मला या मनुपुरोगामी Ecosystem (परिसंस्था) ची आता कीव यायला लागली आहे . ‘मनुपुरोगामी’ या शब्दाची व्याख्या म्हणजे अशी व्यक्ती की जी वरकरणी पुरोगामीपणाचा आव आणते पण प्रत्यक्ष कृतीतून मनुवादाला पोषक अशी भुमिका घेते. या लोकांची एक स्वतंत्र ईकोसिस्टिम आहे जी वंचित, बहुजन ,
शोषित आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या लोकांविषयी समाजातील आपल्या प्रभावाचा उपयोग करून जनमानसात संभ्रम निर्माण करते.
जो माणूस व्यवस्थेशी लढायचा प्रयत्न करतो त्याचा हे उदो उदो करतात, पण तोपर्यंतच जोपर्यंत यांच्या राजकीय किंवा सामाजिक सोयीचे असते.
त्या व्यक्तीने थोडीफार जरी यांच्या गैरसोयीची भूमिका घेतली की त्याला खलनायक ठरवून हे मोकळे होतात.
उदाहरणार्थ ममता बॅनर्जी, मनोज जरांगे पाटील , नितीश कुमार इत्यादी . त्यातील नवीन नाव म्हणजे हेमंत सोरेन.आता याला ते सपोर्ट करत आहेत.
पण या माणसाने थोडी जरी स्वतंत्र राजकीय भूमिकाघेतली तर त्याला हे ‘बी टीम’ चे लेबल लावतील.ममता आणि जरांगें सोबत हेच घडलं .
आंबेडकरवादी बहुजन नेत्यांचे राजकीय व वैचारिक चारित्र्यहनन
सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मनुपुरोगाम्यांचे नवीन लक्ष्य आहे वंचित बहुजन आघाडी पक्ष आणि त्याचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर. वंचित बहुजन आघाडीने लोकशाहीचे/राजकारणाचे सामाजिकीकरण ही आंबेडकरवादी संकल्पना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत , जनमानसात पक्षाचा प्रभाव वाढतो आहे . याच्यामुळे या मनुपुरोगामी व त्यांच्या प्रस्थापित पक्षातील मालकांच्या सोयीच्या व्यवस्थेला तडा जात आहे . त्यामुळे आता यांनी वंचित बहुजन आघाडीवर विनापुरावा, VBA ही BJP ची ‘बी टीम’ आहे अशी चिखलफेक सुरू केली आहे.
तस पहायला गेलं तर या मनुपुरोगामींचा आंबेडकरवादी पक्ष, संघटना, विचार यांना सुप्त विरोध किंबहुना तिरस्कार आहे. कारण यापैकी बरेच लोक सरंजामी जातीयवादी,मनुवादी मानसिकतेने ग्रस्त आहेत.सालगड्या प्रमाणे एक तर ‘आम्ही’ किंवा ‘ते’ या बायनरी मध्ये आंबेडकरवादी न अडकता , स्वतःचे वेगळे
अस्तित्व निर्माण करू पाहतात याचा त्यांना राग आहे. वरकरणी आम्ही तुमचे मित्र आहे असे भासवतात.पाठीमागून हे काही तथाकथित पुरोगामी पाळीव पत्रकार आणि विचारवंत हाताशी धरुन आंबेडकरवादी बहुजन नेत्यांचे राजकीय व वैचारिक चारित्र्यहनन करतात.
यावर जर आंबेडकरवादी लोकांनी पुरावे मागितले किंवा थोड्याफार तिखट प्रतिक्रिया दिल्या , तर त्यांना हे प्रतिगामी, फॅसिस्ट असे लेबल लावतात. आम्हीच कसे खरे आंबेडकरवादी अशी टिमकी वाजवून तुम्हाला कसे आंबेडकर कळले नाहीत असा न्यूनगंड निर्माण करायचा प्रयत्न करतात.सर्वसमावेशकतेच्या नावाखाली सर्वांनी आपले हक्क, अधिकार आणि विचार गुंडाळून यांना मदत करावी असे यांना वाटते , कारण ‘हेच’ लोक फक्त ‘मनुवादी’ शक्तींशी लढतात असा गैरसमज बाळगतात.
प्रत्यक्षात हे मनुपुरोगामी सोयीनुसार कुंपणाच्या दोन्ही बाजूंना उड्या मारतात.यांच्या आजवरच्या मुळमुळीत,बोटचेप्या
आणि संधीसाधू राजकीय,धार्मिक व सामाजिक धोरणांमुळेच आज आपला देश प्रतिगामी शक्तींच्या हातात गेलेला आहे.
तरी यांची ‘जैसे थे वादी ‘(Status-quoist) विचारसरणी गेलेली नाही.
उलट ती कायम राहावी यासाठी बाकीच्यांनी आपली अस्मिता सोडावी ही यांची अपेक्षा.
या मनुपुरोगामी लोकांनी आधी स्वतः मध्ये सुधारणा करावी आणि मग बाकी लोकांना कॅरेक्टर सर्टिफिकेट वाटावे असे मला वाटते.
तुमच्या मनातील ‘मनु’ आधी नष्ट करा
जर तुम्हाला खरोखरच आमच्या खांद्याला खांदा लावून ‘प्रतिगामी’ शक्तींशी लढायचे असेल तर तुमच्या मनातील ‘मनु’ आधी नष्ट करा.
आणि खऱ्या अर्थाने, वर्तनाने आणि कृतीने ‘पुरोगामी’ व्हा !
सन्मान आणि भागीदारी यात कुठलीही तडजोड होणार नाही.खऱ्या पुरोगामी , समतावादी, फुले-शाहू-आंबेडकरवादी मित्रांनी
प्रतिक्रियावादी न बनता यांच्यावर रचनात्मक टीका करावी.कारण आपल्याला प्रतिक्रियावादी बनवून मुळ विषय भरकटवण्यात यांचा हातखंडा आहे.
हलके फुलके मिम्स, विनोद , तार्किक प्रश्न यातून आपले विचार ठसवून यांना उघडे पाडता येते.
जर आपल्याला या देशातील राजकीय लोकशाही टिकवायची असेल आणि सामाजिक लोकशाही निर्माण करून
समतावादी समाज निर्माण करायचा असेल तर सोबत लढावं लागेल. पण हक्क,सन्मान,भागीदारी,समानता या गोष्टींमध्ये तडजोड नाही.
कारण जर लोकशाही साठी लढणारे या गोष्टी मानत नसतील तर त्यांना लढाईचा नैतिक अधिकारच नाही.
डाॅ.सुश्रुत दिलीप सावंत
लेखक सामाजिक चळवळींचे अभ्यासक असून,गेली अनेक वर्षे सोशल मिडिया आणि ब्लॉगिंगच्या विश्वात लेखन करत आहेत.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 01,2024 | 19:45 PM
WebTitle – MANU PROGRESSIVE ECOSYSTEM