सकाळचे साडेदहा झाले होते. रुखसानाची लगबग सुरू होती. घरची सगळी कामं आटोपून मुलांना शाळेत पाठवून आणि सासर्यांना जेवायला वाढल्यावर ती बाहेर निघाली. आदल्या रात्रीच तिच्या नवर्याच्या वकिलाचा फोन आला होता. आज कोर्टात निकाल होता म्हणे. गेल्या दीड वर्षापासून तिचा नवरा सुलेमान तुरुंगात होता. एका ९ वर्षांच्या मतिमंद मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्याचा आरोप होता त्याच्यावर. तिने तिची अॅक्टिवा बाहेर काढली. घरापासून दहा किलोमीटर अंतरावर असणार्या न्यायमंदिराकडे ती निघाली. रस्त्यात तिचं विचारचक्र सुरू होतं.
एका घटनेनं सगळं उध्वस्त
दहा वर्षांपूर्वी तिचा सुलेमानशी निकाह झाला होता. वर्षभरात इम्रानचा जन्म झाला आणि त्यानंतर दोन वर्षांनी सानियाचा. सुलेमानचा केबलचा व्यवसाय होता. घरात ते चौघं आणि सुलेमानचे वडील रहीम शेख. ते पाच वर्षांपूर्वी रेल्वेतून गार्ड म्हणून निवृत्त झाले होते. सारा मोहोल्ला त्यांना रहीमचाचा म्हणून ओळखायचा. एकूण सुखवस्तू कुटुंब. सार्या मोहोल्यात सर्वांशी मिळून मिसळून राहणारं. अडल्यानडल्याला धावून जाणारं. आणि अचानक एका घटनेनं सगळं उध्वस्त झालं.
रुखसाना न्यायमंदिरात पोचली तेव्हा सव्वा अकरा झाले होते. ती पाचव्या मजल्यावरच्या ५१३ क्रमांकाच्या खोलीसमोर पोचली तेव्हा सुलेमान आलेला नव्हता. सुलेमानचे वकील शैलेश देशपांडे एकदोनदा येवून गेले. कोर्टात इतर काही कामकाज सुरू होतं. न्यायाधीश झेड. एच. काझी कुठल्यातरी पुस्तकात डोकं खुपसून बसले होते. रुखसाना एका बेंचवर बसून सुलेमानची वाट बघत होती. तिच्याबाजूला एक वयस्कर महिला येवून बसली.
सुलेमान शेख
“तुझी कसली केस आहे ग?” तिनं रुखसानाला विचारलं.
“माझ्या नवर्यावर बलात्कार आणि खुनाचा आरोप आहे. आज निकाल आहे.” रुखसाना निर्विकारपणे म्हणाली. प्रत्येक सुनावणीच्यावेळी कोर्टात आल्यामुळे इथले व्यवहार, बोलणं चालणं तिच्या अंगवळणी पडलेलं होतं.
“तुमचं काय आहे?” रुखसानानं उगाच वेळ जावा म्हणून चौकशी केली.
“मी कुसुम मेश्राम. माझ्या नवर्यानं एक बाई ठेवली होती. तिचा जीव घेतला मी, असा आरोप आहे माझ्यावर.”
“मग तुम्ही बाहेर कशा?” रुखसानानं आश्चर्यानं विचारलं.
“अगं घटना घडली तेव्हा मला तिसरा महिना सुरू होता. महिनाभरात तुरुंगातून जामीनावर बाहेर आले, आज निकाल आहे माझ्या केसचा” ती उत्तरली.
“तुझा नवरा कुठे आहे?” तिनं विचारलं.
“तो अजून तुरुंगातच आहे, येईल इतक्यात. त्याला काही जामीन मिळाला नाही.” रुखसाना म्हणाली.
तेवढ्यात एका बाजूला माणसांची लगबग दिसली. तीन पोलिस सुलेमानला घेऊन येताना दिसले.
त्याच्या दंडाला बांधलेली दोरी सोडण्यात आली. इतक्यात सरकारी वकील आणि सुलेमानचे वकील पण आले.
“सुलेमान शेख” कोर्ट हॉलच्या दरवाजावर उभ्या असलेल्या शिपायाने पुकारा केला. सगळे आत गेले.
माझं निर्दोष सुटणं कठीण आहे
“सुलेमान शेख कोण आहे?” न्या. काझींनी विचारलं.
“मी, हुजूर” सुलेमाननं पुढे येत सांगितलं.
“तुला xxxx नावाच्या मतिमंद मुलीवर बलात्कार करून तिचा गळा आवळून खून केल्याबद्दल दोषी धरण्यात येत आहे. परवा म्हणजे १३ तारखेला सजेच्या बाबत दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यावर तुला या प्रकरणात सजा ठोठावण्यात येईल. कॉन्स्टेबल, घेऊन जा याला आता. परवा घेऊन या.” न्या. काझी म्हणाले आणि त्यांनी सुलेमानची फाईल बाजूला ठेवून दुसरी फाईल उचलली.
“पण हुजूर मी काहीच केलं नाही” सुलेमान म्हणाला. न्यायाधीशांनी पाहून न पाहिल्यासारखं केलं. सोबतचे पोलिस त्याला ओढतच बाहेर घेऊन गेले.
कोर्ट हॉलबाहेर रुखसाना सुलेमानला सोबत आणलेली पाण्याची बाटली देता देता त्याच्या वकिलाला म्हणाली, “ सर, आता कसं? काय करायचं? त्यांनी काहीच केलं नाही तरी दोषी का धरलं जाताहेत?
“हे बघा मला शक्य होतं ते मी केलं. घटनेच्या वेळी सुलेमान त्या मुलीच्या घरात असल्याचं त्याच्या सेलच्या लोकेशनवरुन सिद्ध झालंय. तो तिथे होता हे सुलेमानही सांगतोय पण त्यांनं तसं काही केलं नाही हे कोर्ट ऐकायला तयार नाही. असो कोर्टाचा निकाल लिहिणं तर आपल्या हातात नाही. आणि हे काही शेवटचं कोर्ट नाही. अपील करता येईल आपल्याला.” देशपांडे वकील रुखसानाला समजावत म्हणाले.
रुखसाना सुलेमानला म्हणाली, “काळजी नको करू. आपण शेवटपर्यंत प्रयत्न करू”.
सुलेमान शून्यात बघत म्हणाला, “काही करू नको. माझं निर्दोष सुटणं कठीण आहे.उगाच पैसे खर्च करू नको.त्यापेक्षा पोरांना खूप शिकव.”
पोलिसांनी त्याच्या दंडाला पुन्हा दोरी बांधली.त्यातला एक जण म्हणाला.
चल सुलेमान, परवा आल्यावर बोल बाकी”, ते लगेच जायला निघालेही.
ज्यानं काही केलं नाही तो दोषी आणि जिनं खून केला ती निर्दोष, असं का?
ते गेले आणि थोड्यावेळा पूर्वी भेटलेली कुसुम रुखसानाला आठवली. तेवढ्यात कुसुम कोर्ट हॉल मधून बाहेर आली. सोबत तिचे वकीलही होते. तिने बाहेर आल्या आल्या रुखसानाला मिठी मारली आणि म्हणाली, “मी निर्दोष सुटली, चल कॅंटीनमध्ये तुला मिठाई खिलवते.” इच्छा नसतानाही रुखसाना तिच्या आनंदात सहभागी व्हायला म्हणून कॅंटीनमध्ये गेली. पण तिच्याबरोबर जाण्यात तिचा एक हेतूही होता. त्या निमित्याने रखसानाला तिच्या वकिलांशी सुलेमानच्या केसबद्दल चर्चा करायची होती.
“ज्यानं काही केलं नाही तो दोषी आणि जिनं खून केला ती निर्दोष, असं का?” रुखसानानं सरळ विषयालाच हात घातला. कुसुमचे वकील म्हणाले, “पोलिसांनी कोर्टात साक्षपुरावे सादर केले, कोर्टाला वाटलं किंवा पटलं की आरोपीनं गुन्हा केलाय तर कोर्ट आरोपीला दोषी ठरवून शिक्षा देतं, एखाद्यानं गुन्हा केला की नाही केला हे महत्वाचं नाही. सिद्ध झालं की नाही हे महत्वाचं. निर्णय पटला नाही तर वरच्या कोर्टात अपील करायची”
मला खात्री आहे तो नक्की सुटेल
एवढ्यात चहा आणि मुंग पकोडे आले. औपचारिकता म्हणून रुखसाना पकोडे आणि चहा घेत होती,
पण तिचं लक्ष सगळं सुलेमानच्या केसकडे होतं. ती बावरल्यासारखी इकडे तिकडे बघत होती.
इतक्यात तिचं लक्ष बाजूच्या टेबलवर बसलेल्या एका माणसाकडे गेलं.
पांढरे शुभ्र कपडे, जाड मिशा, गळ्यात भगवा दुपट्टा अशा पेहरावातला तो माणूस सारखा त्यांच्याकडेच बघत होता
आणि त्यांच्या गोष्टीही ऐकत होता. रुखसानाला त्याच्याकडे बघताना पाहून कुसुम हळूच म्हणाली.
“अगं त्या मतिमंद मुलीचा सख्खा काका आहे तो. रावसाहेब पाटील नाव आहे त्याचं.
नेहमी दिसतो कोर्टात. जुगाराचे अड्डे आहेत त्याचे आणि एका सामाजिक संघटनेचा अध्यक्ष ही आहे तो.
पोलिसांशी बरेच संबंध आहेत त्याचे, या केसकडे लक्ष द्यायला येत असेल.” “हो का? मी नाही पाहिलं त्याला पूर्वी कधी.” रुखसाना म्हणाली.
आता तो तिथे असताना तिला सुलेमानच्या केसबद्दल बोलण्याची इच्छा राहिली नाही, तिने कुसुमचा निरोप घेत म्हटलं,
“अभिनंदन बाई तुमचं, निघते मी आता.” “निघ बाई. सांभाळ स्वत:ला आणि मुलांना.
आणि हो, काही मदत लागली तर सांग.” कुसुम म्हणाली.
रुखसाना घरी पोचली तेव्हा रहीमचाचा वाटच बघत होते.त्यांच्या प्रश्नार्थक नजरेकडे बघून रुखसानाने त्यांना आल्या आल्या सांगितलं,
“सुलेमानला दोषी ठरवलंय, सजा परवा सुनावली जाईल.”
“या अल्ला, सुलेमान असं काही करणं शक्यच नाही.मेरा खून ऐसा गंदा काम कर ही नही सकता.
मी ओळखतो त्याला. लहान असो मोठी असो, कुठल्याही स्त्रीकडे बघायचीही हिंमत नाही त्याच्यात.
तो असला प्रकार करूच शकत नाही. आपण वरच्या कोर्टात दाद मागू” रहीमचाचा म्हणाले.
“अब्बाजान, सगळं संपलंय. आता काही उपयोग नाही. सुलेमान तर म्हणतोय की अपील ही करू नका.”
“पण आपण अपील करायची. त्याचं काही ऐकायचं नाही. मला खात्री आहे तो नक्की सुटेल” रहीमचाचा समजावणीच्या सुरात म्हणाले.
सुलेमानला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली
दुसर्या दिवशी संध्याकाळी रहीमचाचा रुखसानाबरोबर देशपांडे वकिलांकडे गेले. त्यांना फीचे राहिलेले दहा हजार दिले.
“काय शक्यता आहे वकीलसाहेब? काय होईल उद्या?” रहीमचाचांनी विचारलं.
“फाशी किंवा जन्मठेप” देशपांडे वकील उत्तरले. विमनस्क मन:स्थितीत दोघेही घरी परतले.
शिक्षेच्या दिवशी रुखसाना अकरा वाजता कोर्टात पोचली. मुलीचा काकाही कोर्ट हॉलसमोर हजर होता. सुलेमान आला. त्याचे वकील आले. त्यांनी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांचे काही निवाडे सोबत आणले होते. पुकारा झाला. सरकारी वकिलांनी फाशीची मागणी करत जोरदार युक्तिवाद केला. जनमानस तापलेले आहे. जिला कशाचीच जाण नाही अशा एका कोवळ्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आलाय, हे दुर्मिळ प्रकरण आहे असेही ते म्हणाले.
देशपांडे वकिलांनी युक्तिवाद करताना कोर्टाला सांगितले की
सुलेमान घटनास्थळावर होता पण तो तिथे केबल बिघडल्याची तक्रार असल्यामुळे गेला होता.
तास दीड तासात फॉल्ट दुरुस्त करून तो निघून गेला.
वैद्यकीय पुरावे संशयास्पद आहेत हे डॉक्टरांच्या साक्षीवरुन स्पष्ट दिसत आहे.
कुठलाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही.संशयास्पद परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीला फाशीची शिक्षा देता येणार नाही.
त्यांनी सोबत आणलेले निवाडे कोर्टाला दिले. सर्व युक्तिवाद ऐकून झाल्यावर
न्या. काझी यांनी सुलेमानला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. रुखसानाचं डोकं सुन्न झालं.
रुखसानाच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. सुलेमान शांतपणे खाली मान घालून उभा होता.
त्याची मानसिक तयारी आधीच झाली होती असं त्याच्याकडे बघून वाटत होतं.
सुप्रीम कोर्टात जामीन मंजूर झाला
कोर्ट हॉलबाहेर रावसाहेब पाटलांना पत्रकारांनी घेरलेलं होतं, फोटो, बाईट्स, जोरात सुरू होतं. पीडितेचे काका सांगत होते, “या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याबद्दल मी आणि आमचे कुटुंब प्रचंड समाधानी आहोत. अशा लोकांना अद्दल घडायलाच हवी. हे लोक असेच असतात, हरामी स्साले. एका कोवळ्या पोरीला चिरडणार्या खुन्याला आता लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी आमची मागणी आहे.”
संध्याकाळी लोकल चॅनलवर तसेच बाकीही बर्याच चॅनलवर रावसाहेबच दिसत होते. काही चॅनलवर या प्रकरणावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. वकील, निवृत्त न्यायाधीश, स्त्री अत्याचार विरोधी कार्यकर्ते आपापली मतं हिरीरीने मांडत होते. इकडे रुखसाना आपल्या दोन्ही लहान मुलांना जेवू घालत होती. रहीमचाचा त्यांच्या एका वकील मित्राशी फोनवर सुलेमानच्या केसच्या निकालाबद्दल सल्लामसलत करत होते.
महिन्याभरात हायकोर्टात अपील दाखल झाली. सुलेमानला जामीन मिळाला नाही. पाहिल्याच सुनावणीत अपीलाची अंतिम सुनावणी लवकरच घेण्याचं ठरलं. सुलेमानची बाजू मांडायला देशपांडे वकिलांच्या सांगण्यावरून वरिष्ठ वकील मोरानी यांनाही नेमण्यात आलं होतं. दोन अडीच महिन्यांत सुनावणी आटोपली आणि हायकोर्टानं सुलेमानचं अपील फेटाळत फाशीच्या शिक्षेचा निर्णय कायम ठेवला. आता सुप्रीम कोर्टाशिवाय पर्याय नव्हता. आतापर्यंत सात आठ लाख खर्च होऊन गेले होते. सुप्रीम कोर्टासाठी आणखी बर्याच पैशांची आवश्यकता होती. मोरानी वकिलांनी बारा लाखांत सुप्रीम कोर्टातही बाजू मांडण्याची तयारी दर्शवली. महिन्याभरात सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. सुलेमानची विशेष अनुमती याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेण्यात आली. परंतु अंतिम सुनावणीला वेळ लागणार असल्यामुळे आणि सुलेमानची आतापर्यंतची वर्तणूक बघता त्याला सुप्रीम कोर्टात जामीन मंजूर झाला. सुलेमान घरी आला.
सुलेमानच्या अंगावर धावून गेला
रावसाहेब आता बर्यापैकी मोठा नेता झाला होता आणि आमदार ही झाला होता. एक दिवस त्याचा एक कार्यकर्ता सुलेमानच्या घरी आला. “सुलेमान, तुला साहेबांनी बोलावलं आहे. संध्याकाळी ये सहा वाजता. आणि घाबरू नको.तुझ्यावर साहेबांचा राग नाही.
साहेब आता मोठे नेते झाले आहेत. त्यांच्या मतदारांची काळजी घेणं त्यांचं कामच आहे.
त्या दृष्टीनं तुझी विचारपूस करायला बोलावलं आहे तुला. ये नक्की.” असं सांगून तो निघून गेला.
संध्याकाळी दिलेल्या वेळेत सुलेमान त्यांच्याकडे पोचला.
“ये सुलेमान, बस” दिवाणखान्यात दिमाखदार सोफ्यावर वाट बघत असलेले रावसाहेब म्हणाले. “बस रे, घाबरू नको. मला तुझ्याशी काही बोलायचंय.” सुलेमान अवघडलेला बघून रावसाहेब म्हणाले.
“बोला स् सर. पण मी खरं काही केलं नाही हो सर.” सुलेमान अडखळत म्हणाला.
“तुझ्या हातून जे होऊन गेलं तो इतिहास झाला आता. सुप्रीम कोर्ट जे ठरवेल ते ठरवेल. तू ते कृत्य केलं, नाही केलं या वादात मला पडायचं नाही. होतात चुका माणसाच्या हातून. पण तुझ्या कृत्याची शिक्षा तुझ्या घरच्यांना का मिळावी? बरं, मला एक सांग. तुझा केबलचा व्यवसाय कसा चाललाय?” रावसाहेब खूप आपुलकीनं विचारत होते.
“सर, रुखसाना आणि अब्बा मिळून सांभाळतात व्यवस्थित. अगदी खूप उत्पन्न नाही पण घर नीट चालतंय.” सुलेमान म्हणाला.
तेवढ्यात एक आडदांड असा कार्यकर्ता दिवाणखान्यात आला आणि सुलेमानच्या अंगावर धावून गेला. रावसाहेब मध्ये पडले आणि सुलेमानला त्याच्या तावडीतून सोडवलं. “विष्णू, तुला अक्कल नाही का? ही काय पद्धत झाली? माझ्यासमोर अशी आगळिक करायची हिंमतच कशी झाली तुझी?” रावसाहेब विष्णूला रागात म्हणाले.
हेट द सिन नॉट द सिनर
“या नराधमाला मी सोडणार नाही. एका कोवळ्या पोरीचा जीव घेतलाय साल्यानं. तुम्ही याला बोलावलंच कशाला इथे?” विष्णू तिरिमिरीत बोलला.
“आपण कायदा हातात घ्यायचा नसतो. आता मॅटर कोर्टात आहे. कोर्ट बघेल काय ते. आणि इथे तो माझा पाहुणा आहे. त्याचा अपमान माझा अपमान.” रावसाहेबांनी विष्णूला समजावलं. विष्णू खाली मान घालून बाहेर निघून गेला. एक जण चहा, बिस्किटं घेऊन आला. साहेबांनी नजरेनंच सुलेमानला चहा घ्यायला सांगितला.
“हं, काय म्हणत होतो मी? घर व्यवस्थित चाललंय रे तुझं, पण हा कोर्टकचेरीचा खर्च, तुझी मुलं मोठी होत आहेत, त्यांची शिक्षणं, रहीमचाचांचं म्हातारपण. रुखसाना एकटी सांभाळू शकेल सगळं? तुझं पुढे काय होईल, हे अजून काही निश्चित सांगता येत नाही. सुटला तर ठीक पण सुप्रीम कोर्टानंही शिक्षा कायम ठेवली तर?” रावसाहेब प्रश्नावर प्रश्न उपस्थित करत होते. सुलेमानकडे एकाही प्रश्नाचं समर्पक उत्तर नव्हतं. त्यांच्या तोंडून शब्दच निघत नव्हता. थोडा वेळ थांबून रावसाहेब पुन्हा म्हणाले, “सुलेमान हे बघ. इकडे बघ माझ्याकडे. जे झालं ते झालं, माझा खूप मोठा व्यवसाय आहे हे तुला माहीतच आहे. सात आठ सोसायट्या आहेत, वीस बावीस कंपन्या आहेत. जुगार अड्डे सुरूच आहेत. चार बार आहेत. नवीन मॉलचं बांधकाम सुरू आहे. सतराशे फ्लॅट्सच्या मोठ्या मोठ्या इमारती बांधून पूर्ण होत आहेत. बरं ते जाऊ दे. माझंच काय सांगत बसलोय. मला सांग. तुझं शिक्षण किती झालं आहे? आणि रुखसाना किती शिकली आहे?”
मला काही त्रास दिला तर?
“आम्ही दोघंहो एम.कॉम. आहोत. एकाच वर्गात होतो. पण हे का विचारताय सर?” सुलेमाननं विचारलं.
“हे बघ. मी काही उपकार करत नाहीये तुमच्यावर.तुमची इच्छा असल्यास माझ्या कुठल्याही कंपनीत
किंवा सोसायटीत तुम्ही काम करू शकता.” रावसाहेबांनी सुलेमानला सरळ सरळ ऑफर दिली.
“पण का? सर, तुम्ही हे का करताय आमच्यासाठी?” सुलेमाननं विचारलं.
रावसाहेब म्हणाले, “देवानं भरपूर दिलंय मला. हजारो लोक काम करतात माझ्याकडे.माझ्या मतदारसंघातल्या सर्व लोकांकडे लक्ष देणं माझं काम आहे. आणि मी महात्माजींना मानतो. ते म्हणायचे ‘हेट द सिन नॉट द सिनर’. मी तुझ्या कृत्याचा निषेधच करतो पण तुझ्यावर माझा राग का असावा? तुला शिक्षा द्यायची की नाही ते कोर्ट ठरवेल. मी तर तुला केव्हाच ठोकला असता. पण नाही. माझा आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. असो. सांग मग. रुखसानाशी चर्चा करून सांग. जा. आणि ये एक दोन दिवसांत फोन करून”.
सुलेमान घरी आला. रहीमचाचा आणि रुखसाना वाटच बघत होते. त्यानं रावसाहेबांकडे काय घडलं ते सांगितलं.
“त्याच्या मनात नक्की काय आहे ते काही कळत नाही”, सुलेमान म्हणाला.
रुखसाना म्हणाली, “तो काही चांगला माणूस वाटत नाही. मला काही त्रास दिला तर?”.
“आता तो आमदार आहे. खूप नाव आहे त्याचं. हजारो लोक कामावर आहेत त्याच्याकडे. त्यात महिलाही खूप आहेत. शहरात खूप इज्जत आहे त्याची. दान धर्म ही खूप करतो. गेल्या वर्षी आपल्या मशिदीच्या दुरुस्तीसाठी त्यांनंच वीस लाख दिले होते. इतका सज्जन माणूस असं वेडंवाकडं काही करणार नाही. मला वाटतं तुम्ही जावं त्याच्याकडे कामाला. हातभार होईल घराला. केबलचं मी बघतो. आपली सगळी जमापुंजी संपलीय. अजून पोरांचं शिक्षण आहे. भरपूर आयुष्य पडलंय. बघा सर्व विचार करून निर्णय घ्या.” रहीमचाचा समजावणीच्या सुरात म्हणाले.
सुलेमान रावसाहेबांना फोन करून भेटायला गेला
काय असेल नक्की हा प्रकार? काय असू शकतं त्यांच्या मनात? रुखसानाला काही त्रास होईल का? आपल्याला घरी बोलावून दोघांनाही नोकरी देतो म्हणून सांगण्याची गरज का भासावी काकाला? त्याची काही चाल तर नसेल? सुलेमानला त्याच्या साध्या सरळ आयुष्यात इतके प्रश्न कधीच पडले नव्हते. त्या घटनेपासून सगळं कसं उध्वस्त झालं होतं. त्यात पुन्हा काकाची ही ऑफर. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली होती.
“अहो ऐकलं का? मी तयार आहे जॉब करायला.” रुखसानाच्या आवाजानं सुलेमानचं विचारचक्र खुंटलं. दोघांनी सर्व बाजूंनी विचार करून शेवटी काकाला होकार द्यायचं नक्की केलं.
दुसर्या दिवशी सुलेमान रावसाहेबांना फोन करून भेटायला गेला. जाताना दोघांचेही बायोडाटा आणि शैक्षणिक कागदपत्रे सोबत घेऊन गेला. त्यांनी त्यांची सध्या काही गरज नाही, नंतर ऑफिसमध्ये जमा करून द्याल असं सांगून त्याच्या पीएला दोघांच्या नावे नियुक्तीपत्रे द्यायला सांगितली. काही दिवसांत सुलेमान काकाच्या एका बांधकामाच्या साईटवर सुपरवायजर म्हणून रुजू झाला. रुखसाना काकाच्या एका सहकारी पतसंस्थेत असिस्टंट मॅनेजर म्हणून रुजू झाली. रावसाहेबांची बायको त्या संस्थेची अध्यक्षा होती. सगळ्या शहरात सुलेमान आणि रुखसानाच्या नोकरीची चर्चा होत होती. रावसाहेबांच्या चांगुलपणाच्या कथा सगळीकडे चर्चिल्या जात होत्या. इकडे सुलेमान आणि रुखसानाही समाधानी होते, मन लाऊन काम करत होते.
राष्ट्रपतीकडे केलेला दयेचा अर्ज ही फेटाळल्या गेला
पाहता पाहता पाच वर्षे निघून गेली. दरम्यान रुखसानाला मॅनेजर म्हणून बढतीही मिळाली होती. सुलेमानला रावसाहेबांच्या एका कारखान्यात मोठ्या पदावर बढती मिळाली होती. एक दिवस अचानक सुलेमानच्या वकिलाचा फोन आला. त्यांनी येत्या तीन तारखेला त्याची केस अंतिम सुनावणीसाठी लागली असल्याचं सांगितलं. सुलेमानच्या घरी सगळं नीट सुरू असताना पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं. प्रचंड दडपण, अनिश्चितता, काळजी.
सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. मोरानी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. परंतु सुलेमानचं अपील फेटाळण्यात आलं. एका असहाय, मतिमंद मुलीला आयुष्यातून उठवणार्या सुलेमानला सोडलं किंवा फाशी रद्द करून सजा कमी केली तर समाजात चुकीचा संदेश जाईल, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. त्या आदेशाविरुद्ध दाखल केलेली पुनर्विचार याचिकाही फेटाळण्यात आली. सुलेमान पुन्हा तुरुंगात गेला.
राष्ट्रपतीकडे केलेला दयेचा अर्ज ही फेटाळल्या गेला. वर्तमानपत्रात मोठे मोठे लेख छापून आले. सुलेमानच्या कृत्याकडे दुर्लक्ष करून त्याला आणि रुखसानाला नोकरी देणार्या काकाची तारीफ करणारे लेखही खूप छापून आले. काकाला निरनिराळ्या चॅनलवर बोलावून त्याच्या मुलाखती प्रसारित करण्यात आल्या. लवकरच सुलेमानच्या फाशीची तारीख निश्चित झाली.फाशी देण्यापूर्वी सुलेमानला त्याची अंतिम इच्छा विचारण्यात आली. त्यानं कुटुंबियांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला पोलिस बंदोबस्तात घरी आणण्यात आलं.
आमदार रावसाहेब पाटलांचा गृहमंत्रीपद मिळण्याची शक्यता.
सुलेमान घरी सगळ्यांना भेटला. तो त्यांना म्हणाला, “मी कुठलंही गैरकृत्य केलं नाही. मी कामासाठी गेलो होतो. तो प्रकार केव्हा झाला, कोणी केला याबद्दलही मला काही माहिती नाही. कोर्टाचं जाऊ द्या, जगाचं जाऊ द्या, तुम्हाला तरी माझ्याबद्दल खात्री आहे की नाही? तुम्ही मानता का मी निर्दोष आहे ते?”
मुलांनी, रहीमचाचांनी सुलेमानला मिठी मारली. सगळे हमसून हमसून रडत होते. सुलेमाननं रुखसानाला जवळ घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवले, तिला म्हणाला, “सॉरी डिअर, मी तुमच्यासाठी आता काही करू शकत नाही. नियती इतकी क्रूर कशी होऊ शकते, कोण जाणे? अब्बा आणि मुलांची काळजी घे. त्यांना हजयात्रेला घेऊन जायची खूप इच्छा होती. राहिलं ते आता.सरांना माझ्याकडून धन्यवाद दे. त्यांच्यामुळेच आपल्याला आधार मिळालाय. अल्ला ऊनको सलामत रखे. मोठा माणूस आहे. मंत्रीसुद्धा होईल. असो. चल बाय” असं म्हणून तो एकदम वळला, पोलिसांना म्हणाला, “चला आता लवकर, जास्त थांबलो तर निघायला खूप त्रास होईल”. मागे वळून न बघता निघाला आणि झपाझप चालत निघाला सुद्धा. सुलेमान निघून गेल्यावर पुन्हा थोडी रडारड झाली. कोणी कोणाची समजूत काढायची हाच प्रश्न होता. वातावरण बदलण्यासाठी रहीमचाचांनी टीव्हीवर बातम्या लावल्या. “महाराष्ट्रात उद्या मंत्रिमंडळविस्तार. शहरातील आमदार रावसाहेब पाटलांचा समावेश निश्चित. गृहमंत्रीपद मिळण्याची शक्यता. उद्या ११ वाजता राजभवनात शपथविधी संपन्न होणार.” सुलेमानचे शब्द इतक्या लवकर खरे झालेले बघून रुखसाना आश्चर्यचकित झाली.
पहाटे ५ वाजता सुलेमानला फाशी देण्यात आली. शपथविधी संपन्न झाला. शहरभर मिरवणुका सुरू होत्या. रावसाहेबांचे कार्यकर्ते जल्लोष करत होते. रावसाहेब महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले होते.
रुखसाना एकदम भांबावून उभी राहिली
दुखवट्याचे दिवस संपल्यावर रुखसाना ऑफिसमध्ये पुन्हा जायला लागली. कामकाजात मन रमेना पण यंत्रासारखी कामं करत होती. मनात येणारे असंख्य विचार झटकून ती शक्य होईल तितकं कामात लक्ष घालत होती. जवळचा माणूस गेल्यावर साधारणपणे किती दिवसांत जीवन पूर्वीसारखं नॉर्मल होऊ शकतं की कधीच होऊ शकत नाही असे प्रश्न ती स्वत:लाच विचारत होती. हळूहळू रुखसाना कामकाजात रुळायला लागली. साधारण आठवडयाभरानंतर अचानक तिच्या चेंबरच्या दारावर टकटक असा आवाज झाला. “कोण आहे?” तिनं विचारलं. “मी आत येऊ का?” दार थोडं किलकिलं करून रावसाहेबांच्या बायकोनं विचारलं. रुखसाना एकदम भांबावून उभी राहिली. “हे काय, मला नाही का निरोप धाडायचा? मी आले असते ना.” रुखसाना ओशाळून म्हणाली. एव्हाना त्या खुर्चीत येऊन बसल्या.
“कडक कॉफी मागवा मॅडम” त्यांनी इच्छा प्रगट केली. रुखसानानं इंटरकॉमवर कॉफीची ऑर्डर दिली.
“बोला न मॅडम, व्हॉट कॅन आय डू फॉर यू?” रुखसानानं विचारलं.
“थांब जरा, कॉफी येवू दे. घाई काय आहे. मी आज निवांत बोलायला आलेय. हे ही दिल्लीला गेलेत. दोन तीन दिवसांनी येणार आहेत.” त्या म्हणाल्या.
कॉफी आली. कॉफी आणणार्या माणसाला त्यांनी सांगितलं, “ हे बघ. कोणालाही आत सोडायचं नाही. मी सांगितल्याशिवाय. आणि हो, नो फोन्स, आमची महत्वाची मीटिंग आहे.” त्यानं होकारार्थी मान हलवून तो गेला आणि बाईसाहेब बोलू लागल्या.
“ काय असतं नं, याचकानं दात्याकडे जायचं असतं. आज मी तुझ्याकडे एक याचक म्हणून आलेय.”
“क क क्काय? मला काही समजलं नाही. असं काय आहे जे तुमच्याकडे नाहीये. आणि मी काय देवू शकते तुम्हाला?” रुखसानानं विचारलं.
“मी आज जे तुला मागणार आहे ते तुला द्यायला जड जाईल पण माझ्याकडे दूसरा काही पर्याय नाही. मी तुला मागितलं नाही तरी माझं काही बिघडणार नाही. पण माझं मन सारखं खात राहील मला. मी तुझी माफी मागायला आले आहे. मला कॅन्सर झालाय, फार तर दोन तीन वर्षे जगेन.” बाईसाहेब.
मी आज पुन्हा छोटीवर बलात्कार केला
“ओहह, मला कोणीच सांगितलं नाही. काळजी घ्या मॅडम, पण मॅडम माझी माफी का मागताय?” रुखसाना आता भांबावून गेली होती.
बाईसाहेबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, “ मी आज जे तुला सांगणार आहे त्यानं तुला प्रचंड धक्का बसेल पण हा धक्का मला खूप आधीच बसलाय, मी हे गुपित गेली अनेक वर्षे पोटात ठेवून वावरते आहे.”
“माझा नवरा गमावलाय मी. आता अजून त्यापेक्षा काय मोठा धक्का देणार आहात तुम्ही? रुखसाना म्हणाली.
“तुला हे जाणून घ्यायचं नाही का की ते दुष्कृत्य कोणी केलं होतं? मी आज तुला सांगते. पण माझी एक अट आहे. मी सांगितलेलं तू इथल्या इथे विसरून जायचं. कुठेही म्हणजे कुठेही वाच्यता करायची नाही. यातच तुझं, माझं आणि आपल्या सगळ्यांचंच भलं आहे. मला वचन दे.” बाईसाहेब हे सगळं बोलताना खूप अस्वस्थ झाल्या होत्या. घामाघूम झाल्या होत्या.
“हो दिलं वचन. कुठेही बोलणार नाही, कोणालाही सांगणार नाही. सांगा कोण होता तो.” रुखसाना आता त्याचं नाव ऐकायला अधीर झाली होती.
“मला माफ केलं म्हण.” बाईसाहेब रुखसानाच्या डोळ्यात बघत म्हणाल्या.
“माफ केलं मॅडम. सांगा लवकर” रुखसाना.
त्या म्हणाल्या, “तो किळसवाणा प्रकार आणि निर्घृण खून रावसाहेबांनीच केला होता”.
चार वर्षांची चिमूरडी होती बिचारी पहिल्यावेळी
“हाय अल्ला, असं कसं होऊ शकतं?” रुखसानाचा विश्वासच बसेना.
“त्यादिवशी आमच्या घरचा केबल सप्लाय बंद होता. दुपारी मीच सुलेमानला फोन केला आणि बोलावलं. फॉल्ट शोधण्यात आणि दुरुस्त करण्यात दीड दोन तास गेले असतील. दरम्यान माझा डोळा लागला म्हणून हॉलमध्येच दिवाणावर जरा पडले होते. जाग आली तेव्हा सुलेमान त्याची टूल किट आवरून निघायच्या तयारीत होता. ‘मॅडम निघाला फॉल्ट. झालं आहे केबल सुरू. बघून घ्या’, तो बोलला आणि निघून गेला. मला आजही त्याचा तो निरागस चेहरा लख्ख आठवतोय. मी फ्रेश व्हायला म्हणून वॉशरूमकडे जात असताना अचानक हे आले.घाबरलेले दिसत होते. म्हणाले, ‘डार्लिंग, आज एक अघटित घडलं आहे. पण खबरदार कुठे वाच्यता केली तर, गाठ माझ्याशी आहे. मी आज पुन्हा छोटीवर बलात्कार केला.’ ‘त्यात काय मोठं? गेली पाच वर्ष तेच करताय की.’ हो, त्यांच्यामुळेच तर ती मतिमंद झालीय. चार वर्षांची चिमूरडी होती बिचारी पहिल्यावेळी. त्या धक्क्यातून सावरलीच नाही कधी” बाईसाहेब घाईघाईत सांगत होत्या.
छोटी जिवंत नव्हतीच त्यामुळे तिच्या साक्षीचा काही प्रश्नच नव्हता
रुखसाना सुन्न होऊन ऐकत होती. तिनं बाईसाहेबांना थांबवत विचारलं, “तिचे आईवडील नव्हते का घरी?”
“नाही ते शेतावर गेले होते. पण त्यांना हे सगळं माहीत होतं. ह्यांच्या धाकापायी काही बोलत नाहीत बिचारे. हे मला आमच्या दुसर्या मजल्यावरच्या बेडरूममध्ये हात धरून घेऊन गेले. छोटीचा निष्प्राण देह पलंगावर पडलेला होता. म्हणाले, ‘आज मी तिचा गळा आवळून जीव घेतलाय, फार आरडाओरडा करत होती. रागाच्या भरात माझ्याकडून हे होऊन गेलं.’ ‘आता काय करणार?’ मी विचारलं तर म्हणाले. पोलिसांना फोन केलाय. फुकट पोसतो का त्यांना? सगळं निस्तरून टाकू. तो पीआय शिंदे येईलच थोड्या वेळात.’ पंधरा वीस मिनिटात शिंदे आपल्या ताफ्यासोबत आले. छोटीची बॉडी पुढील कारवाईसाठी दवाखान्यात पाठवण्यात आली.
बाकी स्पॉट पंचनामा वगैरे करून पोलिस निघून गेले. रात्री हे बराच वेळ शिंदेंशी फोनवर बोलत होते. दुसर्या दिवशी यांनीच आरोपीला पकडा म्हणून पोलिस स्टेशनवर शेकडो लोकांचा मोर्चा नेला होता, आठवतं न? दोन दिवसात आरोपीला पकडलं नाही तर आमरण उपोषणाला बसीन अशी धमकीही दिली होती त्यांनी. जनतेच्या डोळ्यात ही धूळफेक केल्यावर रात्री शिंदेंसोबत बैठक. शिंदेंनी सगळे खोटे पुरावे तयार केले. फॉरेन्सिक रिपोर्ट, मेडिकल रिपोर्ट, सेल लोकेशनवरुन सुलेमान आमच्या घरी होता हे सिद्ध होणारच होतं. सर्व खोट्या पुराव्यांच्या आधारे शिंदेंनी पक्की केस बनवली आणि सुलेमानला आत टाकलं. लवकरच यांनी वर शब्द टाकून शिंदेंचं प्रमोशन ही करून घेतलं. छोटी जिवंत नव्हतीच त्यामुळे तिच्या साक्षीचा काही प्रश्नच नव्हता. आमच्या सारखे जिवंत असून मेल्यातच जमा होते. यांच्या दबावापुढे आमचा काय टिकाव लागणार होता? आता तर ते गृहमंत्रीच आहेत. कोणीही विरोधात बोलला तर संपवूनच टाकतील, कोणाला समजणारही नाही, कोणी केलं ते.”
हाच का तुझा न्याय?
सगळं ऐकून रुखसाना सुन्न झाली. बाईसाहेबांनी तिला जवळ घेतलं. दोघीही खूप रडल्या. बराच वेळ झाला होता. बाईसाहेब जायला निघाल्या. “यांनी माझ्याकडूनही वचन घेतलं होतं प्रकरण पूर्ण संपेपर्यंत कुठेही वाच्यता करायची नाही म्हणून. म्हणून मी आजवर गप्प होते. मी तुला सांगितलं नसतं तरी काही बिघडलं नसतं पण हे गुपित घेऊन मला मरायचं नव्हतं. मला दिलेलं वचन लक्षात ठेव रुखसाना. उगाच आपला आणि मुलांचा जीव धोक्यात घालू नको. फार भयानक माणूस आहे तो.” एवढं सांगून बाईसाहेब निघून गेल्या. ही धमकी होती की कळवळा होता हे कळायला काही मार्ग नव्हता.
एकीकडे एका चिमुकलीचा खून करून आणि सुलेमानला फासावर लटकवण्यात पोलिस आणि न्यायव्यवस्थेचा वापर करून नामानिराळे राहणारे रावसाहेब आणि दुसरीकडे असहाय छोटीचे आईवडील, खुद्द रावसाहेबांची बायको, सगळं समजल्यावर काहीही करता न येणारी रुखसाना.
खूप प्रयत्न करून, कोणाला काही सांगायचं नाही याची पक्की खूणगाठ बांधून आणि सगळं काही विसरून रुखसाना घरी आली. मुलांसाठी, सासर्यांसाठी आधार व्हायला………….कोणाला काही सांगून काहीही उपयोग नव्हता, उलट नुकसानच होणार होतं. तिला काही सिद्धही करता येणार नव्हतं. तिनं शांत राहण्यातच शहाणपण होतं. एक मात्र तिनं पक्कं ठरवलं अल्लाकडे गेल्यावर त्याला नक्की विचारायचं, हाच का तुझा न्याय? आणि शांतपणे झोपी गेली.
BY अतुल सोनक
३४९, शंकर नगर, नागपूर, ४४००१०
९८६०१११३००, ९६८९८४५६७८
शहीद भगत सिंह : मी नास्तिक का आहे?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 28, 2021 20:40 PM
WebTitle – Ambedkar and Periyar said on the martyrdom of Bhagat Singh