हो. पुरुष जातीचा माणूस. या पुरुष जातीच्या माणसानं माणूस म्हणायच्या सुध्दा लायकीचं ठेवलं नाही. काय केलं या पुरुष जातीच्या माणसानं… ? गांधी जयंतीच्या निमित्ताने पुरुषरुपी माणसाचा घेतलेला शोध..वाचा या लेखात.
पुरुष जातीचा माणूस…
बाई ही बाई म्हणून घडवली जाते. तशी ती मर्दरुपी पुरुषालाही घडवत असते. पुरुषाला मर्द म्हणून घडवलं जातं तर बाईला चौकटीत जगण्यासाठी शिकवलं जातं. पण हा पुरुष लिंगभेदासोबतच धार्मिक, जातीय विषमतेचंही अमृत पिऊन धिंगाणा घालत आला आहे, घालतोय. आपल्या धार्मिक ग्रंथांनी या पुरुषाला मानाचं आणि सर्वोच्च स्थान दिलंय. त्यातला त्यात तो वर्णव्यवस्थेतल्या उच्च जातीत असला तर मग पुरुषाला साक्षात परमेश्वराचीच उपमा. तर असा हा पुरुष आपल्या कुटुंबातून, शाळा-शाळांमधून, आपल्या जातीतल्या नातलगांमधून, मित्र-परिवारातून, समाजातून, राजकीय-शासकीय-सांस्कृतिक-धार्मिक-जातीय-आर्थिक अशा विविध स्तरातून हा मर्दरुपी पुरुष घडवला जातो आणि जात आहे.
कुटुंबामध्ये टीव्हीचा रिमोट कोणाच्या हातात असावा, असा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा जिंकतो तो पुरुषच. मोबाईल चालवण्याचा-वापरण्याचा अधिकार कोणाला असावा, या स्पर्धेतही माणूस नाही, पुरुष जिंकतो. कुटुंबामध्ये काही दिवस घालवल्यावर शाळेतही हा पुरुष बिनदिक्कतपणे घडवला जातो. शाळेतली कामं शिक्षिकांनी आणि बाहेरची कामं शिक्षकांनी अर्थातच पुरुषांनी करावीत, असा अनौपचारिक पायंडा असतो. या उदाहरणानेही तुमचं समाधान झालं नसेल तर अजून सांगतो.
बहिणीकडूनही हा ‘पुरुष’ घडवला जातो
विद्यार्थ्यांनाही अप्रत्यक्षपणे पुरुषजातीचा महिमा सांगितला जातो. सो कॉल्ड कृष्णाच्या थोर कथा, सो कॉल्ड मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या पराक्रमी कथा तर कधी महापुरुषांनी केलेली महान कार्ये. नावालाच फक्त सावित्रीबाईचं गुणगान होतं. शिक्षकदिनाच्या दिवशीही डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनच्या कथा भरभरुन सांगताना आमच्या विद्यार्थिनींना मात्र मुलींना शिक्षणाची दारे खुली करुन देणाऱ्या सावित्रीबाईची आठवण होत नाही. तेव्हाही आपल्या हातून मुलांच्या मनात ‘पुरुषाची’ पेरणी करीत जातो.
तेव्हा कोणत्याही शिक्षकाला ‘पुरुष’ जातीच्या या माणसाचं रुजवणं, गैर वाटत नाही. हा ‘पुरुष’ असाच घडवला जातो. वटपौर्णिमेच्या निमित्ताने मातांनी आपापल्या मुलींनीही कळत-नकळत, अप्रत्यक्षपणे ‘पुरुष’ शिकवलेला असतो. तेव्हा घरातला मुलगा मर्द-पुरुष म्हणून मोठा होत असतो. बहिणीच्या हातून राखी बांधतांना प्रेमाच्या बंधनापेक्षा, पवित्र नात्यापेक्षा सुरक्षिततेची अपेक्षा करणाऱ्या, हमी बाळगणाऱ्या आपल्या बहिणीकडूनही हा ‘पुरुष’ घडवला जातो. अर्थातच तो भाऊही स्वतःला बहिणीचा रक्षणकर्ता म्हणून स्वतःतल्या मर्दरुपी ‘पुरुषाला’ घडवत असतो.
घरातली आई,आपसूकच ‘पुरुष’ घडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असते
हा पुरुष मोठा होतानाही ‘मर्द’ म्हणून घडत जातो.
मित्रांसोबतच्या कट्ट्यावर बसलेला तरुण मुलगी वा मुलींना रस्त्यावरुन जाताना शेरेबाजी करुन,
शिटी मारुन किंवा आपल्या मित्रांमध्ये स्वतःची मर्द म्हणून छाप पाडण्याच्या उद्देशाने
मुलीच्या चारित्र्याची लक्तरे वेशीवर टांगणारा ‘पुरुष’ असा मित्र-परिवारातही घडवला जातो.
तसा तो नातेवाईकांमध्येही घडत जातो बरं का.
कोणतेही धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्त्रियांनी स्वयंपाकाकडेच लक्ष देऊन पुरुषांना नीट पोटभर जेवू घालणारी स्त्री.
आणि पुरुषांची जेवणं होत नाही, तोपर्यंत भूक लागूनही जेवू न शकणारी घरातली आई,
आपसूकच ‘पुरुष’ घडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.
पोटाला चिमटा देऊन पोरांना शिकवणारा बाप आमच्या साहित्यात,
चित्रपटातून, नाटकातून नायकाच्या भूमिकेतून ‘पुरुष’ म्हणून शिकवला जातो.
एक प्रकारे ‘पुरुषाला’ घडवण्याची सोय करतो
पण दारुड्या नवरा असूनही पुरुषांना-पोराबाळांना खाऊ घातल्यानंतर
भुकेने व्याकूळ झालेली आमची आई चमचाभर भाजीवरच भागवते
आणि भूक भागली नाही, तरी दारुड्या नवऱ्यापुढं हिंमत करुन भावनाही व्यक्त करु न शकणारी आई आमच्या नजरेत येत नाही.
ती आणि आपणही अशा वेळी एकत्रपणे ‘पुरुषाला’ घडवण्यातच व्यस्त असतो.
मुलीचं लग्न करण्यासाठी हुंडा द्यावा लागतो, म्हणून कर्ज उचलणारा बाप,
प्रसंगी आत्महत्या करणारा आमचा शेतकरी बापही एक प्रकारे ‘पुरुषाला’ घडवण्याची सोय करतो.
‘पुरुष’ म्हणून आमचा अधिकार आहे, असं अप्रत्यक्षपणे सांगणारा ‘पुरुष’ हुंडा दिल्यावरही सन्मानाने वागणूक देण्याची हमी न मागणारे आपले मायबाप आणि मुलगी त्या नालायक ‘पुरुषाला’ घडण्यास बळ देत असतात.लग्नानंतरही उच्चशिक्षित असणाऱ्या मुलीला चूल-मूलच्या परंपरेची साक्षीदार होताना स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवणारे नवरा-बायको हे दोन्हीही ‘पुरुष’ घडवण्यात व्यस्त असतात.
‘पुरुष’ आज विविध क्षेत्रातही टप्प्याटप्प्याने घडवला जातो
मुलीची – आईची – बहिणीची – बायकोची घरातल्या कोणत्याही स्त्रीची मासिक पाळी आल्यावर धार्मिक परंपरेचा दाखला देत तिला अस्पृश्य ठरवून कोपऱ्यात बसवून ठेवणारी आपली – पुरुषी मानसिकतेची जमात ‘पुरुषपणाचं’ अवडंबर माजवतात आणि त्याला साथ मिळते धार्मिक परंपरांची, चालीरितींची. या धार्मिक परंपरांनी-चालीरितींनी घडवलेला ‘पुरुष’ आज विविध क्षेत्रातही टप्प्याटप्प्याने घडवला जातो.
समान काम करुनही समान वेतन न देऊ शकणारा मालक आणि तसं वेतन न मागू शकणारी कामगार स्त्री आपसूकच ‘पुरुषाला’ घडवत जातात. बचत करुन कुटुंबाला कठीण प्रसंगी मदत करणाऱ्या स्त्रीला विसरुन कर्ज करुन ऐशोआरामाचं जीवन जगू पाहणारा ‘पुरुष’ आम्हाला दाखवून देतो, की आम्ही थेट परमेश्वराची अवतार आहोत.
पुरुष जातीचा माणूस
आम्ही ‘पुरुष’ म्हणून जन्मजातःच घडवला जातोय. जशी जात जन्माने चिकटून येते, तशी पुरुषाची ही जातही जन्माने प्रबळ म्हणूनच रुजवली जाते. तसं नसतं तर आम्ही पोटच्या पोरीलाही हे जग दाखवण्याआधी पोटातच मारण्याचा किंवा चुकून जन्म घेतलाच तरी कधीतरी तिला यातनांनी-अत्याचारांनी भरलेलं आयुष्य देण्याचा नालायकपणा या मर्दरुपी ‘पुरुषाने’ केलाच नसता. तो ‘पुरुष’ आपणच निर्माण केलाय. त्याचं हे मर्द-पुरुष होणं वेळीच रोखणं काळाची गरज आहे. त्यासाठी जात-धर्म-सनातनी-कुटुंब-समाज-व्यवस्था-सरकार यांच्याशी दोन हात करण्याची वेळ आली तरी माघार घ्यायची नाही, एवढाच या पुरुष जातीच्या माणसाचा सांगावा आहे.धन्यवाद.
By विजय बागले
दुर्गाबाई भागवत यांच्या वेश्यासंबंधीत मतावर समाचार घेणारे राजा ढाले
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)