सर्व कलांचा जन्मदाता म्हणजे निसर्ग आता हेच बघाना भारतीय संगीतात जे प्रमूख सात स्वर आहेत त्याचांही उदगम प्राण्यांच्या आवाजातील कंपना पासून झाला असं म्हटलं जातं.मोर,गाय, बकरी, क्रोंच,कोकीळा, घोडा आणि हत्ती यांच्या स्वरा पासून क्रमश: सा,रे,ग,म,प,ध,नी या सात सुरांचा जन्म झाला. विशेष म्हणजे हे सूर फक्त गळ्यातूनच बाहेर पडतात असंही नाही तर नाभी,कंठ, छाती, टाळू,जीभ व दात या सहा ठिकाणाहून स्वरांची निर्मिती होते. नाभी ते डोके असा व्यापणारा स्वर म्हणजे “षडज” जो संगीतातील अत्यंत महत्वाचा स्वर अर्थात हे सर्व संगीतातील दिग्गजांचे मत या सात स्वरांपैकी “सा” म्हणजे “षड्ज” आणि “प” म्हणजे “पंचम” हे दोन स्वर शुद्ध मानले जातात.इतर पाच स्वरात “तीव्र” आणि “कोमल” असे दोन भेद आहेत.असो.
अर्थात आपला विषय संगीताचे व्याकरण नाही आणि तो आवाका माझ्या सारख्याला पेलवणाराही नाही. स्वरांची थेडी तोंड ओळख करून देण्याचे कारण म्हणजे यात “पंचम” नावाचा एक स्वर आहे.
बंगाली संस्कृतीत “दा” या शब्दाला वजन आणि मानही आहे.भारतीय चित्रपट संगीतसृष्टीतील पंचमदा म्हणजे एकदम वेगळं रसायन.विज्ञानातील रसायना प्रमाणेच संगीतातही रसायने असतात.
शिवाय ते विज्ञानातील रसायना प्रमाणेच तीव्र आणि उपयोजित मृदू असेही असता.तर सचिनदा नावाच्या एका अफाट रसायनापोटी दुसऱ्या एका अनोख्या रसायनानं जन्म घेतला राहूल देव बर्मन उर्फ पचंम (82nd birth anniversary of RD Burman, we remember the iconic musician)
लहानपणा पासूनच आठही दिशानां संगीताचे स्वरजाल असल्यामुळे राहूल त्यात ओढला गेला नसेल यात काय नवल?
बाध्यांने अगदीच किरकोळ वाटणारे सचिनदा संगीतात मात्र चांगलेच वजनदार होते.आपल्या मातृभूमीच्या लोकसंगीताचे चित्रपटसृष्टीत अचूक वापर करणाऱ्या मोजक्याच संगीतकारांपैकी ते एक.
विविध प्रांतातल्या शेकडो गुणी कलावंताना आपल्या हृदयात आवर्जुन स्थान देणारी मुंबई म्हणजे सर्व क्षेत्रातल्या दिग्गजांची कर्मभूमी.
आई मीरा देव बर्मन उत्तम गीतकार. आजी राहूलला “तबलू” म्हणायची.पंचम हे नतंरचे नाव. याही नावाची गमंत आहे. तबलू लहानपणी तार स्वरात रडायचा ज्याचं कंपन पंचम स्वरा इतके तीव्र असे म्हणून पंचम.
तर आणखी एक किस्सा सांगितला जातो तो म्हणजे बाळ तबलू पाच वेगवेगळ्या आवाजात रडत असे तर अशोक कुमार यांनी एकदा या बाळाला रडताना बघितले आणि नाव ठेवले पंचम असाही एक किस्सा सांगितला जातो.किस्से काहीही असो पण या बाळाने पूढे जावून संगीतातील सर्व सुरानां मस्त बांधून ठेवलेे.
सचिनदा यांनी मनात आणले असते तर कोणत्याही चित्रपट निर्मात्याकडे शब्द टाकून आरडीच्या कारकिर्दीची वाट मोकळी केली असती पण ‘स्वत:च्या कर्तृत्वावर काय हवे ते करा’ असं मानणाऱ्या लोकांचा तो काळ असल्यामुळे सचीनदांनी शब्द टाकला नसावा.
मेहमूद हा फक्त एक कॉमेडियनच नाही तर निर्माता-दिग्दर्शकही व स्ट्रगल करणाऱ्या कलावंताचे कलागूण हेरणारा मोठ्या मनाचा माणूसही होता. त्याने आरडीतले टॅलेंट बरोबर ओळखले. १९६१मध्ये मेहमूदने ‘छोटे नवाब’ नावाचा चित्रपट काढण्याचे ठरविले. संगीतसाठी मेहमूद सचिनदा कडे गेले. पण त्यांच्याकडे वेळच नव्हता. तिथे तबला वाजवत बसलेल्या आरडीवर त्यांची नजर गेली व आरडी ला संधी दिली. यात विविध मूडची ९ गाणी होती. मॉर्डन डान्स, विरह गीत, कॉमेडी गीत, कव्वाली, कब्बडी खेळावरील गीत पैकी अशा सर्व प्रकारची गाणी त्यात होती. पैकी “घर आजा घीर आए” हे लताचे अप्रतिम क्लासिकल ढंगाचे गाणे आजही ओठावर सहज येते. संगीत कारकिर्द या चित्रपटामुळे सुरू झाली पण बहराला येण्यास आणखी पाच वर्षे लोटावी लागली. मात्र या चित्रपटा पासून दोघांच्या मैत्रीस सुरूवात झाली जी शेवटपर्यंत टिकली.
प्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ व तबलापटू पंडीत सामता प्रसाद या दिग्गजांकडे राहूलदेव यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. त्यांच्या शास्त्रीय संगीतावरील आधारीत चालीचे मूळे बहूदा हे असावे. संगीतकार सलील चौधरी याना ते आपले गुरू मानायचे. माऊथ ऑर्गन हे त्यांचे अत्यंत आवडीचे वाद्या सचिनदाच्या ओर्स्ट्रात ते हे वाद्य वाजवित असत. तालाचे पक्के ज्ञान त्यानां होते व गाण्यातच नाही तर पार्श्व संगीतातही या तालवाद्यांचा फार मोठा सहभाग आहे.
१९६६ मध्ये विजय आनंद दिग्दर्शीत “तिसरी मंझिल” या चित्रपटातील गाण्यामुळे खऱ्या अर्थाने राहूल देव रसिका पर्यंत पोहचले. खरे तर तिसरी मंझिल पूर्वी १९५९ मध्ये गुरूदत्त यांचे सहाय्यक निरजंन यांनी आपल्या “राज” या चित्रपटासाठी सर्व प्रथम राहूल देव यानां साईन केले होते. यातील दोन गाणी रेकॉर्डही झाली पण नंतर हा चित्रपट डब्यात गेला तो कायमचा. तिसरी मंझिल मधील सहाच्या सहा गाणी तुफान हीट झाली. आशाबाई आणि रफी साहब यांच्या जादूई आवाजाला राहूल देव यांनी पाश्चात्य वाद्यमेळात अनोखे गुंफले.
विशेषत: पर्कसन वाद्ये, की बोर्ड, सुशिर वाद्ये आणि तार वाद्ये यांचा अप्रतिम गुलदस्ताच त्यांनी पेश केला
”आजा आजा मै हूँ प्यार तेरा” या गाण्यातील सुरूवातीचे गिटार, बास गिटार, कोंगाबोंगो व ड्रम्स अफलतुनच आहे.
यातील “अअ..अअ आजा अ अ आजा” ने धमालच केली. दोन कडव्यांच्या मधील पेरलेले संगीताचे तुकडे म्हणजे राहूलदेव यांच्या ताफ्यात असणाऱ्या वाद्य कलावंताचा क्रिएटीव्ह संगीत मेळाच या गाण्यात वाजविलेल्या काचेच्या तुकड्यांनी देखिल बहार आणली आहे.
या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन हर्मन बेंजिमन यानी केले होते.हा एक वाईल्ड डान्स होता.
(हे हर्मन म्हणजे “गुमनाम” चित्रपटातील “जान पहचान हो जीना असान हो” या गाण्याचे नृत्य दिग्दर्शक विशेष म्हणजे त्यांच्यावरच हे गाणे चित्रीत झाले होते.)
या गाण्यातील पाश्चात्य वाद्यमेळ आजही मनाला भूरळ पाडतो.प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपूरी यांनी “तिसरी मंझिल”चे निर्माते नासिर हूसेन यांच्याकडे राहूलदेव यांची शिफारस केली होती व त्यांनीही या संधीचे सोने केले.
पूढे “बहारो के सपने”, “प्यार का मौसम” व “यादों की बारात” या तिनही चित्रपटात मजरूह व आरडी सोबत होते.
पूढे आर.डी. बर्मन यांनी चित्रपटसृष्टीत आपल्या आगळ्या रंगाने व ढंगाने चित्रपट संगीतात धूमाकूळ घतला.
१९६८ मध्ये पुन्हा एकदा मेहमूद व आरडी एकत्र आले. माझे तर स्पष्ट मत आहे की एखाद्याच्या मनात आत्महत्येचे विचार घोंगावत असतील तर त्याने “पडोसन” मधील “एक चतूर नार” हे गाणे आतमहत्येपूर्वी एकदा बघावे, मी खत्रीने सांगतो सर्वकाही विसरून तो परत कामाला लागेल.
यातील मेहमूद, किशोरदा, केश्टो मुखर्जी, मुक्री व राज किशोर यांनी अक्षरश्: धुमाकुळ घातला आहे. यातील “ मेरी प्यारी बिंदू बिंदू रे बिंदू ने” ही धमाल उडविली आहे.
यातील संगीता बाहेरील अनेक वस्तूचा चक्क वाद्ये म्हणून वापर केला आहे.अर्थात याचे सर्व श्रेय त्यांच्या ताफ्यातील सर्व पर्कशनिस्ट कलावंताना जाते.
(या पर्कशन वाद्य कलावंता बद्दल ही एकदा लिहावयाचे आहे.) आरडी एकीकडे स्वतंत्र संगीत दिग्दर्शन करत असताना दुसरीकडे वडिलांचे सहाय्यक म्हणूनही काम करत होते.
“आराधना” या सूपर हीट चित्रपटाचे संगीत नियोजन सचिनदा यांचे पण या चित्रपटाचे काम करत असताना ते आजारी पडले आणि सर्व जबाबदारी आरडी वर आली.असं म्हटलं जातं की यातील “मेरे सपनों की रानी” आणि “कोरा कागज था ये मन” या दोन्ही गाण्याच्या चाली आरडी यांनीच तयार केल्या.
“ज्वेल थीफ” मधील “होटों पे ऐसी बात” हे गाणे म्हणजे चित्रपटसृष्टीतल्या अत्यंत मोजक्या अशा गाण्यापैकी एक आहे ज्यात जवळपास सर्वच भारतीय तालवाद्ये व पाश्चिमात्य वाद्यांचा अप्रतिम वापर केला गेला.
८ मिनिट आणि २० सेंकद अशा या प्रदीर्घ गाण्याच्या सुरूवातीचा ऱ्हिदमच मुळी दोन मिनीटांचा आहे. ज्यात तुतारी पासून घुंगरा पर्यंतची सर्व वाद्ये आपल्या कानानां स्पष्ट ऐकू येतात. या चित्रपटाचे संगीतकार जरी सचिन देव बर्मन असले तरी खरी करामत पंचम, बासू चक्रवर्ती आणि मनोहारी सिंग यांचीच आहे यात वादच नाही.
१९७०-७१ चे दशक हे संगीतातील अनेक परीवर्तनाचे दशक होते.
”कटी पतंग” “कारवाँ” आणि “हरे रामा हरे कृष्ण” हे तीन चित्रपट या दशकातील माईल स्टोन.
याच काळात त्यांची ओळख “पचंमदा” अशी झाली.
“ये शाम मस्तानी” ”ये जो मोहब्बत है” “दम मारो दम” ही गाणी ऑर्केस्ट्रात हमखास असतच.
संगीताचा संपूर्ण बाज पचंमदा ने बदलून टाकला.गिटार, लॅप स्टील गिटार, बास गिटार, चेलो, बोंगो, कोंगा, की बोर्ड, सिंथसायजर, ट्रान्सीकॉर्ड, ईलेक्ट्रिक ऑरगन, सॅक्सोफोन, ट्रॉमबोन इत्यादी प्रेक्षकानां माहित नसलेली संगीत वाद्यांची नावे पंचमदा नी अत्यंत कुशलतेने हिंदी चित्रपट संगीतात वापरली.
मूळ थीम नुसार “दम मारो दम”हे गाणे सुरूवातीला द्वंद गीत होते.लतादीदी (चांगली मुलगी) व उषा उथुप (वाईट मुलगी) अशा गाणार होत्या.
पण नंतर ते सोलो गाणे झाले व आशा बाईनी गायले. पण यातील कडवे संपल्या नंतरचे आ..आ…आ..हे आलाप मात्र उषा उथुप यांचेच ठेवण्यात आले.
आनंद बक्षी यांच्या या गीताने अक्षरश्: धुमाकूळ घातला. त्यांची कारकिर्द पूढे अधिक वेगाने बहरली ती याच गाण्यामुळे
पण मला मात्र आजही लक्षात राहिले ते या गाण्या आगोदर वाजलेले सिंथेसायजर व इलेक्ट्रीक गिटारीचे सूर “It’s a montage of creaking synthesizers, psychedelic guitars, and, of course, vocals nailed by Asha Bhosle in an ear-piercing exposition of sound. हे उद्गार वृत्तपत्रीय कॉलम लिहणारे डॅनियल शिमन यांचे आहेत. यातील psychedelic हा शब्द त्यांनी गिटारी बद्दल वापरला आहे.
७० च्या दशकातील फार मोठी तरूण पिढी LSD सारख्या ड्रगच्या आहारी गेली होती. हिप्पी संस्कृतीचा तो बहराचा काळ होता.
Psychedelic हा शब्दही याच ड्रगच्या अनुषंगाने वापरला जातो. या ड्रगचे सेवन केल्या नंतर मानवी मेंदूत नक्की काय उलथापालथ होत असावी याचा कयास करून पंचमदा नी या गाण्यासाठी सिंथेसायजर व इलेक्ट्रीक गिटार ही वाद्ये निवडली. या गाण्याच्या अगदी सुरूवातीला ट्रॉन्सीकॉर्ड या वाद्यावर चरणजीत सिंग या कलावंताने वाजवलले सूर व गिटारिस्ट असलेले भूपेंद्र यांनी नंतर सुरूवातीला वाजविलेली गिटार लोक आजही विसरले नाहीत.
( होय हे तेच भूपेंद्र ज्यांनी अनेक सुंदर गाणी नतंर गायली) वाद्ये आणि सूर मिळून कसे हिप्टोनाईज करू शकतात याचे हे एक उत्तम उदाहरण १९७२ च्या बिनाका गीतमालाच्या सर्वोच्च शिखरा वरील हे गाणे म्हणजे पंचमदा च्या क्रिएटीव्हीटीचा एक अजोड नमूना होय.
बासू देव चक्रवर्ती व मनोहारी सिंग ( बासू मनोहारी) हे दोन कलावंत म्हणजे पंचमदा चे दोन हातच या सहाय्यकानां पूढे मेहमूदने आपल्या ‘सबसे बडा रूपैय्या’ या चित्रपटात स्वतंत्र संधी दिली.( आठवा ना बिबी ना बच्चा, ना बाप बडा ना मैया..द होल थिंग) वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांनी एका गाण्याला चाल लावली ज्याचा पूढे सचिनदानी फंटूश या चित्रपटात वापर केला”ये मेरी टोपी पलटके आ” हे ते गाणे.
तसेच प्यासा ममधील “सर जो तेरा चकराये” याची चाल पण त्यानीच बांधली होती. परदेशी वाद्यां इतकाच देशी वाद्यांचा अप्रतिम वापर पचंम दा करीत असत.
आशाताई, किशोर व गुलजार या त्रयिनी चित्रपटसृष्टीला अप्रतिम गाणी बहाल केली.पंचमदावर पाश्चात्य संगीताचा प्रभाव होता यात दुमत असण्याचे कारण नाही.
पण त्यांनी अससल हिंदुस्तानी संगीताचा वापर करून जी गाणी दिली त्यालाही तोड नाही.
‘घर आजा घिर आई बदरिया सावरिया’ (छोटे नवाब- लता) हे मालगुंजी रागातील मुजरा शैली व सेमी क्लासिकल असलेले गाणे मेलडीचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
राग तोडी व खमाज मिश्रीत ’रैना बिती जाए’( अमर प्रेम- लता) हे गाणे जेव्हा मदन मोहन यांनी ऐकले तेव्हा त्यांनी सचिन देव बर्मन यानां फोन केला -‘’हे गाणे तुम्ही अप्रतिम रचले आहे,शुभेच्छा’’ म्हणाले.
पण सचिनदा म्हणाले हे मी नाही पंचमने केले आहे तेव्हा मदन मोहन देखिल चकीत झाले.
यमन कल्याण रागवरील “बिती ना बिताई” (परीचय- भूपेंद्र व लता) ”आयो कहाँसे घनश्याम”
आणि “जिया ना लागे मोरा”(बुढ्ढा मिल गया) शिवरजंनी रागातील “मेरे नयना सावन भादो”(मेहबूबा)
भैरवीत बांधलेले “हमे तुमसे प्यार कितना”(कुदरत) ही सर्व शास्त्रीय रागावरील गाणी आजही आमच्या ओठावर सहज येतात
१९६७ मध्ये चंदन का पलना नावाच्या मीनाकूमारी अभिनीत चित्रपटातील जोगीया रागातील
”ओ गंगा मैया” हे गाणे आजही पंचमदा च्या हिंदुस्तानी संगीतावरील त्यांची पकड होती हे सिद्ध करते. कलावती रागावर आधारीत असलेली “है अगर दुश्मन” ही कव्वाली आजही कान तृप्त करते.
पंचम काळाच्या सोबत होते. भारतातच नव्हे तर जगभरात संगीतावर काय काय प्रयोग केले जात आहेत, कोणकोणती नवीन वाद्ये वापरात येत आहेत यावर लक्ष् ठेवून होते. शिवाय अस्सल भारतीय लोकवाद्यांचा उपयोग ही तितक्याच ताकदीने करत. साधारण ७० साल असावे. देव आनंद यांच्या ‘’हरे रामा हरे कृष्णा’’चे काम सुरू होते. हा चित्रपट नेवाळच्या पार्श्वभूमीवर चित्रीत होणार होता. या चित्रपटात एक गाणे पहाडी ठेक्यावरील होते.
पंचमदा, देव आनंद, संगीत संयोजक बासूदा व मनोहारी सिंग चर्चा करत होते. त्यावेळी मनोहारी सिंग यांनी एका युवकाला आवाज देऊन पंचमदा ची ओळख करून दिली व म्हणाले- ‘’हा पोरगा नेपाळला असतो. तो मूळ दार्जिलिंगचा आहे. तो त्याच्या एका वाद्या सोबत आला आहे. बघा काही करता आले तर.’’
पंचमदा म्हणाले – तू आणलेले वाद्य वाजवून एखादे गाणे म्हणून दाखवशिल?’’
त्या पोरसवदा तरूणाने एक नेपाळी गाणे त्या वाद्यासोबत गाऊन दाखवले. गाणे ऐकून तेथे बसलेले देव आनंद ताडकन् उठून म्हणाले- ‘’ येस..हाच तो पहाडी ठेका आहे’’आणि पूढच्या दोनच दिवसात दोन गाणी या वाद्यासोबत रेकॅर्ड झाली. पैकी एक लता बाईचे गाणे ‘’ओ री घुंरू का बोले रे’’ व ‘’दुसरे कांचा रे कांचा रे….’’
रणजीत गझमर हे त्या तरूणाचे नाव व त्याने सोबत आणले होते नेपाळचे राष्ट्रीय वाद्य ‘‘मादल’’. पंचमदा ना हे वाद्य आणि तो तरूण दोघेही भावले. प्रेमाने त्या तरूणाला नाव दिले कांचा व त्याला आपल्या टीममध्ये सामील करून घेतले. पूढे मग पंचमदा ने अनेक गाण्यात मादलचा अप्रतिम वापर करून घेतला. मादल हे एक पहाडी लोकवाद्य, आपल्या कडील ढोलकी वा पखवाजा सारख्या दिसणाऱ्या या वाद्याचा ऱ्हिदमसाठी पचंमदा ने खूपच सुंदर वापर केला आहे.
‘’होगा तुमसे प्यारा कौन’’( जमाने को दिखाना है), “हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले”(अजनबी), ‘’दिल मे जो बाते है’’(जोशीला) या गाण्यातील ऱ्हिदम याच वाद्यावरचा आहे.
‘’तेरे बिना जिया जाए ना’’ या ‘’घर’’ चित्रपटातील गाण्यात मादल आणि डुगी या फक्त दोनच वाद्याचा वापर करून गाणे बहारदार केले आहे. त्यांच्या शेवटच्या लव्ह स्टोरी १९४२ या चित्रपटा पर्यंत ‘’मादल’’ हे वाद्य कायम होते.
मला स्वत:ला शोले या चित्रपटातील गाण्यापेक्षा त्यांच्या पार्श्व संगीताने अधिक भूरळ पाडली. अगदी सुरूवातीचा प्रसंग आठवा. एक ट्रेन एका रिकाम्या प्लॅटफॉर्मवर येऊन थांबते ज्यातुन फक्त एकच व्यक्ती उतरते.
गंमत म्हणजे प्लॅटफॉर्मरही एकच व्यक्ती उभी आहे (एकूण दोन व्यक्ती…हे काही पटत नाही…) एक बारीक संवाद होतो.मग दोघे घोड्यावर बसतात आणि गिटारची एक अप्रतिम धून सुरू होते.
भानू गुप्ता उर्फ भानूदा ग्रेट गिटारिस्ट.त्यांनी जे काही वाजविले आहे त्याला तोड नाही.मग पूढे त्यात मनोहारीदाच्या सॅक्सोफोनची भन्नाट जोड.
यात पहाडी व राकट ग्रामीण फील येण्यासाठी मादल,कोंगोबोंगा, तबला आणि मध्येच वाजणारी फ्लूटची शीळ.एकूणात टायटल म्युझिकचा ऱ्हिदम इतका सुंदर झालाय की चित्रपट लगेच प्रेक्ष्कांच्या मनाची पकड घेतो.
यातील- ‘’चल धन्नो’’ अशी साद घालून वसंती जेव्हा टांगा पळवते तेव्हा तबल्याचे कडाडणारे बोल आठवा. त्याकाळचे प्रसिद्ध तबलापट्टू पं. सामता प्रसाद यांच्या जादूई बोटांची ती कमाल आहे.तसेच गब्बरचा जेव्हा जेव्हा प्रवेश होतो त्यावेळचे पार्श्व संगीत आठवून बघा.
पंचमदा चे सहाय्यक वासूदेव चक्रवर्ती यांनी सेलो (व्हायेलिनचाच एक प्रकार) या वाद्यावर हा चिरत जाणारा आवाज काढला होता हा आवाज संपताच ऐकू येतो-कितने आदमी हा संवाद आणि रिकामा तो हलणारा झोपाळा व त्या मागे उभा असणारा मास्टर अलंकार.
काचेच्या ग्लासात चमचाने आघात करून केलेला ध्वनी धडकी भरवितो.
संगीतातील असे अनेक प्रयोग करत प्रेक्षकानां व रसिकानां भूलविण्याची कामगिरी चोखपणे पंचमदा ने केली आहे.
बर्मन घराण्याच्या ऱ्हिदम ताफ्याचे मूख्य शिलेदार म्हणजे मारूतराव कीर.
अगोदर सचिनदा व नंतर पंचमदा या दोन्ही पिढ्याचे तेच मूख्य ऱ्हिदम संयोजक.
अख्ख्या आयुष्यात मारूतराव बर्मन कुटूंबा शिवाय इतरत्र कुठेही ते गेले नाहीत.
नंतर पूढे याच मारूतरावाचे शिष्य अमृतराव पचंमदा चे ऱ्हिदम संयोजक झाले.
पंचमदा त्याना अमृत काका असे म्हणत.अमृतकाका तबला मास्टर.
त्यांच्यासोबत पचंमदा ने अनेक प्रयोग केले.रेसो हे एक आफ्रिकन वाद्य.
पोकळ बांबू पासून तयार केले हे वाद्य साईड ऱ्हिदमसाठी वापरले जाते.
मूख्य संगीतातील गती व टोकदारपणा या वाद्यामुळे वाढवता येतो.
सुरूवातीच्या काळात रेसो,खंजीरी,कबाज किंवा लाकडी पट्टया साईड ऱ्हिदमसाठी वापरत असत व वादक मूख्य ऱ्हिदमवादकांच्या मागे बसत.
रेसो हे वाद्य अमृतकाका शिकले ते मारूतराव यांच्याकडून.
भारतीय प्रेक्षकानां या साईउ ऱ्हिदमची जादू सर्वप्रथम अनुभवयाला मिळाली ती ‘’तिसरी मंझिल’’ या चित्रपटातील संगीता मधून.
यातील “ओ हसिना झुल्फोवाली..ओ मेरे सोना रे आजा आजा मै हूँ प्यार तेरा”ही गाणी तुम्ही परत एकदा काहजी पूर्वक ऐकली तर या साईड ऱ्हिदमची जादू नक्कीच समजेल.
रेसो या वाद्याने खरी मजा आणली आहे ती ‘’मेरे सामने वाली खिडकी मे ’’ या गाण्यात.
सुरूवातीचा किशोरदाचा आलाप संपताच केश्टो मुखर्जी झाडूवर कंगव्याने जो आवाज काढतो ते हे रेसो वाद्य.
अगदी शेवट पर्यंत हे वाद्य वाज राहते.
खरं तर रेसो हे साईउ वाद्य असतानां त्याला मुख्य वाद्य करून मुख्य वाद्यानां साईइ ठेवण्याची कला फक्त पचंमदाच करू जाणे.
याच वाद्याने या गाण्यात रंगत आणली आहे.असेच दुसरे एक गाणे म्हणजे,
’’कटी पतंग’’ या चित्रपटातील आशाताईनी गायलेले ‘’मेरा नाम है शबनम’’ हे बिंदूवर चित्रीत केले गाणे.
अख्खं गाणं रेसो व बोंगो या दोन वाद्यानी आपल्या खांद्यावर तोलून धरलं आहे.
या गाण्यात हे वाद्य अमृतकाकानी प्रचंड वेगाने वाजवले आहे.
सागर चित्रपटातील ‘’सच मेरे यार है’’ हे गाणे देखिल याच वाद्यामुळे कर्णमधूर झाले आहे.
आजही भारतातील एकमेव रेसो मास्टर म्हणून अमृतकाका यांचे नाव घेतले जाते व याचे कर्तेधर्ते अर्थात पचंमदा.
पूढे १९८२-८३ मध्ये अमृतकाकांनी रेसो या वाद्यात बदल केला. त्यांनी हे वाद्य धातू पासून तयार केले.
याचा वापर ‘’सनम मेरी कसम’’ या चित्रपटातील ‘जाने जा…निशा.’ या गाण्यात केला आहे.
पचंमदानी वेळोवेळी अनेक प्रयोग केले म्हणूनच ते मला या क्षेत्रातील संगीत वैज्ञानिक वाटतात.
आजच्या आधुनिक संगीताचा मजबूत पाया त्यांनी रचला व तोही मेलडी वजा न करता.
जगातील अनेक वाद्याचा वापर करताना भारतीय संगीतातील आत्मा शक्यतो हरवू नये याचही काळजी ते घेत.
’’कारवाँ’’ मधील ‘दइया ये मैं कहां आ फंसी’ सारख्या गाण्यात हास्य निर्मितीसाठी ऑर्केस्ट्राचा उत्तम वापर केला आहे.
’चुनरी संभाल गोरी’ (बहारों के सपने- मन्नडे व लता)
पाश्चीमात्य संगीताचा छाप म्हणून ओळखले जाणाऱ्या पंचमदानी या गाण्यात अस्सल बिहारी मातीचा दरवळ दिलाय.
यातील ताल वाद्यांचा मेळ ऐकण्या सारखा आहे.
’पल दो पल का साथ हमारा’(बर्नींग ट्रेन- रफी व आशा) साहिरची ही कव्वाली
पंचमदा नी केदार रागाचा मुलायम मुलामा देऊन किती सुंदर बांधली आहे.
शिवाय मध्येच गाडीच्या वेगाचा तुकडाही पेरला आहे.
’अ आ इ ई मास्टर जी की आ गई चिट्ठी’ (किताब)
या गाण्यात तर चक्क मुलांच्या डेस्कच्या ध्वनींचा वापर करून घेतला आहे.
’तेरे बिना ज़िंदगी से कोई शिकवा तो नहीं’ (आंधी- किशोर लता)
यातील मधून मधून पेरलेले संजीव कुमारचे संवाद आणि लता किशोरचा आवाज म्हणजे पंचमदाच्या प्रतिभेचे सर्वोच्च शिखर.
’चांद मेरा दिल’ (हम किसी से कम नहीं) या गाण्यात पाच सहा छोटीछोटी गाणी होती.
पाश्चिमात्य आणि भारतीय संगीताचा अनोखा मेळ म्हणजे हे गाणे ‘’आप की कसम’’ या चित्रपटातील ‘’जिंदगी के सफर मे गुजर जाते’’
या गाण्यातला ऱ्हिदम जर लक्षपूर्वक ऐकला तर लक्षात येईल की
गाणे गाताना खास ऱ्हिदमसाठी काही सेंकद दिले आहेत जे बोल संपल्यावर स्पष्ट ऐकू येतात.
पंचम एकदा दार्जिलिंगला गेले असताना एक तरूणी त्यानां भेटली.ती त्यांची जबरदस्त फॅन.
तिने आपल्या मैत्रिणीशी शर्त लावली की ती पंचमची फिल्म डेट घेऊन दाखवेन
व तिने तसे करून दाखविले. रिता पटेल हे तिचे नाव.
१९६६ मध्ये पचंमदा नी तिच्या बरोबर लग्न केले. पण हा विवाह टिकला नाही.१९७१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.
’’मुसाफिर हूँ यारो’’ हे गुलजार यांच्या ‘’परिचय’’ चित्रपटातील गाणे घटस्फोट घेतल्या नंतर एका लॉजमध्ये बसून तयार केले.
अनेक कलावंताच्या अशा अनेक कलाकृतीनां अनेकदा वैयक्तिक भावनांचे कंगोरेही असतात.
या गाण्यात वाजवलेला ऱ्हिदमलक्षपूर्वक ऐकला तर असे लक्षात येते की कधी तो अचानक वर जातो
तर कधी एकदम खाली आयुष्याचा प्रवास असाच तर असतो वर खाली.
टांग्यात बसलेला जितेंद्र मिनीटा मिनीटाला हादऱ्यामुळे वरखाली होत राहतो.किती अचूक मेळ आहे ना हा.
एकदा गुलजार, पचंमदा, व आशाबाई भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी मनोसोक्त भटकले.
प्रचंड धमाल केली आणि परत आल्यावर एक अल्बम तयार केला‘’दिल पडोसी है’’ हा अल्बम १९८७ मध्ये रिलिज झाला.
या तिघांची केमेस्ट्री अनुभवायची असेल तर तुम्ही जरूर ऐका.युट्युब वर उपलब्ध आहे.
त्यांनी स्वरबद्ध केलेली दोन गाणी मला प्रचंड आवडतात पैकी पहिले
‘’लाखो मे एक’’ या चित्रपटातील ‘’चंदा ओ चंदा’’ या गाण्यात किशोरदाचा स्वर अप्रतिम तरल लागला आहे.
आजही हे गाणे अर्तंमूख करते.छातीत सलते.एकाकीपणाचा तुरूंगवास तसा अनेक कलावंताच्या वाट्याला आला आहे.
पण याही स्थितीत कलावंत उत्तमाचा शोध घेणे थाबंवत नाही.
दुसरे गाणे ‘’इजाजत’’ या चित्रपटातील ‘’मेरा कुछ सामान तुम्हारे पास’’ हे गाणे जेव्हा गुलजार यांनी पचंमदाकडे पाठवले
तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया होती – ‘मला ही सामानाची यादी कशाला पाठवलीत.याला कशी चाल लावायची?’
पण गुलजार यानां माहित होते पंचमदाच याला चाल लावू शकतात आणि झालेही तसेच. या गाण्याने इतिहास रचला.
नंतर त्यांच्या आयुष्यात आल्या आशाताई. १९८० मध्ये दोघांनी लग्नही केले.
गुलजार, पचंमदा व आशाताई यांनी मिळून अनेक सांगितिक गोफ विणले.
पण पचंमदा ची ही दुसरी इनिंग देखिल खूप यशस्वी झाली असेही नाही.
पचंमदा च्या गाण्याची यादी किती लहान किती मोठी याला काही अर्थ नाही.
पण त्यांनी अत्यंत धाडशीपणे या क्षेत्रात प्रयोग केले व ते यशस्वी करून दाखविले ही साधी बाब नव्हे.
कोणत्याही क्षेत्रातील पारंपांरीक सांगाड्याला धक्का देणे तसे अवघडच.
आम्हा भारतीयानां तर कोणताही बदल एकदम रूचतच नाही.त्यामुळे पचंमदाचे असे अनेक धक्के अनेकानां त्यावेळी पचले नाहीत.
पण ते आपल्या प्रयोगशिलतेवर ठाम राहिले.
त्यांच्या संगीतमय ताफ्यात किमान शे दिडशे वादक होते.भारतीय आणि पाश्चात्य संगीतातील सर्व उत्कृष्ट वादक हे त्याचं बलस्थान होतं.
आधुनिक तंत्रज्ञानाची जाण आणि संगीताचं भान त्यानी कधीच सुटू दिलं नाही.
त्यांचे काही सहकारी वादक ज्यांनी सत्तरी ओलांडली आहे ते आजही त्यांच्या आठवणीने व्याकूळ होतात.
(युट्युबवर त्यांच्या मुलाखती बघता येतील)प्रत्येक वादक कलावंताशी संगीताच्या पक्क्या धाग्यांनी घट्ट बांधलेले होते….पचंमदा…
नागीनची सुप्रसिद्ध धून ‘तन डोले मेरा मन डोले’
रसिक प्रेक्षकातील प्रत्येकाला त्यांचे किमान एक तरी गाणे हे आवडतेच. ते स्वत: उत्कृष्ट हार्मोनिका व माऊथ ऑर्गन वाजवित असत.
’’है अपना दिल तो आवारा’’ मधील वाजवलेली हर्मोनिका आजही टवटवीत वाटते.
शोले मधील एका कातरवेळी दीवा विझवणारी जया भादूरी व पार्श्व संगीतातील अमिताभने वाजविलेले हर्मोनिका वरील स्वर मनाला स्पर्शून जातात.
१९८० च्या आसपास बप्पी लाहिरी या संगीतकाराचा उदय झाला व अनेक निर्माते त्यांच्याकडे वळू लागले. बॉक्स ऑफिसवरही गाणी तग धरेनात.
नासिर हुसेन सारखा निर्माता ज्याने १९६६ पासून त्यानां आपल्या चित्रपटासाठी साईन केले त्यांनीही पाठ फिरवली.
सुभाष घई यांनी राम लखनसाठी त्यानां घेण्याचे वचनही मोडले व तो चित्रपट लक्ष्मीकांत प्यारेलाल यानां मिळाला.
१९८८ मध्ये पंचमदा ना हार्ट अटॅक आला. शस्त्रक्रियेसाठी ते लंडनलाही गेले. या काळात तयांनी अनेक चाली तयार करून ठेवल्या.
१९८९ मध्ये त्यांनी विधू विनोद चोपडाच्या ‘’परींदा’’ व ‘’ १९४२ अ लव्हस्टोरी’’ साठी संगीत दिले
जे त्यांच्या मृत्यू नंतर लोकप्रिय झाले.
’’थेनमाविन कोंबथ’’(तामीळ) हा त्यांनी साईन केलेला शेवटचा चित्रपट पण त्याचे संगीत देण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
पंचमदाच्या निधनानंतर १३ वर्षांनी त्यांची आई मीरा यांचे निधन झाले.
पचंमदा गेले तेव्हा त्या अल्झायमर या रोगाने ग्रस्त होत्या व पूढे त्यातच अंत झाला.
चित्रपट विश्वातील अनेक गुणी कलावंत कमी वयात सोडून गेले.
संगीताच्या क्षेत्रात पर्वता सारखी उंच कामगिरी करणारे पंचमदा कौटुबिंक आयुष्यात मात्र सूर लावू नाही शकले याची बोचणी मनाला आहेच.
शुद्ध स्वराचे प्रतिक असलेला ‘पंचम’ खाजगी आयुष्यात मात्र बेसूर झाला.
वयाच्या अवघ्या ५५ व्या वर्षी हा शुद्ध स्वर कायमचा विसावला.…
लेखन – दासू भगत
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUN 27 , 2021 15 : 25 PM
WebTitle – Musafir Hoon Yaaron Pancham da 2021-06-27
82nd birth anniversary of RD Burman, we remember the iconic musician formation in Marathi