क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नातं हे गुरु-शिष्याचं नातं आहे.महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो.कारण महाराष्ट्राला या तीन थोर समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला आहे.विषमतेत बरबटलेल्या महाराष्ट्राची विस्कटलेली सामाजिक घडी बसवली ती या तिघांनी.
स्त्रीवर्गाविषयी पितृत्वाची छाया
क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नातं हे गुरु-शिष्याचं नातं आहे.बाबासाहेबांनी तीन गुरु मानले तथागत भगवान गौतम बुद्ध संत कबीर आणि महात्मा जोतीबा फुले.या तिघांचे वैशिष्ट्य हे कि तिघांनीही दैववाद नाकारला.ब्राह्मणवादाचा कडाडून विरोध केला.बाबासाहेबांनी त्यांचा वैचारिक वारसा पुढे चालविला. महात्मा जोतीबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्त्रीवर्गाविषयी अतिशय संवेदनशील होते.हि संवेदनशीलता केवळ मानवीय दृष्टीकोनातून आलेली नसून त्यात पितृत्वाची छाया आहे.
पेशवाईचा काळ १८१८ ला संपलेला असला तरी पेशवाईने दिलेली वैशिष्ट्ये समाजात तशीच रुजलेली होती.
फुले दांपत्यांचे आगमन पेशवाईनंतरचे, परंपरेने चालत असलेल्या रुढीप्रिय बुरसटलेल्या सामाजिक व्यवस्थेत ब्राह्मणातील विधवा स्त्रियांचे केशवपन ,विधवा विवाह ,जरठ कुमारिका विवाह ,सती प्रथा, बेकायदेशीर संतती व तिची भ्रुणहत्या इत्यादी चालूच होते त्याविरुद्ध जोतीबांनी अविरत संघर्ष केला.आपल्यापेक्षा वयाने कितीतरी मोठा असलेला जरठ नवरा वृद्धपकाळाने वारल्यानंतर घरातीलच कुणाकडून तरी दिवस गेलेल्या बाल विधवेचे बाळंतपण करण्यासाठी त्यांनी त्यावेळी भारतातील पहिले प्रसूतीगृह काढले.त्याचबरोबर अनाथ आश्रम देखील काढले ज्यात विधवा बाळंतीण आणि तिचे मूल देखील रहात असे.
मारेकरीसुद्धा पाठवले
भारतातील पहिली मुलींची शाळा आणि अस्पृश्य समाजासाठी शाळा काढली.आयुष्यभर ब्राह्मणवादाशी संघर्ष करणाऱ्या फुले दांपत्यानी आत्महत्या करायला निघालेल्या आणि ब्राह्मण असलेल्या विधवा काशीबाई यांना त्यापासून परावृत्त करून बाळंतपणानंतर त्यांच्या मुलाला ”यशवंत”ला दत्तक घेतले.यावरून त्यांची सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि नेणीव किती उच्चकोटीची होती याचा प्रत्यय येतो.त्याकाळच्या सनातनी लोकांनी फुले दांपत्याचा अनन्वित छळ केला होता.एकदा तर चिडून त्यांनी मारेकरीसुद्धा पाठवले होते.
आजच्या काळात जसे मॉर्निंगवॉकला मारतात किंवा जायला सांगतात तसे,
तर आश्चर्य म्हणजे माणूसकी दाटून आली ती सुपारी दिलेल्या मारेकऱ्यासच त्याने जोतीबांचे कार्य पाहिले,
त्यांचा नम्र विनयशील स्वभाव अनुभवला आपण एका सज्जन भल्या माणसाला विनाकरण मारणार होतो याचा त्याला पश्चताप झाला.
पुढे हाच मारेकरी धोंडीराम कुंभार जोतीबांच्या मार्गदर्शना खाली पंडीत झाला.
महारा-मांगाच्या दु:ख विषयी
जोतिबांनी सावित्रीमाईना बरोबर घेऊन १ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या भिडे वाड्यात मुलींसाठीची पहिली शाळा काढली.बहुजन समाजातील अस्पृश्यांना आणि विशेषतः स्त्रियांना शिक्षण मिळावे असा त्यांचा आग्रह होता.याच शाळेत ज्ञानाचे बाळकडू घेत शिकत असलेल्या अवघ्या अकरा वर्षाच्या मुक्ताबाई साळवे या विद्यार्थ्यीनीने एक निबंध लिहिला होता.निबंधाचे शिर्षक “महारा-मांगाच्या दु:ख विषयी “ असे असून त्यात मुक्ताबाई लिहिते “वेद तर ब्राह्मणांचा मक्ता आहे.ब्राह्मणांनीच त्याचे अवलोकन करावे.यावरून उघड दिसते कि महारा-मांगांना धर्म पुस्तक नाही.वेद जर ब्राह्मणांसाठी आहेत तर त्यांच्याप्रमाणे बरहुकूम वर्तवणूक करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे.आम्हाला जर धर्म पुस्तक नाही ते पाहण्याचा अधिकार नाही तर आम्ही धर्मरहित लोक आहोत असे साफ दिसते कि नाही बरे?” स्त्री शिकली कि तीला आत्मभान येते.गुलामीविरुद्ध ती बंडखोरी करते.मुक्ताबाई साळवे हे त्याचे ज्वलंत उदाहरण.
न स्त्री स्वातंत्र्यम महर्ती
बाबासाहेब आयुष्यभर समाजातील दुर्बल वंचित शोषित घटकांच्या शिक्षणासाठी न्याय हक्कांसाठी संघर्षरत राहिले.
जोतीबांचा वैचारिक वारसा पुढे चालवत त्यांनी भारतीय स्त्रीला घटनेत स्थान दिले.समानतेचा दर्जा बहाल केला.
तिच्यासाठी हिंदू कोड बिल लिहिले. ”न स्त्री स्वातंत्र्यम महर्ती” म्हणत मनूने स्त्रीवर्गास हजारो वर्षे गुलामगिरीच्या खाईत लोटले होते.
या अंधारयात्रेत भारतीय स्त्री आपल्या सामाजिक आर्थिक राजकीय
आणि सांस्कृतिक बाबीमध्ये परावलंबतेशिवाय काहीही प्राप्त करू शकली नाही.
स्त्री शिकली कि संपूर्ण कुटुंब शिकते
बाबासाहेबांनी “हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनिती” हा निबंध लिहिला.त्याचे पुढे पुस्तक प्रकाशन केले.हा निबंध म्हणजे स्त्री मुक्तीचा जाहीरनामा जो पुढे हिंदू कोडबिल रूपाने अवतरला.क्रातीबा जोतीबा फुलेंचा वैचारिक वारसा पुढे रुजवत त्यांनी स्त्रियांना घटनेच्या माध्यमातून हक्क अधिकार दिले.पुरुषप्रधान मनुस्मृतीने स्त्रियांना नाकारलेले अधिकार भीमस्मृतीने प्राप्त करून दिले.आजची स्त्री हि अनेक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करते आहे.आपला ठसा उमटवते आहे.आज असे कोणतेही क्षेत्र नाही काम नाही कि ते करण्यास स्त्रिया असमर्थ ठरतील.आज आधुनिक स्त्री हि यशाच्या शिखरावर आहे.स्त्री शिकली कि संपूर्ण कुटुंब शिकते असे म्हणतात.अर्थात या सर्व यशामागे प्रगती मागे या दोन महान समाजसुधारकांचे कष्ट आहेत.हेही विसरून चालणार नाही.
क्रांतिसुर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन _/\_
महात्मा जोतीबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक समन्वय
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)