चर्मकार पोराने स्वतःच्या घरावर लावली बाबासाहेबांची सही…महाराष्ट्राची भूमी ही थोर संतांची ,समाज सुधारकांची व महामानवांची भूमी आहे. हल्लीच्या आधुनिक युगामध्ये अनेक लोक वैयक्तिक जीवनामध्ये कोणाला तरी आपले प्रेरणास्थान आणि आदर्श मानत असतात व त्यानुसार जीवनामध्ये मार्गक्रम करत असतात.असाच एक आगळावेगळा अनुभव मुक्ताईनगर तालुक्यामध्ये असलेल्या रुईखेडा या गावांमध्ये 14 एप्रिल च्या निमित्ताने लोकांना अनुभवास आला.रुईखेडा गावामध्ये चांभार समाजाची वीस पंचवीस घरांची वस्ती आहे.
बहुतांश कुटुंबांची घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे व आर्थिक परिस्थिती प्रबळ आणि सदन नसल्यामुळे
समाजात शिक्षणाचे प्रमाण पाहिजे तसे समाधानकारक नाही परंतु काही विद्यार्थी मात्र बाबासाहेबांना प्रेरणा मानून
बाबासाहेबांसारखे आपण ही शिकले पाहिजे हा संदेश उराशी घेऊन 1980 च्या दशकात धडपडताना दिसत होते.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे गणूबा लोखंडे यांची दोघ मुले राजाराम लोखंडे व संतोष लोखंडे होय.
शिक्षणाचा खडतर प्रवास
ही दोन्ही भावंडे दहावी पास झाल्यानंतर 1980 च्या दशकात बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालया कडे शिक्षणासाठी त्यांची पावले वळली. मिलिंद महाविद्यालयामध्ये गरीब मुलांना शिक्षणाची सोय आहे , तिथे जास्त खर्च लागत नाही , दर महिन्याला शिष्यवृत्ती मिळते आणि गरीब मुलांचे शिक्षण मोफत होते अशी कान- गुण राजाराम लोखंडे व संतोष लोखंडे यांना होती त्यामुळे औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयामध्येच आपले शिक्षण पूर्ण होईल अशी पक्की खुणगाठ त्या दोघं भावांच्या मनावर कोरल्यामुळे त्यांनी आपल्या पुढील शिक्षणाचा मोर्चा औरंगाबाद कडे वळवला.
मिळेल त्या परिस्थितीमध्ये आपला शिक्षणाचा खडतर प्रवास पूर्ण करत असताना येणाऱ्या अनेक अडथळ्यावर ,अडीअडचणीवर व संकटावर या दोघांनीही मात केली. आणि राजाराम लोखंडे यांचे एम एस सी इलेक्ट्रॉनिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले व संतोष लोखंडे यांनी एम कॉम मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले.शैक्षणिक प्रवासामध्ये विचारांची जडणघडण होत असताना व नागसेन परिसरात चळवळीचे बिजारोपण मनावर होत असताना या दोघांच्याही मनावर बाबासाहेबांची प्रेरणा, बाबासाहेबांचे योगदान आणि बाबासाहेबांची चळवळ अजिंठा लेणीवर बुद्धाची मूर्ती जशी कोरल्या गेली तशी या दोघ भावांच्या मनावर ही भावना आपोआप कोरली गेली आणि त्यातूनच पुढे या दोघे ही भावांच्या मनात बाबासाहेबांविषयी नितांत आदर ,प्रेम, आपुलकी ,जिव्हाळा, आपलेपणा आणि आदर्शाची भावना रुजवली गेली.
चर्मकार पोराने स्वतःच्या घरावर लावली बाबासाहेबांची सही
राजाराम लोखंडे नावाचा मुलगा पुढे औरंगाबाद शहरात शिक्षण क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या अशा
सरस्वती भुवन विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून 1990 च्या दशकात रुजू झाला.
याचा मनस्वी आनंद राजाराम लोखंडे यांना झालाच परंतु हे स्वाभिमानाचं जगणं
केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळेच माझ्या जीवनात मला मिळाले
हा बाबासाहेबांविषयीचा आदरयुक्त भाव त्यांच्या बोलण्यातून आजही प्रकट होताना दिसून येतो.
त्यांच्यामुळेच मला आज स्वतःचा बंगला बांधता आला म्हणून कृतज्ञतेतून
बाबासाहेबांना अभिवादन करण्याची एक अनोखी पद्धत त्यांनी अवलंबली.
आणि ज्या युगपुरुषाच्या , महामानवाच्या, भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराच्या सहीने कोटी कोटी कुळाचा उद्धार झाला.
आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं
महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक, कवी मनोजराजा गोसावी यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास { आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र } हीच बाबासाहेबांची सही माझ्या बंगल्यावर शोभून दिसेल आणि तेच माझे मनापासून चे बाबासाहेबांना अभिवादन असेल असा निश्चय त्यांचा झाला आणि त्यांनी चळवळीतील काही जेष्ठ मान्यवरांच्या उपस्थिती बाबासाहेबांच्या सहीचे विमोचन करण्याचा सोहळा आपल्या जन्म गावी रुईखेडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे घडवून आणला.
या सहीचे विमोचन चळवळीतील निष्ठावंत व प्रामाणिक ज्येष्ठ कार्यकर्ते, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आयुष्यमान बी डी इंगळे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या सोहळ्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार दीपध्वज कोसोदे, रुईखेडा ग्रामपंचायतच्या सरपंच माईसाहेब उषाताई गुरचळ, रुईखेडा गावाच्या पोलीस पाटील आदरणीय सविता बढे, ग्रामपंचायत सदस्य मा राजू बंगाळे व मा अतुल बढे,माजी सैनिक मांगो हरी लोखंडे, मा विठ्ठल सावकारे सर,यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मा.श्रीरंग गुरचळ यांनी केले तर आभार राजाराम लोखंडे यांनी मांनले.कार्यक्रमाला गावातील व परिसरातील असंख्य बंधू-भगिनींची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजानन लोखंडे ,गौरव लोखंडे, भूषण मुलतानी व राजू चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.या अभिनव उपक्रमाबद्दल प्रा राजाराम लोखंडे यांचे पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.
मंगेश गायकवाड
सामाजिक कार्यकर्ते
ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी
UK मध्ये आंबेडकर जयंती जल्लोष, हर्षोल्हासात साजरी
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 12,2023 10:52 AM
WebTitle – Babasaheb’s signature on own house