वं आणि जवळ केलेली वैचारिक मूल्यं मनोहरांना महत्त्वाची वाटली.
हा ज्याच्या त्याच्या पिंडप्रकृतीचा प्रश्न आहे. दुसरा कोणी साहित्यिक असता आणि तो टोकाचा नास्तिक असला तरी आपली तत्वं तात्पुरती बाजूला ठेवून अशा समारंभात त्यानं विनातक्रार सहभाग घेतला असता. आणि अनेकांनी विरोधी विचारांच्या संस्थात पाहुणे म्हणून हजेरी लावल्याचं, व्याख्यानमालेत भाग घेतल्याचं आपण पाहिलं आहे. यशवंत मनोहरांनी देखील त्यांचं अनुकरण करावं असं अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. तो त्यांचा प्रश्नआहे.
मी मूर्तीपूजा वगैरे मानत नाही
तात्त्विक तडजोड कधी आणि किती करायची हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. तसं पाहिलं तर मनोहर एकटे नाहीत . समाजातल्या सामाजिक बांधिलकी मानणा-या एका साहित्यिक गटाचं ते प्रतिनिधित्व करतात हे लक्षात घेतलं पाहिजे. हिंदू धर्मातील मूर्तिपूजा , कर्मकांड यांना त्यांचा कडवा विरोधआहे. हा विरोध व्यवहारात किती ताणायचा हे त्यांनी ठरवायचं.
इथं मॅजेस्टिक गप्पातील एक घटना मुद्दाम उल्लेखावी असं वाटते. काही वर्षांपूर्वीची घटना.मॅजेस्टिक गप्पांचा कार्यक्रम कादंबरीकार श्याम मनोहरांच्या मुलाखतीनं होणार होता.गप्पांची सुरवात ज्यांच्या सहभागामुळे होते त्या पाहुण्यांच्या हस्ते गप्पांचं उद्घाटन करायची मॅजेस्टिकची प्रथा. त्यानुसार श्याम मनोहरांना देवीच्या प्रतिमेचं पूजन करायची विनंती कोठावळे यांनी केली. यावर श्यामरावांनी त्यांना बाजूला घेऊन हलक्या आणि नम्र आवाजात सांगितलं, की मला सांगायला भीती आणि संकोच वाटतोय. तरी देखील मी धीर एकवटून तुम्हाला सांगतोय, की मी मूर्तीपूजा वगैरे मानत नाही. तेव्हा मला हे काम सांगू नका. मनोहरांच्या नकारानं कोठावळे अजिबात डिस्टर्ब् झाले नाहीत. देवीपूजनाचं काम त्यांनी शांतपणे दुस-यावर सोपवलं. त्यानंतर मुलाखतीचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला. थोडक्यात : असेही मनोहर आहेत साहित्यविश्वात तात्त्विकद्दष्ट्या यशवंत मनोहराहून ते फार वेगळे नाहीत. पेचप्रसंगाला ते त्यांच्या पिंडप्रकृतीनुसार सामोरे गेले एवढंच म्हणता येईल.
धार्मिक परंपरा अंधपणे स्वीकारल्या जाता कामा नयेत
यशवंत मनोहरांच्या अनेक चाहत्यांना असं वाटते की समारंभावर बहिष्कार न टाकता मनोहरांनी पुरस्काराचा स्वीकार करायला हवा होता.
आणि नंतरच्या भाषणात सरस्वतीपूजन प्रथा याबद्दल निषेधाचा सूर प्रेक्षकांसमोर व्यक्त करायला हवा होता.
पुढेमागे आपण सावित्रीबाईंच्या प्रतिमेचं पूजन अशा समारंभात केलं पाहिजे असं उपस्थितांसमोर ठणकावून सांगायला हवं होतं.
एक चांगली संधी या कवीनं गमावली.असो.
एका कवीच्या स्पष्टवक्तेपणामुळे दोन गटात आधीच असलेली दरी अधिक रुंद झाली हे वाईट झालं;
पण एक चांगलं झालं; धार्मिक परंपरा अंधपणे स्वीकारल्या जाता कामा नयेत;
निरर्थक परंपरांना बरे-वाईट प्रश्न विचारण्याचं धाडस नव्या पिढीनं केलं पाहिजे, हा संदेश या घटनेमुळे जनतेत गेला हे मान्य करावं लागेल.
समारंभात सरस्वतीपूजन करण्याची प्रथा खरोखरच निरर्थक आहे का, सरस्वतीऐवजी सावित्रीबाईंची प्रतिमा पूजणे कितपत उचित ठरेल,
की प्रतिमापूजनच हद्दपार करावं आपल्या अधार्मिक सभा समारंभातून यावर आता उलटसुलट चर्चा होऊ लागेल. हेही नसे थोडके.
लेखन – अवधूत परळकर
22 जानेवारी 2021
.सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून साहित्यीक यशवंत मनोहरांनी विदर्भ साहित्य संघाचा नाकारला पुरस्कार
हेही वाचा..आहे मनोहर अन यशवंत ही
हेही वाचा..सावित्री की सरस्वती या निमित्ताने जनार्दन यांच्या मांडणीला उत्तर
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)