परवा पंकज ला माफी मिळाली. अशोकला मिळणार का ?
अशोक ने गावाचा फतवा ध्यानात न घेता बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला होता. सीसीटीव्हीत तो हार घालताना दिसत होता. बाबासाहेब म्हणजे नक्षल्यांचे दैवत हा समज सर्वदूर असल्याने बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालणा-याला शिक्षा होत होत्या.
***************************
जयभीम वाला का ?
या घटना सातत्याने घडत होत्या. पंकजने त्या विरोधात तालुक्याच्या गावी गांधी पुतळ्याखाली पोलीस कार्यालयासमोरच उपोषण केलं होतं. त्याच्या विरोधात संतप्त जमाव चालून आला होता. पंकजला जमावाने पकडले. पुतळ्याजवळ असलेला पोलीस चटकन कार्यालयात गेला. जमावाने पंकजला शिव्या घातल्या. त्याला मारहाण सुरू झाली. भगवं उपरणं घेतलेल्या एका म्होरक्याने जमावाला थांबवलं.
” जयभीम वाला का ?”
” नाही “
” मंग ?”
” महात्मा गांधी की जय “
म्होरक्या हसला.
“अहिंसावाला हाय ह्यो “
गलका झाला.
“कोण कुठला इच्चारा..”
“नाव काय रं ?”
” पंकज जैन “
” धंदा ?”
” धंदा नाही. सामाजिक कार्यकर्ता आहे “
जैन व्यापारी संघटनेला फोन गेला. आपल्या समाजाचा कार्यकर्ता पकडला म्हटल्यावर बोलणीचा प्रस्ताव आला होता.
पंकजला गाडीत घेऊन गेले.
रात्री उशिरा बैठक संपली. पंकजला सोडलं गेलं.
नंतर पोलीसांनी ताब्यात घेतलं.
संघटनेच्या फोननंतर चॅनेलवाले आले.
पंकज जैनचा इश्यू स्थानिक चॅनेल्स मधे गाजू लागला.
पंकज रातोरात स्टार झाला
संध्याकाळपर्यंत दोन राष्ट्रीय वाहीन्यांचे प्रतिनिधी दाखल झाले. पंकज रातोरात स्टार झाला.
सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यायासाठी धडका बसू लागल्या.
न्यायालयाने सरकारला फटकारले.
सरकार पक्षाचा प्रवक्ता पंकजच्या पक्षाकडे गेला.
पंकज जैन महात्मा गांधी की जय म्हणत न्यायालयातून जामीनावर सुटल्याचे सर्व देशाने पाहीले. आता पंकजला शिव्या देणारे आणि त्याच्या बाजूने असे दोन गट देशात उभे ठाकले.
पंकज सुटकेनंतर मशिदीत गेला. भक्तीभावाने नमाज पढला.पंकज आता स्टार झाला होता.
तो कोणत्या कारणासाठी जेलमधे गेला हे लक्षात नव्हतं. उपोषणाला बसण्याचे कारण मागे पडलं होतं.
सत्ताधारी पक्षाच्या विरोधातला युवा आवाज म्हणून त्याचं भाषण झालं. युवावर्गाने एकच जल्लोष केला होता.
********************************************
बोल आता जयभीम , भाडखाऊ
अशोकला जमावाने फरफटत आणलं.
बाबासाहेबांच्या फोटोला हार घालतानाचा त्याचा व्हिडीओ मोबाईलवर त्याला दाखवण्य़ात आला.
त्याचं व्हिडीओ शूटींग होत होतं.
” नक्षली भाड्या, परत हार घालशील का ?”
प्रश्न विचारतानाच दहा बारा जणांनी लाथा घातल्या.
कळवळत अशोक जमिनीवर पडला होता.
त्याच्यात उत्तर देण्याचं त्राण राहीलं नव्हतं..
मारहाण वाढत गेली.
शरीर बधीर होत गेलं. मन बधीर झालं.
संवेदना गारद झाल्या…
अन्यायाने मन पेटून उठत होतं. तीच एक जाणिव,
अंगात बदला घेण्याचं त्राण नव्हतं.
तो जीव एकवटून ओरडला
“जयभीम “
त्या सरशी जमावाचं टाळकं सरकलं.
त्याचा हात एकशे अंशीच्या कोनातून पिरगाळत मागे नेला गेला, कटकन आवाज झाला..
” बोल आता जयभीम , भाडखाऊ “
डोळ्यातून पाण्याच्या धारा लागलेल्या.
पण संतापाची ज्वाला दुप्पटीने मोठी झाली.
“जयभीम “
दुस-या हाताची तीच गत झाली.
कटकन आवाज झाला,
ओरडण्यासाठी उघडलेल्या तोंडातून आवाज फुटला नाही. पोटावर पाय दिला होता.
पोट बूटाने दाबत त्याच्या देहावरून पलिकडे उड्या मारण्याचा खेळ चालू झाला होता.
आता त्याला पालथे झोपवले गेले. पोटातून वेदनांचा डोंब उसळला होता.
पण जयभीमचा गजर चालू होता,
त्या एका शब्दाने शरीरात चैतन्य येत होते.
भगव्याने मग डावा पाय धरला. सरळ पाठीकडे ओढायला सुरूवात केली. हे अत्यंत भयानक होतं..
कट कट असे अनेक आवाज झाले. कदाचित शिरा तुटत होत्या.
आणि कुणीतरी त्या ताणलेल्या पायावर सळईचा प्रहार केला.
एक किंकाळी दुमदुमली.
बोल आता जयभीम च्या प्रश्नाला त्या ही परिस्थितीत जयभीमचं उत्तर आलं.
आता उजवा पाय ओढला जात होता.
ती शेवटची जाणीव होती.
पोलीस पाठ करून उभा होता.
” ए मरल रं त्यो. बास करा आता”
त्यावर जमाव चेकाळत होता.
अशोकचं थंड झालेलं कलेवर बेवारशासारखं पडलं होतं.
अशोकचं थंड झालेलं कलेवर बेवारशासारखं पडलं होतं.
***************************************
दोन दिवसांनी व्हायरल झालेल्या क्लिपने त्याच्या समाजाच्या भावना हलल्या.
तीव्र आक्रोश सुरू झाला.
त्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करत काही विद्वानांचे मानभावी सल्ले सुरू झाले.
“जातीचा असला तरच निषेध करायचा का ?”
” काय गरज होती जयभीम म्हणायची ? हार घालायची ?”
” हिंदूंना नाही आवडत तर नसतं केलं तर काय बिघडलं असतं ?”
न्याय पोलीस चौकीचीही पायरी चढत नव्हता
पंकजच्या सुटकेसाठी ऑनलाईन आक्रमक झालेला समूह आता बोटाला कुलूप लागल्यासारखा गप्प होता.
दोन दिवस अशोकसाठी फक्त त्याचा समाज आग ओकत होता.
सावकाश ते बी टीम असल्याचा निष्कर्ष निघाला.
आता त्याच्या चारीत्र्याचे धिंडवडेही निघू लागले.
तर भगवाईकडून त्याचे नक्षली कनेक्शन उघड होऊ लागले.
दोन्हीकडच्या माध्यमातून अज्ञात जमावाने नक्षली ठेचून मारल्याच्या बातम्या होत्या.
न्याय पोलीस चौकीचीही पायरी चढत नव्हता.
मोर्च्याला बंदी होती. कायदाच होता तसा.
तरी ज्यांना खाज होती त्यांनी मोर्चा काढला होता.
त्यांची धरपकड झाली.
पाठमो-या पोलिसाकडं रिमांडचं काम होतं.
*************************************
पंकज सध्या एक हॉट न्यूज आयटम झाला
सत्ताधारी पक्षाच्या प्रवकत्याला राज्यातल्या सत्ताधारी पक्षाने फोन लावला होता.
पंकज जैनने घटनास्थळाला भेट दिली.
त्याचं एक ज्वलंत भाषण तिथे झालं.
अशोकच्या न्यायासाठी आसुसलेल्यांना त्याच्यात एक नायक दिसू लागला.
पंकज बेबाकीने सरकार विरोधात बोलत होता. सिस्टीलमा प्रश्न विचारत होता.
त्याचं भाषण देशभरात लाईव्ह चालू होतं. फेसबुक्यांची साखळीच तयार झाली होती.
त्याने एल्गार केला. पुढचा प्रश्न दिल्लीतून विचारणार.
माध्यमांची धावपळ सुरू झाली.पंकज सध्या एक हॉट न्यूज आयटम झाला होता.
दिल्लीतल्य़ा सरकारला एका उद्योगपतीचा फोन गेला होता.
पंकजच्या भाषणानंतर त्याला उचलण्यात आले. सर्व माध्यमे लाईव्ह होती. यातली ९०% उद्योगपतीच्या मालकीची होती.
उद्योगपतीला मग सत्ताधारी चा फोन गेला.
” नाराज हो क्या सर ?”
” बिल्कुल नही “
” फिर पंकजभाईकी पब्लिसिटी जरूरत से ज्यादा नही हो रही क्या ?”
” अरे भाई. दस साल आपने बहुत सेवा की हमारी. अब ज्यादा करोगे तो जनता जग जाएगी. उनको भी मौका दे दो “
” क्या सर ! हमने क्या गलती की ? “
” समझा करो. आपके गुरू क्या कहते है ? रोटी को अच्छा सेंकने के लिए घुमाना पडता है. पांच साल की ही बात है. नही तो ना रहोगे आप और ना रहेंगे अहिंसावादी “
” अब क्या बोल सकते है ? आपकी मर्जी “
अशोकला न्याय मिळाला की नाही ही गोष्ट आता गौण ठरत चालली होती.
निवडणुकात माध्यमांनी संपूर्ण जोर पंकजभाईवर लावला होता.
पंकजभाईच्या करीष्म्याने अहिंसावादी पार्टी निवडून आली.
अन्यायग्रस्तांमधे बदला पूर्ण झाल्याची भावना आली. त्यांच्या संतापाचा निचरा होऊ लागला.
आपला बदला पूर्ण करण्यासाठी ते आता नव्या सत्ताधारी पक्षात नायक शोधू लागले होते.
रात्री नेते उद्योगपतीच्या घरावर हेलिपॅडवर उतरत होते.
पेट्रोल पुन्हा स्वस्त होणार होते. शेतीच्या कर्जाची स्कीम जाहीर करायला उद्योगपतींनी हसून संमती दिली.
मात्र कंपनी शेतीचं विधेयक मंजूर करायची जबाबदारी नवनिर्वाचित सरकारला पार पाडायची होती. त्यासाठीच्या कंपन्या उद्योगपतीने बनवल्या होत्या. फक्त जाहीर करायचं होतं. या कंपन्यात नव्या सरकारप्रमुखाचा हिस्सा असणार होता.
सगळी बोलणी पार पडायला पहाट झाली.
सकाळी सकाळी नव्या सत्ताधा-यांनी कर्जमाफीची घोषणा केली.
जनता मनापासून सुखावली..
एक मोठं परीवर्तन झालं होतं. क्रांतीचा आपणही हिस्सा असल्याचं समाधान जनतेत पसरलं होतं.
अशोकला न्याय मिळाला की नाही ही गोष्ट आता गौण ठरत चालली होती.
************ पुढे चालू *********************
लेखक – किरण चव्हाण
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
Comments 1