जात व्यवस्था चं स्थान या सर्वच प्रश्नात आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जे काही अतिमहत्वाचे इशारे दिलेत त्यातला हा इशारा सर्वच सुधारणा चळवळींसाठी महत्वाचा आहे :
“तुम्हाला वाटेल त्या कोणत्याही दिशेने जा. जातीचा राक्षस समोर उभा राहणार. या राक्षसाला ठार केल्याशिवाय तुमची राजकीय सुधारणा नाही. तुमची आर्थिक सुधारणा नाही.”
[….turn in any direction you like, caste is the monster that crosses your path. You cannot have political reform, you cannot have economic reform unless you kill this monster…]
– Annihilation of Caste
व्यवस्था जैसे थे ठेवणारी
देशभरात सुधारणेसाठीचे जे काही प्रयत्न आजवर झाले किंवा आज सुरु आहेत, रस्त्यावरची आंदोलने-अभियाने, शिक्षणक्षेत्र, सिनेमा-साहित्य, राजकारण, ग्रामसुधारणा… या सर्व क्षेत्रात बऱ्याचदा जाती संरचनेचा अनुल्लेख करून हाती घेतलेल्या कार्यात अधिकाधिक प्रगती कशी करता येईल अशी रणनीती राहिली आहे. जातीविषयी बोलणे म्हणजे शतकानुशतकाच्या जुन्या व्यवस्थेबद्दल बोलणे. एकतर आता कुठाय जात? किंवा मग जात ही गोष्ट इतकी किचकट आणि प्रोब्लेम्याटीक आहे की तिला डावलून आपले उपक्रम पुढे नेलेले बरे असा कॉमन सेन्स तयार झाला आहे. परिणामी जातीव्यवस्था घणाचे घाव न बसल्याने अबाधित आहे.
जातीच्या समस्येला दुर्लक्षित करणारी कुठलाही उपक्रम म्हणा की चळवळ म्हणा ब्राह्मणवादी होते. व्यवस्था जैसे थे ठेवणारी होते. ते कसे ते आपण बघूया. सुरुवातीला मानसिक आरोग्य, पर्यावरण असे आजचे प्रिय विषय घेऊया.
समुपदेशन ग्रुप
व्यक्तीचा स्वतंत्र व्यक्तित्व (individual) म्हणून सर्वाधिक विचार करणारे शास्त्र असे मानसशास्त्रला म्हणता येईल. व्यक्तीचा विचार तसाच केला गेला पाहिजे. पण भारतासारख्या सरंजामी, समुदायवादी भूमीवर तसं absolute पातळीवर करणे शक्य नाही. मेंटल हेल्थ चा खूप जवळचा संबंध आपल्या आर्थिक स्थितीशी आहे आणि आर्थिक स्थितीचा जातींशी.आपला जन्म जातीव्यवस्थेच्या कुठल्या गटात झालाय (सवर्ण की दलित-बहुजन) यावर आर्थिक स्थिती ठरते आणि पर्यायाने मेंटल हेल्थ. मानसिक आरोग्य या क्षेत्राला संकुचित करण्याचा संबंध नाही इथे. पण जे आपलं सामाजिक आहे ज्याचा व्यक्तीच्या मनावर, आरोग्यावर परिणाम होतो तेच जातिग्रस्त आहे. जातीय ह्युमिलिएशन ला कसं बसवणार मानसिक आरोग्याच्या संकल्पनांमध्ये आणि काय सांगणार त्यांना यातून बाहेर कसं पड म्हणून जर पदोपदी पुन्हा ती अनुभवायला येणार असेल तर.
म्हणून मला वाटत मानसशास्त्र त्यातही समुपदेशन (थेरपी) हे असं क्षेत्र आहे जिथून भारतीय अशा जात व्यवस्था विषयक सामाजिक, मानसिक वास्तवाला समोर ठेवून एकंदरीत अकॅडेमिक क्षेत्रात मूलगामी हस्तक्षेप शक्य आहे (गोपाळ गुरूंना वाटतं तसा हस्तक्षेप). म्हणजे आपण क्लाइन्टला त्याचं जातपितृसत्तेत झालेलं/होणारं शोषण निमूटपणे सहन करा आयुष्याचा भाग म्हणून आणि पुढे जा असं म्हणणार आहोत का. की त्याला अन्यायकारक व्यवस्थेतही स्वत:च मूल्य जाणीव करून देवून यातून बाहेर पडायला सांगणार. (मागे एक गोष्ट ऐकण्यात आलेली की पुण्यात कुणीतरी दलित बहुजन तरुणांसाठी समुपदेशन ग्रुप चालू केला आहे.)
द्विज पुरस्कार
परत इथे अत्यंत काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे या प्रक्रियेत कोणतेही अवैज्ञानिक पूर्वग्रह तयार होऊ नयेत. इव्होल्यूशनरी सायकॉलॉजीला बाजूला सारलं जाऊ नये.उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मानवाची झालेली मानसिक जडणघडण दुर्लक्षित करता येणार नाही.-यावर चर्चा, टीका करत हे काम करता येईल. पण जातीव्यवस्था बेदखल करण्याची चूक (कारस्थान) आपण करू नये. फेमिनिजम ने ही केला आहेच की सकारात्मक प्रवेश मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात. शेवटची महत्वाची आणि अंतिम ध्येय अशी गोष्ट म्हणजे या सगळ्यात व्यक्तीचं मानसिक आरोग्य कुठेच कॉम्प्रमाईज केलं जाऊ नये.
अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात वर्चस्व आणि जास्त संख्या ही ब्राह्मण सवर्ण जातीतून आलेल्या व्यक्तींची आहे. मागे एकदा न्यूज वाचली की मेंटल हेल्थ मध्ये काम करणाऱ्या पुण्यातल्या मोठ्या संस्थेने द्विज पुरस्कार असा एक पुरस्कार सुरु केला आहे, गंभीर मानसिक आजारातून बरे झालेल्या व त्याला साथ देणाऱ्या नातेवाईकांसाठी.का तर त्यांचा आजारातून बरे होऊन दुसरा जन्म होतोय. खरं आहे हे तसं. त्याचं काम खूपच मोठे आहे त्याबाबत काही शंका नाही पण या देशात जो शब्द हजारो वर्ष उच्च नीचतेसाठी वापरला गेला त्याला वेगळे अधिष्ठान देऊन तुम्हाला नेमकं कोणत्या भूतकाळाच गौरवीकरण करायचं आहे.
दलितांचे दुय्यमत्व
हे असंच बघता येईल पर्यावरणवादी उपक्रम, चळवळी बाबत. वृक्ष संवर्धन आणि स्वच्छता एवढीच आहे का ही विचारधारा?
पर्यावरणवादाच सर्वात महत्वाचं मूल्य आहे शेअरिंग. जे समतावादी समाजाचंही मूल्य आहे.
त्या मूल्याला केंद्रभागी ठेवून ही चळवळ पूढे चालली पाहिजे.पर्यावरणाचं नुकसान कोण करतं,रिसोर्सेसचा उपसा कोण करतं?
दलित, आदिवासी, बहुजन की ब्राह्मणी-भांडवली वर्ग? इथे याचं उत्तर सापडेल.
‘पर्या जातिवरण : सुलभ, स्वच्छता, दलित और ब्राह्मणी पर्यावरणवाद’ या लेखात
(तद्भव नियतकालिक) मुकुल शर्मा यांनी भारतीय पर्यावरणवादातीत ब्राह्मणी आणि हिंदुत्व नरेशन उघडे पाडलं आहे.
उदाहरणे : शाकाहारी आग्रह आणि पर्यावरणस्नेही मानून हिंदू आचारांचं समर्थन की ज्यात भेदभाव अंतर्भूत आहेत;
राळेगण सिद्धी मध्ये यशस्वी ग्रामसुधारणाप्रयोग आणि त्यात दलितांचे दुय्यमत्व.
हीच टीकात्मक मांडणी स्त्रीवादी चळवळी बाबत झाली त्यामुळे काही प्रमाणात तरी जाती प्रश्नाला त्याचा फायदा झाला.
पण अभिजन स्त्रियांमध्ये स्त्री वादाचं कॉमन सेन्स पातळीवरील आकलन अजूनही जातीप्रश्नाबाबत उदासीनता वाटणारं आहे.
जात व्यवस्थेचं स्थान या सर्वच प्रश्नात
भारतात कुठलाही सुधारणेचा प्रश्न घ्या, तंत्रज्ञान घ्या, साहित्य-सिनेमा घ्या, मराठी आग्रह आंदोलन घ्या, शेतीप्रश्न घ्या, भ्रष्टाचाराची समस्या, आरोग्य आणि शिक्षण घ्या, सहकार चळवळ घ्या, कामगार प्रश्न घ्या, हिंदू-मुस्लिम प्रश्न घ्या, ग्राम सुधारणा घ्या. जात व्यवस्थेचं स्थान या सर्वच प्रश्नात आहे. जेव्हा जेव्हा जातीच्या प्रश्नाकडे या क्षेत्रातल्या सुधारणा चळवळींनी दुर्लक्ष केलं तेव्हा तेव्हा जात (mutation होऊन) नव्या अवतारात घट्ट होत गेली. उदा. जातीतले सरंजाम शैक्षणिक संस्थाचालक झाले, त्यांचं वर्चस्व अबाधित राहिलं.
भारतीय राजकारणावर सर्वाधिक प्रभाव पाडण्याची क्षमता असणारा शेतकरी वर्ग हा शेतमजूर श्रमिकाला आपल्या चळवळीत बरोबरीचे स्थान देत नाही. परिणामी भारतात सामाजिक आणि राजकीय परिवर्तन उथळ पातळीवर राहिलेलं आहे. राजकारणात जात प्रभावी आहे असं सरळधोपट वरवरचं विधान भारतातील राजकीय अभ्यासकांनी केलं आणि तेच लोकांच्या मेंदूत उतरत राहिलं. आणि राजकारण वाईट तसंच जात वाईट ( म्हणजे जातीला चर्चेत आणणं वाईट) इतकं अज्ञानी आपण होत गेलो. राजकारण हा छोटा दृश्य भाग आहे. पूर्ण सामाजिक पर्यावरणाला जातीव्यवस्था लगडलेली आहे. व्यक्ती, कुटुंब, अभिरुची, उत्पन्न सगळीकडे. रामचंद्र गुहाचं वाक्य थोडं वेगळं करून त्यांच्या शैलीत सांगायचं तर,
“In every Indian there is a caste cognition and everyone trying to avoid it.”
जातीअंत चळवळीतील प्रभावशाली व्यक्तीच्या वाक्याने लेखाचा शेवट करतो.
” या देशाची उन्नती येथील जातीभेद ज्या प्रमाणात नाहीसे होतील,त्यावर अवलंबून आहे.”
– राजर्षि शाहू महाराज
आभार :
मेन्टल हेल्थ वरील ऑरग्युमेंटसाठी थेरपिस्ट गौरी जानवेकर यांच्यासोबतचच्या चर्चांची;
पर्यावरणवादावरील ऑरग्युमेंटसाठी प्रा. यशवंत सुमंत, गौरव सोमवंशी यांच्या मांडणीची मदत झाली.
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
Comments 3