विद्यार्थी दिन – बहुजन उध्दारक महात्मा क्रांतीबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी अनेक त्रासांना सामोरे जात कर्मठांची नगरी समजल्या जाणार्या पुण्यात बहुजनांसाठी शाळा सुरू केल्या. सावित्रीबाईंनी तर चिखल, शेण आणि शिव्यांचा भडिमार सहन करत क्रांतीबा फुलेंचे हे उदात्त कार्य सुरू ठेवले. या शिक्षणाच्या चळवळीतून अनेक बहुजन जागृत झाले.
“नॉर्मल स्कूल”
शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे बहुजनांना पटले. तत्पूर्वी “बामणाच्या घरी लिहीणं, कुरवाड्याच्या(मराठ्यांच्या) घरी दाणं आणि महाराच्या घरी गाणं” अशीच परिस्थिती होती. या परिस्थितीला छेद देण्याचे काम आणि सर्वांना शिकवण्याचे काम महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी केले. सामाजिक असमानता, गरीबी, जातीभेद दुर करण्यासाठी शिक्षणच उपयोगी आहे हे फुले दांपत्याने ओळखले होते तसेच रामजी मालोजी सपकाळ यांनीही ओळखले होते. रामजी सपकाळ हे ब्रिटीश आर्मीत सुभेदार होते. तसेच ते महू येथील सैनिक छावणीत असलेल्या “नॉर्मल स्कूल” चे मुख्याध्यापकही होते. शिक्षणाचे महत्त्व रामजी सपकाळ यांना चांगलेच माहिती होते. याच ठिकाणी १४ एप्रिल १८९१ रोजी भीमरावाचा जन्म झाला.
रामजी सपकाळ यांची ब्रिटीश सेवेतून निवृत्ती झाल्यानंतर
ते काही काळ आंबडवे या त्यांच्या मूळ गावात राहिले आणि नंतर ते साताऱ्यात आले.
साताऱ्यात आल्यावर लहानग्या भीमरावाच्या शिक्षणाची काळजी वाटू लागली.
तेव्हाचा काळ रुढी परंपरा यांचा होता. शिक्षणाची दारे सर्वांनाच सरसकट खुली झाली नव्हती.
रामजी सपकाळ यांनी सातारा कँप स्कूलमध्ये भीमरावाच्या मराठी शिक्षणासाठी नाव घातले.
ते शिक्षण पूर्ण झाल्यावर ७ नोव्हेंबर १९०० रोजी आजच्याच दिवशी रामजी सपकाळ यांनी
आपल्या छोट्या भीमरावाचे नाव सातारा येथील गव्हर्मेंट हायस्कूलमध्ये (आताचे प्रतापसिंह हायस्कूल) घातले.
विद्यार्थी दिन
साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूल येथे बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाची सुरवात केली. या हायस्कूलमध्ये ७ नोव्हेंबर १९०० रोजी शाळेत प्रवेश घेतल्याची कागदोपत्री नोंद आजही आहे. भीवा रामजी आंबवडेकर अशी त्यांची मोडी लिपीत सही देखील आहे. एक महान युगपुरुष जो आजन्म विद्यार्थी राहीला त्यांची ती सही आहे. रामजी सपकाळ यांची शिक्षणाविषयी असलेली तळमळ, शिक्षणाविषयी असलेले प्रेम आणि शिक्षणातून जीवनमान सुधारले जाते हे या शाळाप्रवेशातून दिसते. हलाखीचे दिवस काढत आपल्या मुलांना शिक्षण देण्याची ही धडपड रामजी सपकाळ यांनी दाखवली नसती तर आज भारतातील गोरगरीब जनतेची काय अवस्था असती कल्पना देखील करवत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी अपार कष्ट घेतले. त्यांची शिक्षणाविषयीची इतकी तळमळ होती ती तळमळ जिवनाच्या शेवटपर्यंत राहिली. ते अस्पृश्य होते त्यांच्या लहानपणी त्यांना वर्गातही बसू दिले जायचे नाही .वर्गाच्या बाहेर बसून त्यांनी आपले बालपणीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी भारतातील इतर ठिकाणी घेतलेले शिक्षण जे आहे ते थोड्याफार फरकाने असेच अस्पृश्य म्हणून घेतले होते. ते स्वतःला आजन्म विद्यार्थी म्हणून संबोधत . त्यांचे जीवनच पुस्तकांप्रति समर्पित होते, आणि या समर्पण भावनेला एक आदराचे स्थान म्हणून महाराष्ट्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 7 नोव्हेंबर 1900 या शाळा प्रवेश दिनाच्या तारखेला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले आहे.
by सतिश भारतवासी कोल्हापूर
लेखक आंबेडकरी चळवळ अभ्यासक आहेत.
शहीद भगत सिंह : मी नास्तिक का आहे?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)