ऐंशीच्या दशकात दूरदर्शनवर लागणारी “गोट्या” ही प्रचंड लोकप्रिय मालिका आता पस्तीशी चाळीशीत असणाऱ्यांना ज्ञात असेल.
या मालिकेचं शीर्षक गीत ‘बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत’ हे सुद्धा त्या काळी अतिशय प्रसिद्ध होतं.
हे अर्थपूर्ण गाणं म्हणजे पालकत्वाचा जणू मूलमंत्रच ठरावा अशी रचना आहे. कवीचं हे कवित्व म्हणजे मुलांचं संगोपन कसे करावे सांगणारं तत्वज्ञान वाटते.या गीताने ‘दूरदर्शन’ वर गाजलेल्या ‘गोट्या‘ मालिकेला प्रसिध्दीच्या शिखरावर नेऊन ठेवले. (Gotya Serial Title Song Beej Ankure Ankure)
या गीताबद्दल मात्र नेटवर अनेक गोंधळ किंवा गैरसमज असल्याचे दिसते.
ही जुनी मालिका असल्याने अनेक लोक आपल्या आठवणीप्रमाणे गीतकार संगीतकार यांची नावे सांगतात.
काहींनी हे मंगेश पाडगावकर यांनी लिहिले असावे असे म्हंटले आहे.तर अनेकांनी वेगवेगळी नावे सांगितले.
अनेकांना या गीताच्या लेखकाबद्दल कुतूहल आहे असे दिसते.आम्हालाही असेच कुतूहल होते.म्हणून आम्ही या गीताच्या रचनाकारांचा शोध घेण्याचे ठरवले.
आमचा शोध अर्थातच युट्युबवर असणाऱ्या या मालिकेच्या शीर्षक गीतावरच येवून संपला.याचे गीतकार होते.दिवगंत गीतकार मधुकर आरकडे.
मग शोध सुरु झाला.या गीतकाराबद्दल आणखीन जाणून घेण्याचा.अन त्यातून उलगडत गेलेली माहिती अशी.
‘कुऱ्या चालल्या रानात’ हे गाणं ऐकलं असेल तर, ते थेट तुम्हाला गावातील पेरणी चाललेल्या शेतात घेऊन जातं.
आणि तुमचं मन, कुरीच्या नळीतून जमिनीच्या कुशीत अंकुरण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येक दाण्या सोबत विसावते.
एवढी प्रचंड प्रतिभा लाभलेले कवी आहेत,गीतकार मधुकर आरकडे.
एकापेक्षा एक अजरामर गीतांनी चित्रपटसृष्टीला मोठे योगदान देणारे मधुकर आरकडे यांचा जन्म एका सामान्य रेल्वे कामगाराच्या घरात झाला.
आपलं सर्व आयुष्य मुंबई शहरात जगले असले तरी,सातारा जिल्हात्यातील पाटण तालुक्या जवळील ‘अडुळ’ ह्या आपल्या मूळ गावाला ते विसरले नव्हते.
सह्याद्रीचा हिरव्यागार कुशीत विसावलेली ही भूमी त्यांना सतत साद घालत असे.गावाकडच्या संस्कृतीची पुरेपूर ओळख आणि शहरातील धकाधकीच्या जीवनाची पुरेपूर जाणीव पुढे त्यांच्या लिखाणात दिसते.त्यामुळे त्यांच्या लिखाणात खरेपणा जाणवतो.
त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण जे जे स्कुल ऑफ आर्टस् मधून झाले.ते एक अप्रतिम चित्रकार सुद्धा होते.मुंबई महानगर पालिकेच्या शाळेत अनेक वर्षे त्यांनी कला शिक्षक म्हणून नोकरी केली.
पुढे ते आकाशवाणी मुंबईचे मान्यताप्राप्त गीतकार,कवी आणि गायक म्हणून प्रसिद्धीस आले.
आपल्या चित्रकलेचा छंद त्यांनी आयुष्यभर जोपासला.अनेक पुस्तकांचे,काव्यसंग्रहांचे मुखपृष्ठ त्यांनी रेखाटले आहेत.त्यातील प्रमुख ऋतुरंग,बीज अंकुरे अंकुरे,अभिसारिका,कवितारंग आणि कल्पवृक्ष यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
आपल्या प्रतिभेचा जोरावर एक दशकभर दूरदर्शनवरील विविध मालिकांचे शीर्षकगीत लिहिणारे गीतकार म्हणून ते गाजले.होळी रे होळी,जुईली,गोटय़ा,अक्षरधारा,द्रष्टा ह्या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत.
त्यांनी स्वतःचा मराठी वाद्यवृंद(ऑर्केस्ट्रा) उभा केला होता.त्यामध्ये ते स्वतः बीज अंकुरे अंकुरे ही गीत गायचे.
गाणं सूर आणि तालबद्ध असावं त्यासाठी त्यांनी गायनाचे शिक्षण घेतलं होतं तसेच गाण्याची त्यांना खूप आवड होती, असं ते नेहमी सांगायचे.
त्यांच्या गाण्याच्या अनेक सीडी बाजारात आल्या आहेत त्यामध्ये समर्पिता,श्रावणी मी,अभिसारिका, गीत सिद्धार्थ गौतम,त्यामध्ये मध्ये अनेक गाणी त्यांनी स्वतः गायली आहेत.
ती ऐकताना त्यांच्यातील गायक सुद्धा मनाला भुरळ पाडतो.
त्यांच्या ‘बीज अंकुरे अंकुरे’ या अल्बमला रसिकांनी अक्षरशःडोक्यावर घेतले होते.
त्यांचा ‘अभिसारिका’ हा गीतसंग्रह सुद्धा प्रकाशित झाला होता.
‘आम्ही बोलतो मराठी’,’बंदिवान मी या संसारी’,जन्म,’दुसऱ्या जगातली’,’रामायण’ या प्रसिद्ध चित्रपटातील गीतेही त्यांच्या लेखणीतून उतरली होती.
महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक मंडळाने त्यांचा यथोचित सत्कार करून इयत्ता सातवीच्या मराठी पुस्तकात त्यांच्या बीज अंकुरे अंकुरे या गीताचा समावेश केला.
आणि त्यांच्या शिरपेचात आणखीन एक तुरा रोवला.अलीकडच्या काळात त्यांचे डोंबिवलीत वास्तव्य होते.
15 मार्च 2015 रोजी त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या चौसष्टव्या वर्षी निधन झाले,एका गुणी कवी,गीतकार,गायक,संगीतकार आणि चित्रकारास महाराष्ट्र मुकला.
त्यांनी स्वतःच्या आठवणींचा संग्रह लिहायला घेतला होता पण त्यांच्या अचानक जाण्याने तो त्यांच्या हयातीत प्रकाशित झाला नव्हता.
पुढे तो ‘स्मृतीगंध’ नावाने प्रसिद्ध करण्यात आला.प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते,आणि गौरवाची बाब म्हणजे त्यातील दोन चित्रे ब्रिटिश नागरिकांनी खरेदी केली.
वीर भागवत
लेखन –
हे ही वाचा.. नाटककार विजय तेंडुलकर
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 06 , 2020 14 : 37 PM
WebTitle – gotya serial beej ankure ankure title song