आजच्या दिवशी रावण दसरा, तसेच अशोक विजयादशमी अथवा पांडवांचा प्रकटदिन , सीमोल्लंघन, अशोक विजयादशमी अशा विविध कारणांसाठी सण साजरा करणा-या सर्वांनाच सणाच्या शुभेच्छा !
आमच्या सणाच्या दिवशीच तुम्ही तुमचा अशोक विजयादशमी का साजरा करता असा प्रश्न विचारणा-यांनाही शुभेच्छा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिवस विजयादशमी नाही तर १४ ऑक्टोबरलाच साजरी करा म्हणणा-या फतवामार्तंडांनाही शुभेच्छा !
ज्याला जे पटतंय त्याने ते ते खासगीत साजरं करावं. ज्याला जे इतरांना सांगावंसं वाटतंय त्याने ते ते सभ्य आणि संयमित भाषेत अभ्यासपूर्ण रितीने सांगावे. संवादाला जागा ठेवावी. आक्रस्ताळेपणा न करता प्रश्न करावेत. आणि वर्षभर यावर चर्चासत्रे ठेवावीत. त्यातून कुणाला मतं बदलावीशी वाटली तर ते सीमोल्लंघन होईलच.
इडा पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो
हजारो वर्षांपूर्वी नेमके काय झाले होते हे आज सांगता येणे कठीण आहे.
आज पुरातत्त्व शास्त्राच्या अभ्यासातून मिळत असलेल्या पुराव्यांवरून काही थिअरीज मांडल्या जात आहेत.
त्या इतिहास म्हणून स्थापित होण्याला अजून काळ लोटावा लागेल.
मात्र या थिअरीजला निश्चित अशा अभ्यासाची जोड आहे हे नाकारता येणार नाही.
आज अस्तित्वात असलेले सण हे कुणाच्या तरी पराभवाला साजरा करण्यासाठी आहेत हे ही निर्विवाद सत्य आहे.
बलिप्रतिप्रदा आणि नरकचतुर्दशी हे सण तर सरळच एकाच कुटुंबातल्या सम्राटांच्या हत्येचे आहेत हे त्या सणातच सांगितलेले आहे.
हे सर्व दानव अनार्य होते. त्यांच्यावर आर्यांचा विजय हा पुढे सणात रूपांतरीत झाला.
आता इतिहास असे सांगतो की या लढाया पुराणात सांगितल्या तशा हजारो वर्षांपूर्वीच्या नाहीतच.
मुळात ही पुराणे पहिल्या शतकापासून लिहीली गेली आहेत. बळी हा तर इथल्या कुणब्यांचा राजा आहे.
इडा पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो हे आजही शेतकरी बाया कानावर बोटं मोडून म्हणत असतात.
शेतक-याला आजही बळीराजाच म्हटले जाते.
संभाजी ब्रिगेड
त्यामुळे शंका आहेतच. या शंका घेणे म्हणजे आमच्या भावना दुखावणे, किंवा आमच्या सणालाच तुमचा इतिहास का ?
ही विकृती आहे असे म्हणणारे पुरोगामी देखील चिकित्सा नाकारण्याचा कुटीलपणा करत असतात.
हे सोयीस्कर पुरोगामी हीच खरी धोंड आहे चिकित्सेमधली. जे सनातनी आहेत त्यांच्याकडून अपेक्षा नाहीत.
अजिबात नाहीत.ते या इतिहासाला विरोध करता येत नाही म्हणून बीग्रेडी इतिहास म्हणणार यात शंकाच नाही.
गंमत म्हणजे ते बाबासाहेबांना मानतात. आता बाबासाहेबांनी पुष्यमित्र शुंगाने मौर्य सम्राट बृहद्रथाची हत्या केली हे पुराव्यानिशी लिहीले,
तेव्हां संभाजी ब्रिगेड होती का ? की बाबासाहेब संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते होते ?
की महात्मा फुले संभाजी ब्रिगेडमधे होते ? संभाजी ब्रिगेड ही २००० च्या आसपास सक्रीय झाली.
त्यात हौशे, नवशे, गवशे आले. जसे संघाचे भक्त असतात
तसेच अर्धवट माहीतीवर बोलणारे या संघटनेत सुद्धा असतात आणि आंबेडकरी चळवळीत सुद्धा असतात.
अशा अर्धवटांना शोधून, हुडकून त्यांच्याशी “अभ्यासपूर्ण” चर्चा करणा-या विद्वानांची थोरवी काय सांगावी ?
विजयादशमी
गांभिर्याने अभ्यास करणा-या काहींशी अधूनमधून बोलणे होत असते. त्यांच्या म्हणण्यानुसार विजयादशमी हा सण चंद्रगुप्त मौर्याच्या आधीपासून चालत आलेला आहे. या सणाचा आणि त्या काळातल्या क्षत्रियांचा जे मूळचे अनार्य होते अशांचा संबंध आहे. चंद्रगुप्ताच्या आधीचे घराणे म्हणजे नंद किंवा महानंद यांच्या राज्यातही हा सण साजरा होत होता. भारताची सांस्कृतिक राजधानी तेव्हां पाटलीपुत्र म्हणजे आजची पटणा हीच होती. खरे म्हणजे आर्यावर्त म्हटल्या जाणा-या प्रदेशाची संस्कृती हीच देशाची संस्कृती मानली जाते. पण इतर संस्कृ्ती देखील नांदत होत्या. दक्षिणेत ओनम, पोंगल हे मोठे सण त्याच काळापासून साजरे होतात. विजयादशमी हा सण दक्षिणेत साजरा व्हायला लागला त्याचा इतिहास खूप अलिकडे येईल. संसर्गाने हे होते.
सार्वजनिक गणेशोत्सव तर अधिकृतपणे बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केला.
त्या आधी असा सण नव्हता. हळूहळू तो पुण्याच्य़ा वेशीबाहेर गेला.
१९६० पर्यंत मुंढव्यात सार्वजनिक गणपती बसत नव्हता.लोक वर्तमानपत्रं घेऊ लागले आणि हळूहळू तो पसरत गेला.
आज हा सण महाराष्ट्रातच नाही तर भारतात पसरला आहे. सणांचे सांस्कृतिक आक्रमण असे असते.
कलिंग युद्धानंतर अशोकाला पश्चात्ताप झाला.
विजयादशमीचा हा सण बुद्धाच्या ही आधीपासून आहे. अभ्यासक असे मानतात की निश्चित दिवशी सण साजरा होत नसणार. राजाने दवंडी पिटवली त्या दिवशी विजयोत्सव म्हणजे विजयाच्या प्रीत्यर्थ उत्सव साजरा होत असावा. कधीतरी मोठ्या विजयानिमित्त परंपरेने दरवर्षी उत्सव साजरा करण्याची प्रथा रूढ झाली असावी. इतिहासात विजयादशमीला योगायोग सापडतात. खरे तर हा सण गाठूनच तत्कालीन सम्राटांनी त्यांची महत्वाची कार्ये आरंभली असावीत.
कलिंग युद्धानंतर अशोकाला पश्चात्ताप झाला. त्याने युद्ध नको बुद्ध हवा ही घोषणा केली. तो दिवस योगायोगाने विजयादशमी नसून युद्ध झाल्यानंतर अनेक महीन्यांनी विचारपूर्वक अशोकाने विजयादशमीला घोषणा केली असावी. तर्कांना फाटा देत केलेल्या मांडणीमुळे अनेकदा अशा थिअ-या हास्यास्पद करून टाकणारे सैनिक हे चिकित्सेमधली धोंड आहे. दुस-या प्रकारचे लोक हे आपण मूर्ख नाहीत याची काळजी घेणारे असतात. ते या सैनिकांची दशा पाहून सावध पवित्रे घेत असतात. अभ्य़ास, चिकित्सा यांनानी नकोच असते. तर्काने मुद्दे मांडणेही नको असते. ही मंडळी आमच्या सणाला तुमचा इतिहास का या चतुराईला बळी पडत असतात. यातूनच मग ही मंडळी पुरोगामी असल्याचा आव आणून वेगळे काही सांगू पाहणा-यांचे मुद्दे न पाहता त्यांना झोडपून महान बनत असतात.
राजाचा आदेश शिरसावंद्य
सम्राट अशोकाचा अशोक विजयादशमी या नावाने शिलालेख आहे का हे मला निश्चित माहीत नाही.
मला तेव्हढा वेळ मिळालेला नाही. जेव्हां मिळेल तेव्हा अशोक विजयादशमी नावाने हा सण
अशोकानंतर साजरा होत होता हे मी खात्रीपूर्वक सांगू शकेन.
मात्र अशोकाने विजयादशमीला मोहीमा केल्या आणि युद्ध थांबवले याबद्दल दुमत नाही.
फक्त हा सण नेमका कोणत्या दिवशी हे सांगता येणे कठीण आहे.
कारण त्या त्या काळच्या सम्राटाने आपल्या सोयीने उत्सवाचे आदेश दिलेले आहेत.
त्या काळी काही धार्मिक भावना दुखावल्या जात नसत.
सम्राटाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत हेच पाहीले जात असणार.मुळात एव्हढा तरी विचार होत असेल का ?
राजाचा आदेश शिरसावंद्य हेच धोरण असायला पाहीजे.
अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक सम्राटाने आपापल्या नावे कालगणना सुरू केली. त्या त्या कॅलेंडर प्रमाणे विशिष्ट दिवशी जरी उत्सव साजरा होत असेल तरीही नव्या सम्राटाने ते कॅलेंडर फक्त नाव बदलून आपल्या नावे सुरू केले तरच त्या अमूक एका दिवशी विजयोत्सवाची परंपरा अबाधित राहू शकेल. नाहीतर कॅलेंडर म्हणजे शके सुरू करताना कालमापन तेच राहीले पण महीने बदलले तर त्यात फरक पडेल.
इतिहास हा श्रद्धेवर आधारीत
विजयोत्सवाची विजयादशमी कशी झाली याच्य़ा अनेक थिअ-या आहेत. त्याचा आढावा घेत बसणे शक्य नाही. ज्याने त्याने ते करावे. सम्राट बृहद्रथाने पूर्वीच्या दहा मौर्य सम्राटांचा वंश समाप्त झाला हे जाहीर करण्यासाठी दहा तोंडाच्या मूर्तीला जाहीररित्या आगीच्या भक्षस्थानी दिले त्यासाठी त्याने विजयोत्सवाची निवड केली म्हणून त्याला विजयादशमी हे नाव प्राप्त झाले असा एक तर्क आहे. तर्काला छातीठोकपणे इतिहास म्हणून सांगणा-या उत्साही वीरांमुळे चिकित्सकांची नक्कीच अडचण होत असते. कारण ही थिअरी कितपत सत्य आहे याचा अभ्यास करणे ही एक प्रक्रिया आहे. त्यालाच ऐतिहासिक तथ्यांची छाननी म्हटले जाते. इतिहास असाच असतो.
रावणाच्या इतिहासाचे पुरावेच नाहीत हे ही सत्य आहे. त्यामुळे सध्य़ा सुरू असलेला इतिहास हा श्रद्धेवर आधारीत आहे. त्यावर प्रश्चचिन्ह लावणे म्हणजे विकृती आणि ऐतिहासिक तथ्यांची मांडणी करण्याचा प्रयत्न केला की बीग्रेडी हा पवित्रा सध्याच्या एकूणच लादण्याच्या प्रक्रियेत आता ठळक होत चाललेला आहे. बरेचशे पुरोगामी अशा वेळी सनातन्यांना मदत करत असल्याचे दिसून येते.
क्रांती – प्रतिक्रांती
बाबासाहेबांनी सुरूवातीला विजयादशमी हा पराभवाचा सण असल्याने नाकारला. मात्र ही पराभूत मानसिकता नकारात्मकतेकडे घेऊन जात असल्य़ाने त्याचं सकारात्मकते मधे रूपांतर करण्यासाठी आणि पुष्यमित्राने जी प्रतिक्रांती केली ती उलट फिरवण्यासाठी विजयादशमी च्या दिवशीच धम्मचक्रप्रवर्तन केले. याचाच जळफळाट अनेकांमधे दिसून येतो. फक्त ते उघडपणे न बोलता बुद्धीभेदाचं तंत्र अवलंबण्य़ात येतं.
यात शिवाजी महाराजांच्या जयंतीचा वाद महत्वाचा ठरतो. तिथी की तारीख या वादाचा फायदा उचलत ब्राह्मणांनी तुम्हाला तिथी चालत नसेल तर विजयादशमीला धम्मचक्रप्रवर्तन कसा हा वकीली प्रश्न टाकला. त्याने अनेकांच्या दांड्या गुल झाल्या. कारण बाबासाहेबांची एकूण स्ट्रॅटर्जी जर समजलेली नसेल तर तुकड्यातुकड्यात बाबासाहेबांची चळवळ समजून घेणे हा आत्मघातच असतो. क्रांती – प्रतिक्रांती वाचल्यानंतर ते स्पष्ट होत जाते.
पुरोगात्मित्व
धम्मचक्रप्रवर्तन विजयादशमीला घेतले म्हणूनच बाबरी मशीद ६ डिसेंबरला पाडली. यावरून बाबासाहेब प्रतिगाम्यांना नीट समजले आहेत पण त्यांच्या नावे चळवळ चालवणा-यांना समजलेले नाहीत असे खेदाने म्हणावे लागते.
विजयादशमीलाच धम्मचक्रप्रवर्तन बाबासाहेबांनी केले असे मानण्यासाठी अनेक कारणे आहेत. १४ ऑक्टोबर हा कोणताही खास दिवस नाही. या दिवसाची निवड करण्याचे कारण दिसत नाही. १५ ऑक्टोबर का नाही, वैशाखी पौर्णिमा का नाही असे प्रश्न पण आहेतच. ते महत्वाचे नाहीत. गेले काही वर्षे हा वाद चालू असताना त्यात पडलो नाही. मात्र बाबासाहेबांची एकूण रणनीती पाहता अखेरच्या दिवसात बौद्ध धम्म देणे ही जशी प्रतिक्रांतीची सुरूवात होती तशीच ती विजयादशमीलाच सुरू करणे हा ही अभ्यासपूर्ण निर्णय वाटतो.
त्यामुळे ज्यांना ज्या कारणाने हा सण साजरा करायचा आहे त्यांच्या मान्यतांप्रमाणे त्यांनी तो करावा. आम्ही काही घरात घुसून शस्त्र गळ्याला लावत नाही. किमान मांडणी करण्य़ाचे स्वातंत्र्य तरी असेल ना ? आमच्या सणालाच का असे म्हणणारे पुरोगामी आता हे विश्लेषण वाचल्यावर तरी मान्य करतील ना ? बिनबुडाचे असेल तर सांगावे. नक्कीच फेरविचार करू. मला वाटते पुरोगात्मित्व त्यालाच म्हणत असावेत…
आमच्या मान्यतांना का धक्का लावता असा आडदांड पवित्रा घेणे हे पुरोगामित्व असेल तर राहीलं. मग पुष्यमित्राने जसे निर्णय लादले तसे तुमचेही फतवे पुरोगामी आहेत हे मुकाट्याने मान्य करूच की. पुन्हा एकदा सनातन्यांकडून अपेक्षाच नाहीत आणि नव्हत्या. पुरोगामी आहोत असा दावा केल्याने तुमच्याशी थोडासा संवाद करावासा वाटला इतकेच.
(राजकारणात एखाद्या पक्षाचे मांडलिकत्व पत्करले की मग चिकित्सेला मर्यादा येतात. सर्वांना खूष करणे हा राजकीय पक्षांचा धर्म असतो. त्यांना प्रबोधनासाठी वेळ नसतो. म्हणूनच राजकीय पक्षांपासून थोडे अंतर ठेवणे योग्य वाटते)
लेखन – किरण चव्हाण
(लेखक सामाजिक आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक विश्लेषक आहेत)
हेही वाचा… माझा सहोदर सखा वाट्याडा बुध्द
हेही वाचा… विश्व बौद्ध धम्म ध्वज दिन- एक उत्सव
दुर्गाबाई भागवत यांच्या वेश्यासंबंधीत मतावर समाचार घेणारे राजा ढाले
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)