नवी दिल्ली,16-12-2025 : पतंजली च्या लाल मिरची पावडर चा नमुना असुरक्षित आढळला, सरकारने लोकसभेत सांगितले,कारण त्यात आढळलेल्या कीटकनाशकांच्या अवशेषांचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त होते. या महिन्याच्या सुरुवातीला, पतंजलीने बनवलेल्या तुपाचा नमुना गुणवत्ता नियंत्रण चाचणीत अयशस्वी झाल्याचे उघड झाले आहे. नवी दिल्ली: उत्तराखंडमध्ये असलेल्या पतंजली फूड्सच्या उत्पादन युनिटमध्ये तयार झालेल्या लाल मिरची पावडरचा एक नमुना असुरक्षित असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ही माहिती केंद्र सरकारने शुक्रवारी लोकसभेत दिली.
न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लेखी उत्तरात सांगितले की, 2024–25 या कालावधीत मसाल्यांवर राबवण्यात आलेल्या सॅम्पलिंग मोहिमेदरम्यान उत्तराखंडमधील पतंजली फूड्सच्या उत्पादन केंद्रातून घेतलेल्या लाल मिरची पावडर चा एक नमुना तपासण्यात आला. या नमुन्यात आढळलेले कीटकनाशकांचे अवशेष ठरवून दिलेल्या कमाल मर्यादेपेक्षा म्हणजेच एमआरएलपेक्षा अधिक असल्यामुळे तो नमुना असुरक्षित ठरवण्यात आला.
मंत्र्यांनी पुढे सांगितले की, तपासणी अहवालाच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांनी उत्पादन मागे घेण्याचा आदेश दिला.
त्यानंतर संबंधित अन्न व्यवसाय चालकाने म्हणजेच एफबीओने तो प्रभावित माल बाजारातून परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली.
तसेच मंत्री प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केले की,
अमूल ब्रँडच्या कोणत्याही उत्पादनाचा नमुना अन्न सुरक्षा व मानक नियमांनुसार असुरक्षित आढळलेला नाही.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी सरकारला प्रश्न विचारला होता की,
बाजारात ग्राहकांना केवळ गुणवत्तापरीक्षित आणि सुरक्षित अन्नपदार्थच उपलब्ध होतील, यासाठी सरकार कोणती पाऊले उचलत आहेत ?
या प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांनी सांगितले की, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयला विज्ञानाधारित मानके ठरवणे तसेच अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वितरण, विक्री आणि आयात यांचे नियमन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामागील उद्देश मानवी उपभोगासाठी सुरक्षित आणि पौष्टिक अन्न उपलब्ध करून देणे हा आहे.
मंत्री म्हणाले की, अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, 2006 याची अंमलबजावणी आणि अंमल सुनिश्चित करण्याची जबाबदारी केंद्र सरकार
आणि राज्य सरकार यांच्यात विभागलेली आहे.
या अगोदर पतंजलीच्या तुपात भेसळ आढळून आली होती
ते पुढे म्हणाले की, ठरवून दिलेल्या मानकांचे, मर्यादांचे आणि इतर कायदेशीर अटींचे पालन होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी एफएसएसएआय, त्यांची प्रादेशिक कार्यालये तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील अन्न सुरक्षा प्राधिकरण वर्षभर नियमितपणे विशेष अंमलबजावणी व देखरेख मोहिमा राबवतात. यामध्ये राष्ट्रीय वार्षिक देखरेख योजना (एनएएसपी), तपासण्या आणि नमुने गोळा करण्याच्या कारवाया यांचा समावेश असतो.
जर कुठेही निष्काळजीपणा किंवा अन्न सुरक्षा व मानक नियमांचे उल्लंघन आढळले, तर संबंधित दोषी अन्न व्यवसाय चालकांवर अन्न सुरक्षा व मानक कायदा, 2006 आणि त्याअंतर्गत नियमांनुसार कारवाई केली जाते. या कारवाईत दंडात्मक उपायांचाही समावेश असतो, असेही त्यांनी सांगितले.
उल्लेखनीय बाब म्हणजे, याच महिन्याच्या सुरुवातीला पतंजलीने तयार केलेल्या तुपाचा एक नमुना गुणवत्ता नियंत्रण चाचणीत अपयशी ठरल्याचे समोर आले होते. या प्रकरणी उत्तराखंडमधील एका स्थानिक न्यायालयाने कंपनीवर दंड ठोठावला होता. वृत्तसंस्थांच्या अहवालानुसार, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील प्रयोगशाळांमध्ये तपासणी केल्यानंतर तुपात भेसळ आढळून आली होती. त्यानंतर उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांवर मिळून एकूण 1.40 लाख रुपयांपेक्षा जास्त दंड लावण्यात आला.
गुणवत्तेवर याआधीही प्रश्न
पतंजली फूड्स ही एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी असून ती खाद्यतेले, बिस्किटे, नूडल्स, साखर तसेच पॅकेज्ड अन्नपदार्थांची विक्री करते.
यावर्षी जानेवारी महिन्यात एफएसएसएआयने पतंजली फूड्सला त्यांच्या लाल मिरची पावडरच्या एका बॅचला बाजारातून परत घेण्याचे निर्देश दिले होते,
कारण ती बॅच गुणवत्ता मानकांचे पालन करत नव्हती. त्या वेळी कंपनीचे सीईओ संजीव अस्थाना यांनी सांगितले होते की,
पतंजली फूड्सने लाल मिरची पावडरचा सुमारे चार टनांचा छोटा बॅच, म्हणजे 200 ग्रॅमचे पॅक, बाजारातून मागे घेतले आहेत.
त्यानंतर मे 2024 मध्ये उत्तराखंडमधील पिथौरागढ येथील मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांनी सोन पापडी या उत्पादनाच्या गुणवत्ता चाचणीत अपयश आल्यामुळे पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या एका सहाय्यक व्यवस्थापकासह तीन जणांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती. या तिघांवर दंडही लावण्यात आला होता.
याआधी उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणाने ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स नियम, 1945 चे वारंवार उल्लंघन केल्याच्या कारणावरून
पतंजली आयुर्वेद लिमिटेड आणि दिव्य फार्मसी यांच्या 14 उत्पादनांचे उत्पादन परवाने तात्काळ निलंबित केले होते.
या निलंबित उत्पादनांमध्ये स्वसारी गोल्ड, स्वसारी वटी, ब्रॉन्कोम, स्वसारी प्रवाही, स्वसारी अवलेह, मुक्ता वटी एक्स्ट्रा पॉवर, लिपिडोम,
बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पॉवर, लिवामृत अॅडव्हान्स, लिवोग्रिट, आयग्रिट गोल्ड आणि पतंजली दृष्टि आय ड्रॉप यांचा समावेश होता.
गेल्या वर्षी कर्करोग निर्माण करणाऱ्या कीटकनाशकांचे प्रमाण जास्त आढळल्यामुळे हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये एमडीएच आणि एव्हरेस्ट या मसाला उत्पादक कंपन्यांच्या काही उत्पादनांची विक्री स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर देशांतर्गत मसाला उद्योगही तपासाच्या कक्षेत आला होता.
गुणवत्ता मानकांचे पालन होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी सरकारनेही कंपन्यांची तपासणी सुरू केली होती.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 14,2025 | 12:22 PM
WebTitle – Patanjali Foods red chilli powder sample unsafe due to excess pesticide residue, government informs Parliament























































