मुंबई दि.05 – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द करणार आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांनी याची माहिती दिली.
अनिल देशमुख यांनी राजीनाम्यात काय म्हटलं आहे?
अनिल देखमुख यांनी स्वत: राजीनामा पत्र ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे.
“मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याकडे एड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल केलेल्या याचिकेमध्ये
आज ५ एप्रिल २०२१ रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत.
त्यानुषंगाने मी, मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही,
म्हणून मी स्वतःहून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे.
सबब मला मंत्री (गृह) या पदावरून कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती,”
असं अनिल देशमुख यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 5, 2021
मुंबई उच्च न्यायालयाने काय आदेश दिले आहेत?
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने परमबीर सिंह यांनी केलेल्या याचिकेसह अन्य याचिकांवर सुनावणी झाल्यानंतर निर्णय बुधवारी राखून ठेवला होता. त्यावर आज न्यायालयाने निकाल दिला. “जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलिसांत तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. आम्ही या बाबीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आरोप राज्याच्या गृहमंत्र्यांविरोधात आहेत, त्यामुळे असामान्य स्थिती म्हणून सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले जात आहेत. प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल करायचा की नाही याचा निर्णय सीबीआयने घ्यावा,” असं न्यायालयाने आदेशात म्हटलं होतं.
एड. जयश्री पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. हायकोर्टानं अॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली. सीबीआला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही.
“खरे सूत्रधार ‘सिल्व्हर ओक’ आणि ‘वर्षा’वर बसलेत”
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
First Published on APRIL 05 , 2021 15: 38 PM
WebTitle – Maharashtra Home minister Anil Deshmukh Resigned 2021-04-05