सिनेमा: ‘जयभीम’, ‘जयंती’, सोशल मिडिया आणि समीक्षक
कोणताही चांगला सिनेमा बनवायचा म्हणजे करोडो रुपये गुंतवणे ओघाने आले. जो ही निर्माता सिनेमा बनविण्यासाठी करोडो रुपये खर्च करतो तेव्हा त्यास त्यात नफा अपेक्षित असतो नव्हे तो त्याचा अधिकारच असतो.अगदी सिनेमा सुपर डुपर हिट नाही झाला तरी किमान लावलेला पैसे परत यावा ही त्याची रास्त अपेक्षा असते. चाकोरीबाह्य विषयावर सिनेमा बनविणे ही रिस्क असते. समांतर, कलात्मक सिनेमाची चर्चा खूप असते पण बॉक्स ऑफिस वर तो सपशेल मार खात असतो. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावरील सिनेमा बनविणे ही तर आर्थिक दृष्ट्या खूपच मोठी रिस्क आहे कारण भारतातील मोठ्या वर्गाला बाबासाहेबांच्या नावाची एलर्जी आहे हे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना किंवा रिंगटोन वाजवला म्हणून हत्या करणे या गोष्टींनी सिद्ध केले आहे. म्हणूनच ह्या दोन्ही सिनेमा निर्मात्यांचे प्रथमतः मनःपूर्वक अभिनंदन.
काहींनी सिनेमाच्या विरोधात स्टँड घेतला
सोशल मिडियावर ‘जयभीम’ या सिनेमाची एन्ट्री झाली ती त्याच्या पोस्टरने. मजकूर होता या सिनेमाची जाहिरात केली जात नाहिये तेव्हा ती आपण करूया, जाहिरात व्हायरल करूया. प्रत्येक बहुजनांनी पहावा असा सिनेमा आहे पण या जाहिरातीची फारसी कुणी दखल घेतली नाही. जेव्हा सोशियल मीडियावर काही जणांनी हा सिनेमा पहिला त्यातील काहींनी सिनेमाच्या विरोधात स्टँड घेतला. हा सिनेमा जयभीम नसून लाल सलाम आहे, जयभीम नावाचा वापर केवळ पैसे कमविण्यासाठी केला जातो आहे. यात बाबासाहेबांचे कोटेशन नाही, निळे झेंडे नाहीत वगैरे …. आणि एक कॉन्ट्रीवरसी तयार झाली.
सिनेमा मध्ये नेमके काय आहे ? बाबासाहेबांच्या नावाचा , जयभीम चा वापर का केला जातोय ? म्हणून नेटकरी सरसावले आणि हातातील मोबाईलवर सिनेमा पाहता येतो म्हणून सिनेमा पाहू लागले. काहींना जयभीम सिनेमा भावला आणि त्यांनी त्यात काही वावगे नाही असा स्टँड घेतला आणि एक प्रकारे सोशियल मिडियावारचे स्वरूप त्यास प्राप्त झाले इतके की टीव्ही न्युज चॅनेल्सना त्याची दखल घ्यावी लागली. सिनेमावर भाष्य होऊ लागले आणि समाजातील सर्व घटक तो सिनेमा पाहू लागले व व्यक्त होऊ लागले. निर्मात्याला प्रयास नकरता (?) हवे ते घडू लागले. सिनेमा हिट होऊ लागला. त्याच सोबत सिनेमावर वेगवेगळे अक्षेप होऊ लागले, अभिनेता सूरयाला धमक्या येऊ लागल्या आणि सिनेमा सतत चर्चेत राहिला. आणि सिनेमाचा व्यवसाय ही वाढला.
बोधी आंबेडकरी साहित्यात मुळात समीक्षकांची वानवा
खरे पाहता जयभीम ने जयंती साठी चांगले वातावरण तयार केले होते पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
त्याला अनेक कारणे असू शकतात त्यातील काहींचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया.
कोणत्याही कलाकृतीवर बरे वाईट लिहून येणे महत्वाचे असते. त्यासाठी समीक्षक हा घटक महत्वाचा असतो.
बोधी आंबेडकरी साहित्यात मुळात समीक्षकांची वानवा आहे.
कथा, कविता, कादंबरी याचे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके समीक्षक आहेत.
नाटकाचे समीक्षणासाठी तर समीक्षकांचा शोध घ्यावा लागतो.
नाटकाचे समीक्षण करायचे म्हणजे नाटकाचे तंत्र अभ्यासावे लागते, स्टेज, कोरीओग्राफी, दिग्दर्शन, नेपथ्य,संगीत समजून घ्यावे लागते.
इतकी मेहनत घेणार कोण ? हा प्रश्न असतो.
सिनेमा हे तर आणखी पुढचे पाऊल. सिनेमाचा चांगला समीक्षक शोधने हा तर संशोधनाचा विषय ठरावा अशी एकंदरीत परिस्थिती आहे. बरं साहित्याचे जे समीक्षक आहेत ते व गंभीरपणे लिखाण करणारे लेखक सोशल मिडियावर लिहित नाहीत त्यात त्यांना रस नसतो वा त्यास ते कमीपणाचे मानत असावे . त्यास अजूनही एक महत्वाचे कारण आहे व ते म्हणजे ट्रोल करणाऱ्या टोळ धाडी येथे निर्माण झाल्या आहेत.
पोटाच्या भुकेप्रमाणेच सांस्कृतिक कलात्मक भुक असू शकते हे त्याच्या गावीच नाही
आपल्याला एखाद्याचे विचार पटले नाही तर अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्यास ट्रोल केले जाते त्यामुळे दोनतीन वर्षा पासून जे साहित्यिक सोशियल मिडियावर लिहित होते त्यांनीही सोशल मिडियावर लिहिने बंद केले आहे किंवा कमी केले आहे. लिहिले तर अतिशय संक्षिप्त पणे ते व्यक्त होत असतात.सध्या जे सिनेमावर लिहिले जात आहे ते समीक्षण नसून मला सिनेमा आवडला, तो का आवडला या बद्दलचे संक्षिप्त मनोगत असते किंवा न आवडण्याची कारण मिमांसा असते. बरं आंबेडकरी समाज हे समीक्षण वाचून सिनेमा नाटक पाहायचा का नाही हे निर्णय घेत नसून मुळात तिकीट काढून आपल्या विचाराचे नाटक, सिनेमा पाहावे ही सांस्कृतिक जडणघडण त्याची झालेली नाही. पोटाच्या भुकेप्रमाणेच सांस्कृतिक कलात्मक भुक असू शकते हे त्याच्या गावीच नाही.कदाचित परिस्थिती मुळे तसे झाले असावे.
जयंती सिनेमा चालणे ही काळाची गरज आहे
दुसरे असे की जयंती सिनेमा हा आंबेडकरी विचार मांडीत असल्यामुळे त्यावर पॉझिटिव्हच लिहायला हवे असा अप्रत्यक्ष सुर उमटला . त्यामुळे त्यातील उनीवा दाखवाव्यात ज्या मुळे कॉंट्रोव्हर्सी निर्माण होऊन सिनेमा चर्चेत राहिल असं वातावरण निर्माण झालं नाही. कोणत्याही समीक्षणात कलाकृतीतील चांगल्या बाबिंचा उहापोह असतो तसाच उनीवांचाही परामर्श घेतलेला असतो तसे जयंती बाबत झाले नाही, तशा गोष्टी ट्रोल धाडी खपवूनही घेत नाहीत. ह्या सर्व बाबिंचा प्रत्यक्ष वा आप्रत्यक्ष परिणाम जयंती सिनेमावर त्याच्या बुकिंग वर झालेला दिसतो. आंबेडकरी समाज हवा त्या क्षमतेने सद्दा तरी सिनेमाला जात नाही व आंबेडकरी विचाराचा सिनेमा म्हणून इतर समाजही तिकडे फारसा फिरकत नाही. सामाजिक चळवळीत काम करणारे त्यास अपवाद असू शकतात. अर्थात याची जाणीव जस जशी निर्माण होत जाईल तस तशी प्रेक्षकांचे पाऊले थियटर कडे वळू लागतील.
जयंती चालणे ही काळाची गरज आहे कारण हा सिनेमा चालला तर इतर निर्मातेही यापासून प्रेरणा घेऊन असे सिनेमा काढण्याचे धाडस करतील त्यामुळे सर्वांनी मिळून हा सिनेमा चालावा म्हणून सांघिक प्रयत्न करायला हवा. प्रेक्षक तिकीट काढून जास्त संखेने हा सिनेमा बघतील व नवप्रेक्षक तयार होईल या साठी प्रयत्न करायला हवेत. ह्या इंडस्ट्रीत उभे राहायचे असेल तर सर्वांनी मिळून असे करणे आवश्यक आहे.
Jai bhim film Review – इरुलर जमातीचे भेदक चित्रण करणारा सिनेमा ‘ जयभीम ‘
अभिनेता गगन मलिक यांना डॉ.आंबेडकर यांची प्रतिमा भेट
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 24, 2021 10:40 AM
WebTitle – Movies: ‘Jaybhim, Jayanti marathi movie social media and critics
दलित पिडीत गरीब समाजावर होनारे अन्याय अत्याचार आणि त्यांना वाचा फोडून न्याय मिळवून देने हीच महामानवांना दिलेली खरी श्रध्दांजली होय. असे पिक्चर निघने खरोखरच आजच्या काळाची गरज आहे.
आणि अशा पीचरावर बंदी आणणे हे त्या समाजावर केलेला अन्याय होय.
जयभीम जय शिवराय.