मुंबई ते (कतार) दोहा हा तीन साडेतीन तासाचा विमान प्रवास. मुंबईच्या ट्राफिक मधून मार्ग काढीत ४.३० च्या दरम्यान छत्रपती शिवाजीमहाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट’ला सह कुटुंब पोहचलो. ट्राफिक मुळे अपेक्षा पेक्षा अर्धा पाऊण तास उशिरा एअरपोर्ट’ला पोहचलो. सगळ्या फॉर्मॅलिटी कम्प्लिट करून ५.३० ला बोर्डिंग केले. संध्याकाळी ६.१५ ला विमान टेक ऑफ झाले. संध्याकाळची वेळ असल्यामुळे वातावरण तसे प्रसन्न होते. उजव्या बाजूच्या खिडकीतून बाहेर पाहिले तर क्षितिजावर लाल पिवळसर अशी छान छटा पसरलेली दिसली. विरुद्ध दिशेला म्हणजे डाव्या बाजूला सहज नजर गेली तर आकाश व क्षितिज निळेशार दिसत होते. दोन बाजूच्या दोन खिडक्यातून एकच वेळी वेगवेगळी दृश्य दिसत होते. वाटले जिथे आकाश लाल दिसत आहे ती पश्चिम दिशा असावी. सूर्य मावळला म्हणून लाल दिसत असावी. पण जसजसे विमान पुढे सरकत होते उजवी दिशा काळोखात बुडत चालली होती तर विरुद्ध बाजूची दिशा लाल पिवळा रंग धारण करित होती.
एकच वेळी दोन दिशांचे भिनत्व दिसत होते , ते लक्षपूर्वक पाहत होतो. उजव्या बाजूच्या खिडकीतून दिसणारे अकाश/ क्षितिज काळेभोर होत चालले होते म्हणजे रात्र होत होती तर डाव्या खिडकीतून दिसणारे क्षितिज लालसर दिसत होते म्हणजे सूर्यास्त होतांना दिसत होता. सूर्य दिसत नव्हता तो मावळला होता आकाश मात्र लाल दिसत होते. या आगोदर प्रवास करताना असे कधी जाणवले नव्हते. मला वाटते दक्षिणोत्तर दिशेने विमान जात असावे त्यामुळे पूर्व पश्चिम असे दोन भाग झाले असावेत. त्यामुळे एकाचवेळी आकाशात एका दिशेला संध्याकाळ तर दुसऱ्या दिशेला रात्र दिसत असावी.
कतार एक श्रीमंत सुसंस्कृत समृद्ध देश :
कतार हा जगातील पहिल्या पाच श्रीमंत देशामधील एक देश. ग्लोबल फायनान्स मॅगेजीन ( Global finance magazine ) च्या रिपोर्ट नुसार दर डोई उत्पन्ना नुसार कतार देश सन २०२३ साली जगातील श्रीमंत देशाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे तर भारत १३० व्या क्रमांकावर आहे. सन २०१० मध्ये तर कतार पहिल्या नंबरवर होता पण नंतर तिसऱ्या चौथ्या नंबरवर त्याची घसरण झाली आहे. जगातील पहिल्या पाच श्रीमंत देशांपैकी एक देश नेमका कसा असावा याची उत्सुकता मनामध्ये होतीच. याचे कारण ही तसेच होते. अमेरिका, इंग्लंड, फ्रांस, चिन, जपान, जर्मनी अशा नामांकित विकसित मोठ्या देशातील एक ही देश हे पहिल्या पाचत नाही. त्यामुळे उत्सुकता अधिकच वाढलेली होती.
मुलीच्या व जावयाच्या आग्रहामुळे कतारला जायचे निश्चित झाले.
जावई कतार एयरवेज मध्ये इंजिनियर म्हणून नोकरीला आहेत तर मुलगी डॉक्टर म्हणून तिथे काम करते आहे. सांगण्याचे प्रयोजन म्हणजे जावई कतारच्या सरकारी नोकरी मध्ये आहेत. कतार’चे कायदे अत्यंत कठोर आहेत आणि सरकारमध्ये नोकरी करणाऱ्यांना ते काटेकोरपणे पाळायचे असतात. म्हणून विमानातून प्रवास करतांना सरकारी कर्मचारी व त्यांचे नातेवाईक यांनी कम्पलसरी फॉर्मल कपडेच घालायचे असा सरकारचा नियम आहे.
टी शर्ट, जीन पॅन्ट, स्पोर्ट बूट घालायला परवानगी नाही. स्त्रियांनी पूर्ण अंग झाकेल असा ड्रेस घालायचा असतो.
चप्पल नघालता बूट घालायचे असतात. स्त्रियांचे नख ही दिसू नये हा त्या मागचा उद्देश असतो. इतर प्रवाश्यांना मात्र हे नियम लागू नाहीत.
इतर प्रवासी जीन, टी शर्ट घालू शकतात मात्र ते कपडे तोकडे ( शॉर्ट ) असता कामा नये.
पूर्ण अंग झाकेल असे कपडे परिधान करणे सक्तीचे आहे. एअरपोर्ट ला खूप फॉर्नर दिसले पण सर्व पूर्ण कपड्यात दिसले.
नेहमी फॅशनेबल तोकड्या कपड्यात वावरणारे फॉर्नर चक्क सोज्वळ पेहरावात ? ते दृश्य डोळ्यांना अपरिचित वाटले.
चोरी, विनयभंग मुक्त देश कतार :
चोरी, विनयभंग या सारख्या अपराधा पासून हा देश पूर्णतः मुक्त आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
चुकून अशा घटना घडल्या तर कठोर दंडाला समोरे जावे लागते.विमान दोहा इएरपोर्ट ला लँड झाले व आम्ही विमाना बाहेर आलो
तर प्रथम जाणवली ती सभोवार पसरलेली चीर शांतता. आम्हाला न्यायला सरकारी बस हजर होती.
बस मध्ये चढतांना चुकूनही अनोळखी मुलीला, किंवा स्त्रीला धक्का लागू नये याची काळजी घ्यावी लागली.
माझ्या मुलीने बस मध्ये स्त्रिया बसलेल्या शीट शेजारी उभे न राहण्याची खूण केली.
बाहेर आल्यावर मुलीने सांगितले एखाद्या स्त्रीने तक्रार केली तर सरळ तुरुंगात पाठवले जाते त्यामुळे सर्वजण काळजी घेत असतात.
कुणाची पर्स जरी खाली पडली तरी कुणी चुकूनही त्याला हात लावीत नाही. सर्वीकडे कॅमेरे बसविले आहेत.सर्व कतार डिजिटल आहे.
तुम्ही कतार मध्ये पाय ठेवल्या पासून तुमचा सर्व डेटा सेव केला जातो.
तुम्ही पन्नास वर्षांनी जरी पुन्हा कतारला आला तरी तुमचा सर्व डेटा त्यांना चेक करता येतो.
मागच्या साथीच्या काळात एखादा पेशंट चुकून सार्वजनिक स्थळी, दुकानात गेला तर अलार्म वाजायचे इतकी त्यांची व्यवस्था अद्ययावत व सतर्क होती. प्रत्येक व्यक्ती अंडर ऑब्जर्वेशन होती. आता ही एकप्रकारे सर्वांवर पाळत ठेवली जाते. विज्ञानाच्या प्रगतीने कतार सारख्या देशात स्त्रिया, अबाल वृद्ध सुरक्षित झाले आहेत तर काही देशात विज्ञानाचा मुक्त वापर माणसांना वेठीस धरण्यासाठी सुद्धा केला जातो आहे.
दोहा विमानतळ भव्य, प्रशस्त, स्वच्छ सुंदर आहे. माणसे आपसात बोलतांनाही अगदी हळू आवाजात बोलत होते. विमानतळावरील सर्व सोपस्कर पार पाडून कतार वेळेनुसार रात्री ९.३० च्या दरम्यान आम्ही घरी पोहचलो.
क्रमशः
अशोक हंडोरे
नाट्यकर्मी,सामाजिक चळवळ विश्लेषक
अमेरिका मध्ये 14 ऑक्टोबर 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक,सर्वात मोठ्या पुतळ्याचे भव्य अनावरण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 18,2023 | 14:40 PM
WebTitle – A journey from India to Qatar