पुणे: राज्यात काहीही घडू शकतं : शरद पवार-अजित पवार एकत्र येऊ शकतील – अतुल बेनकेचं खळबळजनक वक्तव्य : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. वेगवेगळ्या मतदारसंघांत आपली ताकद किती आहे याची चाचपणी या राजकीय पक्षांकडून केली जात आहे. त्यासाठी राज्यातील बडे नेते महाराष्ट्रभर फिरत आहेत. दुसरीकडे, काही नेते आणि विद्यमान आमदार विजयाचे गणित बघून सोयीच्या पक्षात जाण्याची तयारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेले अतुल बेनके यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळातील चर्चांना मात्र उधाण आले आहे. या भेटीवर अतुल बेनके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार आमच्यासाठी दैवत आहेत
अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत बेनके अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार का, असे विचारले जात आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, बेनके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या या भेटीबाबत कोणत्याही प्रकारचा राजकीय अर्थ काढू नये. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमच्यासाठी दैवत आहेत. गेल्या ४० वर्षांपासून बेनके परिवाराचा राजकीय इतिहास हा शरदचंद्र पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील यांच्या आशीर्वादाने चालू राहिलेला आहे. सध्या राजकीय स्थित्यंतरं झाली आहेत. सहा महिने तटस्थपणाच्या भूमिकेनंतर, जुन्नर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी अजित पवार यांच्यासोबतच राहणं पसंत करेन,” असे बेनके म्हणाले.
त्यांचे स्वागत करणे ही माझी जबाबदारी
” लोकसभेच्या निवडणुकीत मी घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढविलेल्या आढळराव पाटील यांचा प्रचार केला म्हणून वेगळे प्रश्न उपस्थित करण्याची गरज नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून शरद पवार यांचे स्वागत करणे ही माझी जबाबदारी आहे. परंतु त्यांच्या स्वागत करण्यापलीकडे दुसरे काहीही नव्हतं,” असे बेनके यांनी स्पष्ट केले.
कदाचित शरद पवार-अजित पवार एकत्र येऊ शकतील
“पक्षप्रवेशाबाबत मला शरद पवार काहीही बोलले नाहीत. मीही त्यांना काहीही बोललो नाही. म्हणूनच पक्षांतराचा प्रश्नच नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरं घडली आहेत. भविष्यात काहीही होऊ शकतं.
कदाचित शरद पवार, अजित पवार एकत्र येऊही शकतील. भविष्यातील राजकारणाबाबत सध्यातरी काहीही सांगता येत नाही.
मी घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्षासोबत आहे. पण भविष्यात अशा काही गोष्टी घडल्या तर मी काही सांगू शकत नाही,”
असेही अतुल बेनके म्हणाले आहेत.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 20,2024 | 12:15 PM
WebTitle – Sharad Pawar-Ajit Pawar can come together – Atul Benke’s statement