डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९२२ मध्ये ग्रेज इन येथून बॅरिस्टर- अॅट- लॉ ही पदवी घेऊन ३ एप्रिल १९२३ रोजी मुंबईत परतले. समाजकार्य करावे व अर्थाजना साठी वकिली करावी असा निर्णय त्यांनी घेतला. परंतु डॉ. भीमराव यांच्यापुढे दोन महत्वाची ध्येय होती एक ध्येय म्हणजे. आपली प्रिय पत्नी रमाबाई यांच्या इच्छापूर्तीसाठी आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारणे. आणि दुसरे ध्येय म्हणजे आपल्या अस्पृश्य समाजाचा उद्दार करणे.
आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थित सुधारण्यासाठी त्यांना सरकारी नोकरी मिळवावी लागली असती. पण ते सरकारी नोकरी मिळवू शकत नव्हते. कारण डॉ.भीमराव यांना आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या कार्याबरोबरच आपल्या अस्पृश्य समाजाच्या उद्धाराचे सत्कार्यही करावयाचे होते. ही दोन्ही कार्य करीत राहण्यासाठी स्वतंत्रपणे वकीली करणे योग्य आहे असे त्यांना वाटले. म्हणून परळच्या दामोदर हॉलमध्ये पहिल्या मजल्यावर एक खोली कार्यालयासाठी मिळवली. जून महिन्यात त्यांनी वकिलीच्या प्रॅक्टिस साठी मुंबई उच्च न्यायालयात आपले नांव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला. व ५ जुलै १९२३ रोजी उच्च न्यायालयाने त्यांचे नांव नोंदवून घेतले. वकिली सुरु झाल्यावर आंबेडकर अस्पृश्य समाजाचे असल्याने स्पृश्य समाजाच्या वकिलांनी त्यांना सहकार्य करण्याचे टाळले. अशा स्थितीत बाळकृष्ण गणेश मोडक नावाच्या एका स्पृश्य वकीलाने आंबेडकरांना वकिली करत राहाण्यासाठी सहकार्य केले.
जेधे जवळकर खटला
आंबेडकरांना पहिली केस म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या आडगावच्या महार जातीच्या जाधव बंधूची केस मिळाली. ही केस वर्षभर चालली व यशस्वीही झाली. केसची फी म्हणून आंबेडकरांना सहाशे रुपये मिळाले. तसेच बॅरिस्टर आंबेडकरांनी अनेक महत्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता. ब्राम्हणेत्तर सत्यशोधक चळवळीशी संबधित नेते केशव गणेश बागडे. केशवराव मारुतीराव जेधे. रामचंद्र नारायण लाड आणि दिनकरराव शंकरराव जवळकर या चौघांवर “देशांचे दुश्मन ” हे पुस्तक लिहिण्याच्या कारणांवरून खटला भरण्यात येऊन खालच्या न्यायालयाने त्यांना दोषी मानले होते.
आंबेडकरांनी त्यांची अपील लढवून ऑक्टोंबर १९२६ मध्ये त्या चौघांनाही वरच्या न्यायालयातून निर्दोष मुक्तता मिळवून दिली.
फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील नामांकित वकील ए.बी भोपटकर होते.इंडिया आणि चायना या पुस्तकाचे लेखक फिलीफ स्प्रॅट
यांनाही बॅरिस्टर आंबेडकरांच्या वकिली निशी २६ नोव्हेंबर १८२७ रोजी न्यायालयाव्दारे दोषमुक्त करण्यात आले बॅरिस्टर आंबेडकरांची यशस्वी वकिलांमध्ये गणना होऊ लागली.
भारतीय घटनेचे शिल्पकार
बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार म्हणून सर्व जग ओळखते.अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेबांचे विचार शिल्प आहे बॅरिस्टर बाबासाहेब हे उत्तम वकील होते.तसेच त्यांनी उलट तपासात अनेकांची भंबेरी उडवली व खटल्यातील सत्य न्यायालयासमोर उघड करून अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिला.यांची फार कमी लोकांना माहिती असेल बॅरिस्टर डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने माढा तालुका न्यायालय व सोलापूर जिल्हा न्यायालय पावन झालेले आहे.डॉ.बाबासाहेब जे खटले लढले ते गोरगरिबांसाठी व समाजातील वंचित वर्गाकडून सामाजिक भावनेने लढले. इंग्लंड मध्ये बॅरिस्टरचे शिक्षण घेताना त्यांना अतोनात त्रास झाला. बॅरिस्टर होऊन ते ज्यावेळी भारतात आले व मुंबई उच्च न्यायालयात वकिली चालू केली तेव्हा त्यांना अस्पृश्यतेचा कटू अनुभव आला.बार लायब्ररी मध्ये ते ज्या टेबलावर बसत होते त्या टेबलाकडे उच्चभ्रू समाजातील वकील फिरकत नव्हते.
खरे म्हणजे तो प्रसंगच त्यांचे पुढील अस्पृश्यतेच्या विरुध्दच्या लढ्याचे स्फुलिंग ठरला व त्यांनी अस्पृश्यते विरुद्ध लढा देण्याचे ठरविले.बॅरिस्टर डॉ.बाबासाहेब उलट तपास अत्यंत भेदक होते. ज्येष्ट स्वातंत्र्य सेनानी शंकरराव मोरे व शंकरराव जेधे यांनी पुणे येथे केलेल्या भाषणात थोर विचारवंत आण्णासाहेब भोपटकर यांच्यावर कडक शब्दांत टीका केलेली होती. भोपटकरांनी याबाबत पुणे न्यायालयात मोरे व जेधे यांच्या विरुद्ध खटला दाखल केला होता. डॉ. बाबासाहेब व शंकरराव मोरे..शंकरराव जेधे यांच्यात तीव्र राजकीय वैमनस्य होते. तरीही त्यांनी आपले वकील पत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिले.
आण्णासाहेब भोपटकरांची उलट तपासणी
या खटल्याच्या सुनावणीच्यावेळी आंबेडकरांनी आण्णासाहेब भोपटकरांची भेदक उलट तपासणी केली व उत्तरे देताना.
भोपटकरांची दमछाक झाली.त्यांच्या उलटतपास अपूर्ण राहिला व त्यांनी पुढील तारीख घेतली.
आण्णासाहेब भोपटकर महाराष्ट्रातील नामवंत ज्येष्ठ विचारवंत त्यांची एवढी दमछाक झाली की त्यांनी पुढील तारखेस खटलाच काढून घेतला.
बॅरिस्टर बाबासाहेब यांची कुशाग्र बुद्धी व इंग्रजीवरील असमान्य प्रभुत्व यामुळे न्यायाधीश सुध्दा त्यांचा युक्तीवाद ऐकताना दंग होऊन जायचे..
पुढे बाबासाहेबांनी चंदुलाल शहा यांना देखील आरोपातून सोडवले.बाबासाहेब आंबेडकर शहापूर ब्रिटीश कालखंडात भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सुमारे दोन दशके सहवास शहापूर मधील तत्कालीन रहिवाशांना लाभला. डॉ. बाबासाहेब वकीली व्यवसाया निमित्त शहापूर मध्ये आले होते. शहापूरकरांसाठी ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असलेला बाबासाहेबांच्या सहवासाच्या हा कालखंडातील आठवणी आजही तितक्याच ताज्या असल्याचे जुनेजाणते शहापूरकर सांगतात शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील व्यापारी असलेले चंदुलाल सरुपचंद शहा यांच्या विरुद्द. १९३० च्या इंडियन पिनल कोडच्या कायद्याखाली बेकायदा शस्त्रे व स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. शेवटी हे प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरु असताना शहा यांचे वकील प्रभाकर रेगे यांनी या गुन्ह्यातून तुम्हाला सोडवणे आपणास शक्य नसल्याचे सांगितल्याने शहा हादरून गेले होते यातून आपली सहीसलामत कोण सुटका करेल. असा प्रश्न त्यांना पडला होता यावर उपाय म्हणून तुम्ही दादरच्या हिंन्दू कॉलनी मध्ये राहाणाऱ्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या निष्णांत वकिलांना जाऊन भेटा असा सल्ला रेगे यांनी दिला.
चंदुलाल शेठ यांची निर्दोष मुक्तता
चंदुलाल शेठ म्हणजे लोक त्यांना दादा म्हणायचे. त्या दादांनी बाबासाहेबांची दादरच्या घरी भेट घेतली. त्यावेळी आपल्या एकूणच नियमित कामात व्यग्र असलेल्या डॉ. आंबेडकरांनी ” काय काम आहे हे फक्त दोन मिनिटातच सांगा” अधिक वेळ माझ्या पाशी नाही असे सांगताच शहा यांनी दोनच मिनिटांत आपल्या वरील दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती बाबासाहेबांना सांगितली.पुढची तारीख कोणती आहे हे विचारत डॉ. आंबेडकरांनी न्यायालयात यायची ग्वाही दिली. दिलेल्या शब्दाप्रमाणे डॉ.आंबेडकरांनी ठाणे येथे सत्र न्यायालयात शस्त्र कायद्या प्रकरणी न्यायाधीशांसमोर अवघी दोनच मिनिटे खटल्या नुसार युक्तीवाद केला.या युक्तीवादा नंतर न्यायाधीशांनी चंदुलाल शेठ यांची आरोपातून निर्दोष मुक्तता केली.ते केवळ बाबासाहेबांच्या वकिली बाण्यांमुळे मानधन केवळ ठाणे – दादर रेल्वेचे तिकीट शहा यांनी बाबा साहेबांना फी विषयी विचाराताच त्यांनी केवळ ठाणे- दादर रेल्वेचे तिकीट काढून देण्यास सांगितले. सन १९३० ते १९३८ या कालावधीत शहापुर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात वकील म्हणून अनेक केसस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालविल्या होत्या.
समाज स्वास्थ्य कार :-
असा एक खटला जो आंबेडकर हारुनही जिंकले अभिव्यक्ती स्वातंत्र्य ‘ ही हल्ली चर्चेचा आणि वादाचा विषय झाला आहे. अशीच काहीशी परिस्थिती १९३४ साली होती त्यावेळी डॉ. आंबेडकरांनी र.धों कर्वेची कोर्टात बाजू मांडताना जे विचार व्यक्त केले होते ते आजही तंतोतत लागू पडतात. समाज स्वास्थ्य या कर्व्याच्या मासिका विरुद्धचा हा ऐतिहासिक खटला होता. विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून रघुनाथ धोंडो कर्वे यांनी महाराष्ट्रात सुरु केलेल्या कार्यामुळे ते पहिल्या पासूनच रुढी वाद्यांच्या टीकेचे लक्ष्य ठरले होते. त्यांचा विषयच तसा होता. ते लैंगिक ज्ञानाबद्दल ते बोलायचे लिहायचे जे प्रश्न आजही हलक्या आवाजात बोलले जातात कर्वे ते त्या काळात मुक्तपणे बोलायचे प्रमुख्याने लैंगिक विषयांना वाहिलेल त्याचं ‘ समाजस्वास्थ्य ‘ हे मासिक सगळ्या बंधनाना झुगारत वैयक्तीक प्रश्नांना सार्वजनिक रित्या उत्तर देत त्यासोबतच नैतिक तेच्या शीलतेच्या मुद्द्यावर नवी आधुनिक भूमिका घेत प्रकाशित होत असे.विज्ञानाची आणि वैदकीय शास्त्राची बैठक त्यांच्या या कार्या मागे होती.
वकिलांचा काळा डगला चढवून र.धो कर्व्याच्या मागे पर्वतासारखे उभे राहिले
साहजिकच तेव्हाच्या रुढीवादी समाजतल्या कर्मठ व्यक्ती कर्व्याच्या शत्रू झाल्या होत्या विखारी सा. टीकेसोबतच न्यायालयीन लढायाही कर्व्याच्या वाटयाला आल्या. ते त्या एकांड्या शिलेदारासारखे लढत राहिले. सा. वा राजकीय नेतृत्व इतकं प्रगल्भ नव्हतं की त्याला कर्वे जे विषय हाताळताहेत ते समाजाच्या एकंदरित स्वास्थ्यासाठी आधुनिक समाजासाठी हे अत्यावश्यक होते .अपवाद . फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जे आधुनिक विचारांची कास धरत. वकिलांचा काळा डगला चढवून र.धो कर्व्याच्या मागे पर्वता सारखे उभे राहिले. कर्व्यांची विषय निवड आणि पुराण मतवाद्यांना झोडपून काढणारी त्यांची शैली यांच्या मुळे त्यांच्यावर कर्मठ सनातन्यांनी पहिला खटला गुदरला तो १९३१ मध्ये फिर्यादी तक्रारदार पुण्यातले होते आणि व्याभिचारांचे प्रश्न या लेखामुळे त्यांना अटकही करून २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. कर्वे उच्च न्यायालयात जेव्हा या शिक्षेविरोधात अपीलात गेले तेव्हा हा खटला इंद्र वदन महेता न्यायाधीशां समोर चालला आणि त्यांचे अपील फेटाळले गेले.
कर्व्यांच्या मागचं सनातन्यांच्या खटल्याचं चक्र इथेच थांबले नाही. १९३४ व्या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा त्यांना अटक झाली. यावेळेस कारण होते ” समाज स्वास्थ्य” च्या गुजराती अंकात वाचकांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी दिलेलं प्रश्न क्रमांक ३’ ४ आणि १२ ची उत्तर प्रश्न वैयक्तीक समस्यांबाबत होते. हस्तमैथुन समलिंगी संभोग यासारख्या विषयांवर होते. या विषयाला आणि उत्तरांना अश्लील ठरवत पुन्हा एकदा कर्व्यांच्या वाट्याला न्यायालयातील लढाई आली. पण यावेळेस मात्र ते एकटे नव्हते तोपर्यंत वकील म्हणून प्रख्यात झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे वकील पत्र घेतले.
आंबेडकरांनी टीकेची पर्वा न करता र.धों कर्वे यांच्यासाठी खटला लढला.
त्यानंतर पुन्हा एकदा न्यायाधीश इंद्रवदन मेहता यांच्या समोरच हा खटला चालला. त्यांची नैतिकता अश्लीलता आणि लैंगिकतेच्या आणि कायद्याच्या लढाईत एक दस्तऐवज म्हणून नोंद होते डॉ. आंबेडकरांनी र र.धों कर्व्यांसारख्या एकांडया शिलेदाराचा खटला का लढवावा असं का वाटलं ? बाबासाहेब अर्थात प्रपंचासाठी वकिली करत होतेच. पण या खटल्याचं महत्व त्यांना का वाटलं असावं ?
बाबासाहेब हे दलिताचे नेते होते यात शंका नाही जो दलित समाजाचा पिचलेला आवाज होता.
त्यांला त्यांनी वाचा फोडली यात शंका नाही त्यांचा विचार हा एकंदरीत भारतीय समाजासाठीच होता.
आंबेडकरांनी टीकेची पर्वा न करता र.धों कर्वे यांच्यासाठी खटला लढला.
कर्व्यांचा हा खटला जो बाबासाहेबांनी लढवला त्यात एक वाचक लैंगिक समस्येबद्दल प्रश्न विचारतात आणि कर्वे त्यांना उत्तर देतात.
यासाठी सरकार रूढी वाद्यांना बरं वाटाव म्हणून कर्वेविरुद्द कारवाई करत. हे बाबा साहेबांना भयानकच वाटलं असणार
‘समाज स्वास्थ् ‘ चा मुख्य विषय हा लैगिंक शिक्षण स्त्री पुरुष संबंध होता.
त्याविषयी सर्व सामान्य वाचकांनी जर प्रश्न विचारले असतील. तर उत्तर का द्यायंच नाही.असा बाबा साहेबांचा प्रश्न होता.
‘समाज स्वास्थ्य ‘ न अशा प्रश्नांना उत्तर नं देणं म्हणजे कामच थांबवण असं होतं ना? १९३४ सालच्या २८ फेब्रुवारी ते २४ एप्रिल या दरम्यान.’
समाज स्वास्थ्य ‘ च्या या खटल्याची सुनावणी चालली डॉ. आंबेडकरांसोबत त्यांचे सहकारी असईकर यांनीही या खटल्याच काम पाहिलं
मुख्य आक्षेप अर्थातच लैंगिक प्रश्नांची मांडणी. आणि त्याला जोडलेल्या अश्लीलतेच्या शिक्क्याचा होता.
समलिंगी संबंधांच्या बाबतीत
बाबासाहेबांनी पहिला युक्तीवाद असा केला कि लैंगिक विषयांवर कोणीही लिहिल तर त्याला अश्लील ठरवता कामा नये. आजही लैंगिक विषयांवर स्पष्ट भूमिका घेणारे राजकीय नेते.अभावानंच असताना जवळपास ८० वर्षीपूर्वी बाबासाहेब कोर्ट रुममध्ये ही भूमिका मांडत होते. न्यायाधीशांनी असं आर्ग्युमेट केलं कि विकृत प्रश्न छापायाचेच कशाला आणि त्यावर बाबा साहेबांनी उत्तर असं दिल आहे कि जर जी. विकृती असेल तर ती ज्ञानानेच जाईल. नाहीतर कशी जाईल? त्यामुळे प्रश्नांनी कर्व्यांनी उत्तर देणं हे क्रमप्राप्त आहे. जणू केवळ या एका खटल्यात निकालाच उदिष्टय डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेब बोलत नाहीत. तर समाज कोणत्या दिशेला जातो आहे. आणि जायला हवा याच भविष्य डोळ्यासमोर दिसत असल्या सारख भूमिका ते मांडतात. जगातल्या या विषयावरच्या लेखनाच्या संशोधनाच्या आधारे ते विचार करण्यास उधुक्त करतात.
समलिंगी संबंधांच्या बाबतीत ( आंबेडकर ) हॅवलॉक एलिस सारख्या तज्ज्ञांच्या ग्रंथाचे संशोधनाचे. दाखले त्यात काही गैर नाही असं मानण्यांची काही गरज नाही त्यांना वाटत त्या काळात समान्य स्त्री- पुरुष संबंधांवर बोलण्याची काही परवानगी नव्हती.त्याकाळात बाबासाहेबांनी हा विवेकवादी विचार मान्य करणं ही खूपच क्रांतीकारी घटना होती.दोन महत्वाच्या अधिकाराबद्दल इथे बाबासाहेब भूमिका घेतात.एक लैंगिक शिक्षणाचा अधिकार त्या विषयांच्या आड येणाऱ्या.कोणत्याही बुरसटलेल्या विचारांना आड येऊ देण्यास बाबासाहेब तयार नाहीत.साहजिकच हे अडथळे परंपरांचे होते. या मुद्यावरची बाबासाहेबांची भूमिका केवळ वैचारिक वा न्यायालयातल्या युक्तीवादापुरती मर्यादित नाही.तर ती कृती तही नंतर दिसत राहाते.र धों कर्वे तर संतती नियमनावर शेवट पर्यंत लिहित राहिलेच.पण डॉ. आंबेडकर सुद्दा संसदपटू म्हणून त्या मुद्यावर कार्य करीत राहिले. १९३७ संतती नियमनाच बिनसरकारी विधेयक तत्कालीन मुंबईत बाबासाहेबांनी आपल्या एका सहकाऱ्यांला मांडायला सांगितल.
लैंगिक विषयांवर खुलेपणानं बोलायचं धाडस
त्यावेळच त्यांच भाषण ही उपलब्ध आहे.अत्यंत सविस्तर आहे दुसरा अधिकार आहे तो अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा समाजातल्या काहींना एखादा विषय आवडत नाही म्हणून तो बोलायचा नाही. हे डॉ. आंबेडकरांना पटत नाही. म्हणूनच कर्व्यांनी लिहायचेच नाही.या मांडणीला ते तीव्र आक्षेप घेतात.आज इतक्या वर्षा नंतरही लैगिक विषयांवरच्या चित्रपट नाटक पुस्तका मधून आपल्या समाजात हिंसक विरोध होतो हे दिसते.८० वर्षी पूर्वी बाबा साहेबांनी लढवलेला कर्वेचा खटला अधिक महत्वाचा ठरतो.त्या काळातही ही विषय सोडून इतर विषयांवर बोलायची.पण त्यातली फार कमी माणसं ही यां लैंगिक विषयांवर खुलेपणानं बोलायची त्या काळात ही दोन माणसं या विषयांवर बोलतात. न्यायालयात लढतात हे हे मला आजच्या काळच्या दृष्टीनही खूप महत्वाच वाटत.
र.धो कर्वे आणि बाबासाहेब आंबेडकर १९३४ मध्ये हा खटला हरले. कर्व्यांना २०० रुपयांचा दंड झाला. पण समाजाच्या वर्तमान आणि भविष्यावर परिणाम करणारे हे असे न्यायालयीन खटले हे विजय पराभवाच्या ही पलीकडचे असतात. दृष्टा नेता त्यांच्या काळच्या पुढचं पाहतो. जे वर्तमानात समाजाला पचवण कठीण असतं ते अधिकारवाणीनं त्याला सांगून प्रसंगी टीका सहन करण्याच धारिष्टय त्यांच्या कडे असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नेते होते.
वकिलांच्याबद्दलचे बाबासाहेबांचे मत :-
कोर्टाची भाषा कोणती राहावी या विचाराने माझे मन व्यग्र होते. काही लोक म्हणतात कोर्टाची भाषा हिंदी राहावी. तर काही च्यामते ती इंग्रजी राहावी स्थानिक भाषांमधून कायद्यातील शब्द व्यक्त करता येत नाही. असा अनुभव आहे उदा: ‘इक्विटी ‘ ला योग्य असा शब्द नाही याकरिता स्थानिक भाषा कोर्ट होणे सर्वानाच फायदे शीर होणार नाही. त्यामुळे राज्य कारभारात कितीतरी अडचणी उद्भवतील अर्थात राष्ट्रीय भाषा कार्यक्षम झाल्यावर तिला तिचे योग्य स्थान मिळेल.मला वकिलीचा धंदा फार आवडतो. पण या धंद्या विषयी लोकांत आदर नाही. भारतात वकिलांवर कित्येक आरोप केले जातात. मध्यवर्ती सरकारातून मुक्तता झाल्यावर मी वकिलीच वाहून घेणार आहे. आज या देशांत लायक असे वकील थोडेच आहेत. आणि लायक वकील नसतील तर त्या खात्याची अधोगती होईल. आज या धंद्याला अवनत कणा आली आहे. यांचे एक उदाहरण म्हणजे या धंद्यात काम करणारे लोक निवृत्त होऊन तरुण वकिलांना संघी देत नाहीत. अर्थात धंद्यांची प्रतिष्ठा राहावी म्हणून तरुण वकिलांना संधी दिली जाणे आवश्यक आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची न्यायविषयक संकल्पना :-
बऱ्याच लोकांनी अस लिहून ठेवलंय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असा पणच केला होता. कि मी निष्णांत वकिल होईलच पण न्यायाधीश सुद्धा होऊन दाखवेन व तो पण क्षण पूर्ण होण्याची वेळ आली होती. पण बाबासाहेबांच्या आयुष्याचे ध्येय बदलल होत. आणि राजकीय लढाई सुरु झाली होती त्यामुळे समोर पद दिसत असतांना बाबा साहेबांनी १९३८ साली प्राचार्य पदाचा राजीनामा दिला आणि ते विधी मंडळाचे सभासद झाले कायदा करण्याकरिता.ते न्यायाधीश झाले नाहीत पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशांचे पहिले कायदा मंत्री झाले साहजिकच त्यांनी केलेल्या प्रत्यक्ष वकिलीचा अनुभव या कामी आला. परंतु इथं प्रकटशाने अशा प्रश्नांना हात घातला.
फिरत्या न्यायालयांची संकल्पना
आजही तो भारतीय न्याय व्यवस्थेत ज्वलंत प्रश्न आहे प्रलंबित खटल्यांसाठी फिरत्या न्यायालयांची संकल्पना २१ मार्च १९४९ ला कायदा मंत्री म्हणून डॉ. बाबा साहेबांनी मांडलेल विधेयक जर प्रत्यक्षात आलं असत तर . तर आज मोठ्या प्रमाणात न्यायालयामध्ये ज्या कोट्या वधी केसस प्रलंबित राहिल्या आहेत. त्या तसा राहिल्या नसत्या पैसे नाहीत म्हणून न्याय मिळत नाही. असा देश त्यांना नको होता म्हणून गरिबांना न परवडणारी कोर्ट फी हा देखील बाबा साहेबांच्या चितेंचा विषय होता.
कायदा मंत्री या नात्याने गरिबांची कोर्ट फी रद्द करता येईल. याविषयी त्यांनी संसंदेत विचार मंथन केले होते.
केस लवकर निकाली निघाव्यात म्हणून फिरत्या न्यायालयांची संकल्पना मांडणारा किंवा कोर्ट फि नाही म्हणून न्याय मिळत नाही.
म्हणून देखील व्यथित होणारा कायदा मंत्री हा कोर्टाच्या दैनंदिन व्यवहाराची पूर्ण माहिती असणारा.
वकिलच असू शकतो आणि बाबासाहेब ते होते.ते दूरदृष्टीचे वकील सुद्धा होते.
सर्वव्यापी आंबेडकर
आज देशांतील सर्व न्यायालयातील सर्व मिळून जवळपास ३ कोटी केसस प्रलंबित आहेत.
म्हणून बाबासाहेब त्याबद्दल चा उपाय १९४९ मध्ये सांगत होते तो आजही अंमलात आलेला नाही.
बॅरिस्टर आंबेडकरांचा दांडगा अनुभव व पुढे घटनाकार आंबेडकरांच्या कामी आला.
प्रकांड कायदेपंडीताने देशाला घटना दिली कायदे दिले पण त्या सगळ्याचे मुळ अस कि
त्यांच्या या वकिलीच्या कारकीर्दी मध्ये दिसल म्हणून ते सर्वव्यापी आंबेडकर होते..
मला सुद्दा हा लेख लिहित असताना प्रकर्षाने जाणिव झाली की बाबासाहेब आंबेडकरांची वकिली ही सर्वव्यापी पूर्णत: मानवतावादी होती. इथल्या गोर गरिब वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कायम तत्पर होती. आजही मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार हां वंचित शोषित घटकावरच होतो. त्यामुळे अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याच काम हा वकिल करीत असतो. तरी माझ्या सर्व वकील बांधवांना विनंती आहे कि आपण सुद्धा कायम न्यायाच्या बाजूने तत्पर असलं पाहिजे व ज्या शोषित वंचित आणि जे न्यायापासून वंचित आहे. अशा लोकाना कायम न्यायाच्या भूमिकेत असलं पाहिजे
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त त्यांच्या कार्यास व स्मृतीस विनम्र अभिवादन करतो….. जय भीम !!
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
हे ही वाचा.. डॉ.आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा स्थापन करणारा मराठा
वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महिला वर्ग
.. जागतिक महिला दिन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आपण
. कॅनडामध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
First Published on APRIL 14, 2021 17 : 09 PM
WebTitle – Barrister Dr. Babasaheb Ambedkar is an expert lawyer 2021-04-14




















































