“ए सर्किट ये 2 अक्टुबर क्या है”
“भाई ड्राय डे है, स्टॉक लेके रखना क्या?”
“ड्राय डे ? कायकू”
“पता नही भाई पर पता करके बताता हूं…”
”बर्थ डे है… भाई बापू का”
”कौन बापू? किसका बापू?” लगे रहो मुन्नाभाई या सिनेमातील मुन्नाभाई आणि सर्किटमधला हा सिन तुम्हाला आठवला असेलच. हा सिन बराच अंशी वास्तवाजवळ जातो. कारण अनेकांना 2 ऑक्टोबर हा दिवस गांधी जयंतीपेक्षा ड्राय डे म्हणूनच अधिक लक्षात असतो. या दिवशी टिंगल टवाळी करणा-यांची संख्या देखील कमी नाही. गांधीजी आणि दारू यांचा काय संबंध आहे? 2 ऑक्टोबर या दिवशी ड्राय डे का असतो? तर चला या मागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करू.
दारू हा त्यांच्या धर्म आणि संस्कृतीचा एक भाग
जेव्हा भारताचे संविधान लिहिले जात होते, तेव्हा दारूबंदीवर दोन्ही बाजूंनी संसदेत चांगलीच चर्चा रंगली.
संसदेत दारू पिणारे व दारू न पिणारे असे दोन्ही प्रकारचे लोक होते.त्यामुळे अनेकांची चांगलीच गोची झाली होती.
काहींना वाटायचे की भारतात दारूबंदी असावी तर काहींचा याला विरोध होता.विशेषत: गांधीवादी नेते हे दारुबंदीच्या बाजूने होते.
चर्चेदरम्यान आदिवासी नेते जयपाल सिंग मुंडा यांनी धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत दारुबंदीला विरोध दर्शवला.
दारूचा आदिवासींच्या धर्माशी आणि संस्कृतीशी संबंध असल्याचे सांगत
आदिवासी समाजाचा कोणताही धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम हा दारूविना (तांदळाची दारू) होत नाही.
जर आपण प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य देत असू आणि दारू हा त्यांच्या धर्म आणि संस्कृतीचा एक भाग असेल तर
त्याला विरोध करणे योग्य नाही असे मत मुंडा त्यांनी मांडले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी यावर मध्यममार्ग काढला
ओरिसाचे लक्ष्मीनारायण साहू यांनी ओरिसाच्या काही आदिवासी जमातींचे उदाहरण देत मुंडा त्यांना विरोध केला. त्यांनी दारू पिणे हा जरी आदिवासींच्या संस्कृतीचा भाग असला, तरी ती ज्या दारूचे सेवन करतात ती सौम्य दारू असते. त्याची नशा त्यांना वेडा करत नाही. प्रथा, परंपरेच्या नावाखाली चुकीच्या गोष्टींना समर्थन करणे योग्य नाही. सतीसारख्या प्रथा आपण बंद केल्या. शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यांनी दारू पिणे योग्य नाही. त्यामुळे धार्मिक प्रथा परंपराच्या आडून दारूला समर्थन नको अशी भूमिका त्यांनी मांडली.
या चर्चेचे काँग्रेसचे महावीर त्यागी यांनी जर देशात दारूबंदी नसेल तर यात गांधीही नसेल, अशी दारूबंदीच्या बाजूने कठोर भूमिका मांडली. जिथे गांधीजी असेल तिथे दारू राहू शकत नाही व जिथे दारू असेल तिथे गांधीजी नसेल. त्यामुळे त्या गोष्टीला नाही तर त्या जागेला आक्षेप असायला हवा अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सहमती दर्शवली.
दोन्ही बाजूंनी घमासान चर्चा झाल्यानंतर अखेर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी यावर मध्यममार्ग काढला. त्यांनी दारूबंदी करावी की नाही हा निर्णय राज्यसरकार घेईल तसेच ज्या भागात दारूचा संबंध धर्म, प्रथा, परंपरांशी आहे त्या भागातील निर्णय जिल्हा प्रशासन घेईल. असा यावर तोडगा काढला.
जिथे गांधी यांचे वास्तव्य होते तिथे दारूबंदीचा निर्णय
आज जरी काँग्रेसवर महात्मा गांधीच्या विचारांचा प्रभाव फारसा दिसत नसला तरी
त्या काळात मात्र काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांवर गांधींच्या विचारांचा चांगलाच पगडा होता.
जिथे गांधी यांचे वास्तव्य होते तिथे दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला.
1960 साली संपूर्ण गुजरात राज्यात दारूबंदी करण्यात आली.आज गुजरातसह बिहार, मिझोरम तसेच नागालँड, लक्षद्वीप व मणिपूरच्या काही भागात दारूबंदी आहे. याशिवाय गांधीजींचे वास्तव्य असलेल्या सेवाग्राम आश्रमामुळे महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यात तसेच गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे.
2 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशात ड्राय डे असतो का?
तर याचे उत्तर हो आहे. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी व 2 ऑक्टोबर या दिवशी संपूर्ण देशभरात ड्राय डे असतो. ड्राय डे कोणत्या दिवशी ठेवायचा व कोणत्या दिवशी नाही हा निर्णय़ राज्यसरकारच्या अधिन येतो. राज्य सरकार जयंती, सण, उत्सव इत्यादी गोष्टी गृहीत धरून ड्राय डे जाहीर करते. याशिवाय स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारीही दारूबंदीचा निर्णय घेतात. उदा. निवडणूक, स्थानिक सण उत्सव इ.
2 ऑक्टोबरला ड्राय डे का?
आता आपण मुख्य मुद्याक़डे येऊ. गांधीजींनी आयु्ष्यभर व्यसनमुक्तीसाठी काम केले. त्यांची दारूबंदीची भूमिका इतकी कठोर होती की त्यांनी जर मला 24 तासांसाठी जर हुकुमशाह कराल तर मी या देशात सरसकट दारूबंदी करेल, असे म्हटले होते. गांधीजींच्या विचारांचा आदर म्हणून गांधीचे जन्मस्थळ असलेल्या गुजरातमध्ये 1960 पासून सरसकट दारूबंदीचा निर्णय़ घेण्यात आला. सेवाग्राममध्ये गांधीचे वास्तव्य असल्याने संपूर्ण वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. याशिवाय देशातील देशभरात गांधीजींच्या व्यसनमुक्तीच्या विचारांना आदर करत तसेच त्यांना आदरांजली म्हणून राज्य सरकार 2 ऑक्टोबर या दिवशी ड्राय डे ठेवतात. दारुचा महापूर असणा-या गोव्यासारख्या ठिकाणीही 2 ऑक्टोबर या दिवशी ड्राय डे असतो.
2 ऑक्टोबर हा व्यसनमुक्ती सप्ताह
अलिकडेच महाराष्ट्रात गांधी जयंतीपासून एक आठवडा व्यसनमुक्ती सप्ताह पाळला जातो. त्यामुळे महाराष्ट्रात व्यसनमुक्ती सप्ताहाचा पहिला व शेवटचा दिवस ड्राय डे असतो. याशिवाय गांधीहत्या करण्यात आलेला 30 जानेवारी हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो. या दिवशीही अनेक राज्यात ड्राय डे असतो.
2 ऑक्टोबरला ड्राय डे असावा की नाही यावर मतमतांतरे आहेत. इतर महापुरुषांच्या जयंतीला का नाही याच दिवशी का? असाही युक्तीवाद केला जातो. तर जयंतीला ड्राय डे ठेवण्यात काहीही तथ्य नाही असा दुस-या बाजुनेही युक्तीवाद केला जातो. आज जरी गांधीच्या विचारांचा सर्वसामान्यांना विसर पडत असला तरी 2 ऑक्टोबर मात्र ड्राय डे मुळे चांगलाच लक्षात राहतो.
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)