सफर एका समृद्ध देशाची, कतार ची, भाग 3
कतार कडे प्रयाण केले तेव्हा कतार एक श्रीमंत समृद्ध देश आहे एवढे माहित होते पण इतका सुसंस्कृत , विनयशील, आल्हाददायक असेल अशी कल्पना केली नव्हती.एकीकडे विनयशीलता तर दुसरीकडे अत्यंत कठोर कायदे.कायदे अत्यंत कठोर असल्यामुळे सर्वांच्या अंगी विनयशीलता अपरिहार्यपणे आली असावी.
इन्कमटॅक्स सेलटॅक्स नाही
ह्या देशात इन्कमटॅक्स, सेलटॅक्स अस्तित्वात नाही त्यामुळे ह्या देशात नोकरी करण्यासाठी खूपजण उत्सुक असतात. कारण कोणताही टॅक्स नकापता पूर्ण पगार हाती पडत असतो. पगारावर कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष टॅक्स नसतो. कारण येथे राजेशाही आहे आणि त्यांचेच मंत्रिमंडळ ही आहे. आणि ते कोणत्याही प्रकारचा जनतेवर टॅक्स लावीत नाहीत. आणि त्यामुळे जनताही सुखासमाधानाने जगते आहे.
बाहेरील भांडवालदाराला व्यवसाय प्रवेश नाही
या देशात मोठ्या देशा बाहेरील मोठ्या भांडवलदाराला स्वतंत्रपणे व्यवसाय करता येत नाही वा इंडस्ट्री उभी करता येत नाही. इथे इंडस्ट्री उभी करण्यासाठी किमान एक पार्टनर कतारचा असणे बंधनकारक आहे. कारण इथे प्रथम देशाचा व देशातील जनतेचा विचार करण्यात येतो.
नॅशनल म्युझियमऑफ कतार
आज नॅशनल म्युझियम ऑफ कतार ला प्रथम जायचे निश्चित केले, त्याप्रमाणे नॅशनल म्युझियमला पोहचलो.
डेझर्ट रोझ नावाचा काही प्रकार असतो हे तिथे पोहचल्यावर मला प्रथम कळले.
त्या म्युझियमची रचना इतकी आगळी वेगळी होती की ती अशी का असावी हा प्रश्न पडला होता.
ती रचना म्हणजे मॉडर्न आर्ट आहे की कलात्मकता आहे किंवा काय ते कळत नव्हते.
ती अशी का केली असावी ? असा प्रश्न पडला. अर्किटेक याच्या कल्पना शक्तीचा प्रचंड हेवा वाटला
पण आतमध्ये गेल्यावर प्रत्यक्ष डेझर्ट रोझ पाहिले आणि त्यावरून अशी वास्तू आकारस आली आहे हे स्पष्ट झाले.
ह्या म्युझियममध्ये करोडो वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेले भुचर प्राणी, जलचर प्राणी, पक्षी,अश्मयुगातील मानव त्याने बनविलेली हत्यारे ते आतापर्यंतचा माणसांचा व प्राण्यांचा विकास कसा कसा होत गेला याचा इतिहास भूगोल कल्पकतेने मांडला आहे.
विविध अवशेष , आश्मयुगीन मानवाने बनविलेली हत्यारे जसे इथे जतन करण्यात आले आहेत त्या सोबतच त्याचे चित्रण करून भव्य स्क्रिनवर ऑडिओ – व्हिडीओ द्वारे दाखविले जाते. ते चित्रण इतक्या चांगल्या पद्धतीने केलेले आहे की एखादी हॉलिवूड ची बिग बजेट फिल्म पाहतो आहे असा भास होतो.
एका एका दालनात अनेक भव्य स्क्रीन आणि अशी कित्येक भव्य दालने, सर्व काही अफाट म्हणावे असे आहे. केवळ हे म्युझियम पाहण्यासाठी ही आपण कतारला येऊ शकतो. इतकी स्वच्छता आणि भव्यता की डोळ्यावर विश्वासच बसू नये. खरे म्हणजे हे शब्द वर्णन करण्यास अपुरे पडत आहेत.
कतार : समृद्ध देशाची सफर
म्युझियम पाहून, मंत्रमुग्ध होऊन बाहेर पडलो आणि कतार मधील सर्वात मोठा मॉल पाहण्यासाठी
मॉल ऑफ कतार पाहण्यासाठी अल- रय्यान (Mall of Qatar – Al-Rayyan city) शहराकडे रवाना झालो.
तासा भरच्या प्रवासा नंतर अल – रय्यान शहरात पोहचलो. नेहमी प्रमाणे रस्ते प्रशस्त, ट्राफिक विरहित असल्यामुळे
कार दोहा ते अल – रय्यान शहरापर्यंत १००-१२० च्या स्पीडने जात होती.
रस्ते अत्यंत स्मूथ असल्यामुळे शरीराला कोणताही त्रास जाणवत नव्हता. उलट प्रवास आल्हाददायक वाटत होता.
मॉल ऑफ कतार
कतार मध्ये जिथे ही जावे तिथे भव्यता, स्वच्छता दिसते त्यास हा मॉल ही अपवाद नव्हता. मॉल मधील लॉन इतके प्रशस्त आणि डेकोरेटिव्ह होते की आपण एखाद्या आर्ट गॅलरीत आलो आहोत असे वाटते. माझा मुलगा शिक्षणासाठी अमेरिकेत होता, तो म्हणाला इतके मोठे प्रशस्त मॉल अमेरिकेत ही नाहीत. लक्झेरियस लाईफ जगणे काय असते ते इथे येऊन समजले. पैश्याची कमी नसल्यामुळे प्रत्येक ठिकाणी मुक्त हस्ते पैश्याची उधळण केलेली दिसते. येथील गरिबलोक कसे आयुष्य जगत असावेत म्हणून शोध घेतला तर सुखद धक्काच बसला.
दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के
येथे श्रीमंत आणि गरीब असे वर्ग असले तरी दारिद्र्य रेषे खाली मात्र कुणीही जगत नाही. हा देश दारिद्र्य मुक्त देश आहे. घर काम करणाऱ्या स्त्री पुरुषांना योग्य तो पगार दिला जातो. सर्वसाधारणपणे इथला आठ टक्के समाज गरीब आहे. त्यातील सहा टक्के लोकांना दहा हजार कतार रियाल पर्यंत पगार दिला जातो म्हणजे भारतीय पैशात दोन सव्वादोन लाख रुपयां पर्यंत पगार दिला जातो तर दोन टक्के समाजाला पाच हजार कतार रियाल म्हणजे लाख सव्वालाख रुपये पगार दिला जातो. शिवाय सरकारी योजनाही त्यांच्यासाठी असतात. खरं म्हणजे सर्व जगच दारिद्र्य मुक्त असायला हवे. पण हा सुदिन कधी उगवेल ? आमच्या देशातील म्हणजेच भारतातील गरिबांसाठीच्या योजना त्यांच्या पर्यंत पोहचतच नाही. त्या मधल्या मध्ये हडप केल्या जातात. खेड्यापाड्यात तर दारिद्र्य पाचवीला पुजलेले असते. गरीब आणि श्रीमंत देशाची, तेथील माणसांची दरी मिटणे शक्य नाही पण किमान गरीब देशातील माणसाला दोन वेळचे पोटाला अन्न मिळायला हवे असा विचार करित कार मध्ये बसलो आणि दोहाच्या दिशेने प्रवास सुरु केला.
क्रमशः
अशोक हंडोरे
नाट्यकर्मी,सामाजिक चळवळ विश्लेषक
कतार : सफर एका समृद्ध देशाची,म्युझियम ऑफ इस्लामिक आर्ट भाग -2
कतार : सफर एका समृद्ध देशाची भाग – 1
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 20,2023 | 17:05 PM
WebTitle – Qatar: Zero percent of society below poverty line