आपल्या स्वत:जवळ विचार करण्याची क्षमता असेल तरच मत स्वातंत्र्याच्या हक्काला काहीतरी अर्थ आहे.- एरिक फॉर्म (Erich Fromm)
प्रतिकूल परिस्थितीत चोख भूमिका घेणाऱ्या लोकांची नोंद इतिहास घेत असतो,परिस्थितीशी जुळवून घेत तीला शरण जाणाऱ्या लेच्यापेच्या लोकांना इतिहास कुठेही स्थान देत नाही.एरिक फॉर्म यांचं वाक्य यासाठी इथं महत्वाचं ठरतं.
आज आपण स्वतंत्र आहोतच देश,सामाजिक, सांस्कृतिक,वैयक्तिक अनुषंगाने मानसिक अशा सर्वच पातळ्यांवर भारतीय समाज आज स्वतंत्र आहे. परंतु त्याच्यात स्वत: विचार करण्याची क्षमता अजून विकसीत झालेली नाही.मग हे स्वातंत्र्य परिपूर्ण आहे का? या स्वातंत्र्याच्या हक्काला काही अर्थ आहे का? असे प्रश्न आपण स्वत:ला विचारले पाहिजेत.
जीवनव्रती पुरस्कार नाकारला
फार थोड्या लोकाना स्वत:विचार करणे आणि निर्णय घेणे जमते.तसे न जमलेले लोक कुणाचे तरी भक्त बनलेले आपल्या अवतीभवती आपल्या नजरेस पडत असतात.स्वातंत्र्याच्या हक्काला तेव्हाच अर्थ प्राप्त होतो जेव्हा आपण स्वत: विचार करण्याची क्षमता विकसित करतो.अन्यथा आपण स्वतंत्र असूनही स्वतंत्र नसतो.तर मानसिक गुलाम असतो.
जेष्ठ साहित्यिक कवी डॉ.यशवंत मनोहर यांनी त्यांना विदर्भ साहित्य संघांकडून जाहीर झालेला “जीवनव्रती” पुरस्कार नाकारला,त्याचं कारण पुरस्कार स्विकारताना मंचावर हिंदू धर्मातील (खरं म्हणजे वैदिक धर्मातील) देवता सरस्वती ची प्रतिमा ठेवली जाणार होती असं त्यांनी दिलेलं आहे.या मुद्यावरून देशभरात चर्चा सुरू झाली असून यावर विविध भाषेतील लोकांनी आपली मते मांडण्यास सुरुवात केली आहे.
संभाजी ब्रिगेड या भूमिकेचे स्वागत केले
विविध भाषिक वृत्तपत्रांनी दखल घेतली तसे त्या त्या भाषिक वाचकांनी समर्थनात आणि विरोधात देखील मत व्यक्त केले आहे.
संभाजी ब्रिगेड डॉ. यशवंत यांच्यासोबत खंबीरपणे उभी राहिली आहे.संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र यांनी या भूमिकेचे स्वागत केले आहे.मा. यशवंत मनोहर सर अभिनंदन…
आम्हाला किंवा या देशाला काल्पनिक ‘सरस्वती’ ची नाही तर कर्तुत्ववान ‘सावित्री’ ची गरज आहे…!! प्रत्यक्षात शिक्षणाची ज्योत (मुहूर्तमेढ) ‘सावित्री’ने पेटवली… पुरस्कार नाकारून तुम्ही खरं कर्तुत्ववाद किंवा विज्ञानवाद स्वीकारलात. धन्यवाद.
सर… पुरोगामी चळवळ आणि विज्ञानवादी विचार जिंदाबाद...अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सोशल न्यायाधीश
सोशल मिडियावर हा विषय एकांगी पद्धतीने चालवला गेला,सोशल मिडियात सगळेच न्यायाधीश असतात.वास्तव जीवनात ते लिंबूटिंबू सुमार असले तरी अशा विषयात मात्र ते लगबगीने काळा डगला चढवून डोक्यावर पांढऱ्या केसांचा विग, हातात तलवार घेऊन जज करायला बसतात.
मग आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टींवर,व्यक्तीवर त्यांच्या चारित्र्यावर सपासप घाव घालत सुटतात.रविवारी खाटीकाच्या दुकानात खाटीक जसा बोटया करत बसलेला आपल्याला दिसतो तसे हे लोक सोशल मिडियात बसलेले असल्याची प्रचीती आल्यावाचून राहात नाही.यात जोडीला संस्काराप्रमाणे भाषा असते.शिव्याशाप खिल्ली उडवणे द्वेषयुक्त मांडणी करणे इत्यादी भाषिक अलंकार हे सोशल न्यायाधीश सढळ हाताने योजत असतात.
हे सर्व पाहिले की आपल्या देशात असणारी लोकशाही अन तीच्या अनुषंगाने मिळालेली न्यायव्यवस्था आणि इतर संस्था किती गरजेच्या आहेत याची मनोमन खात्री पटते,अन्यथा असे डिजिटल न्यायाधीश मागचा पुढचा विचार न करता एखाद्याची खांडोळी करूनच दम घेतील.
देवी सरस्वती नेमकी कोण आहे?
कोणत्याही प्रकरणात दुसरी बाजू असू शकते,आपल्यासमोर दाखवले गेलेले चित्र खरेच असेल असे नसते.नेपथ्य करणारे वेगळे असतात कलाकार वेगळा असतो,प्रेक्षकांना त्यातून वेगळीच अनुभूती होत असते.पोस्टट्रूथ च्या या जमान्यात आपल्याला या गोष्टी कशा समजतात? आपल्यासमोर या गोष्टी आणणारे लोक कोण? त्यांचे यामागे नेमके अजेंडे काय आहेत? अशावेळी या गोष्टी नीटपणे माहीत करून घेणे विचारी शहाण्या व्यक्तीचे काम आहे.
परंतु अलिकडे आपल्या देशाचं विचार करण्याचं वयंच सहा वर्षे असल्याने लोक त्याबरहुकूम विचार करतात असते दिसते.सहा वर्षाच्या बाळांचे हट्ट आणि त्याच्या धारणा समजुती याने देश अक्षरश: त्रासून गेला आहे.तुमचं आताचं वय कितीही असो परंतु सध्याच्या वातावरणात तुमची बुध्दी याच वयाच्या अवतीभवती असते हे अनेकदा दिसून आले आहे.
ज्या गोष्टीवरून हे सगळं सुरू झालं ती देवी सरस्वती नेमकी कोण आहे? हे वाचकांनी अगोदर जाणून घेणे गरजेचे आहे.यासाठी आम्ही काही दावा करू इच्छित नाही.तुम्ही स्वत: खात्री करून घ्या. दैनिक जागरण पत्रिका लोकसत्ता मत्स्य पुराण,सरस्वती पुराण यातही पाहता येईल.
स्वैर मुलाखत
ही सगळी पार्श्वभूमी वाचकांना समजून देणे आणि त्यांनी ती समजून घेणे आम्हाला गरजेचे वाटते म्हणून हा फ्लॅशबॅक.तर सुरुवात करूया – मुद्दे समजून घेऊ आपल्या धारणा तपासून घेऊ.गैरसमज दूर करू –
संपादक – सर,आपण कळवलेला नकार आणि त्यातून देशभरात सुरू झालेली चर्चा आपल्याला माहीत आहेच.नकाराची ही परंपरा आपल्या देशात नवी नाही.हिंदू धर्मात काही जातींना माणूस मानण्यासच कधीकाळी नकार दिलेला होता.त्यांच्या नकाराला नकार देत मानव मुक्तीची चळवळ उभी राहिली.या नकाराच्या घटनेच्या अनुषंगाने आम्हाला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत.आपल्या भूमिकेचे समर्थन करणारे अनेक लोक आहेत.तसेच काही टीका सुद्धा करत आहेत.सर्वात जास्त टिकात्मक प्रश्न हा विचारला गेला की तुम्हाला अगोदरच पार्श्वभूमी माहीत होती.तर तेव्हाच नकार कळवायला हवा होता.
माझी मूल्य नाकारुन हा पुरस्कार मी स्वीकारु शकत नाही
डॉ. यशवंत मनोहर – मला पुरस्कार देण्यासंदर्भात बोलणे झाले,मला विदर्भ साहित्य संघाची पार्श्वभूमी माहीत होती.हे खरं आहे.आणि म्हणूनच तर मी अट समोर ठेवली होती.माझी इहवादी भूमिका, तसंच माझी लेखक म्हणून असलेली भूमिका याची साहित्य संघाला कल्पना असेल असं मला वाटलं होतं तथा तसा माझा समज होता. परंतु कार्यक्रमाच्या व्यासपीठावर काय काय असेल? असं मी जेव्हा आयोजकांना विचारलं त्यावेळी त्यांनी सरस्वतीची प्रतिमा मंचावर असेल, असं त्यांनी मला सांगितलं. त्याक्षणी मी त्यांना माझी मूल्य नाकारुन हा पुरस्कार मी स्वीकारु शकत नाही, असं सांगितलं होतं.
संपादक – तुम्ही प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दोन तास अगोदर अचानक भूमिका जाहीर करून ऐनवेळी वाद उत्पन्न केला असा आक्षेप आहे.
डॉ.यशवंत मनोहर – पुरस्कार 2020 मध्ये जाहीर झाला त्यावेळी मी माझी भूमिका स्पष्ट केली होती.त्यानंतर,संस्थेने माझ्याशी एकदाही संपर्क केला नाही.अर्थातच पुरस्काराच्या काही दिवस अगोदर त्यांच्याकडून संपर्क झाला तेव्हाही मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो.ज्यावेळी मला असं समजलं की हे लोक माझी अट मान्य करण्यास तयार नाहीत आणि मंचावर ते प्रतिमा ठेवणारच आहेत,त्यावेळी मी डॉ.इंद्रजीत ओरके यांच्याशी पुन्हा बोलून खात्री करून घेतली,तर प्रतिमा असेल असं समजल्यावर मी नकार कळवला.
माझ्या या जीवनदृष्टीत न बसणारे अनेक पुरस्कार मी नाकारले
माझी भूमिका पुढीलप्रमाणे कळवली – मराठी साहित्यातील माझी प्रखर इहबुद्धिवादी प्रतिमा लक्षात घेऊन आपण अशा दुरुस्त्या कराल असं वाटलं होतं, पण ते झालं नाही म्हणून मी नम्रपणे हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना शिक्षणबंदी आणि ज्ञानबंदी करणा-या शोषणसत्ताकाची प्रतीकं मी पूर्णतःनाकारलीच आहेत.माझा सन्मान म्हणजे जिच्या अनन्यतेमुळे मी ओळखला जातो त्या माझ्या जीवनदृष्टीचा सन्मान ! माझ्या या जीवनदृष्टीत न बसणारे अनेक पुरस्कार मी नाकारले आहेत.हा वाङ्मयीन कार्यक्रम आहे आणि त्यात धर्म येणं मला अजिबात मान्य नाही.म्हणून आपण मला दिलेला जीवनव्रती हा पुरस्कार मी नम्रपणे नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे.आपण मला समजावून घ्यावं.मनोहर म्हैसाळकर म्हणजे माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणारा माणूस. ते मला निश्चित समजावून घेतील ही खात्री मला आहे. आयुष्यभर जपले ते मी कोणत्याही कारणास्तव नाकारू शकत नाही कारण मी मला नाकारलं तर माझ्यापाशी जगण्यासारखं काहीही नाही.
क्षमस्व!
(वाचकांनी इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी डॉ.यशवंत मनोहर ही गोष्ट घेऊन मिडियाकडे गेले नाहीत.ही गोष्ट प्रसारमाध्यमात कशीकाय आली? कुणी आणली ? त्यामागे काय हेतू आहेत? याची उत्तरे शोधली तर यामागे काय ब्रेन आहे हे समजून घेता येईल. हा व्यवहार जर डॉ. यशवंत मनोहर आणि विदर्भ साहित्य संघ या दोघांत होता तर त्यांच्यातच तो संपला पाहिजे होता.तो समाज माध्यमात आणून त्यावर हेतुपूरस्सर चर्चा कशाला घडवून आणली गेली?)
मी स्वत: दोन पावले मागे आलो
संपादक – काही लोकांचे म्हणने आहे की जुन्या गोष्टी जुन्या मान्यता,प्रतिमा प्रतीके बाजूला ठेवून आपला विचार मांडण्यासाठी आग्रही असले पाहिजे आणि समन्वय साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तसे न करता अपमान केलात असेही म्हणत आहेत.
डॉ. यशवंत मनोहर – हे बघा, मी पुरस्काराला गेलोच नाही.तिथं उपस्थितच नव्हतो,माझ्यासमोर कुणीच नव्हते.मग मी नेमका कुणाचा कसा अपमान केला आहे? की त्यांनी मुद्दाम हे अपमाननाट्य रंगवले? दूसरा मुद्दा जुन्या मान्यता सोडून आपण विचार मांडले पाहिजेत हे बरोबर,मी सुद्धा तोच प्रयत्न केला.तुम्हाला हे माहीत नाही.लोकानाही माहीत नाही की मी या अगोदर सुद्धा यांना नकार दिला होता तोही दहा वर्षे अगोदर 2011 मध्ये,त्यावेळी मला त्यांनी अध्यक्षपद देवू केले होते.ते मी नाकारले होते,तेव्हाही हीच भूमिका होती.आणि गेल्या दहा वर्षात ते लोक बदलले असतील दुरुस्त झाले असतील,लिबरल झाले असतील अशीच माझीही धारणा होती,आणि त्या दृष्टीने विचार करूनच यावेळी होकार कळवला मी स्वत: दोन पावले मागे आलो मात्र मी तेव्हाही साशंक होतो तो याचसाठी की खरंच हे बदलले आहेत का? तर तसं आता वाटत नाही.म्हणजे माझा “नकार”त्यांच्या खात्यावर अगोदरच असताना त्यांनी मला पुन्हा पुरस्कारासाठी आमंत्रित केले.हे लोकानी लक्षात घ्यावं.माझ्या भूमिका त्यांना माहीत होत्या,माझा नकार त्यांना माहीत होता,तरीही त्यांनी मला यात ओढलेच आहे ना..
माझी भूमिका स्पष्ट आहे
संपादक -म्हणजे हे प्रकरण आता बऱ्यापैकी स्पष्ट झालं आहे.काही लोकांचे असेही मत होते की “जीवनव्रती” या पुरस्काराच्या नावातच “व्रत” आहे,ते हिंदू धर्मातील कर्मकांड व्रत वैकल्याशी संबंधित आहे मग इहवादी व्यक्तीने त्या नावाने पुरस्काराचा स्विकार का करावा?
डॉ. यशवंत मनोहर – हे पाहा,शब्दांचे अर्थ अनेक असतात,याचेही आहेतच व्रती म्हणजे ध्यास सुद्धा आहे.छंद सुद्धा आहे. लेखनाचा ध्यास छंद असं आपण म्हणतो मी त्या अर्थानेच याच्याकडे पाहिलं.
संपादक – काही लोकांचे म्हणने आहे की सरस्वती सोबत आपण इतर प्रतिमा ठेवण्यास सुचवले पाहिजे होते जसे की सावित्रीबाई फुले,ताराबाई शिंदे,फातिमा शेख इत्यादी तर तुम्ही पुरस्कार स्विकारला असता काय?
डॉ. यशवंत मनोहर – नाही.मला तसे करता येणार नाही,माझी भूमिका स्पष्ट आहे.हे साहित्याशी निगडीत संमेलन आहे ना? मग त्याला विशिष्ट एका धर्माचा मुलामा का देत आहात? त्यात धार्मिक बाबी का आणत आहात? मग सर्वच धर्माच्या प्रतिमा तिथं आपण लावणार आहोत का? कुराण ठेवलेले चालेल काय? ख्रिस्ती लोकांचे बायबल इत्यादि प्रतीके तिथे लावणार का? माझी सरळ भूमिका आहे. मी भारत आणि महाराष्ट्रातील प्रबोधनाचा एक प्रतिनिधी आहे.शिवरायांपासून शाहू-फुले-आंबेडकरांच्या परंपरेला मी माझी आदरणीय परंपरा मानतो. मग सरस्वतीची मूर्ती असलेल्या मंचावर पुरस्कार स्वीकारणं म्हणजे मीच मला खोडून काढणं, मीच मला नाकारणं ठरलं असतं. म्हणून मी स्पष्टपणे पत्रात म्हटलंय की, मी आयुष्यभर जी मूल्य जपली, त्या मूल्यांच्या विरोधात स्वत: कृती करणं हे मला मीच खोडून काढल्यासारखं आहे.साहित्य संमेलनात साहित्याशी निगडीत गोष्टी असाव्यात.आणि दैववादी गोष्टी टाळाव्यात.साहित्यात योगदान देणारे अनेक थोर लेखक आहेत,त्यांच्या प्रतिमा लावण्यास माझी कधीही हरकत नसणार.शिवाय समन्वय की समरसता हा सुद्धा एक तिढा आहे.त्याचे काय करायचे आहे? हा माझ्यासमोर प्रश्न होता आणि मी समरसतावादी नाही.
यात द्वेष आहे की आदर आहे?
संपादक -तुमची ही भूमिका हिंदू धर्म विरोधी,तर काही लोक म्हणतात ब्राह्मणविरोधी आहे.तुम्ही ब्राह्मणांचा द्वेष करता असेही काहीनी म्हटले आहे.
डॉ. यशवंत मनोहर – मी कोणत्याही अंधश्रद्धेच्या विरोधात आहे.काल्पनिक गोष्टींच्या विरोधात आहे.याचा अर्थ मी कोणत्या धर्माच्या विरोधात होत नाही.धर्मातील चुकीच्या भ्रामक समजुती चालीरीती यांना आजवर प्रबोधनाच्या माध्यमातून समाजसुधारकांनी नकार देतच समाज सुधारला आहे.मी हिंदू धर्म विरोधी असतो तर हिंदू धर्मातील थोर लेखकांची नावे प्रतिमा लावण्यास सुचवली असती का? हा वाङ्मयीन कार्यक्रम आहे ना मग कार्यक्रमात साहित्यिक पु.ल. देशपांडे, कुसुमाग्रज, लोकहितवादी अशा लेखकांचे फोटो का लावले जात नाहीत? हा प्रश्न मी विचारला आहे.हे लोक हिंदू धर्मीयच आहेत ना? ब्राह्मण आहेत ना? मग मी विरोधक कसा आहे? यात द्वेष आहे की आदर आहे? हे जनतेला ठरवू द्यात.
संपादक – सर्व मुद्दे स्पष्ट झालेत असे आम्हास वाटते,या एकूणच घटनेवर आपण काही म्हणू इच्छिता ?
डॉ. यशवंत मनोहर – हे पाहा,कोणतेही साहित्यमंडळ हे लेखकांसाठी असते.त्यांची काळजी घेणारे असते.असावे.साहित्य संघ असो की मंडळ त्यांनी लेखकांचे ऐकले पाहिजे.त्यांचा आदर केला पाहिजे.मानवी उत्कर्ष झाला पाहिजे.सर्व लोकांचा विकास झाला पाहिजे तसेच समाजात प्रबोधन होईल अशा साहित्याच्या निर्मितीवर भर दिली गेली पाहिजे.सर्वांना सोबत घेऊन चालावे.भारतीय संविधान आणि त्यातील मार्गदर्शक तत्वे विज्ञानवादी दृष्टिकोन यांची कास धरावी.लेखकांना अशाप्रकारे संपवायला पाहू नये.अशी माझी अपेक्षा आहे.
धन्यवाद डॉ. यशवंत जी तुमचे मुद्दे बऱ्यापैकी स्पष्ट झालेले आहेत.
यावर आम्हीही काही प्रकाश टाकू इच्छितो –
विदर्भ साहित्य संघाचा हा कुळाचार,परंपरा म्हणून जे ते म्हणतात तसा दावा करतात अन त्यावरून जे रणकंदन सुरू आहे.
त्यासंदर्भात आम्हाला काही गोष्टी हाती लागल्या आहेत.
2018 साली विदर्भात बुलढाणा येथे 12 वे साहित्य संमेलन पार पडले होते.त्यावेळी मात्र संविधानाची प्रतिमाच मंचावर होती,
आणि तिच्यासमोर दीप प्रज्वलन करून या संमेलनाचे उद्घाटन झाले.
संस्था तीच तेच नेपथ्य मात्र इथं प्रतीक बदललं.आणि यावेळी मात्र त्यांनी सरस्वतीचा आग्रह धरला.
योग्य भूमिका
बुलडाणा सारख्या तथाकथित मागास समजण्यात येणार्या जिल्ह्यात फेब्रुवारी2018 मध्ये वि.सा.संघाचे12वे जिल्हा साहित्य संमेलन होते तेव्हा संविधानाच्या प्रतीसमोर दिपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले होते.मग जे बुलडाणा वासियांना जमले ते नागपूरातील विद्वानांना जमू नये? आश्चर्य वाटते.की मुद्दामहून मा.डाॅ.यशवंत मनोहर सरांना डिवचण्याचा आणि त्याअनुषंगाने साहित्यिकांमध्ये दुफळी माजविण्याचा कुटील प्रयत्न चाललाय?
खरोखर आपापला धर्म उंबरठ्याच्या आत जपून सार्वजनिक ठिकाणी कोणत्याच धार्मिक प्रतिकांचा वापर करू नये म्हणून डॉ.यशवंत मनोहर सरांनी अतिशय योग्य भूमिका घेतली आहे.
ही स्पष्ट भूमिका विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे यांचीच आहे.हे वाचकांनी इथे लक्षात घ्यावं.म्हणजे हे सगळं का घडवून आणले गेले हे आपल्या लक्षात येईल.
आणखी एक महत्वाची भूमिका
दूसरा मुद्दा आणखी महत्वाचा आहे.टीकाकार लोकानी अगोदर हा हिंदू धर्माचा अपमान म्हटलं,
नंतर संस्कृती नाकारणे म्हटले नंतर यात जातीयवादी मुद्दा आणला गेला ब्राह्मणांना विरोध वगैरे.
अशाप्रकारे वेगवेगळ्या भूमिका मांडत हा मुद्दा चालवला गेला आहे.
यासाठी आपण डॉ. यशवंत यांची वरील भूमिका माहीत करून घेतलीच
परंतु आणखी एक महत्वाची भूमिका ही सामाजिक कार्यकर्त्या दिवंगत विद्या बाळ यांची आहे.
विद्या बाळ महाराष्ट्राला सुपरिचित आहेतच त्यांची आणखी ओळख अशी की न. चि. केळकर हे त्यांचे आजोबा हिंदू महासभेमध्ये सक्रिय होते.
शिवाय लोकमान्य टिळकांचे सहकारी होते.त्यांच्या घरात उजव्या विचारसणीचे वातावरण माहेरी आणि सासरी दोन्हीकडे,
भाऊ राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जात,त्यात सक्रिय तसे त्यांची मुले सुद्धा जात होती.
विद्या बाळ या हिंदू धर्मीय अन ब्राह्मण त्या भाषणात असं म्हणत की “सरस्वतीच्या अस्तित्वाचा पुरावा नाही.
सावित्रीच्या अस्तित्वाचा पुरावा मात्र आहे.हिंदू देवीला नमन करून अन्य धर्मीयांच्या मुलांनी का शिकावे?”
सरस्वती नाकारणाऱ्या विद्या बाळ यांचे आपण काय करणार आहोत?
काही लोकानी यात साहित्यिकही आले त्यांनी मात्र यात गोलमोल भूमिका घेतली.
म्हणजे त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे बुद्धीला ताण देवूनही समजले नाही.
सामान्य माणसाना जर तुमची भूमिका कळत नसेल तर तुम्ही नक्की कुणीसाठी साहित्य निर्मिती करता आणि त्याची उपयोगिता काय?
तुमच्या भूमिकेचे काय असे आम्हाला प्रश्न पडले.
असे साहित्यिक आम्हाला तत्वच्युत साहित्यिक वाटतात अशा लोकांचा मानवी जीवन समृद्ध करण्यात हातभार लागणे कठीण असते,
ते फक्त हस्तिदंती मनोऱ्यात शोभेसाठी असणाऱ्या छोट्या मोठ्या टिकल्यांच्या पलीकडे काहीच नसतात.
अशांना समजाही लक्षात ठेवत नाही विसरून जातो.
डॉ. यशवंत मनोहर मात्र आपल्या स्पष्ट भूमिकेने स्फटिकसारखे स्वच्छ मनोहर आहे
आणि मानवमुक्तीच्या लढ्यातील खंदे दिशादर्शक दीपस्तंभ वाटतात.
प्रबोधानाची मानवमुक्तीची चळवळ अशा खांद्यावरच यशवंत होत असते.
– संपादक जागल्या भारत
हेही वाचा...सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून साहित्यीक यशवंत मनोहरांनी विदर्भ साहित्य संघाचा नाकारला पुरस्कार
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
Comments 1