सावित्री की सरस्वती या निमित्ताने
पार्श्वभूमी
जेष्ठ साहित्यिक कवी डॉ.यशवंत मनोहर यांना विदर्भ साहित्य संघाने “जीवनव्रती” हा पुरस्कार जाहीर केला.त्यावेळी त्यांच्यात पुरस्कार स्वीकारताना मंचावर काय असेल यावर चर्चा झालेली आहे.ही चर्चा होण्याचे कारण डॉ.यशवंत मनोहर यांना विदर्भ साहित्य संघाबद्दल त्यांच्या परंपरा आणि संमेलनाचे स्वरूप याबद्दल माहिती होती.त्यामुळे त्यांनी मंचावर काय असेल असा प्रश्न उपस्थित करणे नैसर्गिक वाटते.त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलल्यावर असे समजले आहे की त्यांना असे वाटत होते की विदर्भ साहित्य संघ हा दुरुस्त झाला असेल कर्मठपणातून बाहेर पडला असेल.
इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी की 2011 साली याच विदर्भ साहित्य संघाने डॉ.यशवंत मनोहर यांना त्यांच्या संघाचे अध्यक्षपद देवू केले होते.जे त्यावेळी डॉ. यशवंत मनोहर यांनी नाकारले होते.त्या गोष्टीला दहा वर्षाचा काळ लोटला.या पार्श्वभूमीवर विदर्भ साहित्य संघाने त्यांना पुन्हा आपल्यासोबत जोडून घेण्याची धडपड केली आणि पुरस्कार देवू केला.यावेळी ते बदलले असतील अशा अपेक्षेने आणि आपण साहित्याशी वाहून घेतलेलो असल्याने साहित्याशी निगडीत गोष्टीत जास्त ताठर भूमिका नसावी,मात्र आपल्या तत्वाशी तडजोड न करता.
या भावनेने त्यांनी यावेळी पुरस्कार स्विकारण्याचे मान्य केले.ते समरसतावादी नाहीत हे त्यांनी आमच्याजवळ भूमिका मांडताना स्पष्टपणे म्हणलेले आहे.परंतु त्यावेळी एक अट ठेवली.अगोदर नकार देणारे डॉ.यशवंत काही एक विचार करून तयार झाले असताना एक पाऊल मागे येण्याची तयारी असताना विदर्भ साहित्य संघाने आडमुठेपणा केल्याचे या प्रकरणात स्पष्ट झाले आहे.ही वस्तुस्थिती आम्ही म्हणजे जागल्या भारत यांनी समोर आणली आहे.
हे उत्तर दीर्घ असल्याने इथे मुद्दे नीटपणे हाइलाईट करून मांडता येतील
परंतु असत्याला पाय नसतात ते गावभर हिंडून येते.शेंडा बुडखा नसतो त्यामुळे त्यावर लोक वाट्टेल तसे व्यक्त होतात.अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.यापैकी काही प्रतिक्रिया जातीयपातळीवरील होत्या.द्वेषयुक्त होत्या,काहींनी तर अतिशय हिणकस शेरेबाजी केली आहे.अनेकांनी खिल्ली देखील उडवली आहे.खरतर जे घडलेच नाही त्याची शिक्षा देण्याची धडपड काही लोक करत राहिले.
यापैकी एक आहेत श्री.जनार्दन म्हात्रे (Janardan Keshav – Awaam) त्यांनी यावर संयत प्रतिक्रिया दिली असल्याने त्यांच्या मांडणीला उत्तर द्यायला हवे असे मला वाटले.जनार्दन हे गझल लिहितात.मी देखील गझलेचा चाहता असल्याने आम्ही मित्र यादीत आहोत.
फेसबुकवर अलिकडे खूपच दडपशाही सुरू आहे, पोस्ट अडवल्या जात असल्याने आणि पूर्वीप्रमाणे त्या न्यूजफिडमध्ये दिसत नसल्याने या मुद्यावर फेसबुकवर लिहिणे मला योग्य वाटले नाही.तसेच हे उत्तर दीर्घ असल्याने इथे मुद्दे नीटपणे हाइलाईट करून मांडता येतील.
ही मांडणी येणाऱ्या पिढ्यांसाठी एक महत्वाचे दस्तावेज म्हणून ठरणार आहे
याशिवाय हा वाद ज्या काळात घडतो आहे त्या काळाचे एक महत्व आहे.आणि या वादावरून उद्भवलेले मुद्दे चर्चेला आणणे त्यावर चर्चा करणे गरजेचे वाटते.हे वर्षे 2021 आहे अन 21 व्या शतकात विज्ञानवादी जगात सुद्धा भारतात अशा गोष्टींवर चर्चा घडत होती.हे येणाऱ्या पिढ्यांसाठी एक महत्वाचे दस्तावेज म्हणून ठरणार आहे.त्यादृष्टीने मी याच्याकडे बघतो आहे.आणि म्हणून यावेळी कुणाच्या काय भूमिका होत्या हे समजून घेणे,लिहिणे गरजेचे वाटते.शिवाय अशा चर्चा त्यांचे संदर्भ तुम्हाला फेसबुकवर सर्च मारून सापडणार नाहीत. ती पोस्ट/चर्चा गायब होईल.मात्र इथे एक दोन शब्द टाकले तरी तुम्हाला संबंधित माहीती मिळून जाईल.
या उत्तरला थोडा उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.या घटनेच्या मुळाशी जावून वस्तुस्थिती माहीत करेपर्यंत हा वेळ झालेला आहे.असो.
मांडणीचे चार भाग
श्री.जनार्दन यांच्या फेसबुकवरील पोस्ट मध्ये जी मांडणी आहे तीचे चार भाग करता येतील. कारण त्यामध्ये वेगवेगळे विषय एकत्रितपणे मांडले गेले आहेत. पुरस्कार नाकारणे हा एक भाग आहे. ब्राह्मण समाजावर टीका,हिंदू धर्मावर टीका , आणि जनार्दन यांचे मित्र असे चार भाग,(खरे पाच भाग झाले असते पण सावित्रीबाईंबद्दल जे लिहिले आहे ते पुरस्कार नाकारण्याच्या मुद्याशी जोडले आहे.)
यापैकी श्री.जनार्दन यांच्या मित्रांचे किस्से वाचून आपण त्यावर कोणतेही समर्थनात अथवा विरोधातील मत व्यक्त करणे योग्य नाही. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? पार्श्वभूमी काय होती? यात चेष्टा मस्करी होती की गांभीर्य होतं हे आज आपण सांगणे अवघड आहे. त्याचे अर्थ लावता येणार नाहीत.या मित्रांना प्रत्यक्ष भेटून हे ठरवता येईल,तसे भेटण्यास मी उत्सुक आहे.आणि अशा गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडून गेलेल्या असतात.फक्त एक गोष्ट इथं अशी की कोणताही बाहेरील व्यक्ती तुमच्या घरात येवून तुम्हाला दरडावू शकत नाही. तुमच्या पुस्तकाची वहीची पाने फाडू शकत नाही,तुमची ओळख असते आणि समोरच्या व्यक्तीला तुमच्यावर विश्वास असतो.अपेक्षा असते आणि मुख्य म्हणजे जिव्हाळा असतो म्हणून या गोष्टी घडतात.अनोळखी माणूस असे करू शकत नाही.
सरस्वती देवी नेमकी कोण?
माझ्या आयुष्यात अनेक चांगले वाईट लोक आलेत.ब्राह्मण मराठा जैन ख्रिस्ती लिंगायत धर्मीय सगळेच आठरापगड जातीचे.यातील एक ब्राह्मण माझा बालमित्र आम्ही एकत्र वाढलो शिक्षण अन नोकरी सुद्धा काही ठिकाणी एकत्र केली.पुढे लग्ने झाली,परंतु त्याने कधी माझ्या घरातील पाणी प्याले नाही.मला त्रास होतो.आमचा देव कोपतो.मला रक्ताच्या उलट्या होतात जुलाब होतात अशी त्याची अंधश्रद्धा होती.आजही आहे.माझ्या बहिणीच्या लग्नात तो जेवला देखील नाही.जेवण बाहेरचे होते,घरात तयार झाले नाही.आम्ही त्याला यातून काढण्याचा प्रयत्न करत होतो.यापासून त्याला दूर करण्याचा प्रयत्न देखील काहीवेळेस केला पण त्याने आपला स्वभाव बदलला नाही.हा मित्र आजही आहे.म्हणजे जीवंत आहे. हे कपोलकल्पित नाही.ज्याला उत्सुकता असेल त्याला मी भेटवू शकतो.म्हणजे खात्री पटू शकते.तर अशी प्रकरणे भरपूर सांगता येतील.जनार्दन सुद्धा मित्रांचे किस्से सांगत आहेत.तर आपण वस्तुनिष्ठ मुद्यांवर बोलले पाहिजे.त्यामुळे मित्रांचा मुद्दा इथे स्पष्ट झाला असं समजून सोडून देवू.
सर्वप्रथम वाद उत्पन्न झाला त्याबद्दल बोलूया.हिंदू देवता सरस्वतीची प्रतिमा मंचावर नसावी अशी अपेक्षा डॉ.यशवंत यांनी कळवली आणि पुढे हे सगळं घडलं ती सरस्वती देवी नेमकी कोण? हा प्रश्न निश्चितच इथे उत्पन्न होतो.तीच्या जन्माविषयी इथे वाचता येईल दैनिक जागरण पत्रिका लोकसत्ता मत्स्य पुराण,सरस्वती पुराण यातही पाहता येईल.
राजा रवी वर्मा या चित्रकारांनी काढलेलं चित्र
आतापर्यंत समजलेली माहिती अशी आहे – सरस्वती ही विद्येची देवता मानली जाते.
ती जन्माला आली तेव्हाच तीच्या हातात पुस्तक होते,वीणा होती वगैरे,
एक पुस्तक छापून तयार होण्याची प्रोसेस तुम्हाला माहीत असेलच.
सरस्वतीचा जन्म आईच्या पोटी झालेला नाही.शिवाय जन्मातच ती वयात आलेली आहे.
म्हणजे हातात पुस्तक वीणा चित्रात दाखवलं जातं तसं.
खरतर ही राजा रवी वर्मा या चित्रकारांनी काढलेलं चित्र आहे.ती त्यांची चित्र-कल्पना आहे.
पाणी शिंपडले आणि त्यातून एक स्त्री उत्पन्न झाली
दूसरा प्रवाद असा की सृष्टि निर्माण केली,सगळं होतं कंटाळा आला मग ब्रह्माने पाणी शिंपडले आणि त्यातून एक स्त्री उत्पन्न झाली.हे सगळं अशक्य अतर्क्य फक्त भारतातच असतं,हजारो वर्षे लोकाना शिक्षण,स्वतंत्र विचार करण्याची संधीच दिली जात नव्हती म्हणून याबद्दल कधीच कुणी विचार केला नाही.त्यांना प्रश्न पडले नाहीत,हे सत्य असू शकतं का असा विचार उत्पन्न झाला नाही.
अक्षरलेखन -छपाई मशीनचा शोध – पुस्तकाचा शोध
(अवांतर – अक्षरलेखन -छपाई मशीनचा शोध – पुस्तकाचा शोध अक्षरलेखनाची सुरुवात सुमारे ५,००० वर्षांपूर्वी इजिप्त मध्ये झाल्याचे उल्लेख आहेत.
नाईल नदीच्या किनारी उगवणार्या पापयरस या वृक्षावर इजिप्शियन लेखन करीत असत.
जोहान गुटेनबर्ग यांना मुद्रणकलेचे जनक मानले जाते.इ.स.1450 मध्ये अक्षरांचे सुटे खिळे बनवण्याचा शोध त्यांनी लावला.
पुढे परंतु दुसऱ्या शतकाच्या शेवटी चिनी लोकांनी मजकूर मुद्रित करण्याची पद्धत शोधली होती असेही मानले जाते.
कागदाचा शोधही चीनमध्ये लागला होता.
हान काळात लगद्यापासून कागद बनविण्याची क्रिया काई लुनद्वारे इसवी सनाच्या दुसर्या शतकाच्या सुरुवातीस विकसित केली गेली.
त्यापूर्वी लेखनासाठी हाडे, कापड, बांबू, लाकूड या वस्तूचा वापर केला जात होता.
भारतामध्ये मुद्रणकला 1556 साली आली असे म्हणतात.त्या अगोदर भारतात ताडपत्र व भूर्जपत्र यावर लिहिले जात होते.
आपण इथं असं समजू की हातात भूर्जपत्र आहे.एक उल्लेख असा आहे की पोर्तुगाल मधून जहाजावरून छपाईयंत्र प्रथम गोव्यात आलं.
त्यामुळे हातात पुस्तक कधी आलं ? कुणी आणलं ? हा एक संशोधनाचा विषय आहे.
यातून असंही वाटतं की सरस्वतीची प्रतिमा जी दिसते ती फारच अलिकडची आहे.असावी.तिला आधुनिकतेचा टच दिसतो.)
अवतारकार्य
प्रत्येक देवाचा अवतार हा काहीतरी कारणासाठी झालेला आहे.त्या त्या अवतारात देवाने आपलं “अवतारकार्य” केलेलं आहे.सरस्वती देवीने असे काही “अवतारकार्य” केले आहे का? विशेषत:विद्येच्या क्षेत्रात ज्यामुळे तिला विद्येची देवता अशी पदवी बहाल करण्यात आली.देवत्व बहाल करण्यात आले आहे.तीने समाजाला विद्या दिली,शिक्षण दिले नैतिक शिक्षण दिले. सूचना दिल्या नियम दिले असे काहीतरी असेल जे शिकवले असेल? त्याबद्दल काही कुणाला निश्चित सांगता येईल?
कशाच्या आधारावर मानणार?
(श्री.जनार्दन यांच्या पोस्टवर काही “स्त्रिया” सरस्वतीने बुद्धी दिली नसावी अशी कमेंट करताना दिसल्या त्यावरून असे वाटते की सरस्वती बुध्दी दाती आहे असे मानले जात आहे.मग ही बुद्धी कशाप्रकारे दिली जाते? कोणाकोणाला दिली जाते? तिचे निकष काय आहेत? सर्वाना समान बुद्धी मिळते का? की त्यातही नियम असतात. आणि हे सगळं कसं ठरवलं जातं?
एका “स्त्रीने” कमेंट केली आहे की (सरस्वती नाकारणे) स्वतःच्या आईच मातृत्व नाकारण्यासारखं आहे.हे सगळं तिकडून जोरात मांडले जातेय,ताल ठोक के मांडले जातेय.ते ठीक आहे. पण त्याला आधार काय हा मुद्दा उरतोच आहे.हे सगळं कशाच्या आधारावर मानलं गेलं पाहिजे? फक्त काही लोक म्हणतात म्हणून? “स्त्रियांना” मुद्दाम कोट केलं कारण हे सगळं म्हणणाऱ्या स्त्रिया आहेत हे नोंदवले पाहिजे.मुलांवर संस्कार त्याच करतात.त्या कोणत्या विचारांच्या आहेत हे लपून राहात नाही.)
हा काय आदर्श आहे?
मान्यते नुसार सरस्वती ही ब्रह्मदेवाची कन्या.तिचे अप्रतिम लावण्य पाहून सृष्टिकर्ता ब्रह्मदेव तिच्यावर भाळला व त्याने तिच्याशी लग्न केले काही लोकांचे म्हणने आहे हा बलात्कार होता. आपल्या पित्यापासून वाचण्यासाठी ती सगळीकडे लपत होती असे उल्लेख वरील लिंकवर सापडतात..हे सगळं भयंकर आहे.हे आपण कसे पाहणार आहोत? काय आदर्श आहे हा? वरील एकूण सर्व प्रश्न जर एखाद्या बुद्धीप्रामाण्यवादी व्यक्तीस पडले आणि त्याला हे पटलं नाही तर त्याबद्दल आपण काय करणार आहोत? त्याला मोडीत काढणार का? इथं चुकीचं कोण ठरतं? हीच गोष्ट डॉ. यशवंत मनोहर यांनी केली.त्यांना वरील प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत.कुणी दिली नाहीत.आम्ही मानतो म्हणून तुम्ही माना असा अट्टाहास करणे योग्य ठरत नाही.ठरतो का?
यावरून महात्मा जोतीराव फुले ब्रह्मादेवास बेटीचोद म्हणतात.
लहान असताना पहिल्यांदा वाचलं तेव्हा मलाही हे धक्कादायक वाटलं होतं.
परंतु हे वाक्य अक्षरश: दस्तुरखुद्द क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुल्यांचे आहे.
आणि त्यात चुकीचं देखील काही नाही. कारण ज्याप्रकारे पुराणात वर्णन आहे त्या वर्णणावरच हे आधारलं आहे.
गुलामगिरी ग्रंथ
सदर ग्रंथातील वरील संभाषण हे धोंडीबा आणि जोतीराव यांच्यातील आहे.गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग ,मंत्रालय,मुंबई 4000032 यांनी प्रकाशित केला असून या ग्रंथासाठी अनेक मान्यवरांनी काम पाहिले आहे.समितीचे अध्यक्ष ना. डॉ. पतंगराव कदम होते.सदस्य डॉ. य. दि. फडके होते.( य.दि. फडके स्वत: ब्राह्मण आहेत हे लक्षात असावं) तसेच साहित्यिक लेखक हरी नरके हेही सदस्य होते.
ही माहिती देण्याचे कारण ही माहिती लोकाना खरी आहे का याबद्दल साशंकता वाटू शकते,परंतु ती मुद्रित स्वरूपात आहे आणि ती महाराष्ट्रशासनानेच प्रकाशित केलेली असून लेखकाने यात पदरचा एकही शब्द घातलेला नाही.
(हा ग्रंथ इथे उपलब्ध आहे. इथे क्लिक करा. )
जोपर्यंत आपल्याला वस्तुस्थिती माहीत नसते,मूळ माहीत नसते,
इतिहास माहीत नसतो तोपर्यंत आपल्या धारणा आपले मानणे हेच सर्वश्रेष्ठ आहे असा आपला समज आहे.
तो कसा फसवा तथ्यहीन आणि तकलादू आहे हे वरील उदाहरणावरून आपण समजून घेऊ शकतो.
आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की हे संस्कार आपण मुलांवर करणार आहोत काय? किती पालक यासाठी तयार आहेत?
सरस्वतीचा मुद्दा हा इथे संपतो आहे.
आता सावित्रीबाईंबद्दल दिलेले सोयीचे कोट पाहू –
सावित्रीबाई फुलेंनी ती कविता लिहिली हे सत्य आहे.यात न मानण्यासारखे काहीच नाही.परंतु ती त्यांनी लिहिली म्हणून आता तुम्ही मानलीच पाहिजे असा कुठेही नियम नसतो,नाही.व्यक्ती बदलतात,बदल हा निसर्गाचा नियम आहे. असं भगवान बुद्ध म्हणतात.सावित्रीबाई फूलेंच्या धारणा पुढे बदललेल्या आपल्याला दिसतील.
यासाठी मी त्यांची काही भाषणे आणि कविता व अभंग इथे देतो म्हणजे आपल्याला समजून घेता येईल.
दैव देवतांच्या नादी लागून इथल्या लोकांचा अध:पात
सावित्रीबाई फुले इथं स्पष्टपणे म्हणत आहेत की दैव देवतांच्या नादी लागून इथल्या लोकांचा अध:पात झालेला आहे.श्री.जनार्दन यांनी सरस्वतीची कविता पोस्ट करून म्हटले आहे की “सावित्रीबाई फुले यांनी केवळ देवी सरस्वतीच नव्हे तर सगळ्याच देव-देवतांचा आदर केला आहे. त्यांनी लिहिलेली शिवस्तुती याचे प्रमाण आहे. तसेच ‘काव्यफुले’ ह्या त्यांच्या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर चित्रित असलेले शिवपार्वती यांचे छायाचित्र हे देखील आदराचे आणि श्रद्धेचे द्योतक आहे.”
श्री.जनार्दन यांच्यापोस्टवर, मी, “सावित्रीबाई आणि जोतीबा फुले तुम्हाला पचणार नाहीत.झेपणार नाहीत” हे यासाठीच म्हणालो होतो.श्री.जनार्दन यांनी वरील प्रमाणाचे काय करायचे आहे ? याबद्दल आम्हाला समजावले पाहिजे.सावित्रीबाई फुले जर अगोदर शिवस्तुती करत होत्या. सरस्वतीबद्दल लिहीत होत्या देव-देवतांचा आदर करत होत्या तर नंतर त्यांची धारणा का बदलली आहे?
त्या हिंदू संस्कारात वाढल्या हे खरं आहे. आपले सगळेच पूर्वज त्यात वाढले त्यामुळे तेव्हाच्या या धारणा असणे साहजिकच आहे. परंतु जेव्हा माणसाला प्रश्न पडायला लागतात माणूस विचार करायला लागतो तेव्हा मात्र जुन्या धारणा हळूहळू गळून पडायला लागतात.
वरील अभंगात सावित्रीबाईंनी स्पष्टपणे दैववाद नाकारला असल्याचे दिसते आहे.
सध्या देशात शेतीवर आंदोलन सुरू आहे. त्यावरही त्याकाळात जे सावित्रीबाईंनी लिहिलेलं आहे ते आजही किती सुस्पष्ट वास्तव आहे हे समजून येत आहे.
खोटा इतिहास लिहिणाऱ्यांच्याबद्दल ही त्यांनी वर आसूड ओढलेला आहे.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले तुम्हाला मान्य आहेत? झेपणार आहेत?
बळी राज्याची त्यांनी लिहिलेली ही वरील मते आहेत.सांगा आता हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले तुम्हाला मान्य आहेत? झेपणार आहेत? या त्यांच्या मांडणीचे काय करणार आहात?
सर्व संदर्भ सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय
(लिंक – इथे क्लिक करा )
प्रकाशक :
सचर्व,
महाराष्ट्र राज्य साचहत्य आचि संस्कृ ती मंडळ,
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय इमारत,
चतसरा मजला, १७२, ग्रंथसंग्रहालय मागच,
दादर (पूवच), मुंबई ४०० ०१४
सरस्वतीच्या अस्तित्वाचा पुरावा नाही
बरं हे सर्व महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे,संपादक होते डॉ.मा. गो. माळी आणि त्याचे अध्यक्ष होते.
साहित्यिक मधू मंगेश कर्णिक त्यांना सरकारने पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे.
या कामावरून हे डोळस आणि बुध्दीप्रामाण्यवादी आहेत असे म्हणता येईल. आपण आहोत का?
यात आणखी समजून घेण्यासाठी दिवंगत विद्या बाळ यांची बदलत गेलेली धारणा इथं खूपच महत्वाची आहे.
आणि त्या स्वत: काय म्हणतात हेही पाहा. विद्या बाळ यांची मुलाखत
विद्या बाळ या हिंदू धर्मीय अन ब्राह्मण त्या भाषणात असं म्हणत की “सरस्वतीच्या अस्तित्वाचा पुरावा नाही.
सावित्रीच्या अस्तित्वाचा पुरावा मात्र आहे.हिंदू देवीला नमन करून अन्य धर्मीयांच्या मुलांनी का शिकावे?”
सरस्वती नाकारणाऱ्या विद्या बाळ यांचे आपण काय करणार आहोत?
जन्माने ब्राह्मण धर्माने हिंदू असणाऱ्या विद्या बाळ या द्वेष करणाऱ्या होत्या काय?
श्री.जनार्दन म्हणतात समानतेचा आग्रह धरणार्या गटाचीच समानतेची मानसिकता नाहीय.खरी समानता अस्तित्त्वात आली, तर विद्रोहाला जागा उरणार नाही, हा भयगंड त्यांना स्वस्थ बसू देत नसावा.मी स्वत: जन्माने हिंदू आहे. पण, आजपर्यंत अन्य कुठल्याही धर्माला मी दोष दिलेला नाही.
श्री.जनार्दन यांचे सावित्रीबाई फुले,क्रांतीसूर्य जोतीराव फुले,यांचे विचार वाचून काय वाटते? ते समानतावादी नव्हते असं त्यांचं मत आहे का?
माझेच काही मित्र ब्राम्हणांना दोष देतात आणि त्यायोगे संपूर्ण हिंदू धर्माला दोष देतात. आता प्रत्येक हिंदू ब्राम्हण नसतो ना..?
सुधारणावादी असणे म्हणजे द्वेष करणे असते का?
विद्रोह म्हणजे काय? हे श्री.जनार्दन यांना समजलं आहे का? य. दि. फडके , मधू मंगेश कर्णिक, विद्या बाळ हे समानतावादी होते आहेत? की असमानतावादी आहेत? हे लोक ब्राह्मण आहेत.डॉ.नरेंद्र दाभोळकर ब्राह्मण होते त्यांचा खून करणारे सुद्धा पकडले गेलेले आरोपी हिंदुच आहेत. मग नेमके चुकीचे कोण वाटते? डॉ. नरेंद्र दाभोळकर हिंदू धर्मात सुधारणारा करणारे की हिंदू धर्माला दोष देणारे? तुम्हाला काय वाटतं?
वरील सर्व मंडळी ही जन्माने हिंदू आहेत त्यातही काही ब्राह्मण आहेत. तुम्ही द्वेष केला नसेल तुम्ही कोण आहात ते तुम्ही सांगितलं आहे.तुम्ही हिंदू आगरी आहात.परंतु माळी आणि ब्राह्मण हे सुद्धा जे विचार मांडत आहेत तेच विचार आजचे तरुण आणि इतर मांडताना दिसतात मग यात द्वेष कुठून आला? सुधारणावादी असणे म्हणजे द्वेष करणे असते का? तुमचं बेसिक इथं गंडलेलं आहे.
तुम्ही एके ठिकाणी म्हटलं आहे. मी दहावीनंतर डिप्लोमाला गेलो. त्यामुळे जातीचा दाखला वगैरे दाखविण्याची वेळ आली नाही.कोणतीही ‘सवलत’ न स्वीकारता कॉलेजात गेलो.
आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे.
तुम्हाला आरक्षण म्हणजे “सवलत” वाटली आहे.हा बेसिक गोंधळ आहे.हिंदुत्ववादी लोकानी तो चुकीचा समज समाजात रुजवला आहे. आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे.त्याबद्दल तुम्ही अभ्यास केला पाहिजे.तुम्हाला तुमच्या जातीने कधी काही वाकडं वा सरळ केलं नाही. असं तुम्ही जे म्हणत आहात ते समाजसुधारकांनी हिंदू धर्मातील चुकीच्या गोष्टींना “नकार” देत सुधारणा करत आजवर जे मुक्त वातावरण निर्माण झालं त्याचा हा परिणाम आहे. की तुमचं काही वाकडं वा सरळ झालेलं नाही. अन्यथा तुम्हाला दहावी सुद्धा करता आली नसती हे आपल्या देशाचं वास्तव आहे.नकार यासाठी महत्वाचा ठरतो.
चुकीच्या गोष्टींना “नकार” दिला नसता तर…
तुम्ही एकमेव या गैरसमजाचे शिकार नाही आहात.असे अनेक लोक आहेत.ज्यांना वाटतं आज आपण जे आहोत ते आपल्या स्व-कर्तुत्वावर अपने दम पर,पण हे खरं नाही,हे सत्य आहे पण अर्धसत्य,आज आपण समाजात मुक्तपणे ज्या गोष्टी करतो त्यासाठी चार्वाक बुद्धा पासून छत्रपती शिवाजीमहाराज,फुले दांपत्य ते आगरकर छत्रपती शाहूमहाराज ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते अलिकडचे अंधश्रद्धा निर्मूलनपर्यंत नरेंद्र दाभोळकर या सर्वांच्याच अथक परिश्रम आणि त्याग कष्ट इत्यादींचा हा आजचा समाज आहे.तो तसा पूर्वी नव्हता. यांनी तो बदलवला आहे. त्यांनी त्यावेळी चुकीच्या गोष्टींना “नकार” दिला नसता तर तुम्ही आम्ही कुणीच सोशल मिडिया सुद्धा वापरत नसतो,तर आपली जातीला नेमून दिलेली कामे करत बसलो असतो.या धार्मिक सामाजिक बदलांचा अभ्यास न करता मत मांडत राहिल्याने बराचकाळ आपण एकाच बाजूने विचार करत राहतो.
मला आशा आहे की एवढे विस्तृतपणे मांडल्यावर,पुरावे दिल्यावर तुम्हाला हा विषय समजला असेल.ही खूप दीर्घ पोस्ट झाली म्हणून फेसबुकवर हे लिहिता आले नसते.
आता आजच्या घडीला काय करू शकतो?
थोडं पुन्हा मागे जातो हा खालील श्लोक मी स्वत: दहावी पर्यंत म्हणत आलो.कॉलेजमध्ये असं काही नव्हतं.पण शाळेत हे संस्कार करण्यात आले.हा सरस्वती श्लोक मोठा आहे.याचे हे पहिलेच कडवे.आमच्याकडून वदवून घेतले जाई. त्यावेळी या श्लोकाचा अर्थ आम्हाला समजण्याचे कारण नव्हते,ना आम्हाला कुणी तो समजावून दिला.आजही मला त्याचा अर्थ माहीत नाही,परंतु आजही मी न चुकता हे म्हणू शकतो.
या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता |
यावीणावर दण्डमंडितकरा, या श्वेतपद्मासना ||
या ब्रह्माच्युतशंकरप्रभ्रृतिभिर्देवै: सदा वन्दिता |
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥
सरस्वती ही वैदिक देवता आहे.ती बहुजणांची देवता नाही.
शाळेत आपण नकार देवू शकत नाही.हे लक्षात घ्या आम्हाला ही भाषाही कळत नव्हती,ती आपली बोलीभाषा नाही.मातृभाषा नाही.बोलताना आम्ही तोंड दाबून हसत राहायचो.आमच्या शाळेत मराठा माळी ब्राह्मण कोळी सगळेच होते .मी माझ्या विभागात मुंबईत महाराष्ट्रात सरस्वती देवीची मंदिर आजतागायत पाहिलेलं नाही.म्हणजे ते असेलच कुठेतरी माझ्या पाहण्यात नाही. सरस्वती ही वैदिक देवता आहे.ती बहुजणांची देवता नाही.ती ब्रह्मा म्हणजेच ब्राह्मण ज्याच्या मुखातून जन्म घेता झाला त्याची पुत्री.आणि त्याबद्दलची माहिती वर आलेली आहेच.हे सगळं बहुजन समाजावर सांस्कृतिक आणि धार्मिक वर्चस्व स्थापित करण्यासाठी थोपवलं जातं,अगदी बेमालूमपणे.एवढं की ओबीसी असणारे आगरी जातीचे श्री. जनार्दन त्यासाठी मैदानात उरतात.हे एवढं समरस झालं आहे भिनलं आहे. भिनवलं गेलं आहे.तरीही असो.
तर ज्याना कुणाला देवी सरस्वतीची आराधना करायची असेल,पूजा करायची आहे,मानायची त्यांनी ती मानावी.त्याबद्दल माझे किंवा इतरांचे काही म्हणने असू शकत नाही.आपण त्यावर भाष्य करू शकत नाही.करू नये.तुमचा हक्क अधिकार भले त्यामागे अज्ञान असेल अंधश्रद्धा असेल तो हिरावून घेणे हे एका पातळीवर अयोग्य ठरते.
हिंदू विरोधी ब्राह्मण विरोधी असं चुकीचं रंगवले
कारण आपल्या भारतीय संविधानातच उपासनेचा अधिकार आपण मान्य केलेला आहे.त्यामुळे तुम्ही तिची उपासना जरूर करावी.इतर लोक फक्त तुम्हाला वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न करतील.किंवा ते मानण्यास नकार देतील कारण त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीला ते पटणार नाही.हेच कारण डॉ.यशवंत मनोहर यांचे आहे.त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीला हे पटलं नाही.त्यांनी असे कुठेही म्हटले नाही की विदर्भ साहित्य संघाने सरस्वती देवीची प्रतिमा कायमस्वरूपी हटवावी,तिचे पूजन करणे बंद करावे.
त्यांनी सांगितलं मी करू इच्छित नाही.यात कुणाचाही अपमान होत नाही.तुमच्या कृतीला कुणी नकार देत नाही.तुम्ही ती कृती इतरांवर लादता तेव्हा नकार दिला जात आहे.आणि नेहमीप्रमाणे हा विषय चुकीच्या पातळीवर नेवून ठेवल्याने तो हिंदू विरोधी ब्राह्मण विरोधी असं चुकीचं रंगवले गेले.श्री जनार्दन सतत घरच्या कार्यक्रमाचा देव्हाऱ्याचा उल्लेख करतात,मी तुमच्या घरी यायला तयार आहे.पाहुणचार देखील घ्यायला तयार आहे. तुमचा देव्हारा किचनमधला हॉल मध्ये येवू द्यात त्याच्या समोर आपण बसू शकतो.
तुमच्या घरात काय असावं हे मी तुम्हाला नाही सांगू शकत असं समाजात सुद्धा कुणी कुणाला सांगू शकत नाही.सांगू नये.
हा व्यक्तीचा खाजगी विषय आहे.तीच गोष्ट आपल्या धारणा इतरांवर थोपविण्याची आहे.संघर्ष इथे निर्माण होतो.
..तेव्हा मात्र माझा स्पष्ट नकार असेल
कर्मकांड आणि मानवी व्यवहार याची गल्लत नको.मी देवाचा प्रसाद खाल्लेला आहे खात आलो आहे.त्याने माझा नास्तिक असण्याचा देवाचे अस्तित्व न मानण्याचा संबंध नाही.ते अन्न आहे.मनुष्याने तयार केलं आहे.मी ते कोणताही किंतु न ठेवता सेवन करेन.चिकित्सक असणं आणि श्रद्धा अंधश्रद्धा यातला फरक शिकला पाहिजे. जेव्हा तुम्ही म्हणाल तुला ही देवी मानलीच पाहिजे तिच्यासमोर तू नतमस्तक झालेच पाहिजे तेव्हा मात्र माझा स्पष्ट नकार असेल.
सावित्रीबाई फुले माळी समाजाच्या हिंदू धर्मीय होत्या, त्यांचे पती क्रांतीसूर्य जोतीराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची निर्मिती केली.
या सावित्रीबाई मला आदरणीय आहेत. ज्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा काढली.चालवली.त्या भिडेवाड्यास मी भेट दिलेली आहे.त्यांचे अस्तित्व मला शोधता येते सापडते.जे अस्तित्वात आहे.ज्याना समाजासाठी त्याग केला कष्ट उपसले आणि समाज घडवला त्या सर्वांचा जात धर्मापलिकडे मी आदर करतो.करत राहीन.
हेही वाचा…आहे मनोहर अन यशवंत ही
हेही वाचा.. .सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून साहित्यीक यशवंत मनोहरांनी विदर्भ साहित्य संघाचा नाकारला पुरस्कार
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)