मुंबई : राज्यात पावसाचा चांगलाच जोर वाढल्याचे दिसत आहे.गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांत जनजीवन ठप्प झाले आहे. आता वीकेंड येऊन ठेपला असून यावेळी पावसाचा आनंद लुटायला अनेक जण फिरायला बाहेर पडतात, पण हवामान खात्याची ही बातमी सर्वांसाठी महत्त्वाची आहे. कारण, राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या पावसाचा जोर पुढील दोन दिवस कायम राहणार आहे.अशा परिस्थितीत पावसाची शक्यता पाहता लोकांना महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
हवामान खात्यानुसार, कोकणासह राज्याच्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, पालघर आणि घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा आयएमडीने जारी केला आहे. पुढील पाच दिवस मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.त्यामुळे वीकेंडमध्ये घरीच राहा, अशा सूचना हवामान खात्याने दिल्या आहेत. अशा स्थितीत येत्या तीन ते चार तासांत मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी.
विदर्भातील जिल्ह्यांना रेड अलर्ट
दरम्यान, महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट आणि अगदी विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात गेल्या 24 तासांत विक्रमी पावसाची नोंद करण्यात आलीय.हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकणसह पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात मुसळधार उघडझाप सुरूच आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागामध्ये पाणी साचलं असून त्यामुळे वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
लोकांसाठी महत्वाची माहिती
सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने नागरिकांनी केवळ अत्यावश्यक कामांसाठीच घराबाहेर पडावे.
घाटाच्या माथ्यावर फिरायला जाणे टाळावे. सखल भागात पाणी भरू लागले आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅक/बस मार्गावर जाणे टाळा.
डोंगराळ भाग तसेच घाटात दरड कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षित ठिकाणी राहावे, अशा सूचना हवामान विभाग आणि प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 22,2023 | 19:14 PM
WebTitle – Maharashtra Weather Alert latest 2023