संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परिश्रम, कायदेविषयक, बौद्धिक योगदान आणि नैतिक अधिष्ठान किती होते हे सर्वज्ञात आहे.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला असला तरी तो कसा चालवला जाणार यासाठी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना स्वीकृत केली गेली तो संविधान दिन आणि २६ जानेवारी १९५० रोजी २१ तोफांच्या सलामीसह भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी ध्वजारोहण करुन भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केले, त्याची अंमलबजावणी झाली. तेव्हापासून आपल्या देशाला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक लोकशाही राष्ट्र म्हणून जगात ओळख मिळाली. संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व धर्मनिरपेक्षता या मुलभूत तत्वांवर देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे, अबाधित राखण्याचे महान, अनमोल कार्य केले आहे म्हणून आपला देश अखंड, सार्वभौम आहे. अनेक जाती, धर्म, रुढी, परंपरा, पंथ, वर्ण व्यवस्था असतांनाही संविधानाने भारताचे अखंडत्व अबाधित राखले आहे. २६ जानेवारी १९५० पासून पुर्वीची सर्व जाचक व्यवस्था, गुलामगिरी, ब्रिटिश कायदे संपुष्टात येऊन भारतात संविधानिक प्रजासत्ताक कार्यप्रणाली अस्तित्वात आली.
कोणत्याही परिस्थितीत डॉ. आंबेडकर घटना समितीत येणार नाहीत याची पुर्ण काळजी घेतली आहे
संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परिश्रम, कायदेविषयक, बौद्धिक योगदान आणि नैतिक अधिष्ठान किती होते हे सर्वज्ञात आहे. त्या संदर्भात संविधान सभेचे अध्यक्ष आणि पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, मसुदा समितीचे सदस्य टी. टी. कृष्णमाचारी, काझी सय्यद करिमुद्दीन व ए. के. अय्यर आणि नाथ पाई अशा अनेक मान्यवर मंडळींनी तर ब्रिटनचे सुप्रसिद्ध घटना तज्ञ सर व्हिलियम आयव्हर जेनिंग्स, बाबासाहेबांचे गुरु अमेरिकेतील तत्वज्ञ जॉन डेवी, अमेरिकन एलेन शॅकल, अर्नेस्ट बार्कर, लॉर्ड लुई माऊंटबॅटन, प्रसिद्ध अभ्यासक पॉल ब्रास, मोरिस जोन्स अशा परदेशी संविधानतज्ज्ञ, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि विधिज्ञ विद्वानांनी अत्यंत उच्च दर्जाचे गौरवोद्गार काढले आहेत, कौतुक केले आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी तर, ‘आम्ही कोणत्याही परिस्थितीत डॉ. आंबेडकर घटना समितीत येणार नाहीत याची पुर्ण काळजी घेतली आहे’ असे जाहीर वक्तव्य केले होते. पण नंतर त्यांनीही बाबासाहेबांबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. भारतीय संविधान निर्मिती करण्यासाठी अतुलनीय बुध्दी, कायदेविषयक प्राविण्य, अद्वितीय विद्वत्ता, सामाजिक तत्वज्ञान, संघराज्य, अर्थकारण, समाज रचना, सखोल आकलन तसेच व्यापक सामाजिक दृष्टीकोन आणि आधुनिक युक्तिवाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होता. मसुदा समितीचे सल्लागार बी. एन. राव असले तरी, समितीचे नेतृत्व करण्यासाठी अत्यावश्यक राजकीय, सामाजिक आणि कायदेविषयक तत्वज्ञान बाबासाहेबांकडे होते. मात्र, संविधानावर टिका टिप्पणी करुन, संविधान बदलासाठी परस्पर विरोधी वक्तव्ये करणारी मंडळी बी. एन. राव यांना संविधान निर्माता म्हणून आता पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
बी. एन. राव हे मसुदा समितीवर निवडून आलेले सभासद नव्हते तर ते ब्रिटिशांनी सल्लागार म्हणून नियुक्त केलेले ब्रिटिश काळातील प्रशासनिक पदावरचे अधिकारी होते. जगातील काही देशांच्या संविधानाचा तुलनात्मक अभ्यास करुन त्यांनी प्राथमिक आराखडा तयार करुन दिला असला तरी तो अंतिम किंवा मसुदा नव्हता. मात्र काही मंडळी सामाजिक, धार्मिक, राजकीय हेतूने तो फर्स्ट ड्राफ्ट असल्याचा दावा करतात. पण, त्यामागे खोडसाळ जातीय मानसिकता, षडयंत्र आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ होते. त्यांनी ६० पेक्षा अधिक देशांची संविधाने अभ्यासलीच नाही तर समाजव्यवस्था, आर्थिक तत्वे, राजकीय रचना, आर्थिक वास्तवांना बसवून, बहुजाती समाजांची आव्हाने या सर्वांचा तुलनात्मक अभ्यास करुन नव्याने सर्वसमावेशक मांडणी करुन सर्वोत्तम आणि सुसंगत संविधान निर्माण केले. त्यामुळे संविधानाला एक सक्षम सामाजिक आणि कायदेविषयक चौकट प्राप्त झाली. बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने हजारो दुरुस्त्यांचे खूप मोठं परिक्षण करुन संविधानाचा सुधारित अंतिम मसुदा तयार केला. बी. एन. राव हे मसुदा समितीचे ब्रिटिशांनी नियुक्त केलेले सल्लागार म्हणून संविधान निर्मितीच काम पुर्णत्वास जाईपर्यंत भारतात थांबायला पाहिजे होते. पण, संविधान निर्मितीच काम चालू असतांनाच ते भारत सोडून परदेशात निघून गेले आणि ३० डिसेंबर १९५३ रोजी त्यांचे परदेशातच निधन झाले.
संविधान सभेच कामकाज सुमारे २ वर्षे ११ महिने १८ दिवस चालले. संविधान निर्मिती करताना संविधान सभेत प्रत्येक मुद्दा तपासूनच संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे. संविधान सभेमध्ये ज्या वादळी चर्चा, वाद प्रतिवाद झाले आणि त्याला तार्किक, कायदेशीर आणि सामाजिक दृष्टीकोन देत उत्तर देण्याची मोठी जबाबदारी प्रामुख्याने बाबासाहेबांनीच सांभाळली. मसुदा समितीने केलेले काम हे मार्गदर्शनापेक्षा खूप मोठे, कठीण आणि विधानिक होते. त्यामुळे भारतीय संविधानाचा पाया अधिक मजबूत झाला. भारतीय संविधानाने देशाच्या एकात्मतेला आधार दिला असून स्वतःला आधुनिक, वैज्ञानिक जगाशी आणि भारताच्या प्राचीन परंपरा यांच्याशी समतोल साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
संविधानातील राजकीय, आर्थिक, सामाजिक समतेच तत्व आणि व्यक्तीची प्रतिष्ठा राखणारी एकता ज्यांना मान्य नाही, भारतीय संविधान मोडीत काढा, जंतरमंतरवर संविधान दहन केले जाते तेव्हा कधी ज्यांच्या प्रतिक्रिया किंवा भूमिका स्पष्ट होत नाहीत, संविधानावर टिका टिप्पणी करणारे, नवीन संविधान निर्माण करणारे बी. एन. राव यांना संविधान निर्माता म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या कुटील, विकलांग मानसिकतेची कीव येते. तसे पाहिले तर, भारताच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. एवढे बाबासाहेबांचे या देशावर परोपकार आणि प्रत्येक जडणघडणीत फारच मोठा वाटा आहे. देशाच्या प्रत्येक क्षेत्रात बाबासाहेबांचे फार मोठे योगदान असून, भारत देशासाठी दूरदृष्टी ठेवून त्यांनी अनेक अनमोल विकासात्मक भविष्यकालीन निःपक्षपाती यशस्वी धोरणे राबविली आहेत.
जगाच्या पाठीवर बाबासाहेब एकमेव असे अजरामर दिग्विजयी, जागतिक विद्वत्ता लाभलेले महान नेते आहेत,
त्यांच्या पश्चात त्यांचे वाढते प्राबल्य इथल्या समाज व्यवस्थेला सहन कसे होणार ?
बाबासाहेबांना संविधानाचे मुख्य शिल्पकार म्हणून मिळालेला जागतिक सन्मान त्यांच्या संकुचित अजेंड्यांना नक्कीच सोयीचा नाही.
कारण, बाबासाहेबांचा प्रभाव जितका मोठा तितक्याच प्रमाणात त्यांना अस्वस्थता वाटणार.
बाबासाहेबांची विचारधारा लोकशाही, धर्मनिरपेक्षता, आधुनिक आणि सामाजिक न्यायावर आधारित आहे.
त्यामुळे सामाजिक राजकीय प्रतिमा बदलण्यासाठी संविधान निर्मितीचे श्रेय बी. एन. राव यांना देऊन,
बाबासाहेबांचे परिश्रम, बौद्धिक योगदान आणि नैतिक अधिष्ठान झाकण्याचा बालिशपणा, दिशाभूल, खोडसाळपणा चालू आहे.
जाहीर कार्यक्रमातून, पुस्तकाद्वारे बी. एन. राव यांना संविधान निर्माता म्हणून पुढे आणण्याचा कितीही प्रयत्न केला जात असला तरी,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच भारतीय संविधानाचे एकमेव मुख्य शिल्पकार असल्याचे
त्यांचे परिश्रम, बौद्धिक योगदान आणि नैतिक अधिष्ठान, दूरदृष्टी, ऐतिहासिक नोंदी तसेच मान्यवर सहकारी आणि जागतिक तज्ज्ञांची मते अधोरेखित करतात..

मिलिंद कांबळे, चिंचवलकर
लेखक,अभ्यासक आणि वृत्तपत्रीय लेखनाचा तसेच सोशल मिडिया ब्लॉग लेखनाचा दहा वर्षापासूनच अनुभव.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 25,2025 | 10:55 AM
WebTitle – Dr. Babasaheb Ambedkar The unbreakable foundation of the architecture of the Constitution.























































