धम्मचक्र प्रवर्तन दिन, १४ ऑक्टोबर की विजयादशमी ? ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु, हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक येवले मुक्कामी युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची ऐतिहासिक ‘भीम गर्जना’ केली अन् रक्ताचा एकही थेंब न सांडता, १४ ऑक्टोबर १९५६ साली लाखो अनुयायांसह पवित्र नागभूमीत ‘न भूतो, न भविष्यती’ अशी जागतिक धम्मक्रांती घडविली. मनुष्यहीन, भविष्यहीन, अखंड अंधकारमय लाखो उपेक्षित, शोषितांच्या जीवनात परिवर्तनवादी स्थित्यंतर घडविले. त्यावेळी दिक्षार्थींना २२ प्रतिज्ञा देऊन, दुसऱ्या दिवशी बाबासाहेब बुध्द धम्माच्या आचरणासंदर्भात म्हणतात, “मात्र तुमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल अशी कृती तुम्ही केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण गळ्यात एक मढे अडकवून घेत आहोत अस मानू नका.
हिंदू मानसिकतेचा पोटभेद, विषमता काही प्रमाणात आजही सर्वत्र दिसून येते
बौद्ध धर्माच्या दृष्टिने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे. म्हणूनचं आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाही तर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीत आणला असे होऊ नये म्हणून आपण दृढनिश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्याबरोबरचं देशाचा इतकेचं नव्हे तर, जगाचाही उध्दार करु. कारण बौद्ध धर्मांनेच जगाचा उध्दार होणार आहे.” बाबासाहेबांची बौद्ध धम्मासंदर्भात संकल्पना किती व्यापक, जागतिक होती हे यावरुन सिद्ध होते. म्हणूनचं आपण बुध्द धम्म स्विकारला तेव्हाचं ‘बौद्ध’ म्हणूनचं आपल आचरण असलं पाहिजे होत. परंतु, धर्मांतराच्या साठीनंतरही हिंदू मानसिकतेचा पोटभेद, विषमता काही प्रमाणात आजही सर्वत्र दिसून येते. धम्माची नवी परिभाषा जन्माला येत असून, ती हिंदू धर्माला समांतर, अनुकरणीय आणि प्रतिक्रियावादी आहे. आपण धम्माच्या वाटेवर नव्हे तर धर्माच्या ( हिंदू ) वाटेवर चाललो आहोत असे वाटते. मात्र, ३ ऑक्टोबर १९५७ रोजी, विजयादशमी दिनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली त्याचा वर्धापनदिन दिन ३ ऑक्टोबर ऐवजी विजयादशमी दिनी का साजरा केला जात नाही ?
बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली, धम्मक्रांती केली. बुध्दाचे धम्मचक्र जगावर फिरवून, पाश्चात बौद्ध जगाशी संबंध जोडला. त्या दिवसाची जगानेही सुवर्ण अक्षरांनी नोंद घेतली. मात्र तो सुवर्ण दिन, शिवजयंती प्रमाणे काही लोक १४ ऑक्टोबर अन् काही लोक विजयादशमीला संपन्न करतात. १४ ऑक्टोबरचा तिथीशी संबंध नसतो तर, विजयादशमीचा संबंध तिथीशी येतो. मग बाबासाहेबांनी जी जागतिक धम्मक्रांती घडविली तिला तिथीमध्ये बंधिस्त करुन, भारतीय परिघात बांधून ठेवणार आहोत की, त्याला आपण जागतिक परिभाषा देणार आहोत ? एवढेचं नव्हे तर, धर्मांतराच्या दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी बौद्ध धम्माने जगाचाही उध्दार होणार आहे असे आपल्याला का सांगितले याचाही गांभिर्यांने विचार झाला पाहिजे.
बाबासाहेबांनी आपल्या भाषणात अशोक विजयादशमीचा कुठेही उल्लेख केलेला नाही
देवानंप्रिय महान चक्रवर्ती सम्राट अशोकाचे साम्राज्य फार मोठे होते हे कोणीही नाकारु शकणार नाही. त्यांनी कलिंग विजय मिळविल्यानंतर रणांगणावरील मृत्यूंचा खच पाहून त्यांना पश्चाताप झाला होता. तर अशा वेळी ते कलिंग विजयाचा दिन विजयादशमी म्हणून ते कसा सादरा करु शकतात ? मात्र कलिंग युध्दांने त्यांच्या जीवनात परिवर्तन होऊन कलाटणी मिळाली व त्यानंतर त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन केले असणार, कारण कलिंग युध्दापुर्वीचं सम्राट अशोकाचा बौद्ध धम्माशी संबंध होता असा निष्कर्ष १४ ऑक्टोबर १९७५ रोजी कालिकत विद्यापीठाच्या अभ्यास पथकांने काढला असून त्याला आंबेडकरी चळवळीचे गाढे अभ्यासक राजा ढाले, बबन लव्हात्रे यांच्यासारख्या अनेक अभ्यासकांनी मान्यता दिली आहे. १४ ऑक्टोबर दिनी बाबासाहेबांनी सम्राट अशोकाच्या विजयादशमी दिनी धम्मक्रांती घडवली अस आपण ग्राह्य धरल तर, त्यांनी तोचं दिवस का निवडला ?
धम्मचक्र प्रवर्तन दिन, १४ ऑक्टोबर की विजयादशमी ?
२४ मे १९५६ रोजी बाबासाहेबांनी तथागत भगवान गौतम बुध्दांच्या २५०० व्या जयंती दिन
धम्मक्रांती घडवून आणण्यासाठी का निवडला नाही ?
कारण बाबासाहेबांनी आपल्याला बुध्दाचा धम्म दिला आहे.
तसेच धर्मांतरानंतरही बाबासाहेबांनी आपल्या भाषणात अशोक विजयादशमीचा कुठेही उल्लेख केलेला नाही.
२३ सप्टेंबर १९५६ ला बाबासाहेबांनी नागपूर येथे धर्मांतराची तारीख १४ ऑक्टोबर १९५६ निश्चित केल्यानंतर,
दादासाहेब गायकवाड, दै. प्रबुध्द भारत, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेला जो पत्रव्यवहार केला आहे
त्यात बाबासाहेबांनी दसर्याच्या दिवशी ता. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे
मी बौद्ध दीक्षा घेणार आहे असा शब्द प्रयोग केलेला आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाला आपण तिथीत का बंधिस्त करत आहोत ?
तर, भारतीय बौद्धजन समितीने सामुदायिक धर्मांतराची जी कार्यक्रम पत्रिका तयार केली होती
त्यात रविवार दि. १४ – १० – १९५६ (अशोक विजयादशमी) असा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे.
बाबासाहेबांनी धर्मांतराबद्दल अथवा बौद्ध धम्माबद्दल जी काही भाषणे केलेली आहेत
त्यात त्यांनी विजयादशमीचा कधीही उल्लेख केलेला आढळून येत नाही.
१४ ऑक्टोबर दिनी धम्मचक्र प्रवर्तन दिन जागतिक पातळीवर साजरा न करता,
विजयादशमीला का संपन्न केला जात आहे ? धम्मचक्र प्रवर्तन दिनाला आपण तिथीत का बंधिस्त करत आहोत ?
१३ ऑक्टोबर १९३५ रोजी बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा करुन, तब्बल २१ वर्षे अध्ययन करुन १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धर्मांतर केले. धर्मांतराच्या प्रक्रियेत त्यावेळी बाबासाहेबांचे राजकीय सहकारी नव्हते. त्यांचा धर्मांतरापेक्षा राजकारणाकडेचं जास्त कल होता. एवढेचं नाही तर, १२ ऑक्टोबर १९५६ रोजी धर्मांतराच्या पुर्वसंध्येला नागपूर उंटखान्यातील बैठकीत बाबासाहेबांबरोबर आपण बौद्ध धम्म स्विकारला तर आपल्या राजकीय सवलती जातील या भितीपोटी धर्मांतर करायचे नाही असा निर्णय प्रमुख पुढार्यांनी घेतला होता.परंतु आर. डी. भंडारे यांनी त्यांना त्यावेळी कडाडून विरोध करुन इशारा दिला की, आपण नेते आहोत ते केवळ बाबासाहेबांचे अनुयायी आहोत म्हणून, बाबासाहेबांविरुध्द बंड केल तर जनता आपल्याला फेकून दिल्याशिवाय राहणार नाही.
राजकारणी व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अफवेचे पेव
१५ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर शाम हॉटेलमध्ये बाबासाहेबांनी मार्गदर्शनपर भाषणात तुम्हांला राजकारणात अधिक आवड असल्याचेही तत्कालीन हौशी राजकीय नेत्यांना म्हटले होते. म्हणूनचं त्यांनी धम्म दिक्षेच्या सोहळ्याची जबाबदारी राजकीय नेत्यांवर सोपविली नाही. व बाबासाहेबांच्या पश्चात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा पहिला वर्धापनदिन १४ ऑक्टोबर १९५७ रोजी संपन्न व्हायला पाहिजे होता.
परंतु केवळ राजकारण्यांच्या दृष्टिने दीक्षा भूमी अन् त्यावर येणार्या बौद्ध जनतेचा उपयोग
आपल्या रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेसाठी व्हावा तसेच ३ ऑक्टोबर १९५६ रोजी,
विजयादशमी दिनी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी लाखोंच्या संख्येंने जनतेने दीक्षाभूमीवर उपस्थित रहावे
यासाठी राजकारणी व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अफवेचे पेव निर्माण करण्यात आले होते.
अन् त्या विजयादशमी दिनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना करुन धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.मात्र ते राजकीय पुढारी धर्मांतराच्या प्रक्रियेत नव्हते. त्या दिवसापासून १४ ऑक्टोबर पेक्षा, विजयादशमीलाचं धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र, प्रत्येक वर्षी १४ ऑक्टोबर रोजीचं धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा झाला पाहिजे असा सूर बी. सी. कांबळे, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, वामनराव गोडबोले, डॉ. पंचभाई, राजा ढाले, बबन लव्हात्रे अशा अनेक मान्यवर विचारवंतांनी लावला होता.
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)