नागपूर: नागपूर दीक्षाभूमी येथील अंडरग्राऊंड पार्किंगमुळे ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या स्तुपाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, दीक्षाभूमी स्मारक समिती लोकांना विश्वासात न घेता विकासकामे रेटत असल्याचा आरोप करत राज्यभरातील आंबेडकरी अनुयायांनी पार्किंगच्या कामाला विरोध करत जोरदार आंदोलन केले होते. संतप्त जमावाने अंडरग्राऊंड पार्किंग होऊ देणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने आंदोलनकर्त्यांचा रोष लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. विधिमंडळ अधिवेशनात देखिल या घटनेचे पडसाद उमटले.यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधकामाला स्थगिती देत असल्याची घोषणा विधानसभेत केली.
लेखी आश्वासन दिल्यानंतर संतप्त जमाव शांत झाला
नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीवरील सौंदर्यीकरण आणि नवीनीकरणाच्या प्रकल्पातील अंडरग्राऊंड पार्किंगला आंबेडकरी अनुयायांकडाडून विरोध दर्शवत परिसरात आक्रमक आंदोलन करण्यात आले. शेकडो संतप्त आंबेडकरी कार्यकर्त्यांनी विकासकामाच्या साहित्याची तुफान तोडफोड केल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागपूरचे पोलीस आयुक्त सिंघल यांनी घटनास्थळी धाव घेत स्मारक समिती व राज्य शासनाशी चर्चा करून दीक्षाभूमीवरील बांधकाम त्वरित थांबविण्यात येत आहे असे घोषित केल्यानंतर संतप्त अनुयायी शांत झाले. स्मारक समितीने बांधकाम थांबवत असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर संतप्त जमाव शांत झाला.
दीक्षाभूमी परिसरात मोठय़ा संख्येने जमलेल्या संतप्त जमावाने होत असलेल्या विकासकामाच्या साहित्याची तोडफोड केली. विकासकामाला आमचा विरोध नसून केवळ चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंगला आमचा विरोध असल्याचे मत या आंदोलकांनी बोलताना व्यक्त केले आहे. संतप्त आंदोलकांनी स्मारक समिती व राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देत परिसरातील अंडरग्राउंड पार्किंगच्या कामाला विरोध केला. आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जोपर्यंत आम्हाला काम थांबविण्याचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यानी घेतल्याने पोलीस आयुक्तांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. फडणवीस यांनी दीक्षाभूमी परिसरातील आंदोलनाची गंभीर दखल घेत येथील विकासकाम त्वरित बंद करण्यात येत असल्याचे जाहीर केले. पोलीस आयुक्त सिंघल यांनी डॉ. आंबेडकर स्मारक समितीने आंदोलकांना हे काम त्वरित बंद करण्यात येत असल्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतरच संतप्त आंदोलक शांत झाले.
सर्वांच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल – देवेंद्र फडणवीस
नागपूर दीक्षाभूमी येथील विकासाचा आराखडा स्मारक समितीने तयार केला आहे.
या कामासाठी राज्य सरकारकडून विकास निधी म्हणून 200 कोटी रुपये निधी पुरवला आहे.
स्मारक समितीच्या आराखडय़ाप्रमाणे भूमिगत पार्किंगचे काम हाती घेण्यात आले होते.
मात्र जनतेच्या भावना लक्षात घेत कामाला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
यासंदर्भात एक बैठक घेऊन सर्वांच्या संमतीनेच पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दीक्षाभूमी भूमिगत पार्किंग ; नेमका वाद काय?
नागपूर येथील दीक्षाभूमी वरील सौंदर्यीकरण आणि नवीनीकरणाच्या विकासकामासह परिसरात भूमिगत पार्किंग केली जात आहे. मात्र, या विकासकामाच्या संदर्भात दीक्षाभूमी स्मारक समितीने मनमानी करत लोकांना विश्वासात न घेता हे विकासकार्य सुरू केले असून अंडरग्राऊंड पार्किंगमुळे ऐतिहासिक दीक्षाभूमी च्या स्तुपाला धोका निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 02,2024 | 09:12 AM
WebTitle – Suspension of underground parking construction at Dikshabhumi