भारतीय चित्रपटसृष्टीचा विचार करता इथल्या हजारो वर्षांच्या जातिव्यवस्थेवर, त्यातून निर्माण झालेल्या सत्ता-संपत्ती-संसाधनांच्या भयंकर विषमतेवर, शोषणावर, धर्म-संस्कृतीच्या दांभिकतेवर रोखठोक भाष्य करणाऱ्या ज्या काही मापदंड म्हणाव्यात अशा कलाकृती आहेत त्या निर्माण करण्यात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा आणि त्यातही तामिळ चित्रपटसृष्टीचा फार मोठा वाटा आहे. अलीकडच्या काळातली तामिळमधून असणारी महत्त्वाची उदाहरणे सांगायची झाल्यास त्यात पा. रंजिथचा “काला’, मारी सेल्वराजचा “पेरियार पेरूमल’ ह्या ठळक कलाकृती दिसतात. “असुरन’ हा दलित-शोषित जाणिवांचा अक्षरश: ज्वालामुखी फुटावा तशी बेदरकार मांडणी करणारा एक माइलस्टोन चित्रपट ठरतो.
भातुकलीच्या सर्कशी करण्यातच धन्यता मानणाऱ्या विशिष्ट लोकांची अट्टल आत्ममग्नता
हिंदी चित्रपटसृष्टी असो वा मराठी… हाताच्या बोटावर मोजण्याइतके काही अपवाद वगळता सुमार चित्रपटांचा सध्या सुकाळ म्हणावा असे वातावरण असताना… एकूणच सध्याच्या आणि नेहमीच्याच गल्लाभरू हिंदी-मराठी चित्रपटांच्या भाऊगर्दीत संवेदनशील सुजाण रसिक प्रेक्षकांनी कुणाकडे बघावे हा मोठा प्रश्न असताना… साहजिकच तामिळ चित्रपटसृष्टीकडे आणि तिथे घडून येणाऱ्या दलित-शोषित जाणिवांच्या नव्या आविष्काराकडे लक्ष जाते. दिग्दर्शक वेट्रीमारनचा महिनाभरापूर्वी म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रिलीज होऊन अद्यापही दीड महिन्यांनंतरही तामिळ कलाविश्वात प्रचंड चर्चेत असणारा “असुरन’ ह्या यादीतला अढळ स्थान कमावलेला चित्रपट ठरू शकेल.
“असुरन’ तसा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोचायला बराच वेळ लागला असेच म्हणावे लागेल. ह्याला कारण म्हणजे आपली झापडबंद माध्यमे आणि त्यांची आपल्याच सुरक्षित मध्यमवर्गीय कोषात रममाण राहण्याची, हवाबंद डब्यात बागडण्याची कोती मनोवृत्ती होय. बाहेरची हवा आपल्या सोवळ्यातल्या अवताराला लागू द्यायची नाही आणि आपलं काही पुणे-मुंबई-पुणेच्या बाहेर जाऊ शकेल ह्या तोडीचं बनवायची धमक ठेवायची नाही ही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ठाण मांडून बसलेल्या, कलेच्या क्षेत्रातील सर्व आर्थिक जातीय हितसंबंध आणि राजकीय नाड्या आपल्या हातात ठेवून भातुकलीच्या सर्कशी करण्यातच धन्यता मानणाऱ्या विशिष्ट लोकांची अट्टल आत्ममग्नता ह्याला कारणीभूत म्हणावी लागेल.
“असुरन’ हा दलित-शोषित जाणिवांचा अक्षरश: ज्वालामुखी फुटावा तशी बेदरकार मांडणी करणारा एक माइलस्टोन चित्रपट ठरतो.
हिंदीचा तर सगळा कारभारच रॉयल आणि निराळा. दिवसागणिक देशभरात दलित-शोषित-वंचितांचे प्रश्न कठीण होत जात असताना, सांस्कृतिक पटलावर कलाकृतींच्या माध्यमातून जातिव्यवस्थेविरुद्ध आरपार एल्गार पुकारण्याची निकड दिवसेंदिवस प्रबळ होणे गरजेचे असताना – मराठी असेल वा हिंदी असेल – ह्या दोन्ही चित्रपटसृष्टीत कधीतरीच धूमकेतू दिसावा तशा विरळ धाडसी कलाकृती दिसतात. जातिव्यवस्थेचे सर्व प्रश्न कधी अस्तित्वातच नव्हते वा ते पूर्वापार केव्हाच सुटले आहेत अशा आविर्भावात मराठी आणि हिंदीवाले जगत असावेत ही शंका आल्यावाचून राहत नाही. त्यामुळेच मराठी सिनेविश्वात जातजाणिवेवर हातचे न राखून सडेतोड भाष्य करणारे सैराट आणि फँड्री हा एकमेव अपवाद सोडला तर सध्या मराठी चित्रपटसृष्टी ही कुलकर्णी चौकातल्या देशपांडेचे दणक्यात प्रमोशन करण्यात व्यग्र आहे.
“असुरन’ ज्या कादंबरीवर आधारित आहे त्या ‘वेक्कई’ मध्ये मांडलेले दलित-शोषितांचे, खालच्या जातीतील अल्पभूधारक शेतकऱ्याचे भावविश्व, तिथली दाहकता मोठ्या पडद्यावर आणण्यास जे धाडस आणि प्रगल्भता वेट्रीमारनसारखे तरुण दमाचे दिग्दर्शक दाखवू शकतात तशी बेधडक मांडणी मराठीत लिहिल्या गेलेल्या प्रचंड ताकदीच्या आंबेडकरी साहित्याबद्दल इथले कलेच्या मांडवाखाली मुंडावळ्या बाशिंग लावून बसलेले नेहमीचेच थकलेले प्रस्थापित दाखवू शकतील काय, हा मोठा संशोधनाचा विषय ठरेल. ते घडेपर्यंत आपल्याला तामिळ चित्रपटसृष्टीवाचून पर्याय नाही. म्हणूनच ह्या पार्श्वभूमीवर तामिळमधील विख्यात साहित्यिक पुमानी ह्यांच्या ‘वेक्कई’ ह्या कादंबरीवर आधारलेला “असुरन’ हा दलित-शोषित जाणिवांचा अक्षरश: ज्वालामुखी फुटावा तशी बेदरकार मांडणी करणारा एक माइलस्टोन चित्रपट ठरतो.
हिंसक मानसिकता हे आपल्या कृषिप्रधान समाजव्यवस्थेचं एक सडलेलं अंग आहे.
“असुरन’ची गोष्ट ही जल, जंगल, जमीन, संपत्ती आणि माणूसपण नाकारल्या गेलेल्या माणसांची शेवटची गोष्ट आहे. अशी गोष्ट सांगण्याची वेळ कधीही कुणावरही येऊ नये. एकदा सहजच बोलता बोलता वडिलांनी मला माढ्यातल्या जमिनींची गोष्ट सांगितली होती. ब्रिटिशांच्या राज्यात महार जातींना महार वतन म्हणून ब्रिटिश सरकाराने काही जमिनीची मालकी दिली होती. माढ्यातलं कोर्ट, नगर परिषद, जिल्हा हायस्कूल, तहसील ऑफिस, न्यायालय, वीज महामंडळचं कार्यालय, एका उच्चजातीय डॉक्टरचा दवाखाना हे सगळंच्या सगळं महार वतनाच्या जमिनीवर उभं. हीच परिस्थिती आजही संपूर्ण भारतात आहे.
अल्पभूधारक शेतकरी आणि त्याची जातीच्या उतरंडीमधली जागा म्हणजे सरकारसाठी आणि सरंजामी बकासुरांसाठी अगदीच सहज सोपी कोवळी शिकार. उच्चजातीय समूहाचे लाड, नफेखोरीची लालसा शमवण्यासाठी ज्या काही पायाभूत सोयीसुविधा निर्माण केल्या जातात त्यात एखादी कर्मकांडाची परंपरा असल्याप्रमाणे पहिला बळी दिला जातो तो अल्पभूधारक निम्नजातीय शेतकऱ्यांचा. गावातल्या सरंजामांच्या आणि सरंजामधार्जिण्या सरकारच्या रेट्यामुळं शेकडो एकरांची जमीन बघता बघता गिळंकृत होते तेव्हा कुणीही विरोध करू शकत नाही हा पूर्वापार चालत आलेला इतिहास आणि वर्तमान आहे. गार्डन असो की थिएटर असो… मैदानं असो हायवे असो वा एखादी फॅक्टरी असो. हे सगळं उभं करायला दलितांच्या जमिनीवर खुन्नस बाळगून वेळप्रसंगी कुटुंबं देशोधडीला लावून जमीन बळकावण्याची हिंसक मानसिकता हे आपल्या कृषिप्रधान समाजव्यवस्थेचं एक सडलेलं अंग आहे.
खालच्या जातीच्या कुटुंबातल्या पोराने वरच्या जातीतल्या पोराला त्याची स्वाभिमानाची बलदंड ताकद दाखवून दिली एवढा अपमान पुरेसा ठरतो.
“असुरन’ मध्ये शिवासामीचा पोरगा – मुरुगन मात्र व्यवस्थेला विरोध करण्याची, निर्दयी लोकांसमोर जिंदाबाद म्हणत शड्डू ठोकण्याची जीवघेणी “चूक” करतो. मध्ययुगीन राजवटीत गडकिल्ले बांधले जात असताना बुरुजाचा तोल भक्कम व्हावा म्हणून एखाद्या अस्पृश्याला बुरुजाच्या भिंतीत चिणून बळी द्यायची परंपरा असायची त्याप्रमाणेच वड्डकुरनच्या सिमेंटच्या फॅक्टरीसाठी शिवासामीच्या तीन एकरांचा बळी द्यायची इथे गरज निर्माण होते. पंचक्रोशीत सोळाशे एकरांचा महामालक असणारा वड्डकुरनचा सरंजामी वर्चस्ववाद त्याच्या चाळीस एकरांच्या बांधाला खेटून असणाऱ्या शिवासामीच्या केवळ तीन एकरांच्या तुकड्यामुळं उफाळून येतो आणि “असुरन’ जन्माला येतो.
शेताच्या बांधावर असणाऱ्या कॉमन विहिरीतून पाणी उपसण्याचं निमित्त घडतं.
आई पचाईम्माला मारहाण करणाऱ्या वड्डकुरनच्या गुंडाना मुरुगन छातीचा कोट करून अस्ताव्यस्त भिडतो.
त्याच्याच वयाचा असणाऱ्या वड्डकुरनच्या पोराला धुळीत सपशेल लोळवतो.
आजपर्यंत आपल्यासमोर हात घट्ट जोडून नजर थेट खाली पायांशी रुतवून असणाऱ्या
आपल्या मेहरबानीवर उठबस करणाऱ्या खालच्या जातीच्या कुटुंबातल्या पोराने वरच्या जातीतल्या पोराला
त्याची स्वाभिमानाची बलदंड ताकद दाखवून दिली एवढा अपमान पुरेसा ठरतो.
“असुरन’ प्रचंड हिंसक आहे. “असुरन’ मधली हिंसा प्रत्येक फ्रेममधून वेळोवेळी अंगावर येते.
वड्डकुरनच्या तमाम भावकीसमोर, भावकीतल्या सात- आठ वर्षे वयाच्या पोरांसमोर गावात घराघरात जाऊन अनवाणी लोटांगण घ्यायची “तडजोड” करणारा न्याय आपल्या बापाला पंचायतीकडून बहाल केला म्हणून बुक्कीस बुक्की, ठोशास ठोसा ह्या जिद्दीने जगणारा वड्डकुरनच्या थोबाडीत स्लिपर फेकून मारणारा मुरुगन… दुसऱ्या दिवशी मुंडकं कापलेल्या कातडी सोलवटलेल्या मुरुगनच्या धडाभोवती वर आकाशात घोंगावणाऱ्या गिधाडांच्या गर्दीत आक्रोश करणारा शिवासामी आणि पचाईम्मा… मुंडक्याच्या धडाला आपलं पोरगं म्हणून सातत्याने नाकारत आलेल्या पचाईम्माचे वर्षभराने अखेरीस वास्तवाला शरण जाणे, घरात एकही फोटो नसणऱ्या मुरुगनचा चेहरा आणि वासही मी विसरून जाईल, त्याचा एकतरी फोटो असायला हवा होता असे सांगणारे शिवासामीचे डोळे. त्या डोळ्यांना कितीही हिंमत केली तरीही मला काही केल्या भिडता येत नाही. शिवासामीच्या चेहऱ्यावर मला भोतमांगेचे डोळे चिकटवल्याचा वारंवार भास होतो.
हतबलतेच्या डेड एंडला गावाच्या वेशीवर पाठ टेकवून थकून बसलेल्या शिवासामीच्या
आणि शिवासामीसारख्या जातीच्या निर्घृण कचाट्यात हालहाल होऊन मेलेली आपली पोरं गमावलेल्या असंख्य बापांच्या
सुकलेल्या काळजातला कोलाहल स्पष्टपणे माझ्या मस्तिष्कात घुमत राहतो.
त्या क्षणी “असुरन’ हा चित्रपट फक्त चित्रपट राहत नाही तर तो सूड, वेदना, दुःख, प्रेम, दैना, घुसमट, कारुण्य
ह्या सगळ्या अवस्थांचं एक महाप्रचंड कोलाज बनून आपल्याला आपलं स्थान, आपला संघर्ष
आणि आपलं अस्तित्व ह्याचा समग्र विचार करायला भाग पाडतो. “असुरन’ प्रचंड हिंसक आहे.
“असुरन’ मधली हिंसा प्रत्येक फ्रेममधून वेळोवेळी अंगावर येते.
सरतेशेवटी बुद्धाच्या पायाशी नेऊन ठेवतो.दिग्दर्शक वेट्रीमारनचं हे फार मोठं यश आहे.
पण तिला कोणत्याही दृष्टिकोनातून एक क्षणभरसुद्धा नाकारता येत नाही. “असुरन’ मध्ये मांडलेलं भीषण वास्तव हे सार्वकालिक सत्य आहे. “असुरन’च्या हिंसेत पराकोटीची हतबलता आणि समग्र बंडखोरी ह्याच्या बांधावर उभं राहावं लागणाऱ्या माणसांच्या जगण्याची अंतिम धडपड, त्यांच्या काळजातलं कारुण्य ओतप्रोत भरलेलं आहे. जातधर्मसत्ता ह्याच्या अभेद्य आणि अमर्याद शोषणाच्या क्रूर रणगाड्याखाली कायमच चिरडल्या गेलेल्या दलित- शोषित माणसांचा जगण्याच्या आणि कुठल्याही परिस्थितीत आपलं सर्वस्व टिकवून ठेवण्याच्या आदिम झटापटीशी जोडला गेलेला हजारो वर्षांचा सातत्याने चालत आलेला संघर्ष म्हणून आपल्याला “असुरन’कडे पाहावं लागतं.
सपशेल शरणागतीच्या एका टोकावरून संपूर्ण सूडाच्या दुसऱ्या टोकाकडे अपरिहार्यपणे घडणारा शिवासामीच्या कुटुंबाचा खडतर प्रवास पाहताना प्रचंड घुसमट होते. ही घुसमट जातिव्यवस्थेने लादलेली घुसमट आहे हा “असुरन’चा सारांश प्रत्येक प्रसंगातून आपल्या मेंदूपर्यंत थेट पोहोचत राहतो. शिवासामीच्या हातून घडणारी हिंसा ही मला कुठल्याही विजयाचे सेलिब्रेशन करावी अशा प्रकारची हिंसा वाटत नाही तर ती माणसाची विटंबना करणाऱ्या गिधाडांना चीड, संताप, आक्रंदन ह्यांचा कडेलोट होत असताना शेवटचा पर्याय म्हणून घडलेली हिंसा वाटते. शिवासामीच्या जागी कुणीही असतं तरी हेच केलं असतं. “असुरन’ ह्या शब्दाचाच अर्थ आहे Demon – दैत्य – शैतान – राक्षस. इथे तो राक्षस आहे जातिव्यवस्थेचा. हिंसेचे कुठल्याही स्वरूपात उदात्तीकरण न करता “असुरन’चा प्रवास हा आपल्याला सरतेशेवटी बुद्धाच्या पायाशी नेऊन ठेवतो. दिग्दर्शक वेट्रीमारनचं हे फार मोठं यश आहे.
कर्णबधिर व्यवस्थेच्या कानाखाली मारलेली सणसणीत चपराक
काळ सगळ्या गोष्टींवर औषध असतो! हजार वेळा लिहिलेलं, हजार वेळा वाचलेलं हे सुभाषित.
मुरुगेसन जेव्हा शिवासामीसमोर वड्डकुरनच्या बदल्याचा प्रस्ताव ठेवतो
तेव्हा शिवासामी मुरुगेसनला थिजलेल्या निर्विकार डोळ्यांनी म्हणून जातो
तेव्हा बसल्याजागी आपल्या खपलीच्या मधोमध कुणीतरी धारदार चाकू परत परत भोसकून
जखमेला आतून हादरे देतोय असं वाटू लागतं. इतका वेळ धीर धरून ताणून ठेवलेले आपले डोळे आता मात्र आरपार थकून जातात
आणि काही कळायच्या आतच डोळ्यांतून घळाघळ पाणी वाहायला लागतं.
पण “असुरन’ची फ्रेम मात्र अजिबात अस्पष्ट धूसर होत नाही.
मी विचार करत राहतो काळ सगळ्या गोष्टींवर औषध असतो
हे अर्धसत्य त्या भोतमांगेच्या वाट्याला का आलं नसावं? मी विचार करत राहतो
काळ सगळ्या गोष्टींवर औषध असतो हा सुविचार मला नितीन आगेच्या आईवडिलांना बोलून दाखवता येईल का?
मी विचार करत राहतो काळ सगळ्या गोष्टींवर औषध असतो हे आदिम वचन
हरियाणात साताठ वर्षं वयाच्या दलित भाऊबहीण चिमुरड्यांना ज्या बंद खोलीत जाळून मारलं
त्या खोलीबाहेर ठळक अक्षरात लिहिता येऊ शकेल का? एक ना अनेक अशा असंख्य घटना.
असंख्य माणसांच्या आयुष्याची लक्तरे डौलात फडकवणारी इथल्या
जातिधर्माच्या व्यवस्थेची शतकानुशतके वाजतगाजत निघालेली ही मिरवणूक.
ह्या मिरवणुकीच्या ढोलताशात गावकुसाबाहेर जगणाऱ्यांच्या गोंगाटाला कसलेही स्थान नाही.
म्हणूनच “असुरन’ ही कलाकृती त्या गोंगाटाला दृगोचर करीत कर्णबधिर व्यवस्थेच्या कानाखाली मारलेली सणसणीत चपराक ठरते.
एक संपूर्ण शरणागती किंवा दोन सुडाचं सुडानं दिलेलं प्रत्युत्तर.
काळ सगळ्या गोष्टींवर औषध असतो… शिवासामी मुरुगेसनला थिजलेल्या निर्विकार डोळ्यांनी म्हणून जातो आणि त्यानंतर पेरलं जातं ते असुरनच्या ठिणगीचं भयंकर बीज. उभा राहतो प्रचंड हिंसेचा अक्राळविक्राळ दैत्य. सुडाचं राजकारण जेव्हा शिवासामीसारख्या दलितांवर लादलं जातं तेव्हा दोनच पर्याय उरतात – एक संपूर्ण शरणागती किंवा दोन सुडाचं सुडानं दिलेलं प्रत्युत्तर.
एका बाजूने जातीची धर्माची सत्तेची गुंडांची अफाट ताकद पिढ्यानपिढ्या पाठीशी असणारा मग्रूर वड्डकुरन, दुसऱ्या बाजूला सर्वस्वाचे खच्चीकरण झालेला, कुटुंबाची चारही दिशात ताटातूट वाताहत झालेला तरीही आपलं अस्तित्व टिकवू पाहणारा चिवट झुंजार शिवासामी. शिवासामी असो की मुरुगन की पचाईम्मा… मला त्या तिघांत माझ्या वर्तमान बांधवांच्या आणि हजारो वर्षे तडफडत जगत आलेल्या माझ्या पूर्वजांच्या कित्येक पिढ्या दिसतात, जातीच्या श्वापदांशी दिनरात लढणारी कित्येक कुटुंबं दिसतात.
हिंसेच्या रणांगणात अत्यंत मजबुरीने उतरायला भाग पाडलेल्या इथल्या व्यवस्थेशी दोन हात करून शेवटी ‘न्याय’ नावाच्या शिक्षेला जखमी शिवासामी सामोरा जातो तेव्हा आपल्या धाकट्या पोराला – चिदंबरमला सांगतो – आपण जमीन घेतली तर ते जमीन हिसकावून घेतील, आपण पैसे कमावले तर ते आपल्याला लुटतील, पण आपण शिक्षण घेतलं तर ते आपल्याकडून कुणीही कधीही हिरावून घेऊ शकणार नाही, तेव्हा पोरा तू शीक, मोठा अधिकारी हो, ताकद कमाव, मात्र ती ताकद जशी त्यांनी आपल्याविरुद्ध बेफाट वापरली तशी तू ती कुणाच्याही शोषणासाठी कधीही वापरू नकोस! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला शिका, संघर्ष करा, संघटित व्हा ह्या क्रांतीच्या महामंत्रांतला शिक्षण हा एक मंत्र शिवासामी चिदंबरमला चेहऱ्यावर सुडाचा लवलेशही दिसू ना देता शांतपणे समजावून सांगतो. शिवासामीच्या चेहऱ्यात मला तेव्हा बुद्ध दिसतो!
by Mayur Lankeshwar
Sarpatta Parambarai सारपट्टा परम्बराई ,जोरदार पंच !
गुरुदत्त : भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने 9
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)